नारळदास...

 

नारळदास...


व्वा...मस्तच...नारळदास नाव ना या लाडवांचं...नेहमीसारखा छानच झालाय...पण हे नारळदास नाव म्हणजे काय...नुकत्याच केलेल्या नारळदास लाडवांपैकी दुसरा लाडू फस्त करत लेकानं प्रश्न विचारला...एकीकडे मी काय उत्तर देणार याच्याकडे कान ठेऊन आणि डोळे नारळदास लाडवांच्या ताटावर डोळे ठेवत त्यानं पुन्हा तोच प्रश्न विचारला...ही नारळदास नावाची भानगड काय आहे सांग ना...मी काय उत्तर देणार...जेव्हापासून लाडू या खाद्यपदार्थाची ओळख झाली तेव्हापासून नारळदास हे नाव कानावर येतंय...मुळात नारळदास लाडू यापासूनच लाडू हा खाद्यपदार्थ परिचयाचा झाला....आमच्या रेवदंड्यात नारळांना तोटा नाही...सगळ्या पदार्थात सढळ हातांनी ओला नारळ...पोह्यांवर किंवा उपम्यावरच नाही तर मसाले भात, साबुदाण्याची खिचडी,  पोह्यांचा चिवडा यावरही  तो पांढरा शुभ्र खोब-याचा डोंगर...या नारळात मोहाचा नारळ निघाला म्हणजे अजून चंगळ...मोहाचा म्हणजे ज्याचं खोबरं गोड असा नारळ...असा मोहाचा नारळ हाती लागला की आई त्याचं खोबरं काढून भाजलेल्या बारीक रव्यामध्ये मिसळायची...अगदी नावाला साखर आणि सोबतीला जायफळाची पूड हे सर्व मिसळून लाडू बनवायची...अगदी झटपट...घाट-बिट काही नाही...झटपट होणारे हे लाडू तेवढ्याच लवकर संपायचेही...तेव्हा फक्त लाडू फस्त करण्यावर लक्ष असायचं...त्याचं नाव काय...त्या नावाची भानगड काय आहे,  हेच नाव का पडलं...असले प्रश्न कधी सुचले नाहीत ...पण आता, एवढ्या वर्षानंतर नारळदास नाव का पडलं असेल याचा विचार केला...अर्थातच हेच नाव सार्थकी आहे...कारण या लावडवाचे मुळ साहित्य म्हणजे नारळच...तोही


ओला...खोवलेला...शुभ्र...खोबरं, रवा, साखर यांचं मिश्रण असलेला हा लाडू खाल्ला की पहिल्या घासातच ओल्या नारळाची चव लागते....त्यावरुनच नारळदास हे नाव पडलं असावं...माझा हा अंदाज मी लेकाला सांगितला...त्यावर त्याचं समाधान झालं...तिसरा लाडू घेऊन तो पसार झाला...आणि मी त्या नारळदास नावाभोवती स्वतःला गुंफून घेतलं....

आमचं गाव रेवदंडा...नारळी पोफळीच्या बागांनी नटलेलं सुंदर गाव...गावात असतांना नारळाचं महत्त्व फारसं जाणवलं नाही.  दिवसाला साधारण एक नारळ येथे जेवणात वापरला जायचा...रविवार आणि मासे असतील तेव्हा


एकाचे दोन नारळही सहज व्हायचे...सणाला...गोडाला...असं कधीही नारळ किती वापरला याचा हिशोब ठेवला गेला नाही.  मात्र गाव सुटल्यावर या नारळची किंमत कळली...आणि जेवणातील खोब-याचा सढळ हात अखडता आला.  मात्र जेवणात जरी ओलं खोबरं कमी झालं तरी एका खाद्यपदार्थामध्ये सढळ ओल्या खोब-याचा वापर कमी झाला नाही.  तो पदार्थ म्हणजे, नारळदास लाडू.  या लाडवामध्ये सढळ हातानं होणा-या खोब-याच्या वापरानं हे नाव त्यांना अगदी समपर्क ठरतं.  खोबरं, बारीक रवा आणि साखर या तिघांच्या मिश्रणातून हे अविट गोडीचे लाडू तयार होतात.  त्यात थोडीफार जायफळाची पूड किंवा वेलचीची पूड असेल तर अधिक छान...लहानपणी कधी गोडाला काय हे विचारावे लागत नसे...कधीही आणि केव्हाही उपलब्ध असायचे ते नारळदास लाडू.  बरं रोज खाल्ले तरी कंटाळा आला, असे कधीही या लाडवांबाबत झाले नाही.  त्याची चव लाजबाब...त्यात आईच्या हाताची जादू आणि सर्वांत चांगली बाब म्हणजे आमच्या गावच्या, रेवदंड्याच्या नारळाची चव...हे सर्व कॉम्बिनेशन एवढं अविट की आजन्म या लाडवांचे दास म्हणून रहायला आवडेल असेच..

आईकडून या लाडवांचा वारसा माझ्यापर्यंत आला.  अर्थात आईच्या हाताची चव मी बनवलेल्या लाडवांना नसते, हा लेकाचा शेरा मी कायम लक्षात ठेवते.  अगदी आत्ताआत्तापर्यंतही नारळदास लाडू करायचे तर आईच हवी.  ती अगदी थोड्यावेळासाठी घरी आली की तिला लाडू बनवायची विनंती करायची...बरं आईला कधीही नारळ आधी खवून ठेवलेला आवडायचा नाही.  अगदी ए टू झेड सर्व तीच करणार...आपण ते फक्त पहात रहायचं...एकीकडे रवा भाजायला ठेवत आई नारळ खोऊन घेणार,  मग साखर आणि वेलची


मिक्सरमधून बारीक केली की हे सर्व त्या गरम रव्यामध्ये टाकून मिक्स करणार...हे सर्व मिश्रण ढवळत असतांनाच मंद सुवासानं घर भरुन जायचं...मग हळूवार या गरम गरम मिश्रणाचे लाडू वळणार...देवासमोर हा पांढरा शुभ्र लाडू लेक ठेवणार...आणि सेकंदात तो गडप करणार....मग आजी नंबर वन म्हणत आणखी दोन तरी लाडू खाणार...लहानपणापासून आई अगदी समोर लाडू बनवतेय...पण तोच प्रयत्न मी केला तरी चव ती येत नव्हती...शेवटी एकदा आईकडून नारळदास लाडवांच प्रमाण  लेखी घेतलं...तीन वाट्या बारीक रवा...दोन वाट्या भरुन ओलं खोबरं आणि एक वाटी साखर...लक्षात रहाण्यासाठी पिरॅमिडची आकृती समोर ठेवली.  तेव्हापासून हे लाडू थोडेफार तिच्यासारखे जमायला लागले.  ऐनवेळी कोणी पाहुणे येऊदे की दिवाळीचा फराळ असूदे नारळदास लाडू पुरेसे पडणार...

एकदा या नारळदास लाडवांवर हात बसल्यावर त्यात काही प्रयोगही केले.  गणपतीमध्ये प्रसाद म्हणून नारळदास लाडू नेत होते, दरवर्षी तिच चव नको आणि काहीतरी वेगळं हवं म्हणून त्या लाडवांमध्ये अननस, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, पान, केशर अशा अनेक स्वादाचे मिश्रण केले.  कोणाला भेट म्हणून देतांना नारळदास लाडवांमध्ये काही फळांचा पल्प भरुन वेगळा प्रयोगही केला...पानाच्या स्वादातील नारळदास लाडवांमध्ये गुलकंद,  केशरस्वादातील लाडवांमध्ये बटरस्कॉचचे पल्प, अननसाच्या चवीच्या लाडवांमध्ये चॉकलेट सॉस असे कितीतरी भन्नाट प्रयोग केले आहेत.  मात्र हे सर्व बाहेरसाठी....घरासाठी नाही...घरात फक्त तिच पारंपारिक चव हवी...मध्ये एकदा घरातही चवीत बदल करण्याचा प्रयत्न केला.  लाडवांच्या मिश्रणात


थोडी मिल्क पावडर टाकली...मिश्रण अधिक पांढरे शुभ्र झाले आणि घट्ट झाले...लाडूही पटकन वळले गेले...पण चवीचं प्रमाणपत्र लेकाकडून...पहिला लाडू चाखल्यावर त्याचा नकार आला....काय नवीन प्रयोग केलास का...घरात काही प्रयोग करु नकोस,  आजीसारखेच कर...हे त्याचं रोखठोक मत आलं.  नंतर ते लाडू मोडून त्यात दूध टाकून वड्या केल्या.  तेव्हा त्या वड्या संपल्या...पण लाडवात भेसळ नको असा शेरा मला मिळाला...तेव्हापासून नारळदास म्हणजे शुद्ध नारळदास...त्यात कुठलाही प्रयोग नाही हे नक्की झालं...


आत्ता या परिस्थितीत थोडा बदल होऊ पहातोय.  लेक लवकरच पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जातोय,  त्यामुळे घरात सध्या त्याच्या आवडीच्या पदार्थांची चंगळ चालू आहे.  त्यात हे नारळदास लाडू पहिले.  ठरलेला डबा लाडवांनी भरुन ठेवला...गेल्या आठवडयात दुस-यांदा हे लाडू होत आहेत...पण करतांना मलाही कंटाळा नाही आणि खाणा-यांनाही नाही...या लाडवांवरच्या प्रेमापोटीच की काय एरवी या लाडवांमध्ये कुठलीही भेसळ नको असं सांगणारा लेक आता थोडे दिवस अधिक फ्रेश राहतील असे नारळदास लाडू होतील का याचा प्रयोग कर ना म्हणून आग्रह करतोय...एकूण काय नारळदास लाडवांचा आता दुसरा अध्याय सुरु होतोय...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. नलिनी पाटील
    नेहमीप्रमाणे लेख खुसखुशीत, लाडवाची रेसिपी सुद्धा सोपी आणि सुटसुटीत, पण ते सुंदर फोटो पाहून जिभ मात्र खवळली.

    ReplyDelete

Post a Comment