एक आवडता...आणि बाकी सर्व ????
ताई, खूप उपकार झाले हो तुमचे...माझी पोरं हुशार आहेत...पण परिस्थिती नाही...तुम्ही एवढी महागडी पुस्तकं दिलीत, खूप मोठं काम झालं...आम्हाला बाहेर एवढी पुस्तकं घेता आली नसती....तुम्ही पुस्तकं देऊन खूप मदत केलीत...पुस्तकं निट वापरुन परत करु ताई...खूप उपकार झाले तुमचे आमच्यावर...पुन्हा पुन्हा मला नमस्कार करणारी ही महिला महाडहून पुढे असलेल्या एका गावातून बोलत होती. माझ्या लेकाची जेईईची अनेक चांगली पुस्तकं कोणा गरजूला हवी असल्यास सांगा, असा निरोप मी काही परिचितांना दिला आहे. त्यातूनच महाडच्या आसपास रहाणा-या या महिलेचा फोन आला होता. तिचा धाकटा लेक जेईईची तयारी करतोय. त्यानं घरच्याघरी अभ्यास सुरु केलाय, यात अडचण पुस्तकांची होती...मी ज्यांच्याकडे निरोप दिला, त्या परिचितांना या मुलाबद्दल समजलं...त्यांनी त्याला भेटून हव्या असलेल्या पुस्तकांची यादी मला पाठवली...ती यादी घरी तपासून बघितली...त्यातली सर्व पुस्तकं आमच्याकडे होती. त्या परिचितांना त्याची कल्पना दिली. मुलाचे वडील एसटीमध्ये आहेत. पुढच्याच आठवड्यात ते आमच्या भागातील स्थानकात येणार होते. त्यांच्याकडे ही पुस्तकं पोहचवण्याचे मी आश्वासन दिले. त्यावर तो मुलगा आणि त्याची आई खूप खूष झाले. पुस्तकं मिळायच्या आधी आभार व्यक्त करण्यासाठी आमचा नंबर त्यांनी मागून घेतला. शंभरवेळा आमचे आभार मानले. मुलाच्या शिक्षणासाठी मदत म्हणून अनेकवेळा राजकीय पक्षांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले...पण तिथे फक्त आश्वासनांचा आधार मिळाला...शेवटी वैतागून या महिलेनं मुलांना पुस्कतांशिवाय काय होत असेल तर बघ म्हणून सांगितलं...आणि ती कुटुंबाच्या रोजगारामागे लागली....आता अनायसे सर्व पुस्तकं मिळत आहेत म्हटल्यावर एवढा आनंद होणे स्वाभाविक होते.
काही अनुभव आपल्याला असे येतात की समोर लाखो प्रश्न उभे करुन जातात...त्या आर्यन खान नामक एका स्टारपुत्राला अटक झाल्यापासून रोज बातम्यांमधून एका महान व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला किती त्रास दिला जातोय..,.कसा त्रास दिला जातोय...कोण त्रास देतोय...त्याची जात...त्याचे वैयक्तीक आयुष्य...या सगळ्याची अक्षरशः चिरफाड होतेय...यात त्या स्टारपुत्रानं कुठलं चरस घेतलं...किती ग्रॅम घेतलं...नशा आणणा-या या चरस आणि या चरसी कुटुंबातील अन्य पावडरींची नावं...त्यांच्या करोडोंच्या किंमती...अशा नको नको ती माहिती बातम्यांच्या माध्यमातून पुरुवली जात आहे...कधीही बातम्या लावा...एक ब्रेकींग न्यूज चालू असणारच...त्यात तो स्टारपुत्र जेलमध्ये काय करतोच...त्यानं काय खाल्लं....कुठलं पुस्तक वाचतोय...अशा ब्रेकींग बातम्या...मग त्याच्याबाजुनं लढण-यांचे बाईट...बस्स बाकी काही नाही...बाकी सगळीकडे सुजलाम सुफलाम चालू आहे...शेकतरी मजेत आहेत...एवढे मजेत की सुखाच्या भरात आत्महत्या करीत आहेत. गावपाड्यावर शिक्षणाचा पार बो-या वाजला आहे...शाळा सुरु झाल्या...पण पुस्तकांचा पत्ता नाही...करोनानं अनेक छोट्याच काय पण मोठ्या व्यापा-यांनाही देशोधडीला लावलंय...पण त्याचीही चिंता नाही...कारण इथे रोज बातम्यांमध्ये करोडोच्या डिलचे आकडे येतात...एकूण काय सर्व चिड आणणारे वातावरण...यातच दोन दिवसांपूर्वी या एका साध्या महिलेचा फोन आला...या परिस्थितीत तिची जिद्द बघून मनातली चिडचिड...हताशपणा...सर्व बाजुला झाला....
महाडच्या पुढे हे कुटुंब रहातं...महामार्गालगत असलेल्या चाळीमध्ये भाड्याच्या
खोलीत त्यांचा संसार आहे. मुळ गाव चाळीसगांव....तिथे थोडी शेती आहे. पण सध्या पावसानं होत्याचं नव्हतं केलेलं...वर्षाला त्या शेतीतून येणा-या धान्याचा थोडा आधार व्हायचा...पण यावर्षीही त्यावरही पाणी पडलेलं...नव-याची नोकरी एसटीमध्ये....त्या बाईच्या म्हणण्यानुसार कुत्र्यांचं जीणं हो....कधी वेळेवर पगार नाही...कुठे ड्युटी लागेल ते पत्ता नाही...नाईट असेल तर अजून बेक्कार...खायची काय पण नैसर्गिक विधी करण्याचीही सोय नाही...तरीही नोकरी टिकवण्यावाचून पर्याय नाही...कधीतरी सगळं सुरुळीत होईल ही अपेक्षा...बाईला दोन मुलं...एक दहावीला तर दुसरा बारावीला...बारावीत असलेला वयापेक्षा जास्त मोठा झालाय...हुशार आहे. पण आईबापाला जास्त खर्च नको म्हणून ओढ असूनही सायन्सला गेला नाही...त्यानं कॉमर्स घेतलंय...आई भाजी विकते...हा मुलगा त्यासाठी आईला मदत करतो...धाकटाही असाच हुशार...जुन्या पुस्तकांवर अभ्यास करुन नंबर काढणारा...सर्व स्कॉलरशिप परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी पास होणारा...त्याला कोणीतरी जेईईची माहिती दिली...आत्तापासून अभ्यासाला सुरुवात कर म्हणून सल्ला दिला...मात्र मुलगा अकरावीला सायन्स घेणार म्हणून आईवडीलांना धसका बसला...खर्च किती येईल त्याची आत्तापासून मोजदात सुरु झालीय...त्यासाठी काही झेंडेवाल्यांकडे मदत मागितली...पण करु ना....या शब्दांपलीकडे काही झालं नाही...तरीही खच्चून न जाता त्यांनं अभ्यास सुरु केलाय...मी काही दिवसांपूर्वी या भागातील परिचिताला आमच्याकडच्या पुस्तकांची माहीती दिली होती...ती त्यांनी या मुलापर्यंत पोहचवली...त्याच्या गरजेची सर्व पुस्तकं मिळाली...आनंदलेल्या आईनं फोन केला तेव्हा त्या महिलेबरोबर बोलतांना त्या कुटुंबाचा संघर्ष उलगडत गेला...बोलायला दिवाळी आली आहे. पण या कुटुंबासाठी दिवाळी म्हणजे कमाईचे दिवस....भाज्यांसोबत दिवाळीच्या पुजेचे सामान, रांगोळी, रंग, पणत्या
विकायला सुरुवात केलेली. दोन्ही मुलांसोबत आई हे सामान विकून सणासाठी चार पैसे येतील म्हणून खपतेय...
परिस्थिती माणसाला खूप शिकवते.
सोबत माणसाचा स्वभावही बदलतो...पण प्रामाणिकपणा आणि भोळा भाव हा स्वभावातच
असावा लागतो. आपल्या कुटुंबाची दशा
मांडतांना अनेकवेळा ही महीला सिस्टिमवर चिडली होती. बघा ना ताई आमची लेकरं हुशार पण त्यांच्यासाठी
कुणाकडे वेळ नाही...आणि ती नशेवाली पोरं काय पकडली, सर्व त्यांच्याबाजुनं उभी राहीली...म्हणत तिनं
आपला राग व्यक्त केला...पण तो तेवढ्यापुरता....जाऊदे ताई...शेवटी त्यांचं ते
बघतील...पण वाईट वाटतं कधीकधी...इथे आमच्या मुलांना एकवेळ पोटभर जेवायला देता येत
नाही कधीकधी आणि यांच्या मुलांना नशापाण्याला लाखो-करोडो रुपये मिळतात....आणि
आपल्या बाजुनं बोलणारंही कोणी नाही....काही खरं नाही ताई....अशात तुमच्यासारखी
माणसं भेटतात म्हणून आमचं चालू आहे, म्हणत तिनं पुन्हा आभार मानले....ताई दोन दिवे
पाठवते तुम्हाला नव-यासोबत नाही म्हणू नका म्हणून तिनं पुन्हा आभार मानत फोन
ठेवला....तिच्या या आभारानं आणि शेवटच्या वाक्यानंअजून संकुचल्यासारखं झालं...त्या
मुलाला पुस्तक देतांना आणखी वह्या, पेन आणि नवीन कपडे घेण्याचा विचार केला आणि
पुस्तकांच्या पॅकींगला सुरुवात केली...
सगळं झाल्यावर सहज टिव्ही लावला...बातम्यांच्या चॅनलचे नंबर लावले....तिथे
तेच चालू होतं....आता फक्त त्या आर्यनंनं शी कशी केली...कितीवेळा केली...केली की
नाही हे दाखवायचंच बाकी राहिलं होतं....त्याला बेल मिळाल्यावर फटाके फोटून आनंद
व्यक्त करण्यात येत होता....बहुधा ही आंधळी माणसं तो जेलमधून बाहेर आल्यावर अशाच
फटाक्यांच्या माळा फोडून त्याचं जोरदार स्वागत करतील...अर्थात तोही एक सैनिक
ठरलाय...त्याच्या वडीलांची मुलाखत ऐकली होती...मुलांनी काय करावं याची स्वप्न त्यांनी
पाहिली होती...तिच स्वप्न पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत होता...आता त्याबद्दल
त्याचं किती कौतुक होईल...पुन्हा तो त्याच्या पेज थ्री कल्चरमध्ये रंगून
जाईल...आणि इकडे त्याच्यानावानं चालू झालेला शिमगा सर्वसामान्यांपुढे अनेक
प्रश्नांचा गुंता करत राहील...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
वास्तवावर खरीखुरी टीका करणारा लेख आहे. आर्यन वरच्या बातम्या ऐकून संताप आणि वीट आलाय..
ReplyDeleteहो ना...त्या आर्यनचं स्वागत ढोल ताशे घेऊन करण्यात आलं....हा निव्वळ मूर्खपणा...
Deleteछान लेख
ReplyDelete