साधी माणसं...भारी माणसं...
ओ ताई....अहो ताई....ओ...ओ...तुम्ही...ओ ताई....कोणीतरी मला जोरजोरानं हाका मारत होतं...आणि मी वैतागून त्याकडे दुर्लक्ष करीत एक दरवाजा उघडण्याच्या प्रयत्नात होते. शेवटी तो हाक मारणारा आवाज थकला बहुधा...थोडावेळाची शांतता पसरली...आणि चक्क ते हाक मारणारे काका अगदी माझ्या बाजुला येऊन उभे राहिले...लेकाच्या कॉलेजची तयारी सुरु झाल्यावर शेवटी आयत्या वेळेला जी घाई होते, तिच घाई आमच्या घरात सुरु झालेली...सर्व तयारी झाली-झाली म्हटलं आणि आयत्यावेळी अनेक कामं निघावी...तशी आमची अवस्था झालेली. त्या कॉलेजकडून काही कागदपत्रांची मागणी झाली होती. त्यापैकी काही प्रमाणपत्र ही त्याच्या मागच्या ज्यु. कॉलेजमधील होती. ते कॉलेज पार वाशीला...जाणं तर गरजेचं...बरं लॉकडाऊनच्या काळात ते कॉलेज कुठे आहे, हे मी सुद्धा विसरले होते...भल्या सकाळी घरातून निघाले, तर ट्रेनला नेहमीप्रमाणे गर्दी...कॉलेजमध्ये सकाळी नऊ वाजता जायला सांगितलं होतं. पण मी अगदी आठ वाजता हजर झाले होते. तिथे गेल्यावर कॉलेजचं गेट दिसलं आणि हायसं वाटलं...पण ते तेवढ्यापूरतचं...कारण हे गेट बंद होतं...आणि सर्वत्र बांधकाम साहित्य पसरलं होतं. सळ्या, मातीचे ढीग, सिमेंटच्या गोण्या....असचं सर्व होतं...आत कोणाची चाहूलही नव्हती...की आसपास कोण दिसत नव्हतं. एका टोकाला असलेल्या या कॉलेज समोरच रस्ताही संपतोच...त्यामुळे आसपासही कोणी नव्हते....मी जवळपास दहा मिनीटं अस्वस्थेत घालवली...दरवाजा जोरात वाजवून बघितलं...कोणी आहे का...म्हणून आवाज देऊन झाले...पण कोणी येईना...तेव्हा मात्र वैतागले होते...त्यात दोन-तीन कुत्रे कुठूनतरी आले...मग लांबूनच मी दाराजवळ घिरट्या घालू लागले...तेव्हाच तो आवाज माझ्या कानावर आला...एक वयोवृद्ध माणूस हाक मारत होता...पण हा इथे कोणी नाही असंच सांगणार, हे मनात ठेऊन मी त्याकडे दुर्लक्ष करीत राहिले...शेवटी ते काका माझ्याजवळच येऊन उभे राहिल्याने माझा नाईलाज झाला...काय झालं काका....मला कॉलेजमध्ये जायचं आहे...मी त्यांना टाळत सांगितलं...तेव्हा म्हणाले...अग ताई तेच तर कवाचं सांगतोय...इथून कॉलेज बंद आहे...मागच्या दाराजवळून सर्व चालू आहे...तुला ठाव नसेल म्हणून हाका मारतोय...पण तू थोडं ऐकतेय....साधा लेंगा आणि बुशर्ट घातलेल्या त्या माणसाकडे मी बघितलं आणि त्याच्यासमोरच माझ्या डोक्यावर हात मारुन घेतला....
ब-याचवेळा आपण आपल्याच नादात असतो. आपल्यापेक्षा दुसरीकडे बघायला वेळ नसतो...आणि त्याच नादात आपलेच नुकसान करुन घेतो...असाच मला प्रत्यय येत होता. मी ज्या माणसाकडे दुर्लक्ष करीत होते, त्याच माणसानं मला त्या कॉलेजच्या दुस-या गेटजवळ आणून सोडलं होतं. कॉलेज पार एका
टोकाला होतं. एवढीच मला माहिती होती. पण आता त्या कॉलेजचा आवाका बघत होते...कॉलेजच्या एका बाजुला बांधकाम चालू होतं. नवीन बिल्डींग बांधण्यात येत होती. त्यामुळे तो सगळा भाग बांधकामाच्या साहित्यानं व्यापला गेला होता. आणि त्या बांधकामाच्या कॉन्ट्रॅक्टरनं दरवाजा बंद करुन ठेवला होता. त्याची माणसं सकाळी नऊ नंतर साईटवर येत होती. मी आले होते बरोबर आठ वाजता...त्यामुळे सगळं सामसुम होतं...मला सोबत घेऊन ते काका चालत होते...चालता चालता सगळी माहिती देते होते...कॉलेजचे दुसरे गेट गाठण्यासाठी मोठा वळसा घालावा लागला. मध्येच एक मोठे मैदान लागले...त्याच्यापलिकडे कॉलेजचे गेट होते....त्या काकांनी मला ते दाखवले...आत्ता मी जाईन म्हणून त्यांना सांगितले...तर म्हणाले नको बाय...इथं कुत्री खूप आहेत....आता सकाळी कोण नाय तर मागे लागतात कधी कधी...चल तुला सोडतो...म्हणत पुन्हा माझ्याबरोबर चालू लागले. मैदान जिथून सुरु होते, त्याच कोप-यावर भाज्या आणि फळांचे बैठे दुकान लागले होते....काका त्याकडे बोट दाखवून म्हणाले...हे माझंच हाय...इथूनच तुला बघितलं जातांना...तेव्हाच अंदाज आला...कॉलेजकडे जातेय म्हणून...सकाळी कोण नसतं त्या वाटेला म्हणून पुढे आलो...ते सांगत होते...आणि मी हो हो म्हणत चालत होते...दोन मिनिटात कॉलेजचे दुसरे गेट आले...मागच्या भागातून सर्व कॉलेज सुरळीत चालू होतं...त्यांनी ते दाखवलं...आणि मला येतो म्हणून तसेच झपाझप चालत निघूनही गेले....माझं थ्यॅंक्यूही ऐकलं की नाही काही कळलं नाही...
माझं कॉलेजचं काम अवघ्या अर्ध्या तासात झाले...दोन प्रमाणपत्र घ्यायची होती. ती मिळाली. सोबत आणलेल्या फायलीमध्ये ती काळजीपूर्वक ठेवली आणि निघाले. आत्ता रस्ता माहीत झाला होता, त्यामुळे चालत स्टेशन गाठता येणार होते. तोच विचार करत मी चालू लागले. मैदान संपले आणि अचानक ते काका पुन्हा दिसले. त्यांच्या भाज्यांचा ठेला आवरुन ठेवत होते. फळांच्या, म्हणजेच द्रांक्षांच्या दोन पेट्या होत्या, त्या बाजुला करुन ठेवल्या होत्या...स्ट्रॉबेरीचे बॉक्स मांडून ठेवले होते...त्यांना पाहून मी आता पुढे गेले...त्यांना नमस्कार केला...धन्यवाद म्हणाले...त्यात काय बाय...तूच एकटी नाहीस येत इथं...अशा ब-याच बाया येतात...कॉलेजच्या जुन्या दाराकडं...त्यांना पण सोडते दुस-या भागात...म्हणून ते त्यांची आवराआवर करु लागले. टोमॅटो, गाजर, मटार, फ्लॉवर आणि कोथिंबर, मेथीच्या काही जुड्या
होत्या...त्यांनी त्या एका टोपलीत ठेवल्या. मी थांबल्याचे बघून म्हणाले, सकाळी या मैदानात सगळे चालायला येतात, तेव्हा जातांना भाज्या आणि फळं घेऊन जातात...आत्ता दहा नंतर कोण नाय येत...आत्ता सगळी भाजी स्टेशनला घेऊन जाणार...माझी जाण्याची घाई थोडी कमी झाली....भाजी खरचं फ्रेश होती...मी जवळपास रहाणार असते तर नक्की घेतली असती...पण द्राक्षांवर नजर गेली आणि माझी कळी फुलली....काळी...गोल द्राक्ष होती...माझी आवडती...मी त्यांना त्यांचा भाव विचारला...तर म्हणाले, अग ताई, तू खूप लांबून आली असशील ना...उगाचच घ्यायचं म्हणून घेऊ नकोस...मी त्यांना नाही म्हणत परत भाव विचारला...आणि किलोभर द्राक्ष, सोबत स्ट्रॉबेरीचा एक बॉक्स घेतला...वाशीच्या भाजी मंडईमध्ये त्यांचा मुलगा काम करतो...आणि हे आजोबा असे बाहेर भाज्या लावून विकतात आणि मुलाच्या संसाराला मदत करतात...पहाटे चारला उठून भाज्या आणतात...अगदी पहाटे पाच वाजता इथे येतात...भाज्या लावतात...आणि नऊ-दहाच्या सुमारास स्टेशनजवळ पुन्हा भाज्या लावून बसतात...दुपारी जेवायला घरी...सायंकाळी परत इथेच भाज्या आणि फळं घेऊन बसतात...रात्री आठ वाजता घरी आणि नऊ वाजता झोपायला मोकळे होतात...माझ्या द्राक्षांना काकांनी दोन मोठ्या पेपरमध्ये पॅक करुन दिले...ते करता करता ही माहिती देत होते...आपली काय कुणाबद्दल तक्रार नाय बघ...सगळं चांगलं चालू आहे, म्हणत ते पुन्हा त्यांच्या आवरण्याच्या कामाला लागले...आणि मी त्यांना नमस्कार करुन माझ्या रस्त्याला...
साधी वाटणारी माणसं खरचं भारी असतात...अनुभवानं आणि मनानंही....या
काकांनी याचाच एक अनुभव मला दिला होता...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
आपला ब्लॉग पाहीन म्हणता म्हणता आत्ता पहिल्यांदाच पाहिला.
ReplyDeleteकाकांची साधीच पण विशेष अशी गोष्ट
अन् आपली निवेदनशैली आवडली.