एक लग्न सोहळा....

 

   एक लग्न सोहळा....


हॅलो...कशी आहेस...वेळ आहे का तुझ्याकडे...एक मोठी स्टोरी सांगायचीय तुला...तू नेहमी कोणाचं तरी लिहितेस ना...मी सांगेत बघ तुला आज माझ्या एका मैत्रिणीची स्टोरी...म्हाइताय का काय झालं ते....अशी सुरुवात करत किमान अर्धा तास तरी शलाका बोलत होती.  शलाका माझी खूप चांगली मैत्रिण...काही वर्ष आमच्या घराच्या आसपास रहाणारी....अलिकडच्या तीन-साडेतीन वर्षात शहराबाहेरील मोठ्या सोसायटीत रहायला गेली.  मुळातच धडपडा आणि बोलका स्वभाव असलेली शलाका या मोठ्या सोसायटीमध्ये लोकप्रिय झाली...चांगला मोठा ग्रुप तयार झालाय तिचा तिथे...अगदी बाई सोसायटीच्या कमेटीवर देखिल आहेत.   सोसायटीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमही करते...आणि हे कार्यक्रम झाले की ते कसे झाले...कोणी किती मदत केली...कोणाची नवी ओळख झाली...याचा सगळा रिपोर्ट मला पास करते...तिने जेव्हा फोन केला, आणि बोलायची सुरुवात केली, तेव्हा मला वाटलं की नेहमीसारखं काही सांगेल...पण शलाकाला यावेळी आलेला अनुभव वेगळा होता...ती तो मला सांगत होती...अत्यंत भारावलेला तिचा आवाज आणि सांगण्याची पद्धत यामुळे मी तो लग्न सोहळा समोर बघतेय असा अनुभव येत होता.  या अर्ध्या तासात मला काही बोलावेच लागले नाही....मी फक्त शलाकाचं ऐकतं होते...आणि त्या लग्न सोहळ्यातील नव्या पिढीला मनातून सलाम करत होते. 


शलाकाच्या सोसायटीमध्ये रहाणा-या तिच्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाची गोष्ट होती.  शलाकाच्या या मैत्रिणीचा नव-याचं एका अपघातात निधन झालेलं.  त्यावेळी दोन मुलं शिक्षण घेत होती.  ती स्वतः एका डीपार्टमेटं स्टोअरमध्ये कामाला होती.  पतीच्या निधनानंतर सर्व कौटुंबिक जबाबदा-या पडल्यावर ही मैत्रिण भांभावली होती.  कायम कोणाच्या तरी सल्ल्याच्या ओझ्याखाली रहायला लागलं.  मुलगी मोठी होती.  तिचं लग्न करुन टाक...तेवढी जबाबदारी कमी होईल असा कुटुंबातील मोठ्यांचा दबाव आला.  मुलीची इच्छा शिकण्याची होती.  नाही नाही म्हणत वडील गेल्यावर एक वर्षाच्या आत तिला लग्न करावं लागलं.  नशिबानं मुलगा आणि सासर चांगलं होतं.  तिने पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली.  त्यांनी ती आनंदानी स्विकारली...आता या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाली.  या वर्षात ती मुलगी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करु लागलीय..पण या सर्वात तिच्या लग्नाच्या वेळी आपल्या आईची झालेली कुचंबणा या दोन मुलांशिवाय कोणीच ओळखू शकलं नाही.  नवरा गेला...म्हणजे जणू बाईचा जगण्याचा हक्कच गेला.  स्वतःच्या मुलीच्या लग्नात पुजेला बसण्याचा हक्कही तिला नाही.  कोणा नातेवाईकांना तो मान दिला गेला.  त्यांनीच तिचं कन्यदान केलं.  आई दूरवरुन आसवं गाळत हे सर्व बघत होती.  आणि ती मुलगी मान खाली घालून आईचे दुःख डोळ्यातील अश्रूतून व्यक्त करत होती...वडीलांची आठवण येत असेल म्हणून सर्वांनी तिचं सांत्वन केलं.  वडील गेले पण आई आहेना....तिला करुदे माझं कन्यदान हे बोलण्याचं धाडस ती दाखवू शकली नाही.  मुलीला ही सल अजूनही आहे.  लाडक्या लेकीचं लग्न, तेही वडील नसतांना त्यामुळे आईनं कुठलीही कसर ठेवली नाही.  आपले

दागिने मुलीच्या लग्नात मोडले.  जसा सांगितला तसा खर्च केला...पण ती स्वतः एका साध्या साडीमध्ये आपल्या मुलीच्या लग्नात वावरली.  यावर आता नवरा गेल्यावर कशाला हवीय सगळी हौस म्हणून लेबल लावण्यात आले.  कुटुंबातील जी मोठी मंडळी लग्नाच्या वेळी पुढे आली...त्यांनी फक्त आयत्या तयारीवर आपली मोहोर उमटवली.  लग्नात यजमान म्हणून मान मिळवला....आणि मुलीच्या निरोप समारंभात...आम्ही आलो म्हणून तुझ्या घरात मंगल कार्य झालं...असा शेरा मारला...हा शेरा त्या बाईला किती लागला ते माहित नाही...पण तिच्या दोन मुलांना मात्र चांगलाच लागला.  नव-या मुलीला सर्वांसमोर केलेला तो आईचा अपमानच वाटला.  पण प्रसंग आणि वेळ बघून ती काहीच बोलू शकली नाही....

पण या सर्वांचा या दोन मुलांनी आता बदलाच घेतला जणू.  बहिणीचं लग्न झाल्यावर मुलांनी आईला चांगलाच पाठिंबा दिला.  नोकरी करुन त्यांनी शिक्षण केलं.  मुलींनही सासरी गेल्यावर संधी बघून लग्नातील प्रसंग आपल्या सासूला सांगितला,  आणि मला आईचा अपमान झाल्यासारखे वाटले...तुम्हाला काय वाटलं म्हणून विचारलं.  त्या बाईंनी या बाईच्या मनाचा वेध घेतला आणि आपल्यालाही ही गोष्ट पटली नव्हती...पण तेव्हा बोलता आलं नाही म्हणून कबुली दिली.  आता मुलाच्या लग्नाचे वेध सुरु झाले.  त्याची नोकरी चांगली...पद मोठं आणि पगारही चांगला.  म्हणून रहाता फ्लॅट विकून मुलांनी शहराबाहेर होत असलेल्या सोसायटीमध्ये फ्लॅट बुक केला.  जेव्हा शलाका रहायला गेली तेव्हाच हे मायलेक त्या सोसायटीमध्ये रहायला गेले.  शलाकाची आणि तिची विंग एकच.  दोघींचीही मैत्री झाली.  तिथे आल्यावर काही महिन्यात या शलाकाच्या मैत्रिणीची नोकरीतून निवृत्त झाली.  शलाकानं तिला पाळणाघर चालव म्हणून पर्याय दिला आणि काही मुलं मिळवूनही दिली.  त्यातून या बाई पुन्हा आत्मनिर्भर झाल्या.  आता मुलाच्या लग्नाची बोलणी सुरु झाली तेव्हा पुन्हा कुटुंबातील मोठ्यांनी मान वर काढली.  असं करावं लागेल...तसं करावं लागेल...यावेळी पुजेला कोण बसणार हेही ठरवून ठेवलं.  हे सर्व मुलासमोर होत होते...पण मुलगा आणि मुलींनं काही वेगळंच ठरवलं होतं.  एका ठिकाणी मुलगी पहाण्याचा कार्यक्रम झाला.  पसंती झाली, तेव्हा या दोघांनी आमची अट असल्याचं सांगितलं...ही अट म्हणजे, लग्नात आमची आईच सर्व विधी करणार...आमच्या वडीलांच्या निधनानंतर आमची आईच सर्वकाही आहे.  आणि तिला तिचा मान मिळायलाच हवा म्हणून आम्ही आईशिवाय लग्नात कोणालाही विधी करु देणार नाही...अशी भूमिका घेतली.  पहिल्यांदा सोबत आलेल्या नातेवाईकांनी गोंधळ घातला...पण या दोघांनी त्यांना थांबवून घरी बोलूया म्हणून शांत केलं.  मुलीच्या घरी आमची अट मान्य असेल तर हो म्हणा,  आणि नाही म्हटलंत तरी आम्हाला राग येणार नाही म्हणून निरोप घेतला.

घरी आल्यावर कुटुंबाची छोटी वादळी सभाच झाली.  तुम्ही सर्वांच्या विरोधी भूमिका घेत आहात म्हणून सांगितलं...यावर मुलांनी आपली बाजू सांगितली.  जर तुम्हाला माझ्या लग्नातलं यजमानपद हवं असेल तर सगळा खर्च तुम्ही करा असा प्रस्ताव ठेवला.   वडील नाहीत म्हणून माझी आई अपवित्र होत नाही.  आई म्हणून ती कुठेही कमी नाही.  उलट वडील गेल्यावर त्यांच्या जागी ती उभी राहीली...मग लग्नातल्या विधींसाठी ती का नको...आम्ही असंच लग्न करणार...ज्याला यायचं त्यांनी यावं...आणि हट्टानं यजमानपद हवं असेल तर खर्चांचं बजेट मान्य करावं.  या असल्या अटीनं रिती, परंपरा यांची वकिली करणा-यांची तोंड बंद झाली.  इकडे त्या मुलीच्या घरीही चर्चा झाली.  पण या सर्वात मुलीच्या आजीच्या मतांनी सरशी केली.  मुलगा आपल्या आईला जपतोय.  एक स्त्री म्हणून तिचं दुःख जाणू शकतोय....म्हणजेच तो आपल्या मुलीचीही काळजी घेईल...तिच्या मताला या घरात मान असेल...आपण होकार देऊया म्हणून आजी हो म्हणाली.  हा होकार आल्यावर शलाकाच्या मैत्रिणीला आनंद झाला....तिच्या मुलांनी लग्नात फार खर्च करणार


नसल्याचं आधीच सांगितलं होतं.  त्यामुळे एकदा लग्न ठरल्यावर वेळ कशाला म्हणत दोन्ही कुटुंबांना एक सोयिस्कर दिवस ठरवण्यात आला.  कोरोनाचे नियम त्यांना फायदेशीर ठरले.  आमची आई लग्नातील विधी करणार आहे, तुम्हाला हे मान्य असेल तरच लग्नाला या...असा प्रश्न करुनच मुलांनी पाहुण्यांची यादी काढली.  अर्थात यात कुटुंबातील जाणकारांचा समावेश नव्हता हे सांगायला नकोच...हा माझी शलाका पहिल्या क्रमांकावर होती.  दोन्ही कुटुंबांनी अगदी साधा सोहळा केला.  मोजकी खरेदी केली...दोघांचेही वैचारिक सूत जमलं...त्यामुळे एकानं बोलावं आणि दुस-यांनी व्वा...म्हणत होकार द्यायचा अशा थाटात खरेदी झाली.  लग्न त्यांच्या सोसायटीच्या हॉलमध्येच झालं.  तीस-पत्तीस माणसं लग्नाला होती...पण सर्वांनी मुलाच्या मातृप्रेमाला वंदना दिली.  या दोन्ही कुटुंबांनी लग्नातला वाचलेला खर्च आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून पुरात नुकसान झालेल्या एका शाळेला काही रक्कम दिली.  या शाळेचे मुख्याध्यापकही या दोघांना आशिर्वाद द्यायला आले होते.  त्यांनीही शलाकाच्या मैत्रिणीचं, मुलावर खूप चांगले संस्कार केलेत म्हणून कौतुक केलं.  या सर्वात शलाका तिच्या मैत्रिणीची पाठराखीण होती....ही मैत्रिण विधी करतांना पहिल्यांदा थोडी बिचकली...पण यावेळी नव्या सुनेनं तिचा हात हातात घेतला...तिला विश्वास दिला....हा क्षण लग्नसमारंभातला मोठा टची सीन ठरला...सासू-सून नात्याचं एक वेगळं बंध इथे बांधलं गेलं...बहुतेकांच्या डोळ्यात पाणी आलं...शलाका सांगत असतांना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. 

मध्ये कधीतरी मी एक महिला अत्याचार आणि समाजाची भूमिका या विषयावरील लेख वाचत होते, त्यात एका वाक्यात त्या लेखाचं सार सांगण्यात आलं होतं.  हे वाक्य म्हणजे, एक स्त्री जेव्हा दुस-या स्त्रीचे दुःख जाणून आणि वाटून घेईल, तेव्हाच खरी स्त्री सुधारणा झाली असे म्हणता येईल.  हे वाक्य तेव्हा माझ्या मनाला भावलं होतं.  शलाका तिच्या मैत्रिणीची गोष्ट सांगत असतांना हेच वाक्य माझ्या मनात पिंगा घालू लागले...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

   

Comments

Post a Comment