बस्स..एक थप्पड…
एका जुन्या मैत्रिणीची सहज आठवण झाली. तेव्हा मी नाशिकमध्ये एका
हॉस्टेलमध्ये रहात होते. हॉस्टेलचं लाईफ जसं असतं तसंच तिथलं वातावरण. सकाळी कॉलेज
गाठण्यासाठी सर्वांची ही...घाई. दुपारी जेवणासाठी फार थोड्या मुली हॉस्टेलमध्ये
असायच्या. बहुतेक जणी दुपारचे डबे घेऊन कॉलेज गाठायच्या. मग संध्याकाळी-रात्री
सर्वजणी परत आल्या की एकच धम्माल असायची. रात्रीच्या जेवणावर दिवसभरच्या गप्पा
व्हायच्या. कधीकधी या गप्पा रात्रभर जागूनही संपायच्या नाहीत...अशाच वातावरणात
अचानक आमची एक मैत्रिण गप्पचूप रहायला लागली. तिच्यावर तिच्या कामाच्या जागी कुणीतरी
हात उचलला होता. या घटनेचा माझ्या मैत्रिणीच्या मनावर मोठा परिणाम झाला. ज्यांनी
मारलं, त्यांनी काही दिवसांनी तिची माफीही मागितली आणि ते बाजूला झाले. पण त्या
घटनेतून ती मैत्रिण काही लवकर सावरु शकली नाही. नंतर ती उच्च शिक्षणाच्या
निमित्तानं देशाबाहेर गेली आणि तिथेच विसावली. पण या सर्वात तिच्या सोबत झालेला प्रसंग आमच्या
हसत्या खेळत्या हॉस्टेल लाईफमधला एक थरार ठरला. आज पुन्हा त्या मैत्रिणीची आठवण
होतेय...तिच्या मनाला तेव्ही कशा आणि किती वेदना झाल्या असतील, याची आता नव्यानं
जाणीव होतेय.
मैत्रिण म्हणजे तनुजा. डॉक्टर तनुजा. नाशिक जवळच्या एका खेडेगावातून आलेली. तिचे वडील पक्के शेतकरी. चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या या माणसाच्या गाठी ज्ञानाचं पक्क गाठोड होतं. लेकीबाळी शिकल्या पाहिजेत, हे त्यांचे ब्रिद वाक्य. त्यामुळेच मोठ्या लेकीला, म्हणजेच तनुजाला त्यांनी पाचवीपासूनच गावापासून दूर असलेल्या एका बोर्डींग शाळेमध्ये पाठवले. तिच्या पाठोपाठ तनुजाची धाकटी बहीण आणि भावालाही या शाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. तनुजाच्या सांगण्यानुसार, दहावी नंतर तिने मला डॉक्टर व्हायचं आहे, हे वडिलांना सांगितलं, तेव्हा तिच्या वडिलांनी अख्या शाळेला पेढे वाटले होते. बारावी पर्यंत त्या शाळेमध्ये राहून तिनं मेडिकलच्या परीक्षा दिल्या आणि मग दुसऱ्या शहरांमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये दाखला घेतला. तनुजाच्या धाकट्या बहिणीने इंजीनियरिंग शाखेला पसंती दिली. तनुजा मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून ट्रेनी डॉक्टर म्हणून नाशिक मध्ये आली आणि आमच्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. तेव्हा ती तिच्या वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत हे डोळे पाणावून सांगायची. वडीलांनी शेतीचा काही भाग या बहिण भावंडांच्या शिक्षणासाठी विकला, तेव्हा तनुजाचं आणि तिच्या वडिलांचे भांडणही झालं होतं. वडिलांचं शेतीवर किती जीवापाड प्रेम आहे, हे तिला माहीत होतं, पण वडिलांनी माझं शेतीवर जेवढं प्रेम आहे तेवढंच माझ्या लेकींवर आहे, या लेकींच्या शिक्षणासाठी मी स्वतःलाही विकायला तयार आहे, हे सांगितल्यावर तनुजा वडिलांच्या गळ्यात पडून रडली होती. वडिलांच्या या ध्येयामुळे दोन्हीही बहिणी आपलं शिक्षण गुणवत्तेवर पूर्ण करत होत्या. आमच्या रात्रीच्या गप्पांमध्ये तनुजा जेव्हा सामील व्हायची तेव्ही ती तिच्या वडिलांच्या कष्टाबद्दल नेहमी सांगायची. तिचे वडील हे आम्हा सगळ्या मैत्रिणींचे फेवरेट होते. कारण ते जेव्हा जेव्हा तनुज्याला भेटायला यायचे, तेव्हा गावचा भरपूर खाऊ घेऊन यायचे. तूप, लोणचं, चटण्या, यांच्या बरण्या असायच्या. चकल्या लाडू करंज्या चिवडा यांचे डबे भरून घेऊन यायचे. सोबत त्यांचं ब्रीदवाक्य....लेकी बाळी शिकल्या पाहिजेत....न चुकता ते आम्हा सगळ्या मैत्रिणींच्या शिक्षणाबाबत चौकशी करायचे, असंच शिका जिद्दीने पुढे जा, असा
आशीर्वाद देऊन निरोप घ्यायचे.
त्यांचीच लाडकी लेक तनुजा एक दिवस संध्याकाळी हॉस्टेल मध्ये आली आणि
रूमचा दरवाजा लावून खूप वेळ आत बसून राहिली. तिची रूम पार्टनर आल्यावर तिने बराच
वेळ दरवाजा वाजवला. पण तनुजानं दरवाजा उघडला नाही. मग काय, सगळ्या मुली घाबरल्या. वाँडर्न मॅडमही
आल्या, सगळ्यांनी नंतर आरडाओरडा केल्यावर
तनुजाने अखेर दरवाजा उघडला. तेव्हाचा तिचा
चेहरा अद्यापही विसरू शकलेले नाही. तनुजाचा चेहरा सुजला होता. डोळे रडून लाल झाले होते...अंग थरथर कापत
होतं. काय झालं म्हणून आम्हा सगळ्या मुली
घोळका करून एकाच वेळी तिच्या अंगावरच गेलो, तेव्हा ती जोराने ओरडली काही नाही,
तुम्ही सगळ्या बाहेर जा.... शेवटी वाँर्डन मॅडमनी आम्हाला बाहेर काढलं.
बराच
वेळ त्या तनुजा सोबत बसल्या होत्या. त्यांनी तिथेच तिच्यासाठी जेवणाचा ताटही
मागवलं. ती रात्र आमच्या हॉस्टेल साठी
सगळ्यात विचित्र रात्र ठरली. कारण नेहमीचा चिवचिवाट एका गंभीर वातावरणात बदलला
होता. रात्री उशिरा सगळ्यांना कळलं की, हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या पद्धतीवरून आक्षेप घेत
तनुजाला जाब विचारला. तेव्हा हॉस्पिटलचे मुख्य
डॉक्टर नेमके ऑपरेशन थेटर मध्ये होते. रुग्णावर होत असलेल्या उपचाराबाबत आक्षेप
घेणाऱ्याने ताबडतोब मुख्य डॉक्टरांना बोलवा, म्हणून तनुजाकडे आग्रह केला. ऑपरेशन सोडून डॉक्टर कसे येणार, एवढं एकच वाक्य तनुजा बोलली, आणि त्यांनी चक्क तिच्यावर हात उचलला. चार-पाच जणांच्या या टोळक्याने तनुजाला घेरुन तिच्यावर
प्रश्नांची सरबत्ती केली. या सगळ्यात ती
प्रचंड हडबडली. तिला या टोळक्यापासून
सोडवण्यासाठी हॉस्पिटलचा स्टाफ मध्ये आला. तेव्हा त्यांनाही फटके खावे लागले. ऑपरेशन
झाल्यावर मुख्य डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांना या सगळ्या प्रकाराची माहिती
मिळाली. त्यांनी प्रथम तनुजाची भेट घेतली.
तिला जबर मानसिक धक्का बसला होता. तनुजावर
हल्ला करणाऱ्यांना डॉक्टरांनी समज दिल्यावर त्यांनी तनुजाची माफी मागितली, आणि ते
मोकळे झाले.
पण आपल्यावर कोणीतरी हात उचलला, ही तनुजाची अवस्था बघता डॉक्टर आणि
स्वतः तिला गाडीतून हॉस्टेलवर सोडलं होतं आणि दोन दिवस आराम कर, वाटल्यास घरी जाऊन ये, असा सल्ला दिला
होता. अर्थात हे सर्व विसरणं तनुजासाठी
सोपं नव्हतं. ती रात्र तनुजा सोबत आम्ही
सुद्धा जागून काढली होती. रात्रीच मॅडमनी तिच्या
वडिलांना फोन करून सगळी कल्पना दिली आणि सकाळी यायला सांगितलं होतं. त्यानुसार तिचे वडील हॉस्टेलवर आले. आम्ही पहिल्यांदा त्या काकांना एवढ्या चिंतेत
बघितलं. वडिलांना बघून तनुजा ओक्साबोक्शी
रडली. तिला शांत करून वडील तिला त्या
हॉस्पिटलमध्येही घेऊन गेले. मुख्य डॉक्टरांना भेटले, ज्यांनी माझ्या मुलीला मारलं,
त्यांना माझ्यासमोर उभं करा, म्हणून सांगितलं. पण ज्यांनी तुनजावर हात उचलला होता,
त्यांचे राजकीय लागेबांधे मोठे होते. डॉक्टरांनी त्या काकांसमोर हात जोडल्यावर
काका काही दिवसांसाठी तुनजाला घेऊन गावी गेले.
या घटनेचा डॉक्टर असलेल्या तनुजाच्या मनावर खोलवर परिणाम झाला. गावावरुन परत आल्यावर पूर्वीची तनुजा हरवलेली होती. बोलकी असलेली तनुजा, आता शांत शांत राहू लागली. पहिल्यांदा ती हॉस्पिटल मधील गमती जमती आम्हाला सांगायची. आता त्या गमती जमती बंद झाल्या आणि तनुजाचं हसणंही. रात्री आम्ही सगळ्याजणी जेवायला जाताना हटकून तिला सोबत न्यायचो, ती काही बोलत नसली तरी तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करायचो. तिचे वडील आठवड्यातून एकदा तिला भेटायला यायचे. लेकीला डॉक्टर करण्यासाठी मी काय काय केले हे कोणाला सांगू, म्हणत डोळ्यातील अश्रू आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करायचे. त्या घटनेला चार-पाच महिने उलटून गेल्यावर तनुजा थोडी थोडी बोलायला लागली. आमच्या रात्रीच्या गप्पांमध्ये ती पुन्हा एकदा सामील व्हायला लागली. अशाच गप्पांच्या ओघामध्ये तिच्या मनातली ती दुखती नस आमच्या समोर बाहेर आली आणि ती पुन्हा तेवढीच रडली होती. त्या दिवशी झालेल्या घटनेमध्ये ज्यानं तिच्यावर हात उचलला, त्याच्यामते, फक्त एकच थप्पड मारली. पण त्याच्या त्या कृतीनं तनुजाचं अख्खं आयुष्य बदललं होतं. आपण न केलेल्या चुकीबद्दल कोणीतरी आपल्याला मारलं, हे ती सहनच करू शकत नव्हती. आपल्यावर हात उचलणारा दहावी सुद्धा नव्हता... अशा माणसाची एका डॉक्टर वर हात उचलायची हिम्मतच कशी होते...वरुन त्यानं माफी मागितली, आणि सर्व ठिक झालं, या झोकात हॉस्पिटलमधून बाहेर गेला....त्याला कुणी शिक्षा का केली नाही....हा तिचा प्रश्न होता. तनुजा सांगत होती, मला आता नेहमी हॉस्पिटलमध्ये जाताना त्या माणसाची अर्वाच्च भाषा आठवते...हातात इंजेक्शन पकडलं की हात थरथरतो....असाच हात त्याचाही कधी थरथरत असेल का ग....म्हणत तनुजा पुन्हा रडली आणि तिच्यासोबत आम्हीही....पुढच्या महिन्यातच तनुजानं पुढचं शिक्षण घ्यायचं आहे म्हणून त्या हॉस्पिटल मधून नोकरी सोडली आणि ती परदेशी जाण्याची तयारी करू लागली. तिच्या वडिलांना लेकीची होणारी घुसमट कळत होती. त्यांनी पैशांची तजवीज करुन लेकीला परदेशी पाठवण्याची तयारी केली. पुढच्या सहा महिन्यातच आमची मैत्रीण परदेशी उच्च शिक्षणासाठी गेली. त्यानंतर एक दोनदा तिचा फोन आला पण नंतर मात्र तिने आमच्याशी काय, शहराशी आणि बहुदा देशाशी संबंध तोडून टाकला.
आज मला या तनुजाची पुन्हा एकदा आठवण झाली, कारण आमच्या शहरात घडलेली एक दुर्दैवी घटना...आता त्या डॉक्टरांना मारणाऱ्याने माफी बिफी मागितली आहे. त्याच्यावरून भरपूर राजकारणही सुरू आहे... पण तो आपला विषयच नाही. मला काळजी आहे त्या तरुणीच्या मनाची. तिच्या शिक्षणासाठी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवणाऱ्या पालकांची....वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी तिच्या सोबत तिच्या पालकांनीही काही वर्षाची साधना केली असणार...आपल्या सुखसोयींनी मुरड घालत लेकीच्या शिक्षणाचा खर्च उचलला असणार...अशात कोणीतरी येतो आणि...बस्स, एक थप्पड तर होती...म्हणून आपल्या कृतीचं जाहीरपणे समर्थन करतो...या मानसिकतेला कुठली शिक्षा करणार हाच प्रश्न आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
Comments
Post a Comment