आली घटीका समिप....
अग बाई....आपला मुलगा हॉस्टेलमध्ये रहाणार आहे...वन रुम किंवा टू रुम किचनच्या प्लॅटमध्ये एकटाच रहाणार नाही...त्याला त्याची हॉस्टेलची रुम दुस-या मुलाबरोबर शेअर करायची आहे. त्यामुळे स्वतःला आवर घाल...प्लीज.......................एवढा मोठा दम...माझ्या नव-यानं मला बहुधा पहिल्यांदाच दिला असावा....आणि एवढा ओरडा मिळून न चिडता माझे डोळे भरुन ओघळू लागले...हेही पहिल्यांदाच झालं असेल बहुधा...हे सगळं घडत होतं एका शॉपिंग मॉलमध्ये...हा सर्व प्रसंग होणार आहे, याची जणू जाणिवच असल्यामुळे आमच्यापासून सुरक्षित अंतर राखून लेक उभा होता...त्यानं वडीलांचा आवाज वाढल्यावर आमच्या दोघांकडे बघितलं...हसत हसत दुस-या रो मध्ये वळून खरेदी सुरु केली. इथे मी एकटीच पडले होते. आजूबाजुचे लोक आमच्याकडे बघत होते...पण नव-यानं त्याची पर्वा न करता, मी ट्रॉलीमध्ये घेतलेलं सामान पुन्हा रॅकवर ठेवायला सुरुवात केली...ही सर्व तयारी चालू होती अर्थात लेकाची...एक दिवसापूर्वीच त्याच्या कॉलेजमधून ऑफलाईन कॉलेज लवकरच सुरु होणार...पंधरा दिवसाची नोटीस देण्यात येईल...तयारीला लागा...अशा सूचनेचा मेल आला...त्याबरोबर मी अलर्ट झाले...घरातील दोन माणसं त्यात काय तयारी करायची...सगळं मिळतं तिथे...उगाचच हिचा गोंधळ...याच मोडवर होते...तरीही मी यादी तयार केली आणि हट्टानं मॉलमध्ये जाऊन खरेदी करायला सुरुवात केली...त्यावेळीचाच हा एक प्रसंग...
लेक आज ना उद्या आपल्यापासून दूर रहाणार याची माहिती होती. पण ती घटीका जवळ आल्यावर मनाची जी अवस्था होते, ती फक्त एक आई जाणू शकते. मी काही या सगळ्यापासून वेगळी नाही...गेल्या पंधरा दिवसापासून घाब-या सशासारखी अवस्था झालेली. कॉलेजकडून पंधरा दिवसांची नोटीस देण्यात येईल असा मेल आल्यावर माझी तयारी सुरु झाली. अरे पंधरा दिवस मिळणार आहेत, अशी घाई कशाला काय करतेस, म्हणून आमच्या घरातील दोघांनी प्रथम सुरुवात केली होती. मात्र मी ठाम राहीले, आणि खरेदी सुरु केली. याला मुख्य कारण होते म्हणजे, मला असलेला हॉस्टेलमध्ये रहाण्याचा अनुभव. नाशिकमध्ये पत्रकारितेचा अभ्यास करतांना रचना हॉस्टेलमध्ये तीन वर्ष मी राहिले होते. या तीन वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर मी लेकाची तयारी सुरु केली होती. अर्थात परिस्थितीमध्ये खूप बदल झाला होता.
तरीही अनुभव हा अनुभव असतो. लेक जिथे जाणार तिथले वातावरण टोकाचे....थंडीही तशीच आणि गरमीही...त्यात कोरोनाचे संकंट...आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घरात लाडोबा...एकुलता एक...राजाबेटा...या सर्व आवरणाखाली वावरणारा मुलगा आता एकट्यानं कसा रहाणार याची काळजी. मग त्याला सोप्पं वाटेल, जमेल अशा सामानाची मी माझी लिस्ट बनवली होती. त्या कॉलेजकडून ऑफीशीयल अपेक्षित सामानाची लिस्ट येणार होती. पण त्याआगोदर मी माझी लिस्ट तयार केली. आणि खरेदी सुरु केली.
जेव्हा माझी हॉस्टेलवर रहाण्याची वेळ आली होती, तेव्हा माझ्या आईनं कशी तयारी केली होती, हे आठवू लागले. तेव्हा मर्यादीत साधने होती. अगदी खर्चही मोजून मापून...तरीही आईनं लेक बाहेर रहाणार म्हणून आठवडाभर खपून डबे भरुन खाऊ दिला होता. तो नाही म्हणायची टाप नव्हती. पण आता लेकाची भूणभूण सुरु होती...तिथे सर्व मिळते...तू जास्त काही देऊ नकोस...मी बाहेरचे काही घेऊ शकतो...तू त्रास करु नकोस...हे शवटचे वाक्य माझी समजूत काढण्यासाठी...पण मी काही हटत नव्हते...थंडीचे लाडू आणि चवीला काहीतरी तिखट अशा दोन पदार्थांवर तर मी ठाम राहिले. खरेदी करतांना या दोघांचे सामान घेतले. साबण, साबणाची पावडर, बकेट, चादरी, उशांची कव्हर, चमचे, कुलूप....हे सर्व सामान मी खरेदी करत सुटले. बरं कोरोनाला कायम लक्षात ठेवावं लागणार होतं. त्यामुळे मेडीकल बॉक्स गरजेचा होता. त्यासाठी मोठा डबा, बॅडेज पट्टी, थर्मामिटर, ऑक्सीमीटर, पेनकिलर स्प्रे....आदी औषधं झाली...यासोबत कपड्यांसाठी एक रोप, हॅंगर आणि क्लिपही घेऊन झाल्या...ही खरेदी करतांना मात्र नव-यानं गोंधळ घातला होता. तो काय तिथे कपडे धुवायला जाणार आहे का...तू काय करतेस...ठेव सगळं म्हणून भूणभूण चालू होती...पण मी त्यानं नेलं नाही तर घरच्यासाठी वापरेनं सांगून कुठलीही वस्तू परत रॅकमध्ये ठेवायला नकार दिला. त्यात एक गणपती बाप्पाची छोटी मुर्ती दिसली...ती मात्र त्यानं घेऊन दिली. त्यासोबत अगरबत्ती लावायचा स्टॅड घेतला तेव्हा मात्र चारचौघांना ऐकू जाईल येवढा आरडाओरडा चालू केला.
सामानाच्या बॅगा भरपूर झाल्या...घर गाठलं...सर्व आटोपल्यावर पुन्हा त्याच्या सामानाकडे वळले. कपाटातून एक एक वस्तू निघू लागल्या...हे हवं...ते पण
लागणार...घड्याळ...बॅट...चेसबोर्ड...रिबिस्क्यू...हॉटव्हीलची एक गाडी...शूज...सर्व हवं म्हणून कपाटातून निघू लागलं. कपडेही आले...एक-एक वस्तू तो जमा करत जात होता. आणि कपाट खाली होतं होतं. आता कुठे मला जाणवू लागलं, की त्याच्या नुसत्या जाण्यानं किती जागा रिकामी होणार होती...गेली अठरा वर्ष मला त्याची आणि त्याला माझी सवय झालेली...त्याच्या जाण्यानं मी एकाकी पडणार होते. मध्येच डोळे ओले होत होते...अजून कॉलेजची तारीख आली नाही, म्हणून नवरा समजूत काढत होता...पण त्यालाही जाणवत होतं...ती नोटीस कधीही येणार होती...आणि आमचं पिल्लू भूर्र.....आकाशात उडण्यासाठी दूर जाणार होतं...
ही मोठी अनोखी अवस्था असते.
एरवी मी घरात जाम धडपडते...लागणं...कापणं...भाजणं...हे प्रकार
नित्याचे...पण त्यावेळी सांभाळायला नव-याच्या आधी लेक उभा असतो...आई....म्हणून तो
ओरडला की सर्व वेदना दूर होतात...आता त्यांनी या सर्वांवर बोलायला सुरुवात केली
आहे....तू पहिल्य़ांदा सांभाळून काम करायला शिक...काही फार केलं नाहीस तरी
चालेल...पण सावकाश कर...नाहीतर मला तिथे लेक्चर चालू असतांना फोन करशील...असं काहीतरी
समजुतीचं बोलायला लागला होता...मी मात्र घाब-या सशासारखी...दिवसभर...आला का
मेल...आला का मेल...म्हणून चौकसं झालेली...या मनाच्या भिरभिरण्याला काहीही उपाय
नाही. सकाळचा योगाही इथं फोल ठरलाय...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Mastach
ReplyDeleteTuza likhan nehmich chhan aste...samor basun boltye asa bhasnare...all the best for Varad
ReplyDeleteखूपच छान लिहिलं आहे,जवळपास अनेक आयांचा अनुभव आहे आणि तो भविष्यात मलाही येऊ घातला आहेच.यातून तस शिकायला ही मिळेल.असं लिहिलं आहेस.मी माझ्या मैत्रिणींना पण वाचायला देते.माझ्या मैत्रिणीचा मुलगा गेल्या महिन्यात बंगलोर ला कॉलेज साठी ती पोचवून आली, आज सकाळी त्याने घरी सरप्राईज visit दिली आईची आठवण येतेय म्हणून आणि मग डोळे रिते व्हायला लागले.हे आजच ऐकलं आणि आज हा लेख वाचला म्हणून जास्त भावलं असेल.
ReplyDeleteवरील reply माझा म्हणजे सौ मृणाल केळकर ने दिलेला आहे नाव लिहायला विसरले.
ReplyDeleteछान लेख आहे त्यात स्वतचा अनुभव व त्यावरुन लेकाकरीता केलेली धडपड .
ReplyDeleteखुप छान लेख लिहिलास.
खूप छान लेख
ReplyDeleteशिल्पा खूपच छान व्यक्त झाली आहेस.
ReplyDeleteआईच्या मनाची घालमेल खूप छान शब्दांकित केली आहेस.
ReplyDelete