मार्केटींगचा फंडा आणि आशा
सकाळी भाजी आणि इतर सामान घेण्यासाठी बाहेर पडले. थोड्या अंतरावरील चौकातूनच बहुधा मोठा आवाज येत होता. फक्त आवाज समजत होता...बाकी बोल दुस-या भाषेत होते...बिहारी किंवा तशाच काहीशा भाषेतील गाणी स्पिकरवर लावली होती....भर रस्त्यातून एवढा मोठा आवाज येत असल्याने मला मोठी उत्सुकता वाटली. झपझप पाऊले टाकत त्या गाण्यांच्या शोधात चालू लागले. नेमकं चौकात एक माणूस उभा होता. काळा सावळा...डोक्यावर डोपी....त्याच्याजवळ एक काठी होती. जवळपास त्याच्या उंचीएवढीच....त्याच काठीला वर एक छोटा टेपरेकॉर्डर सारखी वस्तू लावली होती. त्यातूनच गाण्याचा आवाज येत होता. भर चौकातून एवढा मोठा आवाज येत असल्यानं सर्वांच्या नजरा त्या माणसाकडेच लागून राहिल्या होत्या. काहीजण त्यांनी लावलेल्या गाण्यांना हसत होते, तर काहीजण त्याच्या अवताराला. तो जिथे उभा होता, त्याच्या आसपासच माझी खरेदी करायची होती. मी एक नजर त्या माणसाकडे ठेवत खरेदी सरु केली. थोड्यावेळानं त्या माणसांनी गाणी बंद केली. आणि एक छोटा हेडफोन कानाला लावला. एक छोटा माईकही लावला...आणि बोलायला सुरुवात केली. हिंदीमध्ये तो बोलत होता. त्याच्या गावाच्या आसपास असलेल्या जडीबुटी पासून त्यांनी तेल आणि अन्य औषध बनवलं होतं. पायाच्या भेगा आणि सांधेदुखीवर हे औषध रामबाण असल्याचा त्याचा दावा होता. मला त्याच्या औषधापेक्षा त्याच्या मार्केटींग पद्धतीनं आकर्षित केलं. अगदी साधी बोली होती त्याची. काळासावळा वर्ण, दात पुढे, पांढरा शुभ्र शर्ट आणि तशीच पॅण्ट यावर काळा मोठा बेल्ट...आणि त्यावर मात करणारे काळ्या रंगाचे स्पोर्ट शूज....हातात औषधाची छोटी बाटली घेऊन आपल्या माईकद्वारे तो लोकांना बोलवत होता आणि त्या औषधाचे महत्त्व सांगत होता. थोडी का होईना गर्दी त्याच्याभोवती झाली होती. आणि त्यातूनच माझी उत्सुकता वाढली.
हा माणूस उभा असलेल्या चौकात एक मसाल्याचे आणि पापडाचे दुकान
आहे. मला लेकासाठी पापड घ्यायचे होते
म्हणून मी दुकानात गेले. अगदी दुकानाच्या
समोरच हा वन मॅन शॉप सारखा माणूस आपल्या औषधाचे मार्केटींग करत होता. एक साठी उलटलेली महिला त्याच्याकडे आली होती,
आणि औषधाची चौकशी करत होती. तिच्या
गुडघ्यांचा प्रश्न होता. निट चालता येत
नव्हते, सारखे गुडघे दुखत होते. औषधं खूप झाली. त्याच्या खर्चांनी बेजार झाली होती. ती बाई त्याला मोडक्या तोडक्या हिंदीत
त्याच्याकडच्या औषधांची माहिती विचारत होती.
बाजुलाच एक बास्केट ठेवलं होतं.
झाकण असतं ना त्यातलं...ते बास्केट त्यानं उघडलं. मी अगदी पाठीमागे होते, म्हणून दिसत
होतं...छोटे छोटे प्लॅक्टीकचे डबे ठेवले होते त्यात...आणि त्यात छोट्या बाटल्या
दिसत होत्या....त्यातला एक डबा त्यानं काढला...त्यातून एक छोटी बाटली काढली आणि ती
त्या बाईच्या हातात दिली. एवढ्यापुरता तो
शांत होता. पुन्हा त्याचं मार्केटींग सुरु
झालं. तो त्या बाईंना औषध समजावून देत
होताच, पण त्यासोबत इतरांनाही त्याची माहिती देत होता. ये देखो अम्मा...इतनाही लगाना है...मै वो बडा बडा बॉटल बेचके पैसा नही लेता
लोगोंसे....ये छोटा बॉटल है...उतनाही लगाना...उतनाही पैसा....तुम्हारा पैसा वेस्ट
नही जायेगा और मेरा दवांभी....यावर परत त्या महिलेनं शंका घेतली की, एवढं औषध
पुरेल का म्हणून....त्यावर तो लगेच म्हणाला...हां, तो....अरे ये दवाईयां का यही
फायदा है....थोडी लगावो आराम पावो...ये हमारा खानदानी दवाई है...हमारे परदादा
बनाते थे...फिर दादा...अब घर मैं आपसे भी बुढे बाबा है...वो बनाते है....ये देखो
उनका तसबीर....म्हणत त्यानं त्याच्या पाकीटातून वडीलांचा फोटो दाखवला...नब्बे के
हुऐ है...फिर भी काठी नही हातमे....ना कोई दर्द....इसी तेलसे मसाज करते है....
एव्हाना त्याच्या बाजुला जरा गर्दी जमू लागली. कोणाची बोलण्याची पद्धतच अशी असते की, ओळख नसेल तरी चालते, तसंच माझ्याबाबतीत झालं. त्या माणसाची बोलण्याची पद्धत अफलातून होती. त्यातून वन मॅन मार्केटींग...सेलीग...आणि पब्लिसीटी सुद्धा...फार सामान जवळ नाही. पण जे होतं ते निटकं होतं. दिसायला तो काळा सावळा...पण त्यानं टापटीप कपडे घातले होते. पांढ-या शुभ्र कपड्यात तो अगदी लांबूनही दिसत होता.
डोक्यावर टोपीही तशीच मोठी होती...त्यामुळे उन लागत नव्हतं...आणि त्याच्या त्या वेगळ्या अवताराकडे लोकांचं लक्ष लागलं होतं. त्याच्या हातात काठी होती, तिला खाली छोटासा स्टॅंड होता. म्हणजे ती काठी नुसती उभी केली तरी चालू शकत होती. त्याच्यावर टेपरेकॉर्डर आणि कसल्यातरी वेलींचा त्याला विळखा....
मी माझे सर्व सामान घेऊन, त्या माणसाच्या मार्केटींगला बघत बसले होते. एक माईक त्यांनं लावला होता...त्यामुळे तो जो संवाद साधत होता, तो आपोआप सर्वांना ऐकू जात होता. त्या बाईंच्या हातात एव्हाना दोन बाटल्या पडल्या होत्या....एवढ्या पुरतील का...आणि वेदना थांबल्या तर पुन्हा पुन्हा लावायचे का...हे प्रश्न आता त्यांना पडले होते. मग परत हा माणूस सुरु झाला....एक बार लगाओ...आराम पडेगा...दो बार लगाओ...दर्द भागही जाएगा...ये देखो...म्हणत त्यानं बाजुलाच असलेल्या काठीला लावलेल्या वेलींची सुकी पानं तोडली...ये है दवा...हमारे गांव के जंगल मै मिलती है...ये पत्ते और इसकी जडे उबालकर ये तेल किया है....और दर्द भाग गया तो मत लगाओ तेल...उसे वैसाही रखो...खराब नही होगा....आता त्या बाई चांगल्याच प्रभावी झाल्या होत्या...और खतम होगा तो परत कैसा मिलेगा...तुम्हे कहा ढूंढू....यावर त्याला त्याच्या दोन बाटल्या खपल्याची खात्री झाली होती बहुधा...म्हणून तो आत्मविश्वानं म्हणाला...अरे मै कहा जाता हूं...दो हफ्ते बाद वापस यही आयुंगा...तो आप आना...तब तक आपका दर्द खतम हुआ होगा...मुझे बतानेंको आयो....झालं...त्यावर त्या बाई खूष झाल्या....दोन
बाटल्यांचे शंभर रुपये...तिने ते त्याच्या हातात दिले...त्यांनी उदार मनानं त्या काठीची पानं तिला दिली...खाओ...फायदा होगा...म्हणत तो दुस-या गि-हाईकाकडे वळला...
खरं तर हा माझा नेहमीचा रस्ता...गेली अनेक वर्ष येथेच मी खरेदीसाठी
येते...एवढ्या वर्षात हा माणूस कधीही दिसला नाही...आता पुन्हा दोन आठवड्यांनी तो दिसेल
याबाबतही मी साशंक होते. पण आत्मविश्वास
काय असावा याचं चांगलं उदाहरण माझ्या समोर उभं होतं...त्याच्या समोरची गर्दी तुरळक
होती....पण कोणीही खाली हातांनी जात नव्हतं....पन्नास...शंभर रुपयांपेक्षा अधिक
खर्च नव्हता....बघायला काय जातं...म्हणत त्या छोट्या बाटल्यांतील औषधाची खरेदी
चालू होती...
मी माझ्या नेहमीच्या पापडवाल्या दुकानदाराला नमस्कार करुन घराकडे
निघाले...माझ्यापुढेच ते औषध घेतलेले दोघं जण चालत होते...ते एकमेकांना विचारत
होते...होईल का बरं...बघुया...एकदा प्रयत्न करायला काय जातंय...दुस-यानंही त्याला दुजोरा
दिला....शेवटी आशा ही सर्वोच्च असते...तिला कमी नाही...हेच खरं....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
👍
ReplyDeleteKhup chhan lekh.
ReplyDeleteउम्मीद पर दुनिया टिकी है
ReplyDelete