विश्वासाची मोकळीक....

 

विश्वासाची मोकळीक....


अंदर तो आओ...पाच मिनीट का काम है...अंदर आओ....मै आपके मॉं से बात करती हूं...कोई नही है...मै अकेली हुं...सकाळी सात वाजता उठून, कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या मुलीची मी मनधरणी करत होते.  नवरात्रात मुलींची पूजा करतात...त्याचसाठी या मुलीला घरात येण्यासाठी मी बोलावत होते.  ती दहा-बारा वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत नेहमी येते.  यावेळी नवरात्रीचे वाण तिला द्यावे म्हणून मी सर्व तयारी करुन ठेवली.  आईसोबत आलेल्या या मुलीला मी तुझं काम झालं की वर ये...असं सांगून दरवाजा उघडा ठेवला.  पाच मिनिटातच ही छोटी आली...दरवाजा उघडा होता, तरीही तिनं बेल वाजवली.  मी तिला आत घरात यायला सांगितलं...तेव्हा रोखठोकपणे नही, घर नही आऊंगी...अंदर नही आऊंगी...पहले काम बोलो...इधरसेही बोलो...असं मला सुनवू लागली.  दहा मिनीटं मी त्या मुलीची मनधरणी करत होते.  पण ती काही बधली नाही...नही...नही आऊंगी...एवढ्यावर ठाम राहीली.  शेवटी आम्ही दोघींनी एक मध्यममार्ग काढला....तिला मी तिच्या आईला आणायला सांगितलं.  ठिक है...म्हणत ती छोटी पुन्हा खाली गेली.  दहा मिनीटांनी आईला सोबत घेऊन आली.  आल्याआल्या तिनं माझी तक्रार आपल्या आईकडे केली.  ये मॅडम मुझे घरके अंदर बुला रही है....तेव्हा तिच्या आईनं सांगितलं.  कुछ काम है...कचरा लेनेका है...तो बोलो...पर बाहरसे...हम अंदर नही आते...उसको बोला है...अंदर नही आयेगी...मी ठिक आहे म्हणत,  त्या छोटीला देण्यासाठी काढलेले वाण दाखवले...नवरात्री है ना...बच्ची की पुजा करनी है...हातातलं ताट दाखवून तिला परत आत येण्यासाठी मी विनवणी केली.  शेवटी त्या मायलेकींनं एकमेकींकडे बघितलं...मान हलवली आणि त्या आत आल्या...मी सर्व वाण देईपर्यंत दोघीही शांत होत्या....माझं सर्व करुन झाल्यावर मी त्या आईला विचारलं...इतनासा तो है...इसको कितना रिक्वेस्ट किया, फिरभी अंदर नयी आयी....यावर मी दिलेल्या वस्तू हातात पकडून त्या मायलेकींनं पुन्हा एकमेकींकडे बघितलं...मेरी तीन बेटीयॉं है,  मेरे साथ मदत के लिए आती है...पर हर एक कि नियत जान नही सकते...इसलिए बेटीयोंको सक्तीसे कहा है....कोई सोना भी दे...पर घर के अंदर नही जाना...दिदी, बेटीयॉं है....संभालना तो पडेगा ना....हे जळजळीत वाक्य माझ्यावर टाकून त्या मायलेकी मला नमस्कार करुन निघाल्या....

नवरात्रौ उत्सव म्हणजे देवीचा उत्सव...स्त्रीत्वाचा उत्सव...या सर्वांची सांगड घालून अनेक परंपरा आल्या...जोपासल्या गेल्या...यातच कुमारीका पुजन ही एक परंपरा...हे सगळं मी सुद्धा तेवढ्याच उत्सहानं साजरं करते...पण ते


वेगळ्या रुपात...आपल्या आसपास असणा-या पण या सर्वांपासून दूर ठेवण्यात आलेल्यांना यात सामावून घेण्याचा प्रयत्न करते...त्यामुळेच यावर्षी कुमारीका पुजनसाठी रोज सकाळी आपल्या आईसोबत येणा-या छोट्या मुलीला घरी बोलवण्याचे नक्की केले.  तिच्या वयानुसार वस्तू आणल्या...ड्रेस,  खाऊचे पाकीट,  फळं एका पाकीटात पैसे भरले...रात्री हे ताट भरुन ठेवले.  सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही मुलगी आल्यावर तिला घरात बोलवण्याचा प्रयत्न केला...यानंतर जो प्रकार झाला तो वर लिहिला आहे.  ती मुलगी आणि तिची आई दोघीही नवरात्रीचे वाण घेऊन गेल्या..आणि माझे विचार सुरु झाले....

किती छोट्याश्या वाक्यात त्या बाईनं एक सीमा आखली होती.  कोणाच्याही घरात जायचं नाही.  सोनं दिलं तरी नाहीच...माणसानं माणसाची किंमत कशी करावी याचं हे सर्वात वास्तव उदाहरण.  भलेही स्त्री स्वातंत्र्यांचे कितीही गोडवे गायले आणि या स्वातंत्र्याचा गवगवा केला तरी जमिनीवर....वास्तवात...किती सत्यता आहे, याची प्रचिती या एका वाक्यावरुन आली.  माणसानं खरी तर आपली ओळखच विझवलीय.  तिही आपल्याच हातानं.  महिला स्वतंत्र आहेत.  हे फक्त एक वाक्य आहे.  प्रत्यक्षात रोज बलात्कार,  हत्या, छळ आणि मानसिक अवहेलना झाल्याच्या बातम्या येतात.  जेवढ्या बातम्या येतात,  त्यापेक्षा कितीतरी महिला या आगीमध्ये प्रत्यक्ष जळत असतात.  पण परिस्थितीनं त्यांना बोलता येत नाही.   ती स्वातंत्र्याची पट्टी बहुधा त्यांच्या तोंडावर चिटकवण्यात आली असावी.   या नवरात्रात देवीची पुजा करतात...पण या नऊ दिवसातल्या महिलांच्या बातम्या वाचल्या तरी लाजेनं मान खाली जाईल अशी परिस्थिती आहे...बरं अत्याचार झालेली स्त्री, बाई, महिला किंवा रोखठोक म्हटलं तर मादी होती...कारण अत्याचार करतांना तिचं वय काय हा भागच नसतो...अल्लड वयाच्या मुलीही अत्याचाराच्या घटनांना बळी पडत आहेत...सुशिक्षीत अशिक्षीत हा भेदही इथे नाही...या सर्वांकडे बघायलाही कुणाला वेळ नाही...की बोलायला नाही.  कायदे सर्व आहेत.  पण ते बनवणा-यांनी स्वतःच्या सोयीचे केलेले आणि ते त्यांचा वापरही तसाच चालू आहे.  फक्त कायदे केले म्हणून कोडकौतुक करुन घेऊन ही मंडळी मोकळी झालीत...एकीकडे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाचा मखर केलेला आणि त्यात सजवलेल्या महिला...दुसरीकडे तोंड दाबून अत्याचार सहन करणा-या महिला...असे काहीतरी विषम चित्र तयार झालं आहे.

बाकी सोशल मिडीयावर महिला स्वातंत्र्याचे पीक आलेले आहे...अगदी टोकाच्या


वाटतील अशा प्रश्नांवरुन चर्चा इथे होत असतात.  महिलांनी अंतर्वस्त्र घालावी की नाही...हा सुद्धा एक चर्चेचा विषय.  कोणा एका अभिनेत्रीनं आपला व्हिडीओ टाकला.  त्यात ती काय करतेय यापेक्षा तिच्या वक्षस्थळांच्या आकारावर आणि नंतर तिनं अंतर्वस्त्र घातली की नाही यावर चर्चा सुरु.  मग महिलांनी अंतर्वस्त्र कशी घालावी...का घालावी...कशाला घालावी....इथपर्यंत चर्चा सुरु... अंतर्वस्त्र घालण्याचे फायदे तोटेही गायले गेले.  ज्यांचा यात संबंध नाही त्या पुरुष मंडळींनीच यात जास्त सल्ले दिले हे विशेष...पण ही सर्व चर्चा करणारी मंडळी आपल्या आसपास जेव्हा महिला अत्याचाराच्या घटना होतात तेव्हा कुठे लपून बसतात कोण जाणे.  तेव्हा साधा नाराजीचा एक स्वरही नाही.  अत्याचार झाला की तो करणारा कोण, त्याची जात, पक्ष हे प्रथम पाहिलं जातंय....हे सर्व आपल्या बाजुचं असेल तर जी अत्याचारीत आहे, तिच्या शिलावरच शंका व्यक्त केली जाते हे चिंतनीय आहे. 

याच विचारात असतांना सकाळच्या बातम्या लावल्या...पुन्हा त्याच अत्याचाराच्या बातम्या...लावलेल्या बातम्यांना लगेच लगाम लावला...टिव्ही बंद करुन नेहमीच्या कामांना सुरुवात झाली...काही वेळानं बेल वाजली...आता कोण म्हणत दार उघडलं तर ती मघाशी आढेवेढे घेणारी छोटी आली होती. 


सावळा चेहरा आनंदानं उजळला होता...मगाशी वाटणारा संकोच...आणि दडपण दूर झालं होतं...दरवाजा उघडल्यावर न सांगता एक पाऊल टाकून आत आली.  मी क्या हुआ हे विचारणार इतक्यात तिच बोलली...ड्रेस कितना अच्छा दिया...एकदम अच्छा है...हे सांगून जाऊ लागली...मी फक्त हसले...तर पुन्हा आली...मेरा नाम बिनू है...सांगून आनंदानं उड्या मारत खाली पळालीही....काही मिनिटीपूर्वीचीच बात होती.  ही छोटी एवढ्या ताठ्यात माझ्याशी वागली की मी तिचं नावही विचारलं नाही.  पण नंतर तिच्या वागण्याचा उलगडा झाला.  आईनं आखलेली रेखा तिनं जपली होती.   पण आता जिथे विश्वास वाटला तिथं ती मोकळीही झाली होती.   देवीची कृपा होवो आणि प्रत्येक मुलीला, स्त्रीला ही मोकळीक मिळो....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खरंच हा विश्वासाचा प्रश्न किती सहज मांडलायस तू सई . . .

    आमच्या घराच्या बाजूला एक कन्स्ट्रक्शन साईटवरती एक फॅमिली काम करते आणि त्यांची मुलगी रेणुका वय 8-10 वर्षे नेहमीच आमच्या घराच्या कंपाउंड मधील नळा वरून प्यायचे पाणी नेते.

    तीला पण मेघनाने असेच कुमारिका पूजनाला बोलावले तर ती काही केल्या येईना . . .

    मग 2 दिवसांनी वडिलांना घेऊन आली आणि ते सगळे विधी तो प्रसाद तो खाऊ घेतला ती वेणि आमच्या आईकडून माळून घेतली

    अन जातांना मेघनाला तिने एक गोड स्माईल दिले . . . जणू तिच्या रुपात रेणुकाच आशीर्वाद देती झाली 🙏🏼. . .

    ReplyDelete
    Replies
    1. पुष्कर...मेघनानं खूप छान काम केलं....आपल्या परंपरा उत्तम आहेत. फक्त त्या आपण कशा साज-या करतो यावर अवलंबून आहे.

      Delete

Post a Comment