सुवासिनी.....
ताई...मी सुवासिनी आहे का माहित नाही...पण गेल्या पंचवीस वर्षात हळदी कुंकवात वाण म्हणून देणारी पहिली तूच...नव-यानं सोडलंय...पण आमचा कोर्टात काडीमोड झाला नाय...त्यानं दुसरं लग्न केलंय...पण मी तशीच आहे. मंगळसूत्र घातले...पण नवरा नाय...ज्यांना हे माहित आहे, त्या बायका हळदीकुंकवाला बोलवत नाहीत...आता माझा काय दोष...नव-यानं मला सोडलंय...मी थोडी त्याला सोडलंय... मी सुवासिनी आहे का नाय....हे पण मला माहित नाय बघ...पण तू ही साडी वाण म्हणून दिलीस, बरं वाटलं बघ...मागची सगळी कसर भरुन काढलीस...आत्ता तू कधी येणार...तेव्हा घालून येते...आणि तुझ्याकडे काही कार्यक्रम असला की बोलव...तुला परतफेड करेन मी साडीची...हातात भाजीची पिशवी...आणि मनात झालेल्या विचारांची गर्दी सांभाळत मी त्या बाईचा निरोप घेतला. दरवर्षी संक्रांतीची वाण म्हणून आसपास वावरणा-या पण आपलं लक्ष जाणार नाही अशा महिलांना साडी देते. गेल्यावेळी आमच्या भागतल्या सफाई कर्मचारी झाल्या...यावर्षी या भाजीवालीचा नंबर लागला. आठवड्याच्या पहिल्या किंवा दुस-या दिवशी तिच्याकडे भाजीसाठी जाते...तेव्हाची ओळख...नाव आत्तापर्यंत माहित नव्हतं...ती भाजी देऊ लागली तेव्हा, थांब तुला हळदीकुंकू लावतेय...साडी आणलीय तुझ्यासाठी संक्रातीची म्हणत, कुंकू लावत तिचं नाव विचारलं...मंजू...हातात साडी, गजरा आणि तिळगुळाचा डबा ठेवला...तिला नमस्कार केला...आणि तिच्या हातात परत खाली झालेली साडीची पिशवी ठेवली...आवडली का, यात ठेव आत्ता मला भाजी दे..म्हणत मी भाज्यांमध्ये गुंतले...ती त्या साडीतच होती...पहिली साडी डोक्याला लावली आणि मग वरची सगळी बोलणं झालं...
पुढचा अर्धा तास तिच बोलत होती...बोलता बोलता हातही चालत होता. माझ्यामागून अजून तिन चार महिला आल्या...भाजी घेऊन गेल्या...त्यांच्या भाज्या आणि त्याचा हिशोब एकीकडे ठेवत, ती माझ्याशी बोलत होती. खाडीपलीकडे असलेल्या गावात ती रहाते. दोन भाऊ..दोन बहिणी...वडील कुठल्याश्या शेठकडे कामाला...आई शेतीची काम करायची...वडीलांनी दोन्ही मुलींची लग्न अगदी एकोणीस, वीसाव्या वर्षी करुन दिली. मोठी बहिण त्यामानानं सुखी निघाली. तिचा नवरा कंपनीत काम करणारा. चाळीत त्यांची खोली होती. त्यांचा संसार सुरु झाला. एक वर्षांनी मंजूचं लग्न झालं. तिचा नवराही असाच कंपनीमध्ये वेल्डींगचं काम करणारा...त्याचाही चाळीत खोली...बहिणीसारखा आपला पण संसार सुरु होणार म्हणून आनंदात असलेल्या मंजूला पहिल्याच आठवड्यात समजलं, नव-याचं पहिलं प्रेम दारुवर होतं...पहिल्या महिन्यात मंजूनं खूप भांडणं केली...मार खाल्ला...दोन्ही कडून पुन्हा जाणती माणसं बसली...एवढा आकांडतांडव कशाला करते...पुरुष दारु पिणारच...संसाराची जबाबदारी पडू दे म्हणजे सुटेल दारु म्हणून मंजूची समजूत काढली...इकडे नवरा तू भांडकुदळच आहेस म्हणून अधिक ओरडायला लागला...मारही वाढला...सहा महिन्यातच ती आईकडे परत गेली...आई वडीलांनी समजूत काढायचा प्रयत्न केला...पण मंजू तयार झाली नाही...नवराही परत न्यायला आला नाही...एकूण मंजूवर फटकळ...भांडकुदळ...कटकटी..असे सर्व शिक्के मारण्यात आले.
हे सगळं ठिक होतं...पण आई गेली...वडीलांनी दोन्हीही भावांची लग्न एकाच मांडवात केली. धाकटा, त्याच्या बायकोला घेऊन दुस-या शहरात गेला. मोठी वहीनी आणि मंजूची वादावादी व्हायला लागली. आधीच तिच्यावर भांडकुदळ असा शिक्का...त्यामुळे मंजू एकटी पडली...मग दिवसभर शेतात राहू लागली. आजूबाजूच्या बायका भाज्या विकायला शहरात यायच्या...त्यांच्यासोबत मंजूपण यायला लागली. सकाळी सहाला घर सोडायचं...सोबतीनं भाकरी
भाजीचा डबा...पाण्याची बाटली...छत्री...हा ऐवज...भाज्यांची टोपली घेऊन एकदा यायल्या लागल्यावर मंजूला इथं आवडायला लागलं...कोणची कटकट नाही. दिवसभर भाजी संपवायची...आणि चार किंवा पाचच्या बोटीनं पुन्हा घराकडे परत...कधी लवकर गेलं तर शेतात जायचं...रात्री थोडी वहिनीला मदत आणि पहाटे भाज्यांच्या मळ्यात...रविवार सुद्धा मंजूला भाजीला येत होती...फक्त पावसाळ्यात खंड पडायचा...तेव्हा शेतात दिवस घालवायची...याच भाज्यांच्या जिवावर भावाच्या संसाराला मदत केली. वहिनी पहिली रागराग करायची...पण आता ती पण निट बोलते...वर्षातून तिला सणाला साडी देते...मंजूपण देते...मला हातांनी दाखवलं...मागे दोन साड्यांची दुकानं होती...तिथे महिन्याचे शंभर रुपये भीशीचे ती भरत होती...भीशी पूर्ण झाली की वहिनी, बहिण, किंवा नात्यातल्या कुणाला साडी घेऊन देते...
कोराना आला तेव्हा मंजू थोडी घाबरली...पहिल्या वर्षात तर भाजी पण
विकता आली नाही...मग लावलेल्या भाजीचं करायचं काय हा प्रश्न पडला होता...कोणीतरी
गावातून एकगठ्ठा भाजी खरेदी करुन शहरात विकायला नेत होते...त्यात थोडेफार बरे पैसे
मिळाले...पण मंजू भाजी पैश्यापेक्षा आपलं डोकं शांत ठेवायला विकते...त्यामुळे
कोरोना काळातही ती कधी घरी बसली नाही. हे
सांगतांना तिनं दोन वेळा तरी डोक्यावर हात मारुन घेतला...आपल्या फसलेल्या
लग्नाच्या नकोशा आठवणी आजही त्यात आहेत. नवरा
पहिल्या काही वर्षात दिसायचा...एकदा काहीतरी वावगं बोलला...तेव्हा मंजूनं
त्याच्यावर चप्पल फेकून मारली...तेव्हापासून त्यानं तोंड दाखवलं नाही...त्याच्या
दुस-या लग्नाची बातमी मिळाली...तेव्हा वाईट वाटलं...पण मंजूनं मंगळसूत्र काढलं
नाही...मला आईनं दिलंय...तिची खूण आहे, म्हणून गळ्यात ठेवलंय...मंजूच्या फसलेल्या
लग्नाच्या आठवणी ती मला सांगत होती...एरवी सगळं ठिक चालू होतं...पण सुवासिनी आहे
की नाही हाच प्रश्न ती स्वतःला विचारत होती.....मी साडी दिल्यावर हे दुःख वर
आलं...हे सगळं सांगतांना डोळ्यातून पाणी नाही की रडवेला स्वर नाही...हे सगळं असं
आहे, मी का त्याचा मार खायचा, म्हणून निघून आले...आपलं काय बिघडलंय...हा असा संसार
चालू आहे...आपल्या नशीबात हेच होत...देवाला कशाला दोष द्यायचा...तुझ्यासारखी
चांगली चार माणसं ओळखतात...अजून काय हवं...कपाळावर मोठं कुंकू...हातात हिरव्या
बांगड्या....साधीशी साडी कंबरेला खोडून बारीकशी मंजू माझ्याशी बोलतांनी एकीकडे
भाजी घ्यायला आलेल्यांबरोबरही हिशोबाचं बोलत होती...त्यापैकीही ब-याचश्या महिला
तिच्याकडे नेहमी येणा-या...दोघी माझ्यासोबत उभ्या राहिल्या...हिम्मतीची आहेस
हो...म्हणत तिला शाबासकी देऊन गेल्या...
मी सुद्धा आवरतं घेतलं...भाजी घेतली...नको म्हणत असतांनाही तिनं एक कोथिंबीरीची जुडी टाकली...हिशोब झाला...पैसे देऊन मी निघणार, एवढ्यात मंजू म्हणाला, तूझ्याकडे पूजाबिजा असेल तेव्हा सांग....मी येते तुला साडी घेऊन...यंदाची भीशी झाली की तुला देते साडी...मी हो म्हणत तीला निरोप दिला...मनात अनेक विचार होते...तिच्या लग्नाची गोष्ट मला माहित नव्हती...अर्थात महिती असली तरी मी एक महिला म्हणून तिला वाण दिलेच असते....तिच्या या सर्व कहाणी बरोबर एक वाक्य मात्र मनात येत होतं...तूला मी साडी घेईन...आपलं हे असंच आहे. कोणी दिलं तर त्यालापण तसंच देते...वास्तविक मंजूनं काय दिलं आणि तिला काय मिळालंय हा प्रश्नच आहे. दिवसभर एक कोप-यात भाजी मांडायची...हे वाटतं तेवढंही सोप्प नाही...कधी पालीकेवाले उठवायला येतात...कधी रस्त्याची कामं निघतात...नैसर्गिक विधी करण्यासाठी आजूबाजूच्या एखाद्या सोसायटीत हातपाय पडून, वॉचमनच्या हातावर भाजीची एखादी जुडी ठेवत जायचं...पाऊस आला तर सर्व उचलून दुकानाच्या आडोश्याला जायचं...उन्हाचे चटके बसायला लागले की छत्रीचा आधार घ्यायचा...आणि मिळेल ते पाणी पिऊन तहान भागवायची....
यापेक्षाही अडचणी तिला नक्की येत असणार...पण या सर्व ठिक वाटत
असणार...कारण लग्न मोडून आल्यावर समाजांनी जे बोल तिला लावले, त्यापेक्षा हे सर्व
तिला खरचं चांगलं वाटत होतं. कोणाची कटकट
नाही की बोलाचाली नाही...भाजी आवडली...तर घ्या...एकदोन रुपये कमी करा...फार नाय...
दुपारी तीन वाजता लेकाचे काही पेपर घ्यायला गाडीवरुन बाहेर
पडले...पुन्हा तोच मंजूचा कोपरा...ती भाजी घेऊन बसते त्याच्या पुढच्याच दुकानात
झेरॉक्सची सोय होती. घरातून निघतांना
त्याला वॉटसअप केलं...आणि प्रिंटआऊट काढयला सांगून गाडी काढली...दुपारी काही
दुकानं बंद होती. भाज्यांच्या टोपल्या
आवरुन मंजू आणि तिच्याबरोबर असलेल्या अन्य महिला बंद दुकांनाच्या आडोशाला शांतपणे
झोपल्या होत्या...मी प्रिंटआऊट घेऊन परत फिरले तेव्हा, त्यांचा आराम होत आला होता...चहावाला
तिथे फिरत होता...मंजू या सर्वातच आनंदी होती...की अजूनही तिच्या मनात आपल्या न
झालेल्या कुटुंबाच्या दुःखाची खपली आहे...हे तिच जाणे...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup mast lekh ahe
ReplyDeleteApan कोणाच्या जवळ गेल्याशिवाय त्याचे दुःख आपल्याला समजत नाही
आणि लिहिल्यामुळे आयुष्यातील अनुभवांची पोतडी भरते
आपल्याबरोबर इतरांनाही ती वाटली जाते मी हा लेख पुढे पाठवते आहे
धन्यवाद...
DeleteYes , many such Manjus are amongst us. Standing firm and erect.
ReplyDeleteJayshree Karve
yesss Madam....Thanks...
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteनात्यात किंवा शेजारी नसलेल्या महिलांना वाण देण्याची कल्पना खूपच छान, सोबत मंजूच दुःखही कळले, त्यातून ही आनंद मिळवण्याची तिची धडपड कळते
ReplyDelete