आई, मी काय करु....
आई, मी काय करु....सोमवारी सकाळी दहा वाजता उठल्यावर आरामात बसलेला माझा लेक मला प्रश्न विचारत होता. आदल्या दिवशीच एक महत्त्वाची परीक्षा पार पडली होती. जेईई अँडव्हान्स....सातवी पासून तो या परीक्षेसाठी स्वतःची तयारी करत आहे. इथे मुद्दाम परीक्षेची तयारी नाही...तर स्वतःची तयारी म्हटलंय...कारण जसजसं या परीक्षेच्या जवळ जायला लागलो...तसंतसं जाणवायला लागलं की ही जेईई मेन्स आणि त्यानंतर होणारी अँडव्हान्स म्हणजे फक्त एका अभ्यासक्रमाची परीक्षा नाही. ही परीक्षा त्या मुलाची असते. त्याच्या मानसिकतेची असते. त्याच्या चिकाटीची असते...आणि त्याच्या सोबत अख्खं कुटुंब या परीक्षेसाठी तयार होत असतं. गेली काही वर्ष आम्ही तिघंही या परीक्षेसाठी तयारी करत होतो. कुठे फिरायला नाही...की कुठल्या कार्यक्रमाला नाही....कोणी विचारलं तर उत्तर एकच....लेकाची परीक्षा आहे. या उत्तरावरुन अनेक वेळा आम्ही मस्करीचा विषय झालो आहोत...एवढी कसली परीक्षा...एका दिवसानं काय होतं...मुलाला थोडा वेळ तरी मोकळं सोडा...त्याला थोडा तरी श्वास घेऊ दे...असे नको ते सल्ले मिळाले...पण अशावेळी आम्ही नेहमीचा उपाय करत होतो...दोन्ही कानांचा सुयोग्य वापर...एकानं ऐकायचं आणि दुस-यानं डिलीट करुन बाहेर टाकून द्यायचं...कारण या सर्वात महत्त्वाचं होतं ते लेकाची आवड...तो चौथीला असतांना आम्ही पहिल्यांदा त्याला घेऊन मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टला गेलो होतो. तेव्हा त्या वातावरणानं तो भारावला...मला इथेच यायचं हे वेड तेव्हापासून घेतलं. पुढे माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आयसरमध्ये गेला. तेव्हा आयसरची माहिती घेतली, आयआयटी किंवा आयसर मध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. नंतर दरवर्षीच मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टला फेरी होऊ लागली आणि आयआयटीचं वेडंच लागलं....तेव्हाच जेईई नावाची परीक्षा आमच्या कुटुंबात आली आणि कुटुंबाचा भाग झाली. सातवीपासून सुरु झालेला अखंड अभ्यासाचा प्रवाह आता काही दिवसांसाठी थांबला आहे. अगदी शनिवारपर्यंत बिझी असलेलं त्याचं शेड्यूल थोड्या दिवसासाठी बदललं आहे...त्यातूनच हा प्रश्न आला...आई मी आता काय करु...
त्याच्या प्रश्नासोबत अनेक आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असल्यापासून गणित, भौतिकशास्त्र....रसायनशास्त्राची गोडी होती. त्याच्या या आवडीला ओंकार शाळेच्या त्याच्या शिक्षकांनी खतपाणी घातलं. आमच्या शाळेच्या मोठ्या मॅडम...म्हणजेच दर्शना सामंत यांनी यात अधिक भर घातली. मुलांची आवड बघा आणि त्याला प्रोत्साहन द्या...सामंत मॅडमच्या या सूत्राचा माझ्या लेकाला खूप फायदा झाला. त्यांनी वेळोवेळी या परीक्षेची माहिती त्याला दिलीच शिवाय त्यासाठी किती मेहनत करावी लागते याची जाणीवही करुन दिली. शाळा सुटली पण मॅडमची ही शिकवणी सुटली नाही. अकरावी आणि बारावीच्या दोन वर्षात त्याची किती आणि कशी तयारी चालू आहे, याची त्यांनी माहिती घेतली आणि मार्गदर्शनही केले. या सर्वात कोरोनाची छाया होती. पण या अभ्यासाची नशा की काय लेकानं त्याचा फायदा करुन घेतला. त्याची खोली म्हणजे पुस्तकांचं अनोखं जग आहे. सर्वत्र पुस्तकं...त्याच जगात त्यांनी आपली एक जागा नक्की केली. अनायसे बाबाही वर्कफ्रॉम होम...त्यामुळे त्या दोघांच्या सोबत माझाही मुक्काम याच पुस्तकांनी भरलेल्या खोलीमध्ये राहू लागला. सकाळी नऊ ते रात्री दोन, अडीच, तीन...असं शेड्यूल...तो त्याचं टेबल...लॅपटॉप आणि खुर्ची....अगदी टेबलावरील प्रत्येक वस्तूची जागाही ठरलेली. मी टेबल पुसतांना एक इंचही त्यातलं काही सरकलं तरी चक करुन पुन्हा त्या जागेवर ती वस्तू जाणार...
अगदी शनिवारपर्यंत त्याचं शेड्यूल ठरलेलं होतं. सकाळी आठच्या ठोक्याला
उठणार...थोडा व्यायाम झाला की आंघोळ आणि नेहमीचं वाक्य...मी माझा नाष्टा माझ्या टेबलावरच करेन...साधारण नऊ वाजता तो त्याची टेबल खुर्ची पकडायचा...बाजुलाच पाण्याची बाटली...आणि दुस-या खुर्चीवर त्या दिवशी करणार असलेल्या पुस्तकांचा ढिग...रोज झोपतांना उद्या काय करायचं याची टिप काढलेला कागद लॅपटॉपला लटकवलेला असायचा...मी त्याचं टेबल साफ करतांना नेहमी त्यावरुन नजर टाकायचे...अलिकडे त्या अभ्यासातलं फारसं कळत नाही...पण बोट ठेवून हे काय हे विचारलं तर मोजक्या शब्दात काय ते सांगणार आणि आपलं काम सुरु करणार...गेल्या काही महिन्यात या शेड्यूलमध्ये अजून एका गोष्टीची भर पडली होती, ती म्हणजे रोजच्या जेवणाची विभागणी. भात खाल्ला की झोप येते हे कुणा मित्रांनं सांगितलेलं. त्यामुळे पंधरा दिवसांनी होणा-या सराव परीक्षेच्या आधी भात नाही, तेलकट नाही, गोड नाही, अती तिखट नाही...एरवी पट्टीचा खवय्या असलेला....पण हे मित्रांनी सांगितलेलं परीक्षा डायटीही त्यानं कसोशीनं पाळलं.
दोन वर्ष बहुधा परीक्षेशिवाय त्यानं घर सोडलं नाही. कुठे जाऊया का दोन दिवस...रिलॅक्स होशिल थोडासा....या आमच्या प्रश्नावर मी रिलॅक्सच आहे हेच उत्तर ठरलेलं होतं...या सर्वात खूप अनुभव आले...आता अलिकडे तर एखादा चित्रपट होईल असे टर्निंग पॉईंटही आले. मनाची...घेतलेल्या ध्येयापर्यंत पोहचण्याच्या जिद्दीची...आणि विचार किती सकारात्मक आहेत याची परीक्षा झाली...पण यातून तोलून सुलाखून निघालो...हे सर्व सांगण्यामागे लेकाचं कौतुक आहेच...पण एक जाणीवही आहे. प्रत्येक मुलाचं एक ध्येय असतं...एक करीअरची वाट असते. ती त्याला ओळखू देण्याइतपत स्वातंत्र्य नक्की द्यावं आणि त्यांनी ती वाट स्विकारली की त्याचा आदर करीत त्याला प्रोत्साहनही द्यावं. मुलं मेहनत करतात...त्यांना फक्त आपला पाठिंबा हवा असतो....त्याच्या मेहनतीवर...परिश्रमावर विश्वास ठेवण्याची गरज असते...त्याचा निकाल काहीही असूदे...पण आपले आई-बाबा आपल्यासोबत आहेत ही जाणीव मुलांना असली तर ते कितीही कठीण परीक्षा असली तरी यशस्वी होतातच...कारण त्या यशाचे मापदंड शंभर टक्क्यात नसते...तर ते समाधानात असते...त्यामुळे रविवारी परीक्षेसाठी गेला तेव्हा आम्ही दोघांनीही हेच सांगितलं...निकाल काहीही असूदे...तुला कुठलंही कॉलेज मिळो...त्याच्या रॅंकबद्दल आम्हाला काहीही वाटणार नाही. पण आम्ही खूप समाधानी आहोत, तू मेहनत करायला शिकला आहेस...तू प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहेस...ही परीक्षा फक्त एक पायरी आहे. भविष्यातील एका यशाची....अशा अनेक पाय-या पार करायच्या आहेत. पण तूझा मेहनतीचा आणि जिद्दीचा पाया पक्का ठेव...यश मिळणारच...आज ना उद्या ते येणारच...
माझ्या मनात हे सगळं दाटून येत होतं. आणि इकडे ज्यानं मला प्रश्न
विचारला होता त्यानं स्वतःच उत्तर शोधलंही...Jeremy Silman यांचं How To Reassess Your Chess हे चांगल जाडंजुडं पुस्तक काही महिन्यापूर्वी घेतलं होतं. नेहमीच्या अभ्यासादरम्यान lichess वरुन चेसच्या मॅच चालू असतात...त्यात रेटींग सुधारायचे आहे...याची आठवण झाली...त्यामुळे मी जेईई परीक्षेच्या आठवणीत असतांनाच या गाडीनं Jeremy बाबांचा मोठा ग्रंथ समोर ठेऊन चौसष्ठ घरांच्या राज्यात स्वतःला बुडवून घेतलं होतं...पुन्हा तिच खुर्ची....तेच टेबल...जरा दुसरं काही कर...आराम कर...झोप काढ...हा माझा आग्रह फक्त हु...च्या स्वरात हरवून गेला....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDelete