आमवस्या....सोहळा आणि आजी
सकाळची घरातली सर्व कामं...योगा...दोघांचं जेवण...बाकीची सर्व आवराआवर करुन बरोबर अकरा वाजता रोहीणीचं घर गाठलं. तिच्या सोसायटीच्या आवारात गाडी लावतांना पार्कींगमध्ये आणखी दोन ओळखीच्या गाड्या दिसल्या...म्हणजे आमचा चौघींचा कोरम पूर्ण झाला होता...तिघी आधी पोहचल्या होत्या...मला थोडा उशीर झालेला....धावतच मी दुसरा मजला गाठला...पहिलीच रुम रोहीणीची...बाहेर ओळखीच्या चप्पला बघितल्या आणि अधिक जोर चढला...त्याच जोशात बेल वाजवली...दरवाजा शलाकानं उघडला...सेफ्टी डोअर उघडण्याआधीच मी सुरु झाले...तुम्ही आधी आलात...झाली का पार्टी सुरु...काय काय बेत आहे...हे पुढचं वाक्य अर्धच बाहेर आलं...कारण समोर रोहीणीचे सासू सासरे बसले होते...शुभ्र पांढरा झब्बा, तसाच लेंगा आणि डोक्यावर टोपी घातलेले तिचे सासरे...तर हातात अगदी कोपरापर्यंत भरलेला चुडा आणि तशीच हिरव्या रंगाची काष्टी साडी नेसलेली तिची सासू...या दोघांसह बाकीच्या मैत्रिणीच्या नजराही माझ्याकडे खिळल्या...रोहीणीनं अगदी काल रात्री खूप अजीजीनं उद्या सकाळी येच म्हणून फोन केला...त्यांच्या गावची काही पद्धत आहे...तिकडे जाता येत नाही म्हणून सर्वांनी मिळून एकत्र जेवण करायचे होते...खरतर रविवारी मासे, चिकनशिवाय आमच्याकडे जेवण होतच नाही...पण रोहीणींनी हुर्डा, शेंगा, भाकरी, भरीत आणि अशाच अस्सल गावरान पदार्थांचं आमिष दाखवलं...त्यात फार गर्दी नाही...आम्हा चौघीनाच बोलवलं होतं...ती, तिचा नवरा आणि दोन लेकी...मी तरी एवढी माणसं मोजली आणि हो बोलले...पण आता तिच्या सासू सास-यांना समोर बघून माझी बोलती बंद झाली. करोनामुळे खूप गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये हा नियम इथे नव्हता, तर मुळातच रोहीणीच्या सासू–सास-
यांची आमच्यामध्ये दहशतच अधिक होती. सोलापूरची ही मंडळी फार कमी वेळ इथे, त्यांच्या मुलाकडे येतात. सासू सासरे आल्यावर रोहीणी कायम धाकात असल्यासारखी वावरते...साडीत असते...हेच आमचं आत्तापर्यंतचं निरीक्षण...त्या सासू सास-यांना समोर बघून माझा सुरुवातीचा जोश शांत झाला...
माक्स बॅगेत ठेऊन, हात धुण्यासाठी मी बेसीन जवळ गेले...तर रोहीणी मागून आली...हातपाय धूवून घे...स्वयंपाकघरात थोडी मदत लागेल...आईंनी सांगितलय, सर्वजणींना त्या काहीतरी सांगणार आहेत. मी बरं म्हणत, हातपाय धुवून बाहेर हॉलमध्ये येऊन बसले. सर्व स्थिर झाल्यावर रोहीणी, चहा-कॉफीचे मग घेऊन बाहेर आली. अग आईंना काहीतरी सांगायचंय तुम्हाला. आई-बाबांचे जरा चेकअप करायचे आहे, म्हणून मागच्या
आठवड्यातच ते इथे आलेत...दोन दिवसांपूर्वी जाणार होते. पण डॉक्टरांनी अजून एक टेस्ट सांगितलीय. आज आमच्या गावी येळ आमवस्येचा सोहळा असतो, शेतात. आई-बाबांना नाही जाता आलं, ते थोडे नाराज झालेत. म्हणून मी इथेच सर्व गोळा करायचा प्रयत्न केला...त्या म्हणाल्या मैत्रिणींना पण बोलव, म्हणून तुम्हाला बोलवलंय...बघा त्या काय सांगतात ते...
एवढी सारी माहिती देत रोहीणींनं सूत्र तिच्या सासूकडे दिली. एवढ्या वर्षात मी या आजींना पहिल्यांदा एवढ्या जवळून बघत होते. चांगली चापूनचोपून नेसलेली नऊवारी साडी, कपाळावर भलं मोठं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि आणखी एक सोन्याची माळ, हातात कोपरापर्यंत हिरव्या बांगड्या, कानात चंद्रकोरीच्या आकाराच्या बुगड्या आणि पायात चांगली जाडजूड जोडवी.
या सर्वांच्या जोडीला रापलेले हातपाय आणि अंगभर पसरलेलं सुरुकत्यांचं जाळं...मीच काय पण आम्ही चौघीही मैत्रिणी त्यांच्याकडे बघत होतो. त्यांनी आपला घसा साफ केला आणि बोलायला सुरुवात केली....गावाकडे आमचं शेत आहे...रोहीणी सांगत असेल तुम्हाला...शेतात आम्ही या आजच्या आमवस्येला मोठा सोहळा करतो. शेतातच सर्व जेवण करतो. सर्व चुलीवर होतं...आणि जे होतं ते शेतातच पिकलेलं असतं...अगदी पन्नास साठ माणसं जेवतात...पै पाहुणे, मित्र मंडळी, शेजार पाजार...असे सर्वजण येतात...दिवसभर दंगा असतो...शेतातल्या देवाची पुजा करतो...गोडधोड खातो...आणि सूर्य मावळल्यावर घराकडे परततो...शेतातल्या देवाचा मान असतो. मनाही येतो दरवर्षी या आमवस्येला...रोहीणीला लेकींच्या शाळेमुळे कधी जमतं कधी नाही....आम्ही रोहीणीकडे बघितलं...मना म्हणजे मनोहर...रोहीणीचा नवरा...त्यानंही थोडं हसल्यासारखं केलं. आजी पुढे बोलू लागल्या, आम्हाला यावर्षी चुकल्यासारखं होतंय...कित्येक वर्षाचा आमचा नेम तुटला म्हणून वाईट वाटलं...पण रोहीणी म्हणाली, आपण इथे करुया सर्व मी सर्व तयारी करते....आम्ही आलोय तर इथे त्या कोरोनाची भीती आहे....आमच्या गावात हे काय नाय...सगळे मोकळे फिरतात...पण इथे सगळे नियम आहेत. ते सांभाळून रोहीणीनं सर्व खरेदी केली. ती पाहून बरं वाटलं म्हणून थांबलो....बाबांनी गावाला फोन करुन आमच्या चुलत्याला सर्व करायला सांगितले. पण आता सुनेनं केलेली तयारी बघून बाबांना थोडं बरं
वाटलंय...गावी या दिवशी आमचे नातेवाईक येतातच पण शेजारी-पाजारीपण येतात...ओळखीचे येतात...म्हणून आम्हीच रोहीणीकडे मैत्रिणींना बोलवण्याचा आग्रह धरला...तुम्ही आलात बरं वाटलं...आम्हा दोघांनाही फार बोलायची सवय नाही....आम्ही भले की आमचं गाव भलं...गावी आमचा सगळा दिवस शेतात आणि शेताच्या कामात जातो...इथे आल्यावर जीव घुसमटतो...पण आता डॉक्टरांपायी यावे लागले...तर हे असे झाले...बघा पोरींनो, तुम्ही पण मला रोहीणासारख्याच...आमचा सण सर्वजण मिळून साजरा करुया...जेवण साधं असतं पण चवीला खूप छान...करायची का सुरुवात...त्या आजींनी आम्हाला पुन्हा विचारलं...तेव्हा कुठे आमची लिंक तुटली...मगमध्ये कॉफी थंड झाली होती, पण त्याकडे लक्षच नव्हते. रोहीणीच्यासासूबाई काय बोलतात, हे ऐकण्यापेक्षा त्यांच्याकडे बघण्यातच लक्ष होते. थोड्याश्या घोग-या आवाजात त्या आजी बोलत होत्या, पण त्या आवाजातही कुठेतरी ओलावा होता. आमच्यातली एक मैत्रिण पटकन हो, म्हणाली. आई, तुम्ही म्हणाल तसं...आम्हाला आवडेल. असं बोलून गेली...आम्हीही लगेच तिच्यापाठोपाठ हो...हो...करत मान डोलावली....यावर त्या सासूबाई थोड्या हसल्यासारख्या झाल्या...आणि उठून किचनमध्ये गेल्या...रोहीणीनं आम्हालाही हातांनी खूण केली....आम्हीही चौघी तिच्या पाठोपाठ आत गेलो...
रोहीणीचं किचन ब-यापैकी मोठं...त्यामुळे आम्ही सहाजणी त्यात सहज मावलो...त्यातही किचनला लागून ड्राय बाल्कनी. रोहीणींने त्यात छोटी शेगडी ठेवली होती...कोळसे भरलेली ही शेगडी सासूबाईंनी कागदाचे छोटे छोटे कपचे टाकून पेटवायला घेतली. किचनमध्ये ओल्या शेंगदाण्याच्या शेंगा, ओले
हिरवेगार चणे, मोठी बोरं, पिकलेले पेरु, भरताची वांगी असं बरच काही मांडून ठेवलं होतं...आम्ही काय करायचंय याची अद्याप माहिती नव्हती त्यामुळे त्या आजींच्या हालचाली टिपत होतो...ती छोटी शेगडी थोडी पेटल्यासारखी झाल्यावर आजींनी आमच्याकडे बोट दाखवून एकीनं इकडे या म्हणून बोलवलं...मी पुढे गेले...त्यांनी शेगडी पेटवण्यासाठी एक पुठ्ठा हातात दिला. वारा घालून निखारे चांगले तापवण्याची सूचना केली. नंतर बाकीच्यांना ओले चणे सोलण्यासाठी सांगितलं. रोहीणीनं ठेचा करायला घेतला. सर्वांना कामाला लावून या आजी भाक-या करायला उभ्या राहिल्या. माझ्या ताब्यात असलेली शेगडी तापली...कोळसे लालेलाल झाले. तेव्हा त्यावर दोन भरताची वांगी आजींनी ठेऊन दिली...मला ते निट भाजण्याची सूचना केली...ते झाल्यावर त्यांनी कांदे, टोमॅटो, लसणाचा कांदा आणि मिरच्या त्या निखा-यांवर ठेवल्या. मिरच्यांचा ठसका बसायला लागला तेव्हा आजींनी सर्व काढून घेतलं. निखा-यांवर आता रोहीणींनं बारीक जाळी ठेवली. त्यावर ओले चणे टाकले....नंतर शेगदाण्याच्या शेंगा भाजून झाल्या....
इकडे आजींनी भाक-या तयार केल्या...किचनमध्ये
खमंग दरवळ होती...पण एरवी चिवचीव करणा-या आम्ही अगदी मोजक्याच बोलत होतो...आजींनी
भाक-या तयार केल्या...रोहीणींनं ताट बाहेर काढली...ताटं भरायला घेतांना आजी
भाजलेली वांगी घेऊन समोर बसल्या...या पोरींनो तुम्हाला भरीत दाखवते, आमच्या
गावसारखं, म्हणत त्या आजी समोर सर्व मालमसाला घेऊन बसल्या...आमच्यातल्या एकीनं
भाजलेले कांदे सोलले, टोमॅटोची साल काढली, एकीनं भाजलेल्या लसूणाची सालं
काढली. आजींनं कटर ट्रे घेतला. सुरीनं
भाजलेलं वांगं बारीक केलं, कांदा, टोमॅटो, मिरची आणि लसूणांच्या बारीक कापा
केल्या. हे सर्व एका भांड्यात घेऊन त्यावर
मीठ घातलं. सर्व मिळून घेतलं आणि ताटात
वाढायला तयार झालं. माझ्या हातात पेरु देत
कापा करायच्या सूचना मिळाल्या.
आदल्या दिवशी रोहीणी आणि आजींनी मिळून पुरणाच्या आणि गुळाच्या
पोळ्या केल्या होत्या. त्या ताटात आल्या. भाक-या, भरीत, मिरचीचा ठेचा, पेरुच्या कापा, बोरं, तिखट मिठाचा हात चोळलेले ओले चणे, कांदा आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या शेंगा...असं ताट भरलं....आजी त्या ताटाकडे बघत राहिल्या...आई काय राहिलं का, रोहीणींनं विचारल्यावर म्हणाल्या, ताकाची आंबिल तेवढी राहिली...
आधी नाही सांगितलंत, केली असती
की...रोहीणी बोलत असतांनाच आजींनं तिला मध्येच आडवलं...जाऊदे ग...तेवढी राहीली
म्हणून काही होत नाही...तू एवढं हौशीनं केलंस तेच खूप झालं...इथे काय कामाचा रगडा
कमी आहे, ते सांभाळून तू काय करतेस ते इथे राहून समजलं बाई...आम्हाला वाटायचं
सूनबाईला काही कामच नाहीत...पण तुझा व्याप खूप आहे,ते आत्ता कळलं बघ...त्यात आमच्या
दवाखान्याची धावपळपण केलीस...या सर्वांत हे जमवलंस ते कमी नाही...
आजींचा आवाज थोडा जड झाला. त्यांनी पदर डोळ्याला लावला...पण लगेच सावरत
पाण्याचा ग्लास मागितला...भरलेल्या ताटातील एक ताट उचललं आणि देवासमोर ठेवलं. देवासमोर त्या बसल्या. रोहीणीच्या लेकींना आणि आम्हालाही त्यांनी
यायला सांगितले...देवाला ताट दाखवतांना गावी गेलो नाही म्हणून माफी मागितली...आणि
इथे केलं ते स्विकारण्याची विनंती केली...या लेकी आल्यात त्यांना आणि त्यांच्या
कुटुंबांलाही आरोग्य, सुख संपत्ती लाभावी म्हणून प्रार्थना केली. त्या ताटातील प्रत्येक पदार्थ इतर सर्व ताटात
ठेवला.
फार बडबड नाही, गोंधळ नाही...तरीही सर्व
नेटकं चालू होतं...आम्ही जेवायला बसलो.
आजोबा समोर होते...आजींनी त्यांना आम्ही कायकाय केलं ते
सांगितलं...आजोबांनी मान डोलावली...छान...पोरींनो, पुढच्या वेळी तुमच्या
पोराबाळांसह गावाला या...आठवड्याची सुट्टीच घ्या...जरा मोगळ्या व्हा...आराम
करा...आमचा मळा मोठा आहे चांगला...
जेवणाचा बेत फर्मास होता...आजींनी मध्ये
मध्ये आम्हाला वेळा आमवस्येचं महत्त्व सांगितलं होतं...ताटात काय वाढलंय त्याचं या
ऋतूमधलं महत्त्व काय ते सांगत होत्या. आत्तापर्यंत
त्यांच्यापासून आम्ही चार हात ठेऊन होतो...पण आत्ता त्यांनी आमच्या सर्वांच्याच
मनात एक वेगळा आदार निर्माण केला.
आत्तापर्यंत त्यांचा स्वभाव जाणण्याची वेळ कधी आलीच नव्हती. आपल्या शेतावर, गावावर, संस्कृतीवर प्रेम
करणारी ती एक साधी भोळी बाई होती...
निघतांना आम्ही सर्वांनी त्या दोघांना
नमस्कार केला...आजींनी आम्हा सर्वजणींच्या चेह-यावर हात फिरवून आशीर्वाद
दिला...अशाच मिळून रहा ग...म्हणत हातात गुळपोळी आणि पुरणपोळीचे डबे दिले. एरवी आम्हा मैत्रिणींचा कल्लाच फार असतो...पण
रोहीणीच्या घरातून बाहेर पडतांना वेगळ्याच
धुंदीत होतो....आजी आजोबांबाबत असलेल्या भीतीची जागा आता आदरानं घेतली
होती. आजी ग्रेट आहेत....पुढच्या वेळी
नक्की त्यांच्या गावी जाऊन त्यांना सरप्राईज देऊयात म्हणून एकमेकींचा निरोप
घेतला...समाधान होतं की आज एका नवीन परंपरेची माहिती मिळाली....आणि शेवटी माणूस
कसाहा असो...त्याच्याबरोबर बोलल्याशिवाय मत करायचं नाही...हा एक धडाच मिळाला ना...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप मस्त लिखाण
ReplyDeleteसंपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला
आता खरच शेतवरच जेवण फार दुर्मिळ गोष्ट झाली आहे. तोअनुभव घेणे फार आनंददायी आहे.
ReplyDeleteEkdam mast
Deleteधन्यवाद...
Deleteप्रसंग डोळ्यांसमोर उभा करण्यात यशस्वी झाली आहेस!! खूप छान लेख... नव्हे कथा!!
ReplyDeleteधन्यवाद मॅडम, तुमचे मार्गदर्शन खूप मोठे आहे.
Deleteअतिशय सुंदर प्रसंगोचित लेख लिहिला आहे . गावाकडची संस्कृती जवळून समजून घेता आली म्हणून खास धन्यवाद देते.... सौ. मृदुला राजे
ReplyDeleteखूप धन्यवाद....गावाकडे खूप चालीरिती जपल्या जातात....त्या का जपल्या जातात, याची माहिती नक्कीच घेतली पाहिजे...
Deleteखूप छान.
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद...
Delete