माझ्या...तुझ्या....वाटचं...
तिची ती असहाय्य नजर काही माझ्या समोरुन हटत नव्हती...हसती...खेळती...सदा सदाफुलीसारखी टवटवीत असलेली माझी मैत्रिण आज कधी नव्हे ती झोपून होती...असाहय्य होती...आदितीचा, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा फोन आला तेव्हा थोडी काळजी वाटली होती. आई, पडलीय, थोडं लागलंय...डॉक्टरांनी पंधरा दिवस स्ट्रीकली बेडरेस्ट सांगितली आहे, असा आदितीचा फोन आला. तिची आई म्हणजे अर्चना, माझी मैत्रिण मुळात धडपडी...सतत कामात रहाणारी...ब-याचवेळा कामं अंगावर ओढून घेणारी...यात होणा-या धावपळीत अनेकवेळा असे पडण्याचे प्रसंग तिच्यावर आलेत...त्यातलाच हा प्रकार असेल अशी मी माझी समजूत करुन घेतली. तिच्या मुलीचा फोन आल्यावर, बरं झालं डॉक्टरांनी बेडरेस्ट घ्यायला सांगितलंय...आता बाई जरा आराम करतील...काळजी करु नकोस, बरी होईल ती...म्हणत मी बाकीची चौकशी करत फोन ठेवला...पण त्यानंतर लगेच दुसरा फोन आला...आदितीचाच...तुम्ही थोडा वेळ काढून घरी याल का...आई आठवण काढतेय...रडतेयपण...याल का प्लीज...अशा रडवेल्या स्वरात आदितीनं विचारलं...आणि माझ्या मनात चर्र झालं होतं...त्याच दिवशी संध्याकाळची कामं लवकर आवरुन अर्चनाच्या घरी गेले. एरवी दार उघडायला हसत येणारी अर्चना समोर आली नाही, तेव्हा घरातलं गंभीर वातावरण जाणवलं...तिच्या नव-यानं चेह-यावर बळजबरीनं हासू आणतं या, म्हटलं...आणि आतल्या खोलीकडे खूण केली. आदितीच्या पाठोपाठ मी आत गेले...आणि तिथेच थांबले...समोर बेडवर अर्चना झोपली होती...माझ्या चाहूलीनं तिची झोप मोडली आणि तिच्या डोळ्यातून पाणी चालू झालं...
सदैव आनंदी...उत्साही...अशा काही व्यक्ती असतात...त्याच वर्गात या अर्चनाचा नंबर लागतो. सतत कामामध्ये व्यस्त....आज काय केलं तर घरातला खाऊ संपला म्हणून चकल्या केल्या....आज चिवडा...आज सर्व घराची सफाई केली...आज पडदे धुवायला काढले...आज काय तर माळ्यावरची भांडी चकाकून टाकली...आज नव-याच्या ऑफीसमधल्या पार्टीला पुरणपोळ्या बनवून दिल्या...आज मुलांच्या मित्रांची पार्टी होती....आज मुलीच्या मैत्रिणी आल्या जेवायला...आज काय तर पाहुणे आले...आज काय तर कोणा नातेवाईकांकडे दिवाळीचा फराळ करुन दिला....अशा आज आणि आज मध्ये कायम व्यस्त असणारी ही एक मैत्रिण....मी अनेक वेळा तिला विचारलं आहे, कधी तू तुझ्यासाठी काहीतरी करतेस की नाही...या आज मध्ये तुझं काही आहे की नाही....पण स्वतःसाठी म्हणून तिनं कधीही वेळ काढला नाही. अनेकवेळा आजारी असतांनाही दोनवेळचं साग्रसंगीत जेवण बनवलं आहे....आणि आमच्याकडे नाही बाई चालत बाहेरचं....काहीही झालं तरी घरचं जेवण लागतं...तेही गरम गरम...म्हणून कौतुकानं सांगितलं आहे. अशा अट्टहासामुळे ब-याचवेळा थकव्यामुळे पुन्हा आजारीही पडली आहे. पण त्यावेळीही डॉक्टरांकडे वेळ जातो म्हणून मेडीकलमधून गोळ्या आणून वेळ मारुन नेली आहे.
वयाची चाळीशी पार झाल्यावर वर्षातून किमान एकदातरी आपलं चेकअप केलं पाहिजे, असं मी तिला सांगितलं होतं. तेव्हा तर कितीतरी हसली....काय तरीच तुझं...मला काय धाड भरलीय...उगीचच पैसे खर्च करायचे...म्हणत वेळ मारली होती.
ब-याचवेळा माझं आणि अर्चनाचं भांडण झालं आहे. त्याला कारणही तसंच...बाई एकनंबर सुगरण...सर्व पदार्थ करण्यात तरबेझ...कोणाला काय पसंत आहे, याची बरोबर माहिती...पण स्वतःला काय आवडतं हे तिला अद्याप माहिती नाही. कारण मुलांना, नव-याला वाढून जे राहिल त्यावर हिचं समाधान होतं...कधी जेवण शिल्लक राहिलं तर ते तसंच झाकून फ्रिजमध्ये ठेवणार...आमच्याकडे काहीही वाया जात नाही...म्हणत दुस-या दिवशी ते स्वतः खाणार...अग ताजं अन्न खा...एवढं बनवतेस ना, मग त्यातलं तू का नाही खात....असं तिला विचारल्यावर, आत्ता मुलांना काय शिळं अन्न देऊ....त्यांना ताकद हवी बाई, वाढीची आहेत ती....मग नव-याला दे....असं कसं...दिवसभर बाहेर असतात...त्यांना कसं शिळं अन्न वाढू...मग मुळात शिळं राहिल असं बनवू तरी नकोस...हे ही नाही...का...तर कोणाला दोन घास कमी पडायला नको...रात्रीचे दोन घास कमी झाले तरी चालतील, पण हे असं शिळ अन्न रहायला नको...ते तू खाऊ नकोस...त्याचा त्रास होतो...दोन घास कमी कर...म्हणून अर्चनाबरोबर माझे अनेक वाद झालेत...हे सर्व वाद बाईंनी
आपलंच काही सूत्र पुढे करत उडवून लावलेत...यातही तिचा कमालीचा समाधानी स्वभावही आमच्यामधील भांडणाचं कारण झाला आहे. जेवतांना आपल्या ताटातील पदार्थ मुलांच्या ताटात सरकवण्याची एक वाईट सवय अर्चनाला आहे. पनीरची भाजी केली, त्यातले पनीर मुलांच्या ताटात...ही फक्त रश्याबरोबर चपाती खाणार...का..तर त्यांना त्याची अधिक गरज आहे...बरोबर आहे...पण तुलाही आहे ग...हे कळकळीनं सांगूनही फरक नाही...जेवतांना ताटातली अंडी, माश्यांचे तुकडे, चिकन बाबतीतही हाच नियम...मुलांना नक्कीच पुरक खाण्याची गरज असते...पण तेवढीच गरज घरच्या बाईलाही असते. जेवतांना एक वाटी डाळ, तेवढीच कोशिंबीर आणि भाजीही पोटात गेली पाहिजेच....आहारात फळं हवीत...थोडे ड्रायफुट खायला हवेत...ते जमलं नाही तर गुळ चणे तरी खाल्ले पाहिजेत...खजूर तर बाईचा जवळचा मित्र...तो एखादातरी तोंडात टाकावा...अशा अनेक सूचना माझ्या अर्चनाच्या मागे चालू असतात...पण बाई कधीही त्या मनावर घेत नाहीत....
तिच्या घरी गेल्यावर मला वाफळती कॉफी करुन देईल....घरी बनवलेला चिवडा
किंवा चकली...समोर आणून ठेवेल...पण स्वतः कधी एखादा कॉफीचा कप घेऊन सोबत बसणार
नाही. तेच कारण...काहीतरी करायचंय...तू
घे...मी काम करता करता गप्पा मारणार...बरं स्वभाव लाघवी....त्यामुळे गोतावळाही
भरपूर...हात मोकळा...कोणी आलं...किंवा काही फर्माइश केली की बाई लगेच
किचनमध्ये....या सर्वात अर्चनानं स्वतःकडे कधी लक्षच दिलं नाही. यावरुन माझा आणि तिचा वाद ठरलेला. निदान कुठला तरी योगा क्लास लाव...थोडा व्यायाम
हवा अंगाला...असं सांगितलं तरी बाई भडकून उठणार...व्यायाम कशाला हवा. आमच्याकडे नाही बाई हे योगाबिगाचे नाटक
चालत...आणि घरात कामं केवढी...ती करतांना होतो हो आपोआप व्यायाम...हे तिनं सिद्ध
केलेलं सूत्र आपल्याला ऐकवणार...त्यानिमित्तानं बाहेर तर पडशील किचनमधून...असं
म्हटलं की पुन्हा गोड हसून वेळ मारुन नेणार....तिची दोन्ही मुलं कॉलेजला जाणारी...आत्ता
करोना काळात त्यांचाही घरुन अभ्यास...नवराही वर्क फ्रॉम होम...अगदी
महिनाभरापूर्वीच आमचा फोन झाला तेव्हा म्हणाली होती...थोडं थकल्यासारखं
झालंय...सर्वांना अगदी बसल्याजागी द्यावं लागतं...त्यामुळे धावपळ होतेय...पुन्हा
माझा सल्ला देण्याचा प्रयत्न...आणि बाईंची ठरलेली पळवाट...
त्यानंतर मी ही अशी बेडवर झोपलेली अर्चना पाहिली आणि मनात चर्र
झालं. रोजची कामाची घाई...बाथरुम साफ करतांना पडली...लादीचा जोरदार फटका कमरेला बसला...घरात सर्वजण होते...पण पाण्याच्या आवाजात कोणाला काहीही कळलं नाही...अगदी पंधरा मिनीटांनी लेकीला आई कुठे दिसत नाही म्हणून आठवण झाली...आणि पडलेली अर्चना दिसली...भिजलेले कपडे...आणि शरीराला होणा-या प्रचंड वेदना...नव-यानं थेट तिला हॉस्पिटलमध्ये नेलं....सर्व तपासण्या झाल्या...दिवस तिथे गेला...दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं...पण डॉक्टरांनी सांगितलं पाठीच्या कण्याला मार बसलाय...काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल...यावर पेनकिलर आणि विश्रांती हेच औषध आहे...त्यात अर्चनाचे सर्व रिपोर्ट काढले...हिमोग्लोबिन आणि विटामीन डी यांची पातळी चिंताजनक इतकी कमी झालेली. दोन बाळंतपणांतही तिनं फारसा आराम केला नव्हता...मासिक धर्मातही खूप त्रास होत असला तरी, तो होणारच म्हणत हट्टानं काम केलेलं...वयानुसार पाळी अनियमीत झाली तेव्हा डॉक्टरांकडून तपासून घे ग...हे म्हणणं फक्त हुं....वर नेलेलं...या सर्वांचा परिणाम की काय हाडांची झिज झाल्याचा रिपोर्टही आला...
त्यावर उपचार चालू झाले...अर्चना आत्तापर्यंत पै पाहुण्यांसाठी
अनेकवेळा डबे घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेली...पण स्वतःवर वेळ आली तेव्हा प्रचंड
खचली...आपल्याला काही झाले तर आपल्या घराचे काय होणार हा प्रश्न मनात बसला...रडून
रडून डोळे सुजले...शेवटी बहिणींनी डॉक्टरांना विनंती केली...आम्ही हिला घरी
नेतो...तिथे बरी होईल...आत्ता घरी येऊन पाच दिवस झालेत.
ज्या घरासाठी अर्चनानं एवढे कष्ट घेतलेत, त्या घराचं सर्व व्यवस्थित चालू आहे. साफसफाईसाठी बाई ठेवली आहे. तिच्या बहिणी किंवा वहिनींपैकी एक सकाळी येऊन दोन वेळचं जेवण करुन जातात...मुलं व्यवस्थित वाढून घेतात...आत्ता काही पदार्थ बाहेरुनही मागवतात...अर्चनाचं सर्व बेडवर होतंय...फक्त निसर्ग धर्मासाठी बेडवरुन उठावं लागतं...ते करतांनाही कोणाचा तरी आधार लागतो. खाली बसता येत नाही. टॉयलेट चेअरचा वापर करावा लागतो....हे मला सांगतांना अर्चनाच्या डोळ्यातून अखंड अश्रू येत होते...मध्येच तिची लेक आली...कॉफीचे दोन मग होते...म्हणाली, तुच सांग मावशी आईला जरा...आम्ही व्यवस्थित आहोत...काहीही त्रास होत नाही...आम्ही अँडजेस्ट करतोय सगळं...थोडी तारांबळ होते...पण जमतंय...पण हिला सांगा आम्हाला आई हवीय...पहिल्यासारखी हसती खेळती...पण तिनं आता नेहमीची धावपण कमी करावी...आत्ता ती झोपलीय आणि घर चालतंय म्हणजे तिची गरज संपली असं काही तरी ती बडबडते...पण असं नाही आम्हाला आई हवीय...अगदी पूर्वीसारखी...आमच्याकडूनही तिच्याकडे दुर्लक्ष झालंय...आत्ता
ती बरी झाली की बाबा म्हणालेत एखादी टूर करुया सर्व सांभाळून आणि आईला भरपूर प्रोटीन फूड खायला देऊया...आईसाठी बाबाही योगा क्लास लावणार आहेत. आम्ही सर्व करतोय...तिलाही हे सांगा...भरल्या डोळ्यांनी आदितीनं हे सर्व एका दमात सांगितलं आणि अर्चनाच्या गालावर हलकेस ओठ टेकून ती बाहेर गेली...
माझेही शब्द संपले...बाईचा आत्मा कुठे असतो तर तिच्या घरात...तिच्या पिल्लांमध्ये...या सर्वांपासून दूर होण्याची कल्पनाही ती करु शकत नाही...अर्चनाचेही तसेच झालेले. लग्न झाल्यापासून तिनं या घरासाठी...कुटुंबासाठी सर्व केलेलं...तेच तिचं विश्व...फक्त या सर्वात आपलं स्वतःचं अस्तित्वही आहे...ते जपायला हवं हे मात्र ती विसरली...माझ्याबरोबर बहुधा पहिल्यांदाच ती कॉफी पित असेल...दोन उशा मागे ठेऊन बसती झाली...तेव्हाही थोडी कळ आली...मी म्हटलं, झोपून रहा, मी पाजते...नको म्हणाली, डॉक्टर म्हणालेत थोडं दुखेल, पण थोडी हालचाल करा...आत्ता सकाळी थोडं चालतेही...हलकेसे व्यायाम सांगितले आहेत करायला...ते करते...तेव्हा तुझी नेहमी आठवण येते...जेवतांनाही अंडी, पनीर, चीज, सूप, भाज्या, डाळ भरपूर खायला सांगितलं आहे....तेव्हाही तूच आठवतेस...किती सांगायचीस मला नेहमी...खात जा म्हणून...आत्ता कळतं...आत्ता मागून घेतेय...फळं खाते...हे बघ...बाजुला असलेला डबा दाखवून म्हणाली, यात खजूर आहेत...भूक लागली की हे खाते....थोडं आधी करायला हवं होतं ग हे....मग असं झोपायला लागलं नसतं...पुन्हा डोळ्यातून पाणी...काय बोलणार...मी पण शांत...पण म्हटलं, जे होतं ते चांगल्यासाठीच हे मनात ठेव...डॉक्टरांनी फक्त आराम करुन बरं होता येईल हे सांगितलंय...त्यामुळे आरामावर भर दे...आणि चांगलं पोषक खा...आता एक धडा मिळाला ना...आत्ता सर्व वेळापत्रक बदल...काहीही वाईट झालं नाही हे मनात ठेव...नाहीतर असा आराम कधी करता आला असता तुला...आत्ता छान नवी पुस्तकं वाचून काढ...मन प्रसन्न ठेव...फार बोलता आलेच नाही...अर्चनाचे तेच मोहक हासू पुन्हा अश्रूंनी ओल्या झालेल्या गालावर पसरले...कॉफी संपली...तिला बाथरुमपर्यंत न्यावे लागले....थोडी कळ जात होती...पण ठिक आहे, म्हणत तिनं वेळ मारली...बाहेर येतांना छान चेहरा धुवून आली...आत्ता बरं वाटतंय म्हणाली...पुन्हा पन्नास पावलं टाकल्यासारखी पाच पावलं टाकली...बेडवर आडवी झाली...तिला काळजी घ्यायला सांगून निघाले...पण मनात तिचे ते भरलेले डोळे आणि खूप वेदना सहन करणारे चह-याचे भाव काही निघत
नव्हते.
काही वर्षापूर्वी असाच अनुभव मलाही आला होता. डेंग्यू झाल्यानं हॉस्पिटलमध्ये आठवडाभर पडून रहावं लागलं...दोन्ही हात इंजेक्शन आणि सलायनच्या सुया टोचून काळे
पडले...तेव्हा जाणवलं की आपल्या शरीराची ताकद...प्रतिकार शक्ती आपणच वाढवायला
पाहिजे...आरोग्याकडे जरा लक्ष द्यायला सुरुवात केली...प्रत्येक गृहिणीची हिच
अवस्था असते.
माझ्यासारखी...अर्चनासारखी...सगळं लक्ष आपल्या घरट्याकडे....पण ते विणतांना
स्वतःकडे दुर्लक्ष होतं...आणि नको ते आजार शरीरात घर करुन बसतात...आपणच
अन्नपूर्णा...आपणच गृहलक्ष्मी...आणि आपणच आपल्या आरोग्याची पूर्ती हेही लक्षात
घेतलं पाहिजे...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे हे सांगणारा लेख!! ही कथा अनेक स्त्रीयांची आहे. आहार-व्यायाम ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलंच पाहिजे.
ReplyDeleteअतिशय उपयुक्त माहिती दिली आहे सई तुम्ही कथेच्या माध्यमातून !
ReplyDelete