खराटा....शेण्या आणि पॅकींग....
शू...शू...जरा हळू बोल ना...घरात आहेस का....ठेव त्या वाती...किती गोंधळ घालतेस...आजूबाजूला बघत नव-याचा ओरडा...तरीही काहीही फरक नाही पडत या थाटात मी एक वातींचं पॅकेट ठेऊन, दुसरं पाकीट हातात घेतलंच...त्याच्यावरची किंमत पाहूनही तशीच प्रतिक्रीया बाहेर पडत होती...पण नव-यानं प्रसंगावधान राखत हातातलं पाकीट खेचूनच घेतलं आणि पुन्हा रॅकवर ठेवलं...त्यापाठोपाठ माझ्या हातातली सामानाची ट्रॉलीही आपल्या ताब्यात घेतली आणि झपझप पावलं टाकत तो पुढच्या रो मध्ये गेला. नाईलाजान मी सुद्धा त्याच्या मागे चालू लागले...तरीही माझी नजर रॅकवरच्या सामानावर आणि त्यांच्या किंमतीवर होती. अशा अनेक वस्तू होत्या ज्या अशा पद्धतीनं विकल्या जातात, याचीच मला माहिती नव्हती...नारळाच्या झावळीच्या काड्यांपासून केलेला खराटा, गायीच्या शेण्या, काकड वाती, फुलवाती, देवाला घालण्याची कापसाची वस्त्र या सगळ्या वस्तू छान पॅकींग करुन विक्रीस ठेवल्या होत्या. त्यांचं पॅकींग आणि त्याची किंमत बघून मी मात्र चाट पडले होते. काकड वाती, फक्त बारा...त्या फक्त शंभर रुपयाला...एक शेणी दहा रुपयाला...आणि नारळाच्या झापापासून केलेला खराटा चक्क अडीचशे रुपायला होता...या किंमती बघूनच मी जोरात ओरडले होते, आणि नवरोबांनी आजूबाजूच्या लोकांकडे बघून मला दटावत तिथून काढता पाय घेतला....
महिन्याच्या पहिल्या शनिवारी शक्यतो आम्ही घरासाठी किराणा सामान
भरण्याचा प्रयत्न करतो. कोरोना येण्यापूर्वी एक ठराविक दुकान होते. तिथूनच महिन्याचं सामान भरलं जायचं. पण कोरोना आल्यापासून जे मिळेल ते असं धोरण स्विकारुन जिथे सामान चांगलं पण गर्दी कमी अशी दुकानं मार्क करुन ठेवली होती. ब-याचवेळा वेळ वाचावा म्हणून लेकाला परीक्षेला सोडल्यावर आसपासच्या सुपर मार्केटचा आधार घेतला होता. ठराविक दुकान असल्यावर यादी हा प्रकारही मी सहसा करत नव्हते. पण आता आठवणीनं एक यादी जवळ बाळगते. त्यामुळे बाहेर कुठेही गेले तरी सामान भरायला मदत झाली आहे. या महिन्याच्या पहिल्या शनिवारीही काही कामानिमित्त शहराच्या बाहेर पडावे लागले होते. नवी मुंबईच्या आसपास काम होतं. ते झाल्यावर तिथेच बाजुला असलेल्या मोठ्या सुपर मार्केटवर लक्ष गेलं. किराणा सामानाबरोबर भाज्या आणि फळही इथे होती. शिवाय ज्या कामाला आलो होतो तिथे आम्हाला तासभर वाट पहा असा सल्ला मिळाला होता. तो तास सार्थकी लावण्यासाठी आम्ही नवरा बायको त्या सुपर मर्केटमध्ये गेलो.
ब-यापैकी मोठ्या या सुपर मार्केटमध्ये सगळ्या वस्तू पद्धतशीर लावल्या होत्या. स्वच्छतेचे सगळे नियम काटेकोर होते. मास्कशिवाय प्रवेश नव्हता. ठराविक ग्राहकांना आत प्रवेश होता. जे बास्केट किंवा ट्रॉली वापरण्यात येत होते, त्यांना आपल्यासमोर सॅनिटाईज करुन मगच ताब्यात देण्यात येत होते. हा सगळा रागरंग पाहून नव-यानं ओके केलं, आणि मी यादी काढली. नेहमीचे आणि आवश्यक सामान ट्रॉलीमध्ये जमा झाले. मार्केट खूप मोठं होतं. त्याप्रमाणे त्यातील सामानामध्ये विविधता होतीच पण अशा अनेक मी न बघितलेल्या वस्तूही होत्या. त्यामुळे प्रत्येक रॅकसमोर रेंगाळून ते नवे प्रकार हाताळण्यात आणि त्यांच्या किंमती बघण्यात वेळ जात होता. अशाचतच पुजेसाठी लागणा-या सामानांच्या रॅकसमोर आल्यावर तिथल्या वस्तू
बघून आम्ही दोघंही चाट पडलो. एरवी फुलवातींचा एकच प्रकार माहिती होता. पण इथे साध्या फुलवाती, तुपातल्या फुलवाती आणि कमळ फुलवाती हा प्रकार बघायला मिळाला. त्याच्याच बाजुला काकड वातींचे पॅकेट ठेवले होते. फक्त बारा काकड वाती होत्या पण त्या शंभर रुपायाला...ती किंमत बघून मी जवळपास ओरडलेच होते. लहानपणी तुळशीच्या काड्यांच्या भोवती कापूस गुंडाळून त्याला तुपात भिजवून अनेक काकड वाती तयार केलेल्या...पण इथे त्यांची किंमत बघून माझा आरडा ओरडा मला तरी ठिक वाटला. तशीच बात साध्या फुलवाती आणि तुपामध्ये भिजवलेल्या फुलवातींबाबत होती. यापुढे शेणीही विक्रीस ठेवल्या होत्या. प्रत्येक शेणीला स्वतंत्र पॅकींग केले होते. त्यावर दहा रुपयांची किंमत होती. सर्वात मजेदार म्हणजे या शेणींच्या पॅकेजवर त्या शेणींमध्ये काय आहे, अर्थात गायीचे शेण होतेच...त्याशिवाय काय होतं...आणि या शेण्या जाळल्यावर त्याच्यापासून घरातील वातावरण कसे शुद्ध होते हेही लिहिले होते. हा तर माझ्यासाठी नवीन शोध होता. मी आरडाओरडा थांबवून पुन्हा सर्व वस्तूंच्या पाकीट वाचायला सुरुवात केली. त्यात पहिला उचलला तो खराटा. आमच्या गावी, म्हणजेच रेवदंड्याला खराट्याला भुतारा म्हणतात. नारळाचा झाप पडला की तो सुकवायचा, मग त्याच्या पानांची छाटणी करायची आणि विळी किंवा कोयत्याच्या सहाय्यानं या लांब पात्या सोलायच्या...म्हणजे जी काडी हाती येईल, त्याचा मोठा गठ्ठा करुन तो ओल्या सुंभानं चांगला घट्ट बांधायचा...ही पण एक कला. कारण हा भुतारा असा घट्ट बांधला की त्याला कितीही आपटा तो काही सुटत नाही. मग झाडलोट करायला याचा वापर होणार....गाव सुटलं आणि हा भुतारा म्हणजेच खराटाही सुटला. नारळाच्या या खराट्याची जागा प्लॅस्टिकच्या खराट्यानं घेतली. आता ब-याच वर्षांनी पुन्हा हा नारळाचा खराटा पाहिला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गावी तर खराटा जवळपास फुकटातच
मिळतो...पण इथे त्याची किंमत बघितली आणि डोळे मोठे झाले. तब्बल अडीचशे रुपयाला हा नारळाचा खराटा होता. पहिल्यांदा बघितल्यावर जे आर्श्चय वाटलं होतं ते आता कुतुहल झालं. खराट्याचं पाकीट हातात घेऊन त्यावरील सर्व सूचना वाचायला सुरुवात केली. त्यावर खराटा कशापासून झाला आहे, त्याचं उपयोगी मुल्य, वापरण्याची पद्धत याची सर्व माहिती होती. शिवाय प्लॅस्टिक पासून दूर रहा आणि निसर्गाच्या जवळ जा...असा संदेशही छापला होता. विशेष म्हणजे भुतारा ज्या रश्शीनं बांधला होता तशीच एक जादा रश्शीही सोबत देण्यात आली होती. आणि ती कशी बांधावी याचे फोटोही त्या पाकीटावर छापण्यात आले होते. मग मी त्या कापसाच्या फुलवातींकडे वळले. तुपासोबत त्या वातींना चंदनाची पावडर लावण्यात आली होती. त्यामुळे त्या लावल्यावर चंदनाचाही सुवास पसरणार होता.
या वस्तूंच्या पाकीटावरील सूचना आणि माहिती वाचण्यात मला अर्धा तासाच्यापेक्षा अधिक वेळ लागला. तो पर्यंत नव-यानं बील पेड केलं. सामानाच्या पिशव्या भरून त्या गाडीतही भरल्या...तरीही माझा पाय काही
बाहेर निघेना...म्हणून तो परत आला...मी अजूनही त्या वाती आणि खराट्याच्या आसपास भटकत होते...घ्यायचंयं का म्हणून त्यानं विचारलं...आणि मी नकार दिला...आणि त्यालाही त्याच्यावरच्या सूचना, माहिती दाखवली. तेव्हा हसून तो म्हणाला हा मार्केटींगचा जमाना आहे. निट पॅकींग करुन विकलं तर काहीही विकता येतं अगदी मातीही....पटलं...हे जर लहानपणी कळलं असतं तर कितीतरी काकड वाती विकता आल्या असत्या...असा नाठाळ विचार मनात आला...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा





सुरेख
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteमोठ्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये असंच होतं. तुझी निरीक्षण शक्ती मात्र कमाल आहे.
ReplyDeleteधन्यवाद मॅडम....
Deleteधन्यवाद...
ReplyDeleteसई किती साधा विषय !
ReplyDeleteतुझी लेखणी आनंद देऊन गेली
अनुराधा फाटक