तिळा तिळा दार उघड....
सतत दोन आठवडे कार्यक्रमात व्यस्त राहीलं की काय होतं....साधं...सोप्पं उत्तर...खाऊचे डबे रिकामे होतात...मुलांना अशाच वेळी नको तेवढी भूक लागते...मुद्दाम डब्याचा आवाज करुन...काहीच नाही का खाऊ...हे वाक्य ते एवढ्या इमोशनली म्हणतात की, अन्य सर्व कामांना बाजुला ठेऊन आई खाऊ एके खाऊ..असा ठेका धरते...आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे सोमवारी आमच्या घरात ही अशीच परिस्थिती होती. दोन आठवडे कुटुंबातल्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमासाठी मी बाहेर होते. त्या दरम्यान लेकानं सर्व डबे खाली केले. आता ते डबे भरण्याची मला तयारी करावी लागली. आणि माझी तयारी पाहून, आता काहीतरी वेगळं कर...हा नेहमीचा डायलॉगही आला. काय वेगळं करणार...चकल्या, भाकरवडी, गोडाच्या शंकरपाळ्या नुकत्याच संपलेल्या....आता हे पदार्थ सोडून दुसरं काय करता येईल म्हणून
मी घरातील किराणा सामानावर नजर फिरवली. एक किलो तिळाची पिशवी नजरेसमोर आली. चला, म्हणत ती तिळाची पिशवी फोडली, आणि त्यांना नेहमीच्या डब्यात स्थानापन्न केलं...एकूण आज सर्व तिळाचे पदार्थ करुया म्हणून मनात लिस्ट तयार केली, आणि त्यासाठी इतर सामान काढायला लागले....तांदळाचे तिळ घातलेले चिकलेटस...तिळाचा हलवा...गजक आणि दशम चटणी...मेनू ठरला तसं त्याला लागणा-या सामानांनी ओटा भरला...मोबाईलमध्ये सनम पुरीची गाणी लावली आणि मी सुरु झाले...
बिस्कीट वजा अन्य खाऊ आमच्याकडे फारसा आणला गेला नाही. लेकानंही बिस्कीटांना कधी आपलं केलं नाही. लाडू, चकल्या, शंकरपाळ्या, शेव या सर्वांवरच जोर असतो...आता हेच प्रकार नेहमी झाले तर नकोसे वाटतील...त्यामुळे या सर्वांचे किमान दहा ते बारा प्रकार होतात...दरवेळी पदार्थ
तोच पण चव वेगळी...पण आज या सर्वांना विराम देऊन तिळाचा वापर असलेल्या पदार्थांना सुरुवात केली. थंडीही ब-यापैकी पडलेली....त्यामुळे तिळ आणि गुळ हे कॉम्बिनेशन पहिले हवेच. सुरुवात झाली ती चिकलेटस पासून...वाटीभर तांदळाचे आणि वाटीभर चण्याचे पिठ...त्यात दोन चमचे तिळ आणि चवीनुसार ओवा...तिखट...मिठ...या सर्वांवर चमचाभर तेल टाकलेल्या वाटीभर कडकडीत गरम पाण्याची फोडणी...थोडं थंड झाल्यावर हे मिश्रण चांगले मळायचे....पुन्हा पाच मिनिटं त्याला विश्रांती द्यायची...एवढ्या वेळात ते थोडं सैलावतं...मग चपातीला करतो तसे गोळे करायचे आणि तांदळाच्या पिठावर लाटायचे...ओवा आणि तिळ बाहेर येणार नाहीत इतपत जाड चपाती झाली की वरुन काट्यानी टोचून घ्यायचे आणि हव्या त्या आकारात ही चपाती कापायची...कधी शंकरपाळी, तर कधी मोठ्या पट्ट्या कापून त्याला पिळ देऊन हे सर्व गरम तेलात तळून घ्यायचं...या दोन वाटी पिठात एक मोठा डबा भरेल एवढ्या कुरकुरीत चिकलेट होतात...थंड झाल्यावर वरुन चाट मसाला आणि तिखट टाकलं तर आणखी चटपटीत होतात...मी हे चिकलेट थंड करण्यासाठी परातीमध्ये काढून ठेवले आणि तिळाचा हलवा करायला घेतला...तसं बघितलं तर एकदम सोप्पा पदार्थ...तिळ, शेंगदाणे, सुकं खोबरं, गुळ, तूप आणि जायफळ...पहिल्यांदा तिळ, शेंगदाणे आणि बारीक सुकं खोबरं खरपूस भाजायचे...अर्थात वेगवेगळे, आणि थंड झाल्यावर तसेच वेगवेगळे बारीकही करायचे...पण मिक्सर चालवतांना तो एकदम फुर्र............कन चालवायचा नाही...तर आरामसे मिक्सर चालवायचा...हे सर्व बारीक केलेले मिश्रण बाजूला ठेऊन मोठ्या कढईत तुप आणि गुळ गरम करायला घ्यायचे....साधारण पातळ होत आले की सर्व मिश्रण त्यात टाकायचे वरुन आणखी एक चमचा तूप
टाकायचे...दोन मिनीटं परतल्यावर...हवी तेवढी जायफळ पूड...सर्व लगेच मिक्स होत नाही...थोडं थंड झाल्यावर सगळं मिश्रण सरळ मिक्सरच्या भांड्यात घालायचं...आत्ता ते फुर्र..........चालतं....तसं केलं की अगदी पातळ अशी पेस्टच तयार होते...तोच तिळाचा हलवा...हे सर्व मिश्रण तुप लावलेल्या ताटात काढायचे...सेट व्हायला चांगले दोन-तीन तास लागतात...तोपर्यंत त्याकडे बघायचंही नाही...मऊसर वड्या पडतील एवढं सेट होतं...आरामात या वड्या कापून पसरट डब्यात मांडून ठेवायच्या...नंतर केव्हाही डबा उघडला की पहिला दरवळ येतो तो जायफळाचा....
यानंतर नंबर लागला तो गजकचा....दरवर्षी होणा-या इंदौर ट्रीपमधून थेट हलवायाच्या दुकानात बसून शिकता आलेला गजक म्हणजे, एकदा डबा फोडला की तो खाली होईपर्यंत सतत खावासा वाटणारा पदार्थ...आमची इंदौरलाच गजकबरोबर ओळख झाली. तिथे खाऊ गल्लीत या थंडीच्या दिवसात अनेक प्रकारच्या गजकनं भरलेल्या गाड्या उभ्या असतात. लस्सी, पनीर आणि खवा मिळणा-या एका दुकानात आम्ही लस्सी पिण्यासाठी गेलो होतो...तिथे तिळ आणि गुळाच्या गजकच्या वड्या लावून ठेवलेल्या...आम्हाला दुकानदारांनी लस्सीसोबत आग्रहानं एक डीश भरुन गजक दिले. पहिल्यांदा लस्सीसोबत हे गोड कोण खातं म्हणत नाराजीनं एक वडी तोंडात टाकली...अर्थात दुकानातून बाहेर पडतांना गजकचे चांगले दहा बॉक्स घेतले होते. इथेच गजक बनवण्याचा लाईव्ह डेमो चालू होता. मी त्या हलवायासमोरच जाऊन उभी राहिले. गुळाचा पाक चालू होता...त्यातले काही थेंब त्यांनी पाण्यात टाकले. लगेच ते पाण्यातले गुळाचे थेंब कडक झाले आहेत का ते चेक केलं. त्याचा वाटीत आवाज काढून दाखवला. या कडक झालेल्या पाकात त्यांनी मोठं वाटीभर तूप टाकलं आणि भाजलेले तिळ टाकले. वरुन एक चमचा बेकींग पावडरही गेली...हे सगळं चिक्कीचं मिश्रण चांगलं मिक्श करुन मग मोठ्या ट्रेमध्ये काढलं...तेवढ्याच मोठ्या लाटण्यानं त्यावर लाटून ते सारखं केलं...आम्ही लस्सी घेईपर्यंत मिश्रण थंड झालं. त्याचे तुकडे करुन त्यांनी एका मोठ्या मिक्सरमध्ये टाकले...हळूवार मिक्सर फिरवत शेवटच्या फे-यात चांगली वाटीभर वेलचीपूड टाकली. रवाळ वाटलेलं ही तिळाची चिक्की पुन्हा त्या ट्रेमध्ये आली...आत्ता पहिल्यापेक्षा अर्ध्या
जागेत ती मावली...वरुन एक लाकडी मोठा खलबत्ता त्यावर मारुन ही रवाळ पावडर घट्ट बसवण्यात आली. मग त्याच्या सफाईदारपणे वड्या पाडण्यात आल्या...त्यावर पिस्त्याच्या कापा आणि पुन्हा एकदा वेलचीची पूड पेरण्यात आली होती. हाच फ्रेश गजक आम्ही खाऊन त्याचे सोबत बॉक्सही घेतले होते...साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी इंदौरला बघितलेली ही गजकची रेसिपी मी अगदी कॉपी करते....फरक फक्त प्रमाणात आणि वेलची पूडमध्ये. हलवायाच्या दुकानाएवढं नाही तर साधारण अर्धा किलो तिळ आणि तेवढाच गुळ मी घेते..वेलची ऐवजी भरपूर जायफळ....बस्स एवढाच फरक...तसंच अगदी मोजल्यासारखं गजकचे तिळ भाजले आणि पुढच्या कामाला लागले. या गजकच्या वड्या खुसखुशीत असल्या तरी भलत्या नाजूक...त्या ठेवण्यासाठी शक्यतो पसरट डबेच चांगले पडतात...गजक झाल्यावर या डब्यांची शोधाशोध केली, आणि गजकला डब्याआड केलं.
आत्ता एकच डबा खाली दिसत होता, तो म्हणजे चटणीचा डबा...शेंगदाणे, लसूण, तिळ, सुकं खोबरं, काळीमिरी, सुक्या लाल मिरच्या, जवस, मिठ आणि किंचीत हळद या दहा जिन्नसांची चटणी म्हणजे दशम चटणी. रोज रात्री भाकरीसोबत भाजी कुठलीही असली तरी ताटात थोडी तरी ही चटणी लागतेच...तिचाही डबा खाली झालेला...त्यामुळे हे सर्व पदार्थ एकीकडे एक-एक भाजून घेतलेले...मिक्सरच्या आणखी एका भांड्यात सर्व एकत्र केलं आणि एक-दोन-तीन च्या टप्प्यात वाटलं...मिरचीचा ठसका बसला आणि चटणीच्या चवीचा अंदाज आला...डबा भरला...एवढं सगळं झाल्यावर जेवल्यानंतर खायचे तिळ, जवस, ओव्याचे मिश्रणही संपल्याचे दिसले....हाताबरोबर तेही भाजून झाले...सगळे डबे भरुन झाले....चिकलेटस आणि तिळाचा हलव्याच्या वड्यांवर
लेकानं हात मारायला सुरुवात केली होती...
चला आता एका आठवड्यांचा तरी प्रश्न सुटला. तिळाचा या आठवड्यात सढळ हातानं वापर झाला...सर्व
भरलेले डबे आपापल्या जागांवर गेले आणि त्यांना संपवणारेही...इथे सनम पुरीची गाणीही
संपत आली...आता या एवढ्या पाकसिद्धीनंतर थकवा काढण्यासाठी एकच मार्ग....कडक
कॉफी...तसाच कॉफीचा मग हातात घेतला...बाहेर लेक त्याच्या नव्यानंच झालेल्या
दिल्लीच्या मित्राबरोबर गजकबाबत बोलत होता...मेरी मॉं ने बनाया है...वो कुछ भी कर
सकती है...हे वाक्य कडक कॉफीपेक्षा भारी होतं...कॉफीचा घोट घेण्याआधीच सगळा थकवा
कुठल्या कुठे गायब झाला...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
किती छान! तुझा लेक म्हणतो तसं" तू कुछभी कर सकती है। खरीखुरी सुगरण आहेस तू!! वाचताना त्या पदार्थांचा सुगंध दरवळत होता.
ReplyDeleteकिती छान लिहिले आहे सई तुम्ही !
ReplyDeleteत्या पाककृती वाचतानाच खमंग वास येऊ लागले आणि तोंडाला पाणी सुटले! गजक तर अप्रतिम !
कुलकर्णी शुभदा
ReplyDeleteKhoop chhan ...keep it up
ReplyDeleteखूपच छान लेख....अणि ....सर्वे रेसीपी साठी ... खूप खूप धन्यवाद.......
ReplyDelete