गोकर्णाचा रंग आणि तुळशीचा स्वाद.....

 

  गोकर्णाचा रंग आणि तुळशीचा स्वाद.....


बारशी कधी येते माहितेय...तेव्हा लावा...मग चांगलं रुजल बघा...मी आणि माझा नवरा हातात कृष्ण तुशळीच्या रोपांचा मोठा जुडा पकडून होतो...समोर साठीला आलेली एक महिला आणि तिच्यापेक्षा वयानं थोडे मोठे असलेले गृहस्थ आम्हा दोघांनाही समजून सांगत होते.  पण तो बारशी शब्द आमच्या डोक्यावरुन जात होता.  आम्ही पुन्हा बारशी...बारशी असं बोलून थांबत होतो.  शेवटी त्या गृहस्थाला समजलं...त्यानं विचारलं....बारशी म्हणजे काय...माहीतेय...आम्ही दोघंही एकसाथ नाही...एकादशी करता का...पुन्हा त्यांचा प्रश्न...आणि पुन्हा आमचं नाही...ओ,  एकादशी नंतर येते ती....द्वादशी...आम्ही त्याला बारशी एकादशी म्हणतो...तुम्ही उपवास बिपवास करत नाय का....आम्ही परत नाही...पण आमचं नाही, बहुधा त्यांना आधीच कळलेलं...कारण आमच्या नाही कडे दुर्लक्ष करीत त्यांनी पुन्हा सुरु केलं...द्वादशीला लावा तुळस...चांगली बहरेल...लई औषधी असते ही कृष्ण तुळस...तुमच्याकडे तो कोरोना आला होता ना...तेव्हा आम्ही याचीच पानं खुरटून खायचो...बघा आम्हाला काय बी झालं नाय...साठी पार केलेली ती महिला आणि त्या गृहस्थानं आम्हा दोघांची चांगलीच शाळा घेतली होती.  याला निमित्त झालं ते माझं झाडांचं वेड...कृष्ण तुळशीचं अक्षरशः रान बघून मी वेडी झाली होते.  त्यातली काही रोपं काढण्याचा प्रयत्न करत असतांनाच ही मंडळी समोर आली.  कोणाचीही परवानगी न घेता रोपं उपटली म्हणून ओरडा मिळणार असं वाटून त्या दोघांना सॉरी म्हटलं...आमच्याकडे एवढी चांगली कृष्णतुळस मिळत नाही, म्हणून घेतली...पुन्हा सॉरी....पण या सॉरीला विचारात न घेता त्या मावशीनं पहिल्यांदा सुरु केलं...तुळसच ना...इथं रान


आहे तुळशीचं...आम्ही बेनन करतो या भागातलं...सर्व रान उपटतो...पण तुळशीला आणि गोकर्णला हात लावत नाही...तुम्हाला हवी का म्हणत त्या मावशीनं सोबतच्या मामांना तुळस काढायला सांगितली.  पावसाळ्याचे दिवस...वाढलेलं रान...त्यामुळे इथं सापांचा वावर असतो...नवखा माणूस घाबरेल म्हणून थांबवल्याचं त्यांनी सांगितलं आणि आम्ही हुश्श केलं...

लेकाच्या परीक्षेच्या निमित्तानं अनेक चांगले अनुभव येतात...हा त्यापैकीच एक...कोरोनामुळे बाहेर फारसे फिरणे होत नाही...त्यामुळे यावेळी एका परीक्षेसाठी केंद्र निवडायची वेळ जेव्हा आली, तेव्हा मुद्दाम शहराबाहेर केंद्राची निवड केली.  पार पनवेलच्या पुढे असलेल्या विद्यापीठाची निवड केली.  पहिल्यांदा थोडं साशंक होतो...पण त्या भागात प्रवेश केल्यावर मनावरचा बराचसा ताण मोकळा झाला.  दिवसभर पावसाळी वातावरण...मस्त थंड


वारा...आणि आजूबाजूचा बहरलेला परिसर...विद्यापीठाचा परिसर मोठा होता...लेक परीक्षेला गेल्यावर चार तासांचा अवघी मिळाला.  त्याचा फायदा घेत लांब फेरफटका मारण्यास सुरुवात केली.  परिसरातील इमारतींचा भाग सोडला तर आजूबाजूला डोंगर पसरलेला.  डोंगरावर पावसात येणा-या सर्व झाडांची गर्दी झाली होती.  एका बाजुला तेरड्याचं रान होतं...तर एक बाजू आघाड्याच्या रोपांनी सांभाळली होती...मध्येच कुठल्याशा पिवळ्या फुलांच्या वेलींनी जागा घेतली होती...या सर्वात लक्षवेधी होती गोकर्णाच्या वेलींची गर्दी...अगदी विद्यापीठाच्या प्रत्येक इमारतींवर, झाडांवर, कुंपणावर या जांभळ्यागर्द रंगाच्या गोकर्णाच्या फुलांची दाटी झाली होती.  या सर्वासोबतच होती ती कृष्ण तुळशीची रोपं...अगदी कुणाचंही बंधन नाही अशी ही कृष्ण तुळस पसरली होती.  कुठे कुठे तर एखाद्या दगडावरही ती ताठ उभी होती.  पहिल्यांदा तुळस बघून मी रोप काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा नवरा ओरडला...कोणालाही न विचारता काढू  नकोस,  ओरडतील....पण पुढे गेल्यावर या कृष्णतुळशींचे रान बघून त्यालाही हेवा वाटला...अगदी टपो-या पानांच्या या तुळशीचं रोपं बघून त्याचीही चलबीचल सुरु झाली...ते बघून मी तुळस काढण्यासाठी पुढे गेले.  तेवढ्यात मागून आलेल्या आवाजांनी थांबले.  या परिसरात आलेलं रान काढण्याचं काम चालू होतं...आमच्या भागात त्याला

बेनन  म्हणतात...आम्ही लेकाला परीक्षा असलेल्या इमारतींपर्यंत सोडायला गेलो होतो.  तेव्हा ही मंडळी बेनन करत होती.  नेमकं त्यांनीच आम्हाला पकडल्यामुळे आमचे चेहरे पडले...

त्यांना हातातली रोपं दाखवली...दादा...आमच्याकडे अशी कृष्ण तुळस मिळत नाही,  म्हणून काढली दोन रोपं...सॉरी...त्यावर ती मावशी म्हणाली,  एवढंच ना...घ्या की हवी तेवढी....पण फार रानात जाऊ नका....साप असतात...पावसाळा आहे...त्यावर मी थोडी आघाड्याची पानं, दुर्वा आणि गोकर्णाची फुलं काढण्याचा बेत सांगितला...यावर तिनं त्या मामांना या मोहीमेवर पाठवलं...आणि ती आमच्याबरोबर गप्पा मारु लागली.  बाजुलाच असलेल्या गावामधून काही मंडळी इथं नेमानं येतात....रान साफ करायचं आणि झाडांची काळजी घ्यायची...कधी साप दिसला तर त्याला पकडून रानात सोडून द्यायचं....अगदी कोरोना काळातही ही मंडळी नेमानं येत होती...त्यामुळेच सर्व परिसर हिरवागार....निटनेटका....आणि साफ होता....त्या मावशी हे सर्व सांगत असतांना ते मामा मोहीम फत्ते करुन आलेही...कारण


त्यांच्या हातात भरपूर खजिना होता...एकतर मोठा जुडा तुळशीची रोपं होती...ही सर्व रोपं त्यांनी ओल्या मातीमध्ये चांगली लिंपून आणली होती...त्यासोबत गोकर्णाची छोटी वेलही होती...दुस-या हातात त्या मामांनी दुर्वा, आघाड्याची भरपूर पानं खुरडून आणली होती...श्रावणात घरी होणा-या जिवतीपुजेला या सर्वांचा चांगला उपयोग होणार होता...मामांनी आधी ती आघाड्याची पानं आणि दुर्वा आमच्या पिशवीत टाकल्या...आणि मग एका खिशातून प्लॅस्टीकची पिशवी काढून पुन्हा बाजुला पडलेल्या मातीचा आणखी एक लेप त्या तुळशीच्या रोपांवर लावला.  आणि हे सर्व त्या पिशवीत व्यवस्थित बांधून आम्हाला दिलं...

मग आला तो आम्हाला न कळलेला शब्द...हे असंच बारशीला लावा...तोपर्यंत नुसतं मातीत उभं करुन ठेवा काही होणार नाही...बारशीला लावा मग तुळस मस्त बहरेल...मग त्या मावशीही बारशी....बारशी करु लागल्या....आम्ही बारशीला तुळस लावतोच....आमच्या सर्व अंगणात तुळशी हायत...बारशीची तुळस कधी मरत नाय...आम्ही मात्र त्या दोघांकडे आळीपाळींनी बघायला लागलो...तेव्हा त्या मामांना आमची परिस्थिती समजली...एकादशी नंतर येणारा दिवस म्हणजेच बारशी...आमचे सगळ्यांचे उपवास असतात एकादशीला....बारशीला ते सोडतो...ही कृष्णतुळस म्हणजे मोठा आधार आहे, तुमच्याकडे कोरोना आला तेव्हा हिचीच पानं खाऊन आम्ही चांगलं राहील्याचंही त्यांनी सांगितलं...आणि हो...हे पण घ्या...म्हणून त्यांनी मला रुमाल पसरायला सांगितला...आता आणखी काही नको, म्हणून मी बोलेपर्यंत


त्यांनी त्यांच्या खिशातून गोकर्णाच्या शेंगा, कळ्या आणि फुलंही बाहेर काढली.  रुमाल भरेल एवढी ती फुलं होती...एवढी कशाला काढलीत मामा...अगदी दोन-चार देवाला घालण्यापूर्ती हवी होती...म्हणून सांगितल्यावर त्यांनी हात दाखवला...देवाला घालण्यापूरता उपयोग करु नका या फुलांचा...गोकर्ण जाम गुणी हाय...घरी गेल्यावर गरम पाण्यात ही फुलं, दहा-बारा तुळशीची पानं घालून ठेवा...पाणी गार होईपर्यंत या फुलांचा सगळा अर्क पाण्यात उतरेल...तुळशीचंही तसंच होईल...आम्ही तर असच हे निळं पाणी पितो...त्या मामांच्या या सांगण्यानंतर मावशीही पुढे झाल्या....ताई, तुम्ही तो ग्रीन टी पिता का...त्याच्यापेक्षा भारी लागतं हे...आम्ही तर पुदिना आणि चहाची पात टाकूनपण घेतो...खूप फ्रेश लागतं बघा...या कॉलेजातली सर लोकं पण आता घेतात आमचं बघून...आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघून ती गोकर्णाची फुलं गपचूप पिशवीत भरली...नव-यानं पाकीट काढलं. त्या दोघांनाही पैसे देण्याचा प्रयत्न केला...तेव्हा दोघांनीही हसून हात जोडले...राहू दे दादा...या ताई तुळस काढत होत्या म्हणून पुढे आलो...हे सगळं औषधी असतं खूप...ज्यांना माहिती असतं त्यांना द्यायला बरं वाटतं...तुम्ही सर्व  ऐकून घेतलंत हेच मोठं...चला...म्हणून दोघंही त्यांच्या पुढच्या कामासाठी निघून गेले....

आम्ही दोघंही पाठमो-या त्या मामा-मावशींना बघत होतो...कसलंही बाह्य आवरण नाही...लपवा छपवी नाही की उगीचच मोठेपणा नाही...जे आहे...जसं आहे त्यात समाधानी...बोलता बोलता त्यांनी कितीतरी साध्या वाटा दाखवल्या...निसर्गाला जपण्याचा...त्याच्या जवळ जाण्याचा एक मार्ग दाखवला...एरवी आमच्याकडे ग्रीन टी कायमचा...त्यानं फ्रेश वाटत...पण ही अशी फुलांपासून होणारी सरबतं माहीती नव्हती...तुळसंही देवाला


घालण्यापूरती..आणि कधीतरी होणा-या काढ्यात वापरण्यापुरती...पण आता हा उपयोग वाढवता येणार होता...निदान पिशवीत दहा ते बारा तुळशीचं रोप बसली होती...ती भरलेली पिशवी घेऊन आम्हीही परतीच्या वाटेवर लागलो...परत येतांनाही तेरडा, गोकर्णाच्या फुलांनी लक्ष वेधून घेतलं होतं...पण सोबत असलेला खजिना पुरेसा होता...त्यामुळे नव-यानं त्यांचे फोटो काढायची हौस भागवून घेतली...काही वेळातच लेकाचाही पेपर सुटला...आता परतीची घाई...नशिबानं रस्ता मोकळा होता...आसपासचे हिरवे गार डोंगर लोभस वाटत होते...त्याच्या पायथ्याशी काही हौशी मंडळींची फिरण्यासाठी गर्दी झाली होती...त्या सर्व हिरव्या...प्रसन्न वातावरणाला तिथेच सोडून पुन्हा शहराच्या गोंगाटाकडे....सायंकाळपर्यंत घर गाठलं...सोबतची झाडां-फुलांची पिशवी एक क्षणही खाली ठेवली नव्हती...अगदी गाडीत बसल्यावरही त्या पिशवीला पकडूनच बसले...घरी गेल्यावर तुळस आणि गोकर्णाची वेल रिकाम्या डब्यात ठेवली...आघाड्याची पानं फ्रिजमध्ये...आणि त्या मामांनी सांगितल्याप्रमाणे पाणी उकळवलं...गोकर्णाची फुलं स्वच्छ करुन त्या पाण्यात

टाकली...सोबत तुळस, पुदिना आणि पातीचहाची पातही गुंडाळून त्या पाण्यात टाकली...गॅस बंद करुन झाकळ लावून हे मिश्रण ठेवलं...साधारण अर्धातासात त्या फुलांचा छान रंग पाण्यात उतरला...हे नैसर्गिक सरबत दिसत तर छान होतं...पण चव...आहाहा...पहिला घोट घेतला आणि चवीचा अंदाज आला...अप्रतिम...चव एवढी छान की चहा-कॉफीची गरजही भासली नाही...प्रवासातला सर्व थकवा गायब झाला...मनात समाधान होतं...काहीतरी नवीन शिकायला मिळाल्याचं....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. गोकर्णाचं सरबत ... ही कल्पनाच किती रंगीत आणि अलवार आहे .. मी हे अवश्य करून पाहीन. - मंदार जोशी, डोंबिवली

    ReplyDelete
  2. गोकर्णीचं सरबत किती सुंदर रंग....
    प्लीज मला कृष्ण तुळशीचं रोप हवंय!!

    ReplyDelete

Post a Comment