वाईनच्या नावानं…..
वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के असतं?????बाबा, तुम्हाला माहीत आहे का?????लेकानं त्याच्या वडीलांना एकापोठोपाठ एक प्रश्न विचारले आणि आमच्या दोघांच्याही डोळ्यांचे एकाच वेळी बटाट्याएवढे आकार झाले...पण त्याचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खिळले होते. गुगलबाबावर काहीतरी शोधाशोध चालू होती...आम्ही दोघंही शांतपणे त्याच्या हालचाली बघत होतो...आणि तो आमच्या मोठ्या डोळ्यांकडे न बघता...आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरुन नजर न हटवता त्याचं काम करत होता...तो पुन्हा आपल्या जागेवर बसला...आणि आम्ही दोघंही एकमद स्टील पोझला...सकाळपासून बातम्यांमध्ये वाईन म्हणजे दारू नाही...किराणा मालाच्या दुकानात आता वाईन मिळणार....आदी बातम्यांचा भडीमार चालू होता...सकाळी नाष्ट्याच्या वेळी अगदी मोजक्याच वेळ बातम्या बघितल्या...त्यातला रंग बघून नव-यानं शेअर बाजाराचे चॅनेल लावले. पण हीच वाईन थोड्याचवेळात आमच्या संवादात आली. लेकाची शोधक वृत्ती एका वाक्यानं जागी झाली होती, वाईन म्हणजे दारु नाही...मग वाईन म्हणजे काय....अक्लोहोलचे प्रमाण किती असेल तर वाईनला दारु म्हणता येईल...आदी प्रश्न त्याला पडले, आणि त्याची शोधक वृत्ती जागी झाली. थोडावेळ त्याबाबत काही तरी वाचलं...मी फक्त डोळ्यांनी विचारलं...तर म्हणाला नंतर जेवणावर सांगतो...आता प्रोजेक्ट पूर्ण करतो...तो नेहमीप्रमाणे त्याच्या अभ्यासात गुंतून गेला. पण काही क्षणापूर्वी झालेल्या संवादानं आम्ही दोघंही हसावं की चिंता करावी या संभ्रमात पडलो.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री होणार ही बातमी सर्व न्यूज चॅनलवर पसरली होती. या निर्णयावर साधक-बाधक चर्चा चालू होती. त्यांना तिथेच विराम देत आम्ही दैनंदिन व्यवहार सुरु केले. तो विषय तिथेच संपला असं गृहित धरलं होतं, पण लेकाच्या प्रश्नानं तो अंदाज चुकला. त्यांनी नेमकं त्यातला शोधक मुद्दा पकडला आणि त्याला हवी ती माहिती शोधून काढली. आम्ही दोघंही त्याच्या सर्व हालचाली बघत होतो. अगदी पाच ते दहा मिनिटं तो त्या वाईनमधील अक्लोहोलचे प्रमाण जास्त की दारुमध्ये जास्त याबाबत माहिती शोधत होता. ती वाचल्यावर पुन्हा आपल्या अभ्यासाकडे वळला, आम्ही दोघं मात्र या सर्व प्रकारानं फ्रीज झालो होतो. हसावं की ओरडावं या संभ्रमात पडलो होतो...त्याचं लेक्चर चालू होतं त्यामुळे कानाला हेडफोन लावले होते. त्याचा फायदा घेऊन मी नव-याला विचारलं, हा प्रश्न तू बाबांना विचारला असतास तर...तो हसला...तर...कानाखाली...पाठीवर...कुठे जागा मिळेल तिथे दणके बसले असते...अर्थात आमच्या घरीही अशीच परिस्थिती होती. मुळात वडीलांना असा प्रश्न विचारायची हिम्मतच नव्हती...नशीबानं त्या काळात अशा विषयांची चर्चाही व्हायची नाही, हेही तेवढंच खरं.
दिवसभर सोशल मिडीयावर दारू
म्हणजे वाईन नव्हे...वाईन म्हणजे दारु नव्हे...या दोन मोठ्या संशोधनावर आलटून
पालटून चर्चा, आणि विनोदाचं पिक आलं होतं.
खरतरं माझंही ज्ञान त्याबाबतीत खूप कमी
असल्याची जाणीव झाली. स्टेशनला गेल्यावर
वाईन शॉप अशी ठळक पाटी असलेलं मोठं दुकान आहे. स्टेशनला गेल्यावर ते दुकान आलं की फुटपाथवरुन
खाली उतरायचं आणि तेवढं अंतर रस्त्यावरुन चालून पार करायचं. कारण तिथली गर्दी...गेली अनेक वर्षाचं हे सर्व
अंगवळणी पडलेलं. त्यामुळे आत्तापर्यंत मी वाईन शॉप म्हणजे दारु मिळते ते दुकान...असाच अर्थ
समजत होते...पण आता दारु म्हणजे वाईन नव्हे हा शोध कोणीतरी लावला...म्हणजे वाईन
शॉप, दारुची दुकानं नाहीत असाच अर्थ झाला की सरळसरळ...मराठीत दारु म्हणतात आणि त्याच
शब्दाला इंग्रजीमध्ये वाईन म्हणतात, अशीच माझी समजूत होती. बरं आपल्या पंथातला शब्द नसल्यामुळे त्याबाबत
चूक की बरोबर असा कधी शोधही घेतला नाही.
यासर्वांतून एक किस्सा आठवला, आम्ही एकदा एका परिचितांकडे जेवायला
गेलो होतो. मोठा हौशी माणूस....त्यांच्याकडे एक मोठी वेगळी शेल्फ आहे...आणि त्यात वेगवेगळ्या बाटल्या....त्यातच एक रेड वाईनची बाटली होती...कोणीतरी परदेशातून भेट म्हणून दिली होती...त्यांनी मोठी ट्रॉफी असावी अशा थाटात ती बाटली दाखवली....किंमत माहित आहे का, हा प्रश्न विचारला....आम्ही नाही म्हटल्यावर त्यांनी किंमत सांगितली...मी काही बोलले नाही...फक्त तोंडाचा आ केला....तो आ अगदी खूप वेळ राहिला...एक तर त्या रेड वाईनची किंमत आणि त्यांचा त्या वाईनबाबत जो अभ्यास होता, तो सर्व आमच्यासमोर व्यक्त केला. प्रथम बाटलीवरील तारीख दाखवली...ती दहा वर्षापूर्वीची होती...म्हणजे खूप चांगली...जेवढी जुनी तेवढी महाग...मग त्याचे फायदे...किंमतीचे चोचले...असं चालू होतं...हे सर्व काही आपल्या पथ्यातलं नव्हतं...पण तरीही मला त्या बाटलीचे आकर्षण वाटलं...वाईनचे नाही....कारण ती बाटली खूप सुंदर होती....त्या गृहस्थांचे वाईन पुराण झाल्यावर मी सहज विचारले...ही बाटली खाली कधी होणार...पुन्हा त्यांचे प्रौढी शब्दातले व्याख्यान...महाग आहे...कोणी खास आलं तरच काढतो...पण का हो...मी म्हटलं...कधीही घ्या...पण लवकर संपवा...आणि संपल्यावर ही बाटली फेकून देऊ नका...मला हवी आहे...त्यात ते पाण्यात टाकल्यावर फुगतात ते गोळे ठेवायचे आहेत...खूप सुंदर दिसतील...त्या गृहस्थांचा चेहरा अचानक आक्रमक झाला...ती बाटली कदाचीत माझ्या डोक्यावरही त्यांनी मारली असती...पण माझ्या डोक्यापेक्षाही बहुधा त्या वाईनची किंमत जास्त वाटली त्यांना....त्यामुळे मी वाचले...पण घरी परत येतांना नव-यानं ती कसर पूर्ण केली...कुठे न्यायची सोय नाही...जरा शांत बसली असतीस तर काय झालं असतं...हे बोलून मला हैराण केलं होतं....असो...माझं वाईनबाबतचं ज्ञान इथपर्यंतच...
काही
वर्षापूर्वी परदेशात रिहॅबिटेशनसेंटर मध्ये काम करणा-या व्यक्तींबरोबर एका
प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.
तेव्हा त्यांनी परदेशात असलेल्या या संकल्पनेबद्दल माहिती दिली. या सेंटरमध्ये नशेच्या आहारी गेलेली अगदी सोळा सतरा वर्षाची मुलंही येतात. तर त्यांच्याऐवढी मुलं असणारेही असतात. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्यावर
उपचार होतात. ठराविक कालावधीनंतर ही मंडळी
पुन्हा आपल्या कुटुंबात परततात...ब-याचवेळा ही अशी ये-जा चालू असते. पण या सर्वात एक लक्षणीय गोष्ट त्यांनी
सांगितली की हा त्या समाजाचा एक भागच झालाय....ही नशा ही कितीतरी प्रकारची
असते. ड्रग्ज, दारु, सिगरेट...अशा कितीतरी
प्रकारात याची विभागणी होते...पण यामुळे समाजात त्यांना विशिष्ट प्रकारचं लेबल लावलं जात नाही. की हिणवलं जात नाही. समाज जाणकार आहे, किंवा ज्याचं तो बघेल, या विचाराचा आहे. आपल्याकडे अशी परिस्थिती आहेका...हा एक मोठा अभ्यासाचा विषय...पण या सर्वाची उजळणी
माझ्या मनात होऊ लागली, ती वाईन सुपर मार्केटमध्ये मिळणार या निर्णयामुळे. त्यात वाईन ही दारु नसते या सर्वज्ञानाची भर पडली.
काय हे विषय....आणि कुठल्या या चर्चा... कोरोनानं घरी बसवलेल्या मुलांच्या ज्ञानात नको
त्या माहितीची भर पडत होती.
आमच्याकडेही तिच परिस्थिती. जेवतांना टिव्ही....मोबाईल नाही...हा नियम...गप्पा मारत जेवण जेवायचे...त्यादिवशी आमच्या जेवणात वाईन होती....अर्थात चर्चारुपी...मी मध्येच डोळे मोठे करुन लेकाला विचारलं...तुला एवढी माहिती कशाला हवीय...याद राख...काय करशील तर...उद्या बाहेर जाणार आहेस...निट वाग...माझा हावभाव पाहून तो हसला...अगदी बापलेक हातावर टाळ्या देत हसले...अरे...फक्त माहिती घेतली...बाकी काही नाही...तू काळजी करु नकोस...म्हणत त्यानं ताटातल्या माश्यांवर ताव मारायला सुरुवात केली....जेवणानंतर महिन्याच्या सामानाची यादी करायला बसले....शनिवारी सक्काळी लवकर सामान घ्यायला जाऊ म्हणून नव-याला सांगितलं...लेकाला विचारलं, तुला काही हवं आहे का...यावर तो म्हणाला आपण सामान भरतो ते सुपर मार्केट किती मोठ्ठं आहे....झालं...पुन्हा दोघांचे हास्यविनोद आणि माझे गुरगुरणे...एकूण काय या दोघांच्या युतीमुळे वाईन न पिताही पुढचे काही दिवस माझं डोकं गरगरणार होतं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Chan lihilyes
ReplyDeleteKhup mast as usual
ReplyDeleteAccept the change
ReplyDelete