एसटी....आणि आठवणी....
एस. टी....लाल परी....लाल डब्बा...अशा अनेक नावानं ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बससेवा सध्या चर्चेत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य घेऊन चालणा-या या महामंडळाच्या कर्मचा-यांची दैना झाली आहे. खेड्यापाड्यातील, गरजूंच्या, शेतक-यांच्या हाकेला सदैव येणारी....गाव-खेड्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यास हातभार लावणारी ही सेवा देणारे सेवेकरी मात्र दयनीय अवस्थेत आहेत...आता त्यांचा जो चालू आहे तो एक उद्रेक आहे. सुविधांच्या नावावर त्यांना ज्या सुविधा मिळतात, त्यांना सुविधा म्हणणे म्हणजे सुविधा या शब्दाचा अपमान असल्यासारखे आहे. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करीत ही मंडळी गेली अनेक वर्ष नेमानं आणि प्रामाणिकपणानं आपलं काम करीत आहेत. एस.टी. बस म्हणजे काय, हे कदाचित शहरात राहणा-याला जाणवणार नाही. त्याच्यांसाठी ट्रेन, मेट्रो, टॅक्सी, ओला, उबेर अशा अनेक सरकारी आणि खाजगी सेवा उपलब्ध आहेत. मात्र खेड्यात राज्य चालतं ते लाल परीचं....लाल डब्यांच्या बसचं...खेड्यातल्या रस्तांवरुन ठेचाळत, धुळीचे लोट अंगावर सहन करत, या बसनं आणि त्याच्या चालक वाहकांनी अनेकांना आपल्या ध्येयापर्यंत पोहचवलं आहे. या एसटी ची चालक वाहक मंडळी आता संपावर उतरली आहेत. त्यांच्या संपाचं काय होईल याची माहिती नाही, मात्र अनेक अडचणींना सामोरे जात तक्रारीचा एक सूरही न काढणारी ही मंडळी आक्रमक कशी झाली हा प्रश्न कायम मनात आहे. महाविद्यालयीन जीवनात आणि नोकरीला लागल्यावर मी काही वर्ष या एस.टी सेवेवर अवलंबून होते. कुठलंही नातंगोतं नसलं तरी एसटीतील चालक-वाहकांकडून मिळालेले अनुभव खूप चांगले आहेत. या संपाच्या बातम्या जेव्हा येऊ लागल्या तेव्हा हा सर्व एसटीमय भूतकाळ मनामध्ये पुन्हा दाटून आला.
अकारावी-बारावीला पेणमधील गागोदे या गावात आमचे कुटुंब रहात होते. गागोद्याहून पेण कॉलेजमध्ये मी जायचे. सकाळी नऊ किंवा दहाची बस. आणि घरी परत येतांना सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यानच्या बसपैकी एक बस पकडायची. यापूर्वी मला कधी बसनं प्रवास करण्याची वेळ आली नव्हती. लाल बस बाजुनं गेली तरी मळमळ व्हायची. मामाकडे जेव्हा जायचो, तेव्हा गोळ्या घ्यायला लागायच्या....त्यामुळे अवघा प्रवास झोपून व्हायचा. त्यातच आधी जागा बुक झालेली असायची. त्यामुळे खिडकीची आरामदायी जागा असणार याची खात्री असायची. पण गागोद्याला रहायला आल्यावर हे सर्व समीकरण बिघडले. पेण ते वरसई....आणि वरसई ते पेण अशा एस. टी. बससेवा असायची. कॉलेज नक्की केल्यावर या बसनं रोज जायला लागणार हे समजलं आणि पोटात गोळा आला....रोज ती गोळी घ्यायची का...नेहमी प्रवास कसा करणार हे अनेक प्रश्न सतावू लागले. मात्र गागोदे गाव असलं तरी, सर्व माणसं समजूतदार होती. माझ्या सोबत कॉलेजला जाणा-यांबरोबर आईनं ओळख करुन घेतली आणि त्यांना माझी अडचण सांगितली. तेव्हा सर्व सहका-यांनी काही काळजी करु नका आम्ही सांभाळून घेऊ, असं आश्वासन आईला दिलं. या आश्वासनानं आई निर्धास्त झाली तरी मला खात्री वाटत नव्हती. पहिल्या आठवड्यात माझी सॉलिड दांडी उडाली. बसायला जागा मिळाली नाही तर उभं रहायला लागायचं, तेव्हा अनेकवेळा मी अक्षरशः धडपडले होते. काही वेळा खालीही पडले. मात्र त्यामुळे मला बसमध्ये उभं रहाता येत नाही, हे सोबतीच्या सर्वांना समजलं....त्याचा परिणाम असा झाला की, जो पहिल्यांदा बसमध्ये चढायचा तो माझ्यासाठीही एक जागा पकडायचा...आणि समजा नाहीच जागा मिळाली
तर बसमधले कंडकक्टर काका त्यांची जागा बसायला देत...तेव्हा तिकीटांची मोठी पेटी असायची...त्या पेटीवर बसायला लागायचं...या सिटला आम्ही उंटसीट म्हणायचो, कारण बसमधील सर्वांवर या सीटमध्ये बसल्यावर नजर ठेवता यायचं. अख्या बसची टिकीटं काढेपर्यंत तासभराच्या प्रवासातील चाळीस-पंचेचाळीस मिनिटं संपलेली असायची...कधी कधी कंडक्टर काका त्यांचं काम संपून सीटजवळ आले तरी डोळा लागलेला असायचा...पण ते गप्पचूप उभे रहायचे...जाग आली की सॉरी म्हणत, त्यांना त्यांची जागा खाली करुन द्यायची...तेव्हा राहूदे...सवय झाली का प्रवासाची म्हणून आपूलकीनं विचारायचे...आम्ही कोण कुठले...पण हे नातं काका, मामा...अश्या हक्कांच्या नात्यापर्यंत पोहचलं. महिनाभरातच या प्रवासाला सरावले. त्यामुळे जागा मिळवायचा प्रश्न सुटला...गागोद्याहून पेणला जातांना फार गर्दी नसायची. प्रश्न असायचा तो पेणहून गागोद्याला परत येतांना. कारण सायंकाळी बस पकडण्यासाठी कोण गर्दी असायची. अशा गर्दीमधून सहीसलामत बसमध्ये चढणं हेच खूप मोठं स्कील होतं...त्यात जागा मिळवणं म्हणजे नंबर काढण्यासारखं...आणि ती जागा खिडकीची असेल तर नंबरसकट स्कॉलरशिप...पाठिवरची कॉलेजची बॅग सांभाळत ही स्कॉलरशिप आम्ही नेहमी मिळवत असू...पण यात त्या बसच्या ड्रायव्हर, कंडक्टर काकांचा मोठा वाटा असायचा. कुठली बस डेपोमधून निघणार, आपल्याला कुठली बस मिळणार, याची माहिती ही काका-मामा मंडळी बस निघण्याच्या आधी काही मिनिटं द्यायची...मग आम्ही सर्व विद्यार्थी त्या बसकडे अक्षरशः धाव घ्यायचो...जागा मिळायची...बसमध्ये पासला क्लिक करतांना या कंडक्टर काकांना जेव्हा थॅंक्यू म्हणायचे, तेव्हा अभ्यास चांगला करा, मग आम्हाला थॅंक्यूं मिळतं, असं हसत बोलत निघून जायचे. गागोदे आणि वरसई या गावांना पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा विळखा बसतो. अशावेळी गावात येणारी बस थांबायची...मग विद्यार्थ्यांना पायपीट करण्यावाचून काही पर्याय नाही. पण अशा बिकट वेळीही एसटीचे हे काका-मामा आम्हाला मोठा आधार वाटायचे. पाऊस धो धो सुरु झाला की या गावांतील सर्व विद्यार्थी लवकर बसडेपोत यायचे...नेहमीचे सर्व विद्यार्थी किती हे सर्वांना माहिती असायचं...सर्व जमले की एक बस नक्की व्हायची...ड्रायव्हर काका येऊन त्यावर वससई गावाचे बोर्ड लावायचे...आम्ही सर्व विद्यार्थी त्यात बसलो की बस सुटायची. वादळी वा-यात बस चालवण खरं कसब...पावसाचं उग्र रुप असायचं...काळजी वाटायची...तेव्हा कोणीतरी बोलायचं, काळजी नको आपले ड्रायव्हर काका भारी आहेत...आणि हे काका खरचं भारी ठरायचे. अगदी गावाच्या वेशीपर्यंत सुखरुप पोहचवायचे. निट जा रे पोरांनो घरी....म्हणत ते आमचा निरोप घ्यायचे...आणि पुन्हा त्या पावसाच्या मा-यात आपला परतीचा प्रवास करायचे....मुलांना शाळा-कॉलेजच्या वेळात पोहचावयला लागतं, म्हणत हीच काक-मामा मंडळी सक्काळी सहा वाजता हजर असायची. भर पाऊस, थंडीचा मारा आणि गरमीच्या लाटा यांचा त्यांच्यावर कधी परिणाम झाल नसेल का...हा प्रश्न तेव्हा कधी मनात आला नाही...पण आता मात्र येतो...
पुढे नाशिकला कॉलेज आणि गांवकरी वृत्तपत्रातमध्ये नोकरीला लागल्यावर नाशिक ते धुळे या प्रवासातही हिच एसटी प्रमुख साधन होते. धुळ्याहून सोमवारी अगदी पहाटेची बस पकडायची आणि नाशिक गाठायचं...चार तासांचा प्रवास...तेव्हा आई-वडील कंडक्टरांना सांगायचे, भाऊ लक्ष ठेवा, एकटी आहे. त्यावर ते काका, फक्त हात उचलायचे...बस्स...यावर ते कंडक्टर काका त्या चार तासांसाठी पालक व्हायचे. मध्ये बस थांबली की उतरतांना आठवणीनं पाच मिनीटात परत ये ताई, हे सांगणार...आणि निघतांना मी परत आले की नाही याची खात्री करुन घ्यायचे...हे करतांना फक्त नजरेच्या खुणा
व्हायच्या...ना मला त्यांचे नाव माहिती असायचे...ना त्यांना माझे...फक्त त्यांच्यावर माझ्या वडीलांनी सोपवलेली एक जबाबदारी असायची...आणि ते ती प्रामाणिकपणे पार पाडायचे...नंतर गांवकरीमध्ये नोकरी करतांना धुळ्याला जातांनाही या काका-मामांच्या आधारानं प्रवास व्हायचा...तेव्हा शनिवारी सायंकाळी ऑफीसमधून निघायचं आणि बस पकडायची....निघतांना कधी कधी सायंकाळचे सात वाजायचे...त्यानंतर बस पकडून धुळ्याला पोहचेपर्यंत रात्रीचे बारा वाजलेले असायचे. रात्रीच्या प्रवासात एकटी मुलगी म्हणून आई काळजीत असायची...मात्र निघण्याआधी ती फोनवरुन आठवणीनं सांगायची, कंडक्टरच्या बाजूची सिट पकड...हा आईचा विश्वस असायचा. अख्ख्या बसमध्ये आपलं ओळखीचं कोणीही नसलं तरी कंडक्टर काका आणि ड्रायव्हर काका आपल्या ओळखीचे असतात...त्यांना न भेटताही ही माऊली आपल्या लेकीसाठी त्यांच्यावर अवलंबून असायची...अशा कितीतरी जबाबदा-या ही मंडळी पार पाडत होती...आणि पाडत आहेत...
आज शहराच्या रक्तवाहिन्या म्हणून रेल्वेचा उल्लेख होतो. पण एसटी म्हणजे गांव-खेड्यातील नात्याची एक विण आहे. अनेक गावांत रात्री मुक्कामी येणा-या बसच्या कंडक्टर-ड्रायव्हर काकांसाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था केलेली असते. सकाळी निघतांना त्यांना घोटभर गरम गरम चहा मिळेल अशी व्यवस्था असते. ही मंडळी कोणाच्या नात्याची नसतात. पण तरीही माणुसकीचं अनोखं नातं या मंडळींकडून जपलं जातं. फक्त एका गावातून दुस-या गावात माणसं पोहचवण्याचं काम ही मंडळी करत
नाहीत...तर त्या माणसांच्या भावना जाणून त्या जपण्याचं कामही ही मंडळी अनेक वर्ष करत आहेत. या बदल्यात त्यांना काय मिळतं...हा प्रश्न खरोखर संशोधनाचा आहे. निवासाच्या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय किती चांगली असते...फार काय नैसर्गिक विधीसाठीही सोय नसते. पण याबद्दल कधीही तक्रार न करता फक्त प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदवाक्याखाली उत्तम सेवा देणारी ही मंडळी आता हतबल का झाली आहेत, याचाही विचार व्हायला हवा. ज्या खेड्यातल्या मुलांचे भवितव्य या एसटीच्या चार चाकांच्या आधारे उज्ज्व झाले, त्याच एसटीच्या चालक-वाहकांच्या मुलांना मात्र पैशाअभावी शिक्षणाला रामराम करण्याची वेळ आली आहे. या काका मामांच्या आधारानं खेड्यापाड्यातील अनेक मुलं डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी अधिकारी बनवलं आहे. मात्र त्यांच्या मुलांच्या नशिबी शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. अशी एक ना दोन अनेक उदाहरणं आहेत...त्यातूनच हा संपाचा उद्रेक झालाय...हा संप मोडून काढण्यापेक्षा त्या संपक-याबरोबर प्रेमानं संवाद साधा...मगच या माणसाच्या अडचणींची ओळख होईल...आणि त्यात सुटण्यासाठी प्रयत्न सुरु होतील....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप छान विषय मांडला खरोखर दिल्ली कडचा प्रवास आणि तेथील ड्रायव्हर चालक यांच्या बातम्या आणि कोकण किंवा महाराष्ट्रातले एसटी एसटी बस चालक कंडक्टर हे खरोखर खूप विश्वसनीय रित्या काम करत आहेत हे नक्की तुम्ही ते चांगलं अधोरेखित केलं आणि एसटी कर्मचाऱ्यांना पगार कमी आहे हे ही नक्की त्यामुळे एवढा संपाचा उद्रेक झाला आहे शिवाय एसटी मध्ये किती कमी पैशात प्रवाशांची आणि मालाची ने-आण करत असतात फॅसिलिटीज उगाचच सरकार देतो असं वाटतं छान लेख लिहिलात म्हणून अभिनंदन आता मी तुम्हाला नेहमी फॉलो करीन
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete