कोहळा आणि आल्याच्या वडीचा सोहळा.....

 

कोहळा आणि आल्याच्या वडीचा सोहळा.....


एकदाचा गोळा झाला आणि मी हुश्श करीत जोरात पंखा चालू केला...सगळ्यात पाणेरी फळभाजी असलेल्या कोहळ्याच्या वड्या करणे म्हणजे सर्वात कठीण पदार्थ...सर्वात वेळखाऊ पदार्थ...तरीही सर्व पदार्थांमध्ये या कोहळ्याच्या वड्यांचे वजन भारीच भरते.  कारण कोहळा...सर्वात पाणीदार असलेल्या या फळभाजीमध्ये सर्वाधिक कॅल्शियम, व्हीटामीन यांचा भरणा असतो...सध्या आमच्या घरात लेकाच्या अँडमिशनची तयारी चालू आहे.  तो लांबच्या कॉलेजमध्ये आणि पर्यायानं तिथल्या हॉस्टेलमध्ये रहाणार हे जवळपास नक्की झालं आहे.  अशावेळी सर्व घरात जे वातावरण असतं तेच


आमच्याही घरात आहे.  खाण्याची हौस जपणा-या लेकाला कुठले कुठले डबे कसे भरुन देता येतील याची तयारी सुरु झाली आहे.  त्यात अशा अवघड पदार्थांना पहिला मान मिळाला.  जवळपास अर्धा दिवसाची खटपट झाल्यावर कोहळा आणि आल्याच्या चवदार आणि औषधी वड्या तयार झाल्या. 

गेल्या आठवड्यात एका मैत्रिणीचा फोन आला.  माझ्या लेकाबरोबरच तिचा


लेकही शाळेत एकत्र होता.  तोही इंजिनिअरींगसाठी बाहेरच्या राज्यात जात आहे.  तिचा अचानक फोन आला...तिच्या लेकाचं अँडमिशन नक्की झालं...आणि ते कॉलेजही ऑफलाईनमध्ये सुरु होत आहे.  कॅम्पस चालू होणार....आम्ही पंधरा दिवसांनी मुलाला घेऊन कॉलेज असलेल्या शहरात जाणार आहोत...अचानक सर्व गडबड सुरु झालीय...पंधरा दिवसात कशी तयारी करायची....हा प्रश्न तिनं मला विचारला आणि तुझं काय...तुझ्या लेकाचंपण असंच होईल, माझ्यासारखी आरामात राहू नकोस, तयारी सुरु कर असा आदेश वजा सल्ला मिळाला...आणि मला घाम फुटला...एकतर माझ्याही लेकाचं अँडमिशन येत्या आठवड्यात नक्की होणारं...त्यांनीही असंच पंधरा दिवसाचं अल्टीमेटम दिलं तर काय करायचं हा प्रश्न पडला...मग तो आपल्यापासून लांब रहाणार या चिंतेनं मनात घर केलं...त्यापाठोपाठ सर्व आयांना पडतो तोच प्रश्न, त्याच्या खाण्याचे काय...या सर्व प्रश्नांतून मला लेकानंच बाहेर काढलं.  कारण खाण्यापेक्षा अन्य कामं महत्त्वाची आहेत, ती करुया म्हणून त्यानं त्याची लिस्ट पुढे केली.  अर्थात पहिलं नाव डोळ्यांच्या डॉक्टरचं...आणि नंतर फॅमेली डॉक्टरांचा नंबर...डोळ्याची नेहमीप्रमाणे तपासणी झाली...त्याच दिवशी कुटुंबाच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो...कोरोनामुळे जवळपास दोन वर्ष लेक घरात आहे.  जेईईच्या नावाखाली एक टेबल आणि खुर्ची, हेच त्याचं विश्व होतं...त्यामुळे सूर्यदेवाचा स्पर्श नाही....की व्यायामाची बात नाही.  त्यात उंचीमुळे खुर्चीवर बसायची पद्धतही सरळ नाहीच...या सर्वांमुळे हात पाय दुखायच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत...डॉक्टरांनी या सर्वांची जुजबी माहिती घेतली आणि आठवड्यापुरत्या कॅल्शियमच्या गोळ्या देऊन दणकून खात रहायचा सल्ला दिला...त्यांनीही मला हॉस्टेलसाठी डबे तयार करायला लागा म्हणून सल्ला दिला...या दोन महत्त्वाच्या व्यक्तींकडून आलेल्या सल्ल्यामुळे

मी माझी लिस्ट करायला सुरुवात केली.   त्यात पहिल्या नंबरवर आल्या त्या कोहळा आणि आल्याच्या...कोहळ्यासारखे पौष्ठिक, शक्तीवर्धक, बुद्धीवर्धक फळ नाही...बाहेर रहाणा-यां विद्यार्थांसाठी आरोग्यदायी म्हणून या वड्या उपयोगी पडतात.

एरवी जेवणात कोहळ्याचा वापर असतो.  कोहळ्याची भाजी, आमटी, पराठा, थालीपीठ, पेठा फारकाय कोहळा आणि मोड आलेल्या मेथ्यांचं लोणचंही होतं...चवीला फक्कड असणा-या या पदार्थांमध्ये कोहळा आणि आल्याच्या वड्या सगळ्यात किचकट...पण थंडीमध्ये या वड्या चांगल्या ठरतात.  एरवीही संत्र्याच्या वड्यांमध्ये कोहळा चांगला जिरुन जातो.  आणि तिखटसार आल्यांच्या वड्यांमध्ये गोडाची जागा भरुन काढतो.

थंडीची चाहूल लागल्यावर होणा-या आले वड्या झणकेदार असतात...त्यांचा तिखटपणा साखर किंवा गुळानं कमी करण्यापेक्षा कोहळा टाकण्याचा सल्ला मला एका मद्रासी मैत्रिणीच्या आईनं दिला.  नुसता सल्ला न देता, त्या काकूंनी घरी बोलावून प्रात्यक्षिकही दाखवले होते.  एक अख्खा कोहळा, आलं, गुळ, दुध आणि तुपात केलेल्या या वड्या चांगल्या चविष्ठ बनल्या होत्या.  हे सर्वंच पदार्थ थंडीसाठी उपयुक्त.  त्यामुळे दरवर्षी थंडीत ही कोहळा आणि आल्याची वडी मी बनवायला लागले.  खंड फक्त गेल्या वर्षीचा पडला.  कोरोनाच्या मा-यापुढे कोहळा आणण्याचेही भान राहिले नाही...असो...पण आत्ता नेमकं डॉक्टरांकडून बाहेर पडल्यावर समोरच छोटी भाजी मंडई होती...त्यात हिवाळ्याच्या सर्व भाज्या चांगल्या फ्रेश आल्या होत्या...त्यात हा कोहळाही होता...साधारण सव्वा किलो झालेला कोहळा घेतला...आणि बाकीच्या


भाज्या घेत घर गाठलं. 

दुस-यादिवशी हा कोहळा-आल्याच्या वड्यांचा सोहळा सुरु झाला.  वड्यांमध्ये अगदी नावाला दूध टाकलं जातं...त्यामुळे सर्वात आधी ते दूध आटवायला ठेवायचं...मग होतात कोहळ्यावर संस्कार सुरु, स्वच्छ धूवून त्याची हिरवीगार साल बाजूला काढायची...तुकडे करुन मधला गर वेगळा करायचा...आणि उरलेला पांढरा शुभ्र कोहळा जरा मोठ्या किसणीवर किसायचा....कोहळा मुळातच पाणीदार....सगळा कोहळा किसल्यावर त्यातले पाणी वेगळे करायचे... चांगले ग्लासभर पाणी मिळते...हे पाणी बाजुला ठेवायचे....एव्हाना दुध ब-यापैकी आटलेले असते...मग त्यात किसलेला कोहळा टाकायचा...आणि आल्यावर नजर टाकायची....एरवी आल्याच्या वड्यांमध्ये आलं मिक्सरवर बारीक करुन त्याची पेस्ट केली जाते.  पण या वड्यांमध्ये आल्याची पेस्ट नाही तर बारीक किसणीवर किसलेलं आलं मिसळलं जातं...हे किसलेलं आलं त्या कोहळा आणि दुधाच्या मिश्रणात टाकायचं....वर साखर किंवा गुळ...किंवा दोन्हीही अंदाजानं घालायचं...चवीला जायफळ...मोठ्या कढईमध्ये ठेवलेलं हे मिश्रण तयार व्हायला कमीत कमी चार तास तरी लागतात....त्यामुळं या वड्यांचा घाट मी सक्काळीच घातला होता.  वड्या होईपर्यंत माझं जेवण करुन झालंच पण जेवूनही झालं.   चार तासांनी वड्या तयार व्हायला लागल्या. 


त्यातला कोहळा साधारण पांढरसा होतं आला आल्याचा वास सुटायला लागला की वड्या झाल्या असं समजायचं....मैत्रिणीच्या आईनं दिलेली ही टीप खास आहे.  त्यामुळे कोहळा पांढरसा होत आला आणि आल्याची तिखटसर वास आल्यावर वड्या होत आल्याची चाहूल लागली.  मोठ्या ताटाला तूप लावून ठेवलं होतं...मिश्रण त्यावर टाकून वर तूप लावलेल्या डीशनं चांगलं गोंजारुन झालं...हे सर्व मिश्रण चांगलं पातळसं थापून झालं...मग पिझ्झा कटर मदतीला आला आणि शंकरपाळीच्या आकाराच्या वड्या कापून झाल्या...आता पुन्हा थंड व्हायला तास जाणार....हे सगळं होईपर्यंत ऐन थंडीच्या महिन्यात मी घामानं भिजले होते...मधल्या वेळेत लेकानं चारवेळा त्या कढईमध्ये डोकावून बघितलं...कोहळा किसल्यावर त्याचं जे पाणी रहातं त्याला थोड्या तुपा-जि-यावर फोडणी दिली की त्याची चव भारी लागते...हे कोहळ्याचं ग्लासभर पाणी पिऊन झाल्यामुळे आज काहीतरी कोहळ्याचं काहीतरी बनणार याची त्यालाही जाणीव होती...पेठा हा नेहमीचा....पण वड्या या खास वेळ काढूनच कराव्या लागतात....तशाच केलेल्या....चांगल्या दोन डबा भरुन त्या वड्या झाल्या....एक डबा भरुन लेकासाठी बाजुला ठेवला.  दुस-या डब्यातील अर्ध्यावड्या मैत्रिणीच्या लेकासाठी भरल्या...चला, म्हणत आता दुस-या पदार्थांची तयारी सुरु झाली. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. एक नवीन recipeमिळाली छानच दिसतायत वड्या

    ReplyDelete
  2. सुगरण आहेस.. खूप छान लिहिलंयस! पदार्थ बनवणं आणि ते इतकं सगळं फोटोसह लिहणं कौतुक वाटतं तुझं!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....तुमचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे आहे मॅडम...पुन्हा एकदा धन्यवाद...

      Delete

Post a Comment