तो...ती...की माणूस....

 

  तो...ती...की माणूस....


लग्नाचा जोरदार सिझन सुरु झालाय.  आठवड्यात किमान एक तरी लग्नाला किंवा स्वागत समारंभाला हजेरी लावावी लागतेच.  कोरोनाचे सगळे सोशल नियम पाळून केलेल्या अशा लग्नाला जाऊन गेल्या दोन वर्षात न भेटलेल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला भेटण्याची संधी मिळतेय.  बुधवारी असाच एक स्वागतसमारंभ होता.  वेळ थोडी वेगळी, दुपारी तीन ते संध्याकाळी सात...वेळ वेगळी असली तरी मला सोयीची वाटली.  ठाण्याला स्वागतसमारंभ...रेल्वे स्टेशनपासून अगदी पाच मिनीटावर हॉल...त्यामुळे खूप दिवसांनी ट्रेनमधून जाण्याची संधी मिळाली.  बरोब्बर अडीच वाजता स्टेशन गाठलं...लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवून तिकीट घेतलं...नशीबानं त्यावेळेस फास्ट गाडी लागली.  अगदी पाच मिनीटात ती आलीही...गाडीत गर्दी नव्हती...पण एक जागाही खाली नव्हती...त्यामुळे मधल्या पॅसेजमध्ये टेकून उभी राहिले...खूप दिवसांनी असा मोकळेपणानं आणि खाली असलेल्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली.  बाहेरची खाडी बघू लागले....तेव्हाच ती टाळी कानावर पडली.  पुन्हा एकदा पण जोरानं...वळून बघितलं तर कोणी महिला मान फिरवून बसली होती...तिच्यासमोर पुन्हा पुन्हा टाळी वाजवूनही काही मिळालं नाही म्हणून टाळी मारत त्यानं नाराजी व्यक्त केली. आता आमची वेळ होती...ट्रेनच्या मधल्या पॅसेजमध्ये टाळी फिरु लागली...एकीनं दहाची नोट काढली...तिच्या डोक्यावर हात ठेऊन काहीतरी बोलण्यात आलं...आत्ता माझ्याकडे...मी पर्समध्ये शोधू लागले...पन्नास रुपयांची नोट होती...ती त्याच्या हातात दिली...घेतांना त्यांनी विचारलं रुक, छुट्टा देती हुं...मी हातानंच नको म्हटलं...रखो म्हटलं...त्याला एक स्माईल दिली...त्या पन्नास रुपयांपेक्षा त्या स्माईलनं आमच्यातलं अंतर बहुधा कमी झालं...अच्छी है रे तू...म्हणत माझ्याही डोक्यावर हात ठेऊन काहीतरी पुटपुटलं...आणि हसत तो पुन्हा पुढच्या भागाकडे निघून गेला...आता त्या डब्यातल्या काही नजरा त्याच्याकडून बाजुला गेल्या आणि माझ्यावर स्थिरावल्या...मला उगीचच काहीतरी चुकल्यासारखे वाटले आणि मी पुन्हा बाहेर बघू लागले. 


साधारण मोठा बोगदा जवळ आल्यावर ट्रेन थांबली.  चांगलीच थांबली..त्याची डब्यातली सर्व फेरी मारुन झाली.  जवळ जे काही पैसे होते ते मोजायचे होते...नेमकी माझ्या जवळची जागा पकडली...खाली फतकल मारुन सर्व पैसे पदरात टाकले...आणि मोजायला सुरु केले...मी सहज म्हणून बघत होते...एक रुपयाच्या नाण्यापासून एक दोन शंभरच्याही नोटा होत्या...पैसे मोजण्यापेक्षा त्यानं ते सरळ  लावले...त्याची गुंडाळी केली आणि आपल्या पर्समध्ये भरली...सुट्टे पैसेही त्यांच्याजागी गेले.  एव्हाना ट्रेन एकाच जागी उभी होती.  त्यानं आपली जागा पकडली..दाराची अगदी पहिली जागा...त्याच्या मागे मी टेकून उभी होते...त्यानं ओळखीचं हासू दिलं...सिग्नल है...गाडी छुटेगी नही थोडीदेर...तूम क्या फंक्शन जा रही हो...अभी देर होगा...मी पहिल्यांदा संकोचले...ठिक है म्हणत मोबाईलमध्ये डोकं घातलं...पण त्याचं सुरु होतं...सुबह निकले है घरसे...शहाड...अभी तक खाना नही खाया...ठाना में खाना है...ये ट्रेन का हररोज का लफडा है...मी यावर फक्त हसून त्याला प्रत्युत्तर दिले...तेव्हाच माझी नजर समोरच्या डब्यावर फिरली...बहुधा सर्वजणी आमच्याकडे बघतच होत्या...एवढं वेगळं होतं का आमचं कम्युनेकशन...की मी बोलत होते, तो एक समाजानं दूर केलेला माणूस होता म्हणून तेवढी उत्सुकता होती काय माहित...पण एव्हाना मी सुद्धा त्याच्याकडे निट बघू लागले. 

चापूनचुपून घातलेली खणाची लाल रंगाची साडी आणि हिरवा खणाचा


ब्लाऊज...अंबाडा...त्यावर गज-याची वेटोळी आणि मोठं कुंकू...गळ्यात, कानात एकदम छान असे दागिने...मी त्याच्याकडे निरखून बघत आहे, हे त्याला समजले...त्यानं बिंधास्त विचारलं, क्या देखती रे...मी पुन्हा संकोचले...माझी चोरी पकडली गेली...पण हळूच म्हटलं...साडी बहोत अच्छा पेहना है...अच्छा लगता है...बस्स त्याला पुन्हा संधी मिळाली, है ना...तुम मराठी लोगोका है...खणका साडी...एक शादीमें मिला...तेवढ्यात गाडी चालू झाली...चलो अभी ठाना आयेगा...म्हणत तो अधिक बाहेर डोकवू लागला....

स्टेशन जवळ आलं...तशी सिटला चिटकून बसलेल्या सर्वांना जाग आली...मधल्या पॅसेजमध्ये गर्दी होऊ लागली...सर्वाचं लक्ष त्याच्याकडेच...एक पुटपुटली...इथे गरज असेल त्यांना प्रवास करायला देत नाहीत,  यांना बरं तिकीट देतात...हे पुटपुटणं चांगलंच मोठं होतं...त्यानंही ऐकलं...तिकीट निकाला है...म्हणत त्यानं माझ्या हातात खांद्याला लावलेली पर्स अक्षरशः टाकली...प्लॅटफॉर्म कधीही येईल म्हणून मी सुद्धा उतरायच्या तयारीत...पर्स कशीबशी पकडली...वो बाहरवाला चैन खोल...म्हणून मला ऑर्डर आली...मी ती चैन उघडली...उसमे देख वो वॅक्सीनेशनका कार्ड है और तिकीट है वो निकालेक उस मॅडमको दिखाना जरा...म्हणत पुन्हा एक ऑर्डर आली...मी त्या बाईकडे बघितलं...तिनं मान फिरवून माझी नजर चुकवली...तितक्यात गाडी फ्लॅटफॉर्मला लागली...उतरायची घाई सुरु झाली..मी त्या पर्सची चैन बंद करण्यासाठी धडपड करत होते...तितक्यात त्याचा हळूवार आवाज आला...अरे उसमे वो सॅनेटाईजर का बॉटल है...तू ले...मी नाही म्हणत हातांनी खूण करत माझ्याकडेही असल्याचे सांगितले...त्याला हातांना बाय करत मी सुद्धा माझी वाट पकडली...माझ्यापुढेच होता...मध्येच एक फुलांची रोपं घेऊन जाणारा माणूस मोठी टोपली घेऊल बसला होता...याला बघून हात तो लगा जरा म्हणत पुढे आला...त्यानं त्याची चुंबळ डोक्यावर घेतली...यानंही लगेच...क्या रे मैही मिला क्या....म्हणत त्या टोपलीला हात लावला...मी चालत हॉल गाठला...चार वाजायला पाच दहा मिनिटं बाकी. ती...फास्ट ट्रेन पकडूनही काही फायदा झाला नाही. 


हॉलमध्ये फार गर्दी नव्हती...नवरा माझ्या परिचयाचा...त्याचे आई बाबा पुढे आले...एकट्याच आलात का म्हणून विचारणा झाली...नमस्कार चमत्कार...सगळे सोपस्कार पाड पडले...फोटो झाले...आई बाबांनी मला खाऊच्या काऊंटरपर्यंत आणून सोडलं...घाई करु नका...म्हणत ते पुढच्या पाहुण्यांकडे वळले...मी त्या खाऊच्या काऊंटरवर नजर टाकली...सायंकाळच्या वेळीसाठी सर्व प्रकारचे स्नॅक्स तिथे हजर होते....कोणीतरी ओळखीचं भेटलं...आम्ही सोबतीनं त्या काचेच्या पांढ-या डीशमध्ये दोन-तीन पदार्थ घेतले आणि टेबल पकडलं...पहिला घास खातांना समोर मात्र तो दिसला...काय म्हणायचं तो की ती...की फक्त माणूस...
निघतांना पुन्हा सगळ्यांना भेटून हॉल सोडला...घाईघाईनं स्टेशन गाठलं...आता संध्याकाळची ब-यापैकी गर्दी व्हायला लागली होती...गर्दीतही माझी नजर त्या माणसाला शोधत होती...तो ती किंवा कोणीही....पण एक चांगला माणूस मला भेटल्याचा आनंद होता.   स्त्री किंवा पुरुष...गरीब किंवा श्रीमंत...असा भेद नकोच...इथे माणसंच माणसासमोर भींती उभ्या करीत आहेत.   त्या टाळीचा काहींना त्रास होतो...पण ही टाळी त्याच्या आयुष्य जगण्याचे साधन आहे...अशा माणसाला मी पुन्हा येतांना शोधत होते...आता नाही भेटला तर पुन्हा कधीतरी भेटेल...तो किंवा ती नाही...तर त्यांच्यामधला माणूस...फक्त माणूस....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप छान, मनापासून लिहिलंय जाणवतं....खरंच, माणसाला लेबल लावण्या ऐवजी माणूस म्हणून ओळखायला/वागवायला हवं...

    ReplyDelete
  2. साधीच घटना पण ही तू त्याची सुंदर अर्थगर्भ कथा केलीस 🌺

    ReplyDelete
  3. Yes Sai ,it will take some time to remove or lessen the taboo . But the process has begun. Some companies have taken the initiative. TCS employs them as car drivers to pick and drop women employees.

    CA Jayshree Karve

    ReplyDelete

Post a Comment