आई.................प्लीज...................टॉप गेअरमध्ये असलेल्या गाडीला कचकचून ब्रेक लागल्यावर जसा आवाज येतो, त्याच स्वरात माझा लेक मला प्लीज म्हणत होता....आणि मी पडेल आवाजात त्याला सॉरी सॉरी म्हणत होते....हा भाग होता आमच्या घरातील ई...साक्षर मोहीमेचा...गेल्या काही दिवसांपासून लेकाच्या पुढच्या शिक्षणाची तयारी सुरु झाली, तेव्हा पहिली जाणीव झाली की लेक बाहेर गेला की आपलं आयुष्य शून्य होऊन जाणार आहे. त्याच्यावाचून मी एक मिनीट ही राहू शकत नाही....तो म्हणजे माझा जीव की प्राण....या छापिल वाक्यासोबत एक सत्य स्विकारणं भाग आहे, ते म्हणजे सोशल मिडीयामधलं माझं जे शिक्षण झालं आहे, त्याचा गुरु तो आहे. बरं हे करतांना त्याचा सोशल मिडीयतला वावर शून्य टक्के आहे. तरीही मला प्रत्येक साईटवर अँक्टिव करण्यात त्याचा शंभर टक्के वाटा आहे. सोशल मिडीयातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला पासवर्ड असतो....आणि मी इथेच अनेकवेळा मार खाते. कितीही पाठ केलं तरी तो पासवर्ड भाग माझ्या लक्षात रहात नाही. अगदी त्याच्या सुचनेनुसार एका वहित नोंद करुन ठेवली तरी तो ऑपरेट करतांना मी हसखास चूक करणार...बहुतांशी वेळा....जरा करुन देतोस का रे...अशी पळवाट काढून त्यालाच सर्व करायला सांगण्यात मी धन्यता मानलेली. त्यामुळे आता जेव्हा पुढच्या शिक्षणासाठी लेक जर दुस-या शहरात गेला तर करायचं काय...हा माझ्यासमोरचा पहिला प्रश्न होता...अशावेळीही तोच मदतीला आला...आता तुझी सर्व कामं तू स्वतः करायला घे...चुकलं तर मी आहे...पण प्रयत्न कर...म्हणून एक दिवस सर्व सोशल मिडीयाची अकाऊंट त्यानं चक्क डीलीट
मारायला घेतली....अचानक चालू झालेल्या या परीक्षेनं मला घाम फुटला....पण नाही बोलून चालणारा हा गुरु नाहीच...त्यामुळे एक एक स्टेप करत कसरत सुरु झाली...सर्व जमत असतांना गाडी पुन्हा पासवर्डवर अडली....हाच तर होता...म्हणत मी पासवर्ड टाकला आणि तो नेमका चुकला...दोनवेळा हे झाल्यावर पुन्हा तिस-या वेळी तशीच चूक करतांना मागे बसलेल्या लेकानं मला पकडलं...आणि जोरदार ओरडा खायची वेळ आली....
मी बहुधा नववी किंवा दहावीला असतांना पहिलं मशीन माझ्या परिचयाचं झालं...ते म्हणजे टायपिंग मशीन...टायपिंग येणं ही त्याकाळी मोठी कला समजली जायची. त्यातल्या त्यात मराठी टायपिंग येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यासाठी स्पेशल क्लास लावला होता. टायपिंग मशीनवरुन हाताची बोटं सटासट चालायला लागली की स्वतःचंच किती कौतुक वाटायचं...जणू आपण आकाशात विमान उडवत आहोत असा आत्मविश्वास
वाटायचा...पुढे पत्रकारितेत आल्यावर मराठी टायपिंग येणं ही गरजेची गोष्ट ठरली. त्यासोबत संगणक येणंही गरजेचं झालं. मोतीया रंगाच्या मोठ्या संगणकासमोर बसतांनाच तेव्हा कसला भारी अभिमान वाटायचा स्वतःचा...संगणक चालवता येणं...त्याच्यावर पेपरची पानं लावणं...बातम्या वाचणं...ही वृत्तपत्रातली नेहमीची कामं होती. पण संगणाकाच्या सहाय्यानं हे सर्व करतांना वेगळाच उत्साह असायच्या...पुढे कामाचं स्वरुप बदललं...पत्रकारिकेचं स्वरुप बदललं...तशी हातातली साधनंही बदलली...संगणकही आपलं रुप बदलत गेला...मोठ्या संगणकाऐवजी आटोपशीर संगणक आला...तोही सगळ्यांसाठीच...आता जे करायचं ते या संगणकाच्या सहाय्यानंच हे ठरलं... त्यामुळे पहिल्यांदा वाटायची ती भावनाही गेली...हा झाला कामाचा भाग...पण यासोबत सोशल मिडीयाही बहरत होता. हातातल्या मोबाईलवर सर्व सुविधा आल्या आणि मग यातील कुतुहल, उत्सुकता सर्व संपून गेले. त्यात काय विशेष आहे....हे वाक्य आल्यावर तर सोशल मिडीया मोबाईलवर हाताळता आला नाही तर तो ई...निरक्षर म्हणूनच ओळखला जाऊ लागला...
या सर्वांत फिप्टी फिप्टी अशीच माझी भूमिका राहीली. लेकामुळे थोडा काळ नोकरीपासून लांब झाले. त्यामुळे संगणकाचा संबंध कमी झाला. त्याची कमी हाती आलेल्या मोबाईलनं भरुन काढली. आता मोबाईलवर सोशल मिडीयामध्ये अकाऊंट काढायचं तर कोणाला तरी रिक्वेस्ट करा....आणि मग त्या सुविधेचा वापर करा इथपर्यंत मी मर्यादीत होते. पुढे लेक मोठा झाल्यावर नकळत त्याच्या हातात मोबाईल गेला. काही हवं असेल तर त्याचा हातात मोबाईल द्यायचा आणि त्याला ते ऍप चालू करायला सांगायचे...आणि त्याच्याकडून ते चालवायचे कसे याचे प्राथमिक धडे घ्यायचे...हा वर्ग बरा जमला होता. बरं लेक कुठल्याही सोशल मिडीयाबरोबर जोडलेला नाही...त्यामुळे मी नेहमी कौतुकानं त्याला विचारणार, तुला कसे जमते हे....आणि यावर तो नेहमीचे उत्तर देणार....मी वाचतो...बस्स...आत्ता आत्ता पर्यंत तरी असेच चालू होते. आता तर या कोरानामुळे तो हक्काचाच झाला...एकाच रुममध्ये आम्ही तिघं आपापली आयुधं घेऊन बसू लागलो. लेकानं बरोबर एक कोपरा पकडला. माझ्या संगणकांच्या स्क्रीनवर बरोबर
त्याची नजर असणार...काही अडचण आलीच तर लगेच त्याला सांगायचं...मग तोही हौशीनं पुढे येणार...आई साधसच आहे...किती घाबरतेस....काहीही होत नाही...असं म्हणत...फटाफट काहीतरी करणार...आणि पुन्हा माझं काम चालू करुन देणार...हे करतांना, तू शिकून घे ना आई....म्हणूनही सांगणार...पण बेटा तू जरा हळू कर ना...तू करतोस ते समजत नाही...जरा हळू कर ना...या माझ्या बोलण्यावर...असं हळू केलं तर मलाच समजणार नाही...हे त्याचं उत्तर...गेले दोन वर्ष तरी असा आमच्यातला संवाद कामय होणारा...पण अलिकडे काही दिवसांत जाणवायला लागलं होतं की हा मदतीचा हात काही कायमचा आपल्यासोबत रहाणार नाही.
त्याच्या पुढच्या शिक्षणाबाबत जेव्हा बोलणं सुरु झालं तेव्हा त्याच्या पसंतीच्या सर्व शैक्षणिक संस्था दूस-या राज्यातल्या आहेत, त्यामुळे आज ना उद्या हे पिल्लू आपल्याला सोडून पुढे जाणार याची जाणीव होत गेली. त्यातूनच आणखी एक जाणीव झाली की, हे पिल्लू आपल्यावर अवलंबून नाही तर
आपण या पिल्लावर अवलंबून आहोत. ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यावर खूप जोक मारुन झाले...पण त्यानं वास्तविकता बदलली नाही. माझे सर्व सोशल मिडीयावरील अकाऊंट, त्यांचे पासवर्ड, त्यात काही अडचण आल्यास त्याला हाताळण्याच्या पद्धती....या सर्वांची माहिती स्वतः करुन घेणे गरजेचे होते. शेवटी त्यानंच सांगितलं...तू स्वतः सर्व डाऊनलोड मार....आणि नव्यानं सुरुवात कर...तू कर तर, आणि मी आहेच मागे....त्याच्या या शब्दानं विश्वास आला...आणि नवीन शाळेची सुरुवात झालीय....यात नको ते घोळ होतात...काहीतरी चुकलं तर सर्व बंद होईल की काय अशी भीती वाटते...कधीतरी त्याचा ओरडा बसतो...पण तोही मी कौतुकानं सहन करतेय....यालाच कालचक्र म्हणतात की काय कोण जोणो...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Comments
Post a Comment