आपल्या माणसांची व्याख्या.....
ये ये अगदी वेळेवर आलीस...सॅनिटाईज करुन घे आणि तयारीला लाग...हसतमुखानं काकूंनी मला घरात घेतलं आणि हातात अंब्याची पानं देऊन तयारीला लागण्याची सूचना केली....आज त्यांच्या लेकाची, विरेनची हळद होती...आमच्या दूरच्या नात्यातल्या...त्यातून लॉकडाऊनमध्ये जरा अधिक परिचयाच्या झालेल्या या कुटुंबात त्यांच्या लेकाचं लग्न होतं. विरेन अमेरिकेत शिकायला गेला आणि आता तिथेच नोकरी करीत असलेला मुलगा...दोन वर्षापूर्वी त्याचं लग्न ठरलं....पण कोरोनामुळे तो तिकडे अडकला आणि मुलगी इकडे...आता कोरोनाचा कहर थोडा कमी झाला आणि व्हिजाच्या कामासाठी विरेन भारतात परतला...वीस दिवसांची ही भेट...त्यातला आठवडा ऑनलाईन कामात आणि बाकीचे दिवस सुट्टी...याच दरम्यान त्याच्या लग्नाचा घाट काकूंनी घातला...मला त्यांनी फोनवरुन ही बातमी दिली तेव्हा मी एकदम विचारलं...बापरे...एवढ्या कमी दिवसात लग्नाची तयारी कशी करणार तुम्ही...तेव्हा त्य़ा नेहमीच्या शांत स्वरात म्हणाल्या, तयारी झाली ग...तू फक्त हळदीला ये...वेळेवर ये...म्हणून त्यांनी फोन ठेवला....हळद म्हटल्यावर हल्ली कंटाळा येतो....जोरजारातील गाणी, गोंधळ, हळदीच्या नावाखाली दारू आणि मटणाच्या पार्ट्या...पण काकूंकडे थोडं काय बरच वेगळं वातावरण होतं...मी आत्तापर्यंत विरेनला प्रत्यक्ष भेटले नव्हते...तो नवरदेव मुंडावळ्या लावून पाटावर बसला होता...काकूंनी माझी ओळख करुन दिली तेव्हा नमस्कार करायला उठला...त्याची मोठी बहीण विशाखा, मी, काकू, शेजारचे आणि अन्य चार महिलांशिवाय तिथे फार गर्दी नव्हती...फोटो काढण्य़ाची जबाबदारी विरेनच्या दोन मित्रांवर होती....काकूंनी रितीप्रमाणे मांडणी केली होती...त्याला हळद लावतांना त्या, विरेनसोबत आलेल्या त्याच्या मित्रांना आणि त्यांच्या पत्नींना त्या हळदीचे महत्त्व सांगत होत्या...नंतर त्याला गरम पाण्यानं न्हाऊ घातलं...मग सर्वांनी मिळून त्याला ओवाळलं...देवापुढे पेढे ठेऊन सर्व छान होऊदे म्हणून प्रार्थना केली...झालं...हळदीचा कार्यक्रम आटोपला...अवघ्या अर्धा पाऊण तासात...कुठेही गोंगाट नाही...एकमेकांना हळद फासणं नाही...की हळदीच्या नावावर दारु...मटण पार्टी आणि अंगविक्षेप करीत नाचणं नाही....सर्व झाल्यावर विशाखानं फराळाच्या डीश हातात दिल्या....तेव्हा मीच तिला विचारलं, एवढं साधं कसं काय ग...कोणी पाहुणे नाहीत...गडबड नाही...तुमचा गोतावळा खूप आहे ना...त्यांच्यासाठी संध्याकाळी काही खास प्रोग्राम ठेवला आहे का....
माझा हा प्रश्न विशाखानं आणि तिच्या बाजुला उभ्या असलेल्या विरेननंही ऐकला...दोघंही बहिण भाऊ हसत होते...मावशी, आपले कोण...याचं काही छापील व्याख्या आहे का....या दोन वर्षाच्या काळात आपली माणसं कोण आणि कशी ओळखायची याची जाणीव आम्हाला झाली. आपल्या रक्ताची, नात्याची, आजूबाजूची ही सर्वच काही आपली नसतात...या दोन वर्षात आमच्या आई-बाबांना आणि आम्हाला समजून घेतलं ती आपली माणसं, अशी व्याख्या आम्ही केली. आणि त्याच आपल्या माणसांना इथे बोलावलंय...मराठी शाळेत शिकलेल्या आणि आता अमेरिकेत नोकरी करणा-या विरेनच्या मराठी भाषेचं कौतुक करू की त्याच्या विचारांचं हे मला समजेना...तितक्यात विशाखा म्हणाली, ही आता इथे आहेत ना ती सर्व आपलीच माणसं आहेत. हाच आमचा गोतावळा...मी काही बोलणार इतक्यात काकू आल्या, संध्याकाळी पुन्हा ये...आपणच आहोत, मेहंदी काढूया...पण लग्नाच्या कामांचं काय...मी उलट त्यांना विचारलं...मुळात लग्न घरात एवढं कूल रहाता येतं हे मी कधी बघितलचं नव्हतं...अग काही नाही....सर्व प्लॅन काकांनी केला आहे...अगदी कागदावर लिहिलं आहे....जेवणासाठी घरात आठवडाभर एका ओळखींच्या बाईंना बोलवलं आहे. जेवण, घरची साफसफाई त्यांच्याकडे सोपवलं आहे. बाकी सर्वही झालं आहे...त्यामुळे आपण सर्वजणी मोकळ्या रहाणार आहोत...मी मान हलवली...काकूंनी घरी लेकासाठी खाऊ पॅक करुन दिला आणि पुन्हा संध्याकाळची आठवण करुन दिली....
कोरोनाची पहिली लाट आल्यावर या काका काकूंचा परिचय झाला होता. काका दूरचे म्हणजे, ह्याचा तो भाऊ...त्याच्या काकीच्या आजीच्या नात्यातील अशा बराचश्या पाय-या असलेल्या नात्यातील....विशाखा आणि विरेन ही त्यांची दोन मुलं...लग्न होऊन विशाखा ओडीशाला रहात होती...तर विरेन अमेरिकेत...इथे या दोघांचे आई बाबा एकटेच...दोघांनाही उत्तम आरोग्य. व्यायाम, योगा, वाचन, छोट्या मोठ्या सहली, नातेवाईकांचा गोतावळा, मित्र परिवार असं सगळं साभांळत आपलं रिटायर आयुष्य एन्जॉय करत होते...कोरोना येईपर्यंत सगळं ठिक होतं, पण कोरोना आल्यावर सगळं चित्र पलटलं...एरवी मुलगी दोन महिन्यातून एकदा आईवडीलांकडे यायची, किंवा हे दोघं मुलीकडे जायचे. मुलाला भेटण्यासाठीही अमेरिकेला जाऊन आले. पण कोरोनामुळे या सगळ्या गाठीभेटींना कुलुप लागलं. व्हिडीओ कॉलवर भेटी होत होत्या...पण दुधाची तहान ताकानं कधी भागत नाही...तसंच हे...मुलं...नातवंड दिसत होती...बोलत होती...पण त्यांना स्पर्श करता येत नव्हता...शिवाय बाहेरही पडता येत नव्हते...मुलांनी भाजी, दूध, किराणाही घरीच मागवा म्हणून ताकीद दिली होती...त्यामुळे सगळं ऑर्डरवर काम होत होतं...पण माणसांचा सहवास नव्हता...याचा काकांवर खूप परिणाम झाला...ते
नुसते बसून राहू लागले...एकाकी झाले...आजार नाही पण मानसिक खच्चीकरण आलं...कोरोनाची पहिली लाट गेल्यावर मुलगी आली...ती पंधरा दिवस राहीली...ती गेल्यावर पुन्हा पहिले पाढे पच्चावन्न...तेव्हा मुलीनं फोन करुन काही करता येईल का अशी विचारणा केली होती...त्या दरम्यान तर सगळेच कात्रीत सापडले होते...पण अधेमधे फोन करु आणि शनिवार रविवार घरी फेरी मारु म्हणून मी कबूल झाले. आठवड्यातून एक-दोन फोन आणि रविवारी संध्याकाळी चालायला बाहेर पडलं की त्यांच्या घरी पंधरा मिनीटं...असं पहिलं शेड्यूल ठरवलं....एरवी दूरचे नातेवाईक म्हणून आम्ही मनानंही दूर होतो...पण साधारण पंधरा दिवसांनी त्यांचा अंदाज आला....दोघंही शिष्ठ वाटत होती, मात्र तसं नव्हत...दोघंही बोलायला मोकळे होते...सुरुवातीचा आमच्यातला संकोच दूर झाला.
भाजी, मासे यांच्या रेसिपी शेअर झाल्या...एकदा ते दोघंही घरी आले
तेव्हा काकांना बुद्धीबळाची गोडी असल्याचं कळलं...लेकानं त्यांच्याबरोबर लगेच डाव
मांडला आणि त्यांना ऑनलाईन बुद्धीबळ खेळण्यासाठी काही साईडची माहिती दिली. मध्यंतरी आम्हा दोघांना अचानक दुस-या शहरात
काही कामासाठी जावे लागले...तेव्हा घरी एकट्या असलेल्या लेकाला सोबत म्हणून काका
काकू येऊन थांबले...अवघ्या सहा महिन्याच्या काळात या दूरच्या नातेवाईकांमधला आणि
आमचा दूरावा कमी झाला होता. त्यांचा
अमेरिकेतला लेक आम्हालाही व्हिडीओ कॉलद्वारे जवळ आला...तर ओडीसात रहाणारी विशाखा
चांगल्या परिचयाची झाली. ती एकदा अगदी
चार दिवसांसाठी येऊन गेली होती...तेव्हा लॉकडाऊनच्या दरम्यान आलेला वाईट अनुभव
तिनं सांगितला. ब-यापैकी स्थावर असलेल्या
काका काकूंच्या एकटेपणाचा फायदा काहींनी घेतला होता...कोरोना...लॉकडऊनाच्या नावावर
अनेकांनी पैशाची लूट केली....सुरुवातीला दोन्ही मुलांनी आपण आई वडीलांपर्यंत जाऊ
शकत नाहीत, पण आपल्या कुटुंबातील माणसं काळजी घेत आहेत...असं म्हणून दुर्लक्ष
केलं...पण ठराविक महिन्यात ठराविक रक्कम काही व्यक्तींना वडील ट्रान्सफर करीत
असल्याची माहिती मुलाला जॉईंट अकाऊंटमधून कळली...मुलींनं चौकशी केली तेव्हा काही
परिचीत काका काकूंच्या एकाकीपणाचा फायदा घेत होते, हे लक्षात आलं...दोन्ही मुलांनी
त्यांना फोनवरुन कल्पना दिली...पण आता तोडायचं कसं म्हणून काकांनी मुलाच्या
सुचनांकडे दुर्लक्ष केले...शेवटी मुलांनी त्या पैसे उकळणा-यानांच फोन करुन तंबी
दिली...त्यांनी काकांना येऊन उलटा प्रकार सांगितला आणि पैसे परत देण्याऐवजी,
तुम्ही एकटे पडलात म्हणून आम्ही सोबत देण्याचा प्रयत्न केला तर आम्हीच चोर
काय, असा जाब विचारला....या सर्वांचा
परिणाम काकांवर झाला...ते अधिक एकाकी झाले...त्याच दरम्यान विशाखानं आम्हाला
शोधून काढलं....फोन करुन विनंती केली होती...सुरुवातीला आमच्याही मनात अढी
होती...एवढ्या दूरचे, एरवी कधी आम्हाला
फोन केला नाही...आत्ताच बरं आम्ही आठवलो...असं मनात म्हणत मी तिला होकार दिला
होता....पण ही अढी पंधरा दिवसात सुटली...काही माणसं आपल्यापासून दूर असतात म्हणजे
ती वाईट किंवा शिष्ट वगैरे असतात असे नाही...याची जाणीव झाली...काका काकू
नात्यांनी दूर असले तरी ते आता मनानं जवळ आलेले....
हळद सकाळी झाली...संध्याकाळी आमचा बायकांचा मेहंदीचा कार्यक्रम झाला...घरातल्या बायका मेहंदीमध्ये व्यस्त म्हणून पुरुषांनी, अगदी नवरदेवापासून त्याच्या मित्रांनीही घराची, जेवणाची जबाबदारी घेतली....अगदी आटोपशीर बेत...दुस-या दिवशी लग्नाला आम्ही तिघंही गेलो होतो...अगदी चाळीस पन्नास माणसं...मोठा हॉल...साधीशी पण सुंदर सजावट...इथेही सर्व कुल मेंबर...भटजी विधी करतांना त्याचं महत्व काय हे समजावून सांगत होते...मंगलाष्टका झाल्या....शुभमंगल सावधान म्हणत लग्न पार पडलं...एक दोन परिचयाचे सोडले तर सगळे चेहरे नवीन होते...आम्ही तिघंही एका कोप-यात बसलो...तितक्यात विशाखा आली...जेवणाचा आग्रह करु लागली...मी तिला विचारलं, अग लग्नातही कोणी नातेवाईक नाही...कसं चालतं ग...कोणी रागवणार नाही का...विशाखा म्हणाली, नाही मावशी...आई-बाबा या लॉकडाऊनमध्ये बरचं काही शिकलेत...कधी ना कधी मुलं वेगळी होतात....शिक्षणासाठी...नोकरीसाठी दुस-या शहरात जातात...अशावेळी आईवडीलांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे...आमच्या आईबाबांनी आम्हाला समजून घेतलं...आणि आम्ही त्यांना...पण फक्त मध्ये आले ते आपले...आपले म्हणणारे कुटुंबिय...त्यांनी फक्त परदेशातून येणारा पैसा आणि रिटायर लाईफमध्ये मजा मारणारे आमचे पालक दिसले...बाबांना खूप आर्थिक फटका बसला...तो भरुन निघेलही....पण त्यांचा काही माणसांवरचा विश्वासच उडला...तसं व्हायला नको होतं...बाबा मनातून खचलेत....त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतलाय, त्यांना दुखवणा-यांना थोडं दूरच ठेवायचं...परदेशात काय किंवा आपल्या देशात काय पैसे कमवायला कुठेही परिश्रम करावे लागतात...याची जाणीव नसलेले आपले कसे होऊ शकतात...आता इथे आहेत, तेच सर्व आमचे...आमचा हाच गोतावळा...बाकी विशाखा काही बोलली नाही...गळ्यात पडून राहीली...अशा ब-याच गोष्टी असतात की ज्या न बोलताही कळतात...काकू-काकांनीही असे काही फटके सहन केले होते, याची पुन्हा जाणीव झाली...
कोरोनामुळे अनेक नवे धडे मिळालेत त्यातला हा एक....बाकी लग्न मस्त
झालं...कधी नव्हे तो फक्कड मराठमोळा बेत...गरमगरम पु-या, बटाट्याची भाजी, मिसळ, कोथिंबीर
वड्या आणि तोंडली घातलेला मसाले भात...गोडाला मो...द...क....आहा...अगदी लग्नासाठी
आलेले भटजीही पंगतीला बसलेले...व्वा व्वा...म्हणत त्यांनीही दाद दिली...यशावकाश
फोटो सेशन झालं...वधुवरांना शुभेच्छा दिल्या...सर्व कुटुंबियांना आमच्या घरी
येण्याचे आमंत्रण दिले...विरेननं अमेरिकेला जाण्यापूर्वी नक्की घरी येणार असल्याचं
सांगितलं....
चेह-यावर मास्क लावत आम्ही हॉल सोडला...आम्ही दोघंही शांत होतो... लेक
काहीतरी बोलत होता...कोरोना आल्यापासून नवराही वर्क फ्रॉम होम...आता त्यात काही
नाविन्य राहिलं नाही....पण अद्यापही काहींनी त्यात मजा वाटतेय...घरी बसून काम
म्हणजे बरेच पैसे वाचत असतील...असा समज आहे...पार्टी दे की कधीतरी...अशा आशयाचे
फोन आठवड्यातून किमान दोनवेळा तरी येतात...तेव्हा सकाळी आठ ते रात्री एक किंवा दोन
पर्यंत काम करणा-या नव-याला हसावे की रडावे हे कळत नाही...आताश्या असे फोन टाळले
जातात...पैसा...आणि आपली माणसं...या एका नाण्याच्या दोन बाजू...आम्ही दोघंही तोच
विचार करत होतो...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Very nice story 👌
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteएका नाण्याची दूसरी बाजू. छान
ReplyDelete