या दोघी....

 

  या दोघी....


या दोघी म्हणजे माझी आई आणि मावशी....आई अंजली शेलार आणि मावशी शैला सावंत...गेल्या आठवड्यात या दोन लाडक्या पाहुण्या आमच्या घरी अवघ्या दोन दिवसांच्या मुक्कामाला आला होत्या...माझा लेक लवकरच त्याच्या कॉलेजच्या ठिकाणी शिफ्ट होणार...त्याआधी त्याला या दोन आज्यांबरोबर रहायचे होते...अनेकवेळा मी सांगूनही न आलेल्या या आज्या नातवाच्या आग्रहाखातर दोन दिवस तरी रहायला आल्या आणि दोन दिवसांत आमचं अख्खं घर पुन्हा एकदा बोलकं करुन गेल्या.


ब-याचवेळा छोट्यांच्या हट्टाचा मोठ्यांना फायदा होतो...आमचा गेला आठवडाही तसाच फायद्याचा ठरला.  लेक लवकरच दुस-या राज्यात जाणार.  त्यामुळे त्याचे हट्ट सर्वपुरण्यात येत आहेत.  त्यातला प्रमुख हट्ट आजी आपल्या घरी यावी हा....त्याचा या दोन आज्यांसाठी खूप आग्रह होता.  गेल्या आठवड्यात हा बेत जुळून आला  आणि या दोघी दोन दिवसांसाठी का होईना आमच्या घरी मुक्कामाठी आल्या.  दोघीही येण्याची तारीख जेव्हा ठरली तेव्हाच लेकानं जाहीर केलं की नाष्टा आजी करणार...तेही छान खोबरं पेरलेले पोहे.  एरवी मी केलेले पोहे खाण्यासाठी आढेवेढे घेणारा लेक आजीच्या पोह्यांवर फिदा असतो...आजी येणार म्हणून खूष झालेल्या लेकानं तू सांभाळून रहा म्हणत मला इशारा दिला...मी चेह-यावर कितीही नाराजी दाखवली तरी मनात मात्र हसू आलं.  हे नातंच असं आहे.  माया...प्रेम...जिव्हाळा...सर्व काय ते इथे मिळते.   लहानपणी जेव्हा आमची मावशी घरी रहायला यायची तेव्हाही आमची अशीच प्रतिक्रीया असायची...आता त्या नात्याचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे.  तरीही भावना, गोडी तिच आहे.

आई आणि मावशी या दोघींकडे एक व्यक्ती म्हणून जेव्हा बघते, तेव्हा त्यांच्यातील कणखरपणा जास्त भारावतो.  दोघींही पट्टीच्या सुगरण.  आणि तेवढ्याच उत्साही.  आता दोघीही उतारवयात आहेत.  पण हे आकडे फक्त सांगायचे.  आत्ताही पन्नास-शंभर व्यक्तींचे जेवण बनवायचे असेल तर दोघीही तेवढ्याच उत्साहानं पदर खोचून कामाला लागतील.  थकवा हा शब्द यांच्या डायरीत नाही.  कधीही काही नवीन सांगा....लगेच ट्रायल घ्यायला दोघीही तयार.  दोघींनाही माणसं जोडायला आवडतं.  आणि जोडलेल्या माणसांना जपायलाही तेवढंच आवडतं.  त्यामुळे कोणी घरात आलं की त्यांचा पाहुणचार करायला या पुढे.  प्रत्येकाच्या आवडी निवडी माहितीच्या.  समोरच्यानं कितीही नको सांगितलं तरी हमखास त्या आवडी जपणार...आग्रह करणार...हा या दोघींचा स्वभाव त्यांच्याकडे अधिक खेचून घेतो.  काळाच्या ओघात दोघीही वेगवेगळ्या परिस्थितीला सामो-या गेल्या.  पण त्यासाठी कधीही रडत बसल्या नाहीत.  तर आलेल्या परिस्थितीला कणखरपणे सामो-या गेल्या.  लढल्या, आणि त्यातून बाहेर पडल्या.  त्यांच्यामधील ही सकारात्मकता आम्हा सर्वांनाच कायम आदर्शवत ठरली आहे.  दोघीही सुगरण असल्या तरी आपल्या तब्बेतीची अगदी काटेकोरपणे काळजी घेणा-या.  आई, पूर्णपणे व्हेज...सकाळी सहा वाजताचा चहा म्हणजे तिच्यासाठी टॉनिक...त्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यावर सकाळचा मोजका नाष्टा....दुपारीही अगदी मोजकं जेवण...चुकून एखादी गोष्ट जास्त झाली तरी ती आधी ताटापासून दूर काढून ठेवणार...सायंकाळी चारच्या ठोक्यावर पुन्हा चहा आणि एखादं दुसरं मारी बिस्कीट...संध्याकाळी काही अन्य खाऊ झाला तर रात्रीच्या जेवणासाठी अगदी ताटात घेतलं न घेतलं एवढं जेवण...माझी मावशी तर या डायटच्या बाबतीत पुढचं पाऊल.  चहा किंवा कॉफी काहीही नाही.  अगदी खूप थंडी असली तर अगदी अर्धा कप चहा तोही कमी साखरेचा...जेवणाच्या बाबतीतही तेवढाच बॅलन्स...कोशिंबीर, खिचडी, भाकरी यावरच तिचा जास्त भर...पण तेही मर्यादीत...कुणी जास्त आग्रह केलाच तर त्या आग्रह करणा-यालाच ओरडणारी.  सर्व पदार्थांची चव जरुर चाखणार...पण त्यावर ताव


मारला असं कधी नाही.  का...तर आपण आपल्याला सांभाळायला हवं...उगाचच डॉक्टरकडे का जायचं आणि त्याची औषधं का खायची हा युक्तीवाद.  या सर्वांच्या सोबतीनं चालण्याचं महत्त्व सांगणारी...आणि भरपूर चालणारी. 

या दोघींमध्ये माझी आई मोठी आणि मावशी लहान.  दोघींच्यांत वयाचे अंतर...पण स्वभावात मात्र एकी.  लहानपणी मावशी घरी रहायला यायची...मावशी आली की आमची मज्जा असायची...आणि ती गेल्यावर एक गम्मत नेहमीचीच व्हायची...मावशी परत गेली तरी आई तिच्यातच रमलेली असायची.  कारण त्यानंतर माझं  नामांतर झालेलं असायचं...आज एवढ्या वर्षानंतरही आईची सवय काही बदलेली नाही.  अनेकवेळा मावशीच्या नावानं ती मला हाक मारते,  आणि मी तिला ओ देते.   दोघीही नव्या नवलाईच्या....कशालाही विरोध नाही.  नवीन पिढी काय करते...कश्याला करतेय...असा विरोध नाही.  उलट करा हे छान दिसेल...असं करा, हे छान आहे...असं प्रोत्साहन देणा-या...यामुळेच आज मला जेवढ्या या दोघी आवडतात त्यापेक्षाही जरा जास्तच माझ्या लेकाला आवडतात....

प्रत्येक घरात आई आणि मावशी या दोन खास प्रेमाच्या जागा असतात...आमचंही घर त्यापेक्षा वेगळं नाही...आई ही संस्कार देते आणि मावशी संवेदना...दोघीही एकाच नाण्याच्या दोन बाजू...वेगळ्या...तरीही तेवढ्याच अनमोल....त्यांनी काय दिलं हे तराजूत कधी मोजता येऊ शकत नाही...या आमच्याघरी आलेल्या दोघीही अशाच अनमोल...कोरोना काळात फार भेटीगाठी झाल्या नाहीत.  पण आता जवळपास दोन वर्षांनी दोघी अशा घरी रहायला आल्या म्हणून त्याचं कौतुक जास्त.  दोघीही आल्या आणि आम्हाला पुन्हा आणखी आपलंसं करुन गेल्या.  आईनं आल्या आल्या देवाचा ताबा घेतला.  देवपुजेसाठी वापरणारी भांडी लख्ख झाली.  येतांना तिनं नेहमीप्रमाणे जास्वंदीची फुलं, कळ्या, शम्मीची पानं असं आणलं होतं.  ते निट पाण्यात ठेऊन देवाला फुलांनी सजवून झालं.  आणि मग ती नातवाबरोबर गप्पा मारुन जपमाळ घेऊन त्याच्या खोलीत जप करत बसली...तर मावशी आपला नेहमीचा चालण्याचा व्यायाम करण्यात गुंतली.  पहिल्या दिवशी नातवासाठी आजीच्या हातचे पोहे झाले.  दुस-या दिवशी आईला त्रास नको म्हणून मी डोशांचा बेत केला.  तेव्हा माझा लेक आणि नवरा दोघेही नाराज झाले...डोशे कशाला आईनं उपमा केला असता ना...म्हणत मला टोकलं...संध्याकाळी आलेल्या भावासाठी तो हुकलेला उपमा करण्याची संधी आईला मिळाली. 


एरवी पोहे किंवा उपम्यात बटाटे टाकले तर ते वेगळे काढत मला बडबडणा-या लेकानं त्या उपम्यातल्या बटाट्याच्या फोडीही तेवढ्याच आवडीनं खाल्या...आजी, उपमा एक नंबर झालाय...ही त्याची प्रतिक्रीया मला चिडवण्यासाठी असली तरी एकदम खरी होती...कारण त्यात असलेली माया, प्रेम...याची तोड कशालाच येणार नव्हती...आम्हा तिघांनाही भरभरुन आशीर्वाद देऊन या दोघी दोन दिवस राहून आपापल्या घरी गेल्याही...हे नेहमीचच...आई आधीही कधी आली तरी फार दिवस राहीली नाही...मावशीचीही तिच गत...फार आग्रह करुनही कुठे रहाणार नाहीत...पण त्यांचे हे मोजके दिवसही भरभरुन आनंद देणारे...

प्रत्येक घरात असेच आनंदाचे झरे असतात...फक्त दुस-यांना देणारे...देतांना कुठलीही अपेक्षा न करणारे...फफ

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. खूप छान शब्दात आईची आणि मावशी ची महती सांगणारा लेख आवडला

    ReplyDelete
  2. किती साधं, सोपं तरीही हृदयस्पर्शी लिहिलंयस!
    मी आजी असल्याने नातवंडांबरोबरच नातं किती छान असतं ते नेहमीच अनुभवते. असंच ‌‌लिहीत रहा.

    ReplyDelete
  3. खूप छान लिहितोस सई. मलाही माझ्या आई व मावशीची। आठवण करून दिलीस.

    ReplyDelete

Post a Comment