दैवत.....

 


दैवत....

गुरुवारी सकाळी फोन आला....गुरुजी गेले....आमचे वार्डे गुरुजी दत्तरुपात विलीन झाले...एक दत्त उपासक आपल्या स्वामींच्या रुपात समावून गेला...वार्डे गुरुजी म्हणजे नारायण वार्डे...साधारण दोन अडीच महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नी, सौ. सुधा वार्डे म्हणजेच आमच्या काकी या आम्हाला सोडून गेल्या....त्यांच्यापाठोपाठ गुरुजींचे छत्रही हरवले.  गुरुजी आणि काकी हे दांम्पत्य म्हणजे माझ्यासारख्या अनेकांसाठी दैवत होते आणि राहीलही.  गुरुजी म्हणजे कोण...दत्तभक्त...दत्तउपासक....एक शिक्षक...अशी त्यांची ओळख...पण यापलीकडेही या दांम्पत्याची ओळख आहे....ती म्हणजे ते दोघेही माणसांचे भक्त होते.  या दोघांनी आपल्या स्वभावानं लाखोंचा गोतावळा उभा केलाय...एक गुरु आपल्या शिष्यांना काय देतो, याचे आदर्श उत्तर म्हणजे वार्डे गुरुजी....गुरुजींनी संस्कार दिले...पण याबरोबरच आदर्श शिकवण दिली.   ही शिकवण समानतेची...सकारात्मक विचारांची आहे....गुरुजींच्या सहवासात अनेक मंडळी आली...इथे गरीब...श्रीमंत...जात...पात...या शब्दांनाच कधी थारा दिला गेला नाही...जो यायचा तो सामावून जायचा...लहानपणापासून...नेमकं कधी ते सांगता येणार नाही....पण आम्ही गुरुजीं आणि काकींना बघितले ते याच सकारात्मकतेच....त्यांच्या सोबतीनं दत्तभक्ती कशी करायची याची शिकवणी मिळाली...साधेपणाची...सोज्वळतेची शिक्षा मिळाली....तर काकींनी आपलेपणाची...मायेची व्याख्या समजावली...लाखो काय पण करोडोची माया


जमा करण्याची ताकद असलेल्या गुरुजींनी पैश्यापेक्षा माणसाला जपलं...जोडलं...साधा शर्ट आणि पांढरा शुभ्र लेंगा...कपाळावर टिळा....या पेहरावातले गुरुजी आणि साधी, स्वच्छ नऊवारी साडी,  कपाळावर मोठं कुंकू...आणि अंबाड्यावर माळलेला गजरा किंवा फुल...अशी ही गुरुजी-काकांची जोडी आज जगात नाही....त्यांच्या जाण्यानं आयुष्यात जी कमी झाली आहे ती कधीही भरुन निघणार नाही.  पण यासोबतच एक जाणीवही आहे...एक जबाबदारीही...गुरुजी आणि काकींनी दिलेले संस्कार...शिकवण...जपायची आणि ती परंपरा पुढे चालवायची....

वार्डे गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर आम्ही कधी जोडलो हे नक्की सांगता येणार नाही.  अगदी बालवाडीपासून गुरुजी परिचयाचे....शाळेत कुठलासा कार्यक्रम होता...गॅदरींग...पहिल्यांदा स्टेजवर गेल्यावर चिमुकली मुलं जे करतात तेच यावेळी झालं...समोर गर्दी बघून मुलं रडायला लागली...गुरुजी तेव्हा स्टेजवर होते...मी तेव्हा तो ओळखीचा चेहरा बघून सरळ त्यांच्या मांडीवर जाऊन बसले...आई हा किस्सा नेहमी सांगते...पण त्या अजाण वयापासूनच गुरुजींची ओळख पटली होती...त्यांची भीती कधी वाटलीच नाही...पण धाक होता...काही वावगं केलं तर गुरुजी ओरडतील...याची जाणीव होती...पुढे या वार्डे कुटुंबाबरोबर अगदी घरोब्याचे संबंध झाले...एक परिवार...एक कुटुंब...आमच्यासारखेच गुरुजींच्या विचारसरणीनं बांधलेली चौलकर, भट, पटेल, ठाकूर अशी अनेक कुटुंब एकत्र झाली...नवं कुटुंब निर्माण झालं...आमचे कुटुंब प्रमुख गुरुजी....रेवदंडा, चौल, आलिबाग, महाड अशा कितीतरी ठिकाणी एकत्र कार्यक्रम...पुजा...छोट्या पिकनीक...कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव...आणि नवरात्रीची जागरणं....असं आम्ही एकत्र साजरं केलंय...या सर्वांतून गुरुजी आणि काकी अधिक जवळ आले...यातून एकच जाणीव झाली, गुरुजी ही


एक शक्ती तर काकी म्हणजे सात्विकतेची मूर्ती...

समाधान...तृप्तीचा आनंद...म्हणजे काय तर या काकींचा चेहरा...कधीही बघितली तरी हसरी मुद्रा...गुरुजींचा जनसंग्रह अफाट...किती लोकं घरी येणार याला बंधन नाही.  बरं येणारी ही मंडळी कधीही हक्कानं गुरुजींकडे आधारासाठी येणार...दिवस...रात्र असं वेळेचं बधनही नाही...अशा सर्व अगंतुकांचं स्वागत करायला काकी नेहमी पुढे असणार...गोल चेहरा...गोरा वर्ण...साधी पण छानशी नऊवारी साडी...केसांचा अंबाडा आणि त्यावर एखादं फुल वा गजरा...यापलीकडे त्यांना कधी सजलेलं पाहिलं नाही...त्यांचं सौदर्य होतं ते त्यांच्या हसमुख चेह-यात...कितीतरी कार्यक्रमांत त्यांना बघितलं आहे...पण या पलिकडे कधी त्या सजल्या नव्हत्या...पण तरीही त्यांच्या चेह-याचे तेज...प्रसन्नता लक्षवेधी असायची...कार्यक्रम वा कुठली पुजा, सर्व गुरुजींच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली...अर्थात त्यांच्यानंतरचा मान काकींना....त्या सदैव स्वयंपाकघरात...जेवणावळीची तयारी त्यांच्या हाताखाली होत असे...अनेकजणी त्यांना मदतीला असायच्या..पण काकींनी कधीही माझं तेच खरं हे धोरण चालवलं नाही...उलट, तुम्ही करा...तुमच्या हाताला चव आहे...म्हणून त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिलं...कधीही कोणाबरोबर आवाज वाढवून बोलणं नाही...की कोणाला तोडून बोलणं नाही....छोटा...मोठा हा भेद नाही...की आपली प्रौढी नाही...

गुरुजींकडे शिकवणीसाठी आम्ही जायचो...तेव्हा काकींच्या हाताची चव खूप वेळा चाखायला मिळाली आहे.  लोणचं या प्रकारात त्यांच्याकडे पीएचडी होती...किती प्रकारचे आणि कसली कसली लोणची, मोरंब्बे काकी करायच्या याला गणती नाही.  एक छोटी खोली होती.  त्या खोलीत रॅकवर चिनी मातीच्या बरण्या असायच्या...त्यात काकींच्या हातची लोणची बसलेली


असायची...शिकवणीच्या नावावर आम्ही गुरुजींकडे गेलो असलो तरी सर्व नजर त्या बरण्या आणि त्यातील लोणच्यावर असायची.   अगदी मऊ शिजलेला भात...त्याच्यामध्ये गोल करुन टाकलेलं चमचाभर लोणचं हे कॉम्बिनेशनही मी फक्त गुरुजींकडेच खाल्लं आहे...नाष्टाम्हणून हा प्रकार खातांना जिभेला लागलेली लोणच्याची चव हा लेख लिहितांनाही तोंडावर आहे...गुरुजींच्या घरात किती माणसांचं जेवण तयार होतं हे फक्त घरच्या महिलांनाच माहित...पण कोणीही आलं तरी काकी नेहमी त्यांना आग्रहानं जेवण किंवा चहा तरी देणार....अचानक पाहुणे आले तरी पण काकींच्या चेह-यावर कधी नाराजीची रेषा दिसली नाही...की कधीही त्या थकलेल्या दिसल्या नाहीत....त्या नाराज व्हायच्या...कोणीही न जेवता किंवा साधा चहाही न घेता गेलं की...अशावेळी दहावेळा त्या माणसाच्या मागे लागणार...जेवला असतात तर बरं वाटलं असतं हो...थोडा चहा तरी घ्या...असा प्रेमळ आग्रह झाल्यावर मग कोण थांबणार नाही...अशी थांबलेली माणसं पुढच्या वेळी न सांगता हक्कानं जेवायला थांबणार...मग काकींची कळी खुलणार...काकी कधीही मी मध्ये जगल्या नाहीतच...त्या आपण...आम्ही...या जगामध्येच राहिल्या... 

जसं लोणचं तसंच चिवड्यातही काकींची महारत...अनेकवेळा नेमकं उपवास असेल तेव्हा काकींच्या चिवड्याची फोडणी पडायची....मग शिकवणी संपल्यावर त्या उपवासाला स्वाहा म्हणत चिवडा रिचवला जायचा...लहानपणी केलेली ही सर्व खादाडी आठवली तरी आज आनंद होतोय...कारण यानिमित्तानं काकींच्या हातचं जेवण जेवल्याचं समाधान आज माझ्या खात्यात जमा आहे.   काकी कधीही बदलल्या नाहीत...अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही...तशाच सदैव कामात मग्न असलेल्या...प्रसन्न...आणि दुस-याला जपणा-या....त्यांनी जशी आमचं कोडकौतुक केलं तसंच आमच्या लेकरांचंही केलं...अलिकडे त्यांची भेट काही महिन्यांनी व्हायची...तेव्हा काकी एखाद्या लहान मुलांसारख्या आनंदायच्या....अग किती दिवसांनी भेटलीस...बारीक झालीस हो....लेक कसा आहे...बरी आहेस ना...तुझी खूप आठवण येते...हे बोलत असतांनाच खाऊच्या बशाही पुढे करत असत...त्यांचा हा प्रेमळ स्वभाव कायम लक्षात राहील असाच होता.

आमच्या गुरुजींबद्दल काय सांगावे...वार्डे गुरुजी हे नावच फक्त पुरेसं होतं...दत्तभक्त...दत्त महाराजांचे उपासक म्हणून गुरुजी परिचित...आमच्यासारख्या अनेकांना त्यांनी दत्त भक्तीच्या प्रवाहात आणले...मुळात भक्त...भक्ती....देव...त्याची शक्ती...हे सर्व मोठे विषय...वार्डे गुरुजींनी फक्त भक्ती मार्गाला नेलं नाही तर माणसात माणूसपण शोधायला शिकवलं.  त्यांच्या छायेमध्ये नवनाथ परिवार वाढला...गुरुजींसोबत कार्यक्रम, पुजा यांच्या निमित्तानं अनेक ठिकाणी फिरलो आहोत...इथं सर्व समान असायचे...कोण कोणाचा मुलगा म्हणून लाड नाही....अगदी गुरुजींच्या


मुलाचीही चूक झाली तरी त्याला कोणीही ओरडत असे...त्यावर कधी गुरुजी आणि काकी शब्दानं नाराजी व्यक्त करीत नसत...गुरुजीं म्हणजे अनुभवाचा न संपणारा खजिना...कुठेही गेलं तरी त्यांना ओळखणारे निघणारच...पण हे सर्व असूनही गुरुजींनी आपला समर्पित स्वभाव कधी बदलला नाही.  दत्त महाराजांच्या पुजेला नारळ, फुलं, अगरबत्ती याच्यापलीकडे त्यांनी काही घेतलं नाही.  पेढ्यांचे बॉक्स आले तरीही ते परस्पर सर्वांना वाटले जायचे.  आम्ही शिकवणीसाठी जेव्हा जायचो, तेव्हा गुरुजींकडे कोणी आलं की खूप आनंद व्हायचा...कारण आलेल्या मंडळींनी पेढे, बर्फी नक्की आणली असायची....गुरुजी हा सगळा प्रसाद आम्हा मुलांच्या ताब्यात द्यायचे...काही मिनिटातच त्या पेढे, बर्फीचा फडशा पडायचा...नंदू, विवेक, रमेश, गिता...ही त्यांची मुलं...पण आपल्या मुलांना वेगळं आणि आम्हाला वेगळं असा भेदभाव कधी या घरात झाला नाही.  काकी आणि गुरुजींनी सर्वांनाच आपल्या कुटुंबात सामावून घेतलं.  गुरु हा सर्वार्थानं ज्ञानी असावा...श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील भेद जाणणारा असावा...गुरुजी त्याच पंथातले...शब्दांचा प्रचंड भांडार त्याच्याकडे होता...बुद्धी तिक्ष्ण...एखाद्याला अगदी चार वर्षांनी बघितलं तरी तो कोणाचा कोण हे सांगणार...वरुन त्याच्या नावावरुन एक शाब्दीक कोटी करणार...वनस्पती आणि त्यांच्यापासून बनवण्यात येणा-या औषधांचीही माहिती त्यांच्याकडे मुबलक...अनेकांना अशी औषध मोफत दिली आहेत त्यांनी...जगात देव आहे का, हा प्रश्न ज्याच्या त्याच्या समजुतीनं सुटतो...पण गुरुजींनी मात्र या शक्तीची ओळख करुन दिली...ती आपल्यातच असते...आपल्या आसपास असते.  त्याला अवडंबर चालत नाही.  पैसे लागत नाहीत...दिखावा लागत नाहीत...त्याला लागते ती आपल्या मनापासून होणारी प्रार्थना...गुरुजींचा जो सहवास आम्हाला लाभला त्यातून ही मोठी शिकवण मिळाली...गुरुजींच्या याच साधेपणाच्या शिकवणींमुळं आजही देवाच्या नावानं कोणी झगमगतांना दिसलं की आपसूक त्यांच्यापासून दोन पावलांचं अंतर राखलं जातं...


आमच्यावर अनेक प्रसंग आले...त्यात साथ दिली ती गुरुजींनी....वाईट दिवस आले की आपले आपले म्हणणारेही साथ सोडून जातात...पण गुरुजी हे त्यातले कधीच नव्हते....आपल्या शिष्यांना त्यांनी एकटं सोडलं नाही...संकंट आली तेव्हा त्यांनी लढण्याची हिम्मत दिली...परिश्रम करण्याचा सल्ला दिला...त्यामुळेच आज जे काही यश मिळालं ते वार्डे गुरुजींच्या नावानं आमच्या खात्यात जमा आहे.

गुरुजी गेले हे सत्य आहे.  पण गुरुजी, ही एक परंपरा आहे....एक शिकवण आहे...ती कायम अस्तित्वात रहाणार....बहरत रहाणार...आम्हा सर्व नवनाथ भक्तांना...गुरुजींच्या शिष्यांना एक ठेवणार....आणि सदैव त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणार हेच खरं आहे....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. एका दत्त भक्त दांपत्याचा सुंदर परिचय करून दिला आहे...

    ReplyDelete
  2. अगदी खरं शिल्पा सगळे जुने दिवस डोळ्यसमोरून तरळून गेले छान लिहिले आहेस

    ReplyDelete

Post a Comment