राजांच्या चरणी.......
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो....आमचा राजा आमचा अभिमान...हर हर महादेव....बेभान होऊन रात्री घोषणा देणा-या काही तरुणांचा व्हिडीओ माझ्या वॉटसअपला आला होता...आम्ही किमान तीन ते चारवेळा तो लागोपाठ पाहिला...दिवाळी सण आपल्या राजाबरोबर साजरा करण्यासाठी काही वेडी तरुण मंडळी दरवर्षी किल्यावर जातात...किल्ल्यांची साफसफाई करतात....आणि दिव्यांचा लखलखाट करतात...हजारो दिवे राजांच्या चरणी लावतात...रात्री, बेभान वा-यांच्या सोबतीनं आपल्या राजासोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद लुटतात...ही सर्व मंडळी खरोखर वेडीच आहेत....राजांसाठी....त्यांच्या आशीर्वादासाठी...शिवाजी राजे...हे एवढं नावच त्यांच्या आयुष्यभरासाठी एक टॉनिक बनलं आहे. अभ्यास, नोकरी, करीअर, कुटुंब, सामाजिक जबाबदा-या सांभाळत ही काही मंडळी दरवर्षी किल्ल्यावर जातात...महाराजांच्या नावाची अनामिक ओढ त्यांना खेचून नेते...तिथे दिव्यांची रोषणाई करतात...महारांजांना मुजरा करतात...राजांच्या नावाचा जयघोष करतात...आणि चांदण्या रात्रीमधील महारांजांचे राजस रुप डोळ्यात सामावून परत आपापल्या घराकडे निघतात...गेले काही वर्ष या सर्वांमध्ये माझ्या एका मैत्रिणीचा मुलगाही असतो...आपल्या परिचितांकडून दिवे तो आठवणींने घेऊन जातो...महाराजांच्या चरणी आपण जाऊ शकत नाही, निदान आपल्या घरातील दिवे तरी आपल्या राजांच्या चरणी लागले जातील म्हणून आम्ही काही कुटुंब त्याला आठवणींनं दिवे आणि आवश्यक सामान देतो...आता त्याची प्रेरणा घेऊन अन्य कुटुंबातील मुलंही राजांना नमन करण्यासाठी जायला लागली आहेत...आम्हा सर्वांसाठी या मुलांचे कोण कौतुक आहे. राजे...या नावाभोवती गुंफत जाणारी आपली भावी पिढी भविष्यात नक्कीच उज्ज्वल वाटेवर राहणार, हा विश्वास आम्हा पालकांना आहे...
छत्रपती शिवाजी महाराज...आमची उर्जा...सकारात्मकता...संस्कृती...परंपरा...जे जे काही आहे, ते या नावाभोवती गुंफलं आहे...महाराज कधी आले...कधी गेले...हे सांगण्यापेक्षा त्यांचं अस्तित्व आज आहे...उद्याही आहे...आणि ते सदैव कायम रहाणार आहे. एकीकडे तरुण पिढी नशेच्या किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या सावटाखाली वहावत आहे, असे चित्र असतांना दुसरीकडे आपल्या राजांना पुजणा-या अनेक तरुणांचा पडद्यामागचा वावर आता पुढे येण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापूर्वी अशाच एका तरुणांच्या ग्रुपबद्दल मला माहिती मिळाली. माझा लेक सातवी-आठवीत असतांना एक नवीन मैत्रिण आमच्या मैत्रिणींच्या कळपात सामिल झाली. तिचा धाकटा मुलगा आठवीत आणि मोठा इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाला...नवीन असल्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती....त्यातूनच समजलं की तिचा मोठा लेक बहुधा दर शनिवार रविवार ट्रेकींगला जातो...नुकताच इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या तरुणांनं अभ्यासाकडे लक्ष द्यावे...नंतर हे ट्रेकींग वगैरे प्रकरण बघावं...असं आम्ही मैत्रिणींनी तिला सांगून बघितलं...पण नंतर तिनं जे सांगितलं त्यामुळे आम्हाला तिच्याबद्दल आणि तिच्या मुलाबद्दल अभिमान वाटायला लागला. हा मुलगा पाचवीत असतांना हे कुटुंब महाडमध्ये रहायला होतं...जवळचं अवघ्या महाराष्ट्राचं दैवत, किल्ले रायगड...एवढ्या जवळ आहोत, तर एकदा किल्ल्यावर जाऊया, म्हणून हे कुटुंब रायगड भेटीसाठी गेलं...आणि स्वतःला हरवून बसलं. रायगड किल्ल्यानं...महाराजांनी त्यांना काय भूरळ घातली कोण जाणे...नंतर दर शनिवार रविवार किल्ल्याला भेट देऊ लागले....नेहमी
गेल्यामुळे तिथे नित्यनियमानं येणारी....शिवाजी महाराजांच्या प्रेमानं भारावलेली अन्य मंडळी त्यांच्या परिचयाची झाली...नंतर हा मुलगा त्या तरुणांच्या घोळक्यातून एकटा किल्ल्यावर जाऊ लागला. दिवाळी, दसरा, राज्यभिषेक दिन...या दिवशी तर किल्ल्यावर हक्कानं ही मंडळी जात होतीच पण पावसाळ्यात वृक्षारोपण, नंतर किल्ल्याची साफसफाई अशा कारणांसाठीही रायगडवर फे-या होत होत्या....या सर्वांचा सकारात्मक परिणाम त्या मुलावर झाला...शनिवार रविवार किल्ल्यावर जायचं, त्यामुळे आधी सर्व अभ्यास व्हायला हवा...ही जाणिव त्याला झाली. कोणत्याही क्लासची मदत न घेता त्यांनी अभ्यास केला. दहावी, बारावीमध्ये नव्वदीपार गुण मिळवले. आत्ताही इंजिनिअरिंगसाठी मेरीटवर अडमिशन मिळवलं आहे. हे सर्व कतरांना रायगड किल्ल्यावरील प्रेम कुठेही कमी झाले नाही. रायगड सोबत दुस-याही किल्ल्यावर भेटी दिल्या...देत आहेत. आता हा मुलगा अशा समविचारी मंडळाचा सदस्य झाला आहे. तो जातोच पण अन्य परिचित कुटुंबातील मुलांनाही सोबत नेतो. ही सर्व मुलं वेगळ्या शाळेतील, कॉलेजमधील, काही नोकरीतील आहे. पण त्यांना एक समान धागा जोडतो...तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज....या जगातलं सर्वात मोठं विद्यापिठ....त्यांचा हात या मुलांच्या पाठीशी असल्यामुळे रात्री-बेरात्री...केव्हाही ही मुलं जेव्हा कुठल्याही किल्ल्यावर जाण्यासाठी तयारी सुरु करतात, तेव्हा त्यांचे पालक त्यांना नकार देत नाहीत. कारण आपली मुलं कधीही वावगं वागणार नाहीत, अशी खात्री त्यांच्या पालकांना आहे.
अलिकडच्या वर्षात या मुलांनी आणखीही काही चांगले उपक्रम सुरु केले आहेत. अनेक किल्ल्यांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. तिथे गेल्यावर किल्ल्यांचा परिसर धुंडाळला आहे. त्याचवेळी स्थानिक लोकांच्या अडचणी जाणल्या आहेत. तेथील मुलांसाठी कपडे आणि शालेय उपयोगी वस्तू ते नेहमी घेऊन जातात. शाळेला सुट्टी लागल्यावर ही मुलं जेव्हा या भागात जातात, तेव्हा त्या स्थानिक मुलांना गोळा करुन त्यांच्या अभ्यासात मदत करतात. आता कोरोनाच्या काळात जेव्हा सगळ्या शाळा बंद होत्या, तेव्हा या तरुणांनी अशाच मुलांना संगणक साक्षर केलं. याशिवाय किल्ल्यावर दिवाळी साजरी केल्यानंतर घरी आलेली ही मुलं आपल्या घराच्या आसपास जिथे थोडी मोकळी जागा असेल तिथे किल्ला उभा करतात...अगदी बारीक सारीक बारकाव्यासह उभारलेल्या या छोट्या पण परिपूर्ण किल्ल्यांना बघायला गर्दी होते. त्या किल्ल्याची माहिती देतात, आणि प्रत्यक्ष किल्ला बघण्याचा आग्रहही करतात.
या मुलांबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांचं कौतुक होऊ लागलं. त्यांच्या सोबत विश्वासानं आमच्याही मुलांच्या
किल्ल्यांच्या सफरी झाल्या...दिवाळीच्या दिपोत्सवाला कधी जाता आलं नाही...पण
आमच्या घरातील पणती राजांच्या चरणी लागली,
याचं समाधान याच मुलांनी मिळवून दिलं.
कधीकधी त्यांच्या कामाकडे बघितलं की नेहमी वाटतं, असं काय मोठं काम ही मुलं करतात. कुठल्याश्या पडीक किल्ल्यावर जाऊन तेथील
स्वच्छता करतात....तेथील पाण्याच्या टाक्या साफ करतात...वृक्षारोपण करतात...या अशा
कामांनी काय मोठं भलं होणार आहे. ते जे
भलं आहे ते होईल तेव्हा होईल...पण या सर्वांतून या मुलांनी स्वतःचा विकास मात्र
केला आहे. आज चार तरुण एकत्र दिसले तरी ते
मान खाली घालून मोबाईलमध्ये डोकं घातलेले दिसतात.
किंवा त्यांची धुरांडी चालू असतात...अशा वातावरणात ही मुलं मात्र खरचं
वेगळी झाली आहेत. त्यांच्या आयांच्या मते
कोणी फुंकण्या बाजुला येऊन राहिला तरी आमची पोरं बिघडणार नाहीत...हा विश्वास
आहे. आत्मविश्वास आहे. याला कारण म्हणजे महाराज....महाराजांच्या चरणी
सेवा देणारी ही मुलं कधीही, केव्हाही वाया जाणार नाहीत याची खात्री पालकांना आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुणा एका स्टारपुत्राच्या नशेच्या बातमीनं वादळ
उठवलं आहे. काहींनी तरुण पिढीलाच दोषी ठरवलं आहे. तर काही महाभाग त्याला आदर्श मानत आहेत. या अशांना बाजूला ठेवत आपल्या राजाला जपणा-या, राजांच्या आदर्शावर चालणा-या अनेक तरुणांना जाणण्याची गरज आहे. अनेकवेळा या मुलांच्या कामाकडे, फक्त टाईमपास म्हणून बघितले जाते. पण हा टाईमपास नसून एक संस्कार आहे, हे जाणले पाहिजे. आणि मुख्य मुद्दा म्हणजे, राजांच्या चरणी....किल्ल्यावर गेल्यावर काय मिळतं...हे कधीही मोजू नका...कारण कुठल्याही तराजूत ते मोजण्याची ताकद नाही...राजांच्या चरणी मिळते ती नवी उर्जा...उत्साह...जीवनाकडे पहाण्याची सकारात्मक नजर...कुठलंही संकट येवो...त्यावर आपण मात करणार ही जिद्द...त्यामुळेच की काय या मुलांच्या पालकांना हमी आहे, आमची मुलं कुठल्याही नशेच्या आकर्षणाला बळी जाणार नाही याची...एकूण काय, आपले राजे एकच....छत्रपती शिवाजी महाराज...त्यांना शरण जा, बाकी सर्व बघायला राजे समर्थ आहेत....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Jay Shiwaji
ReplyDeleteजय शिवाजी...जय भवानी....
Deleteफार छान विचार.
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteJai Shivaji
ReplyDeleteजय शिवाजी...
Delete