आमची हुशारी....आणि कुंपण...

 

 आमची हुशारी....आणि कुंपण...


सकाळची दहाची वेळ....हातात कॉफीचा मग...तरीही एक घोटही घेण्याची इच्छा नाही...समोरच मी फुलपाखरु म्हणायचे अशी माझ्या मैत्रिणीची मुलगी, साना मान खाली घालून बसलेली...तिच्याही हातात कॉफीचा मग...साय आलेल्या कॉफीकडे बघत आज ती कधी नव्हे ती शांत बसली होती...सगळी माणसंचं शांत होती...फक्त टिव्ही चालू होता...त्याचाच तो आवाज...बाकी माझी मैत्रिण, तिचा नवरा, धाकटी लेक, आजी, आमच्या तीन मैत्रिणी... सगळी माणसं शांत बसलेली...आपण कोणतरी मोठी चूक केलीय अशी भावना त्यांच्या चेह-यावर...कोण आधी बोलणार...काय बोलणार...याचीच जुळवाजुळव प्रत्येकाच्या मनात चालू होती...शेवटी आमच्यातल्या जाणत्या माणसानं सूत्र हाती घेतली.  आजी पुढे झाल्या, त्यांनी आधी तो टिव्ही बंद केला...आणि सुरुवात केली.  हे बघ सई...मी या सर्वांना रोखठोक सांगितलं आहे..एक वर्ष वाया गेलं, म्हणजे आयुष्य वाया गेलं नाही...आणि कर्जाचं काय...ते बघून


घेऊ...माझ्या गळ्यात ही माळ आहे, ती विकेन....फार काय गावची जमिन विकेन...माझी नात आज ना उद्या डॉक्टर होईल...तेव्हा वसूल करेन हो मी सगळं...पण आत्ता हे घरातलं सुतकी वातावरण काय ते दूर करा...आजींचं हे वाक्य पुरं होतं ना होतं तो आमच्या लाडक्या फुलपाखरानं शेजारी उभ्या असलेल्या आजीच्या कमरेला मिठी मारली आणि आजी...म्हणत तिचा बांध फुटला...धो धो रडली...आणि आजी शांतपणे आसवं गाळत तिच्या डोक्यावर हात फिरवत होती...तिच्यासोबत आम्हीही मनमुराद रडून घेतलं...थोडं मोकळं झाल्याची जाणीव झाली...

हे वातावरण होतं माझ्या एका मैत्रिणीच्या घरातलं...तिला साना आणि मिता.... साना मोठी, आणि मिता धाकटी.  आमच्या ग्रुपमध्ये मुलींची संख्या कमी.  त्यामुळे ज्या आहेत त्या आमच्या सर्व लाडूल्या आहेत.  त्यात साना आणि मिता या सर्वांत अधिकच...एकतर दोघींचीही नावं वेगळी...तशाच या दोघीही...सतत बडबड,  उत्साहानं भरलेल्या...काहीतरी नवं करणा-या...आईला मदत...आजीला सोबत...वडीलांना आधार...अशा सर्व भूमिकात वावरणा-या...दोघीही हुशार...दोघींनाही डॉक्टर व्हायचंय... साना लहान होती, तेव्हा तिचे आजोबा आजारी पडले.  गावी पटकन डॉक्टर मिळत नव्हते...तेव्हा लहानग्या सानानं मी डॉक्टर होईन आजोबा, आणि तुमच्याबरोबच राहीन...असं त्यांना सांगितलं...तेव्हापासून सानानं डॉक्टर व्हायचं स्वप्न बघितलं...फार काय


खेळही डॉक्टर डॉक्टरचाच....मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत धाकटी मिताही डॉक्टर होण्याचं स्वप्न पहात आहे.  नातीला ध्येय देऊन आजोबा देवाघरी गेले....आत्ता आत्तापर्यंत साना, मिता डॉक्टर आणि त्यांची आजी पेशंट हा खेळ रंगलेला असायचा....आम्हा सर्व मैत्रिणींसाठी हा कौतुकाचा विषय....या खेळातूनच सानाचं डॉक्टर बनण्याचं ध्येय अधिक घट्ट झालं होतं. 

डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या नीटच्या परीक्षेसाठी साना नऊवीत होती तेव्हापासूनच तयारीला लागली.  पुढे अकरावी-बारावीची दोन वर्ष तर पोर कॉलेज, क्लास व्यतिरिक्त घराबाहेरही फार कमी पडली.  अभ्यास एके अभ्यास...नीट झाली...तिला मार्कही चांगले मिळाले...आणि प्रवेशाची धावपळ सुरु झाली.  एरवी परीक्षा कशी असावी, त्याची तयारी कशी करावी, पुस्तके कुठली वापरावी,  अभ्यास कसा करावा...अशा नको तेवढ्या विषयांची माहिती घेऊन ठेवतो....पण नेमकं जेव्हा थेट मोकळ्या प्रवाहात पोहण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाका तोंडात पाणी जायला लागते....तशीच गत या मैत्रिणीच्या घरातील प्रत्येकाची झाली.  एकतर प्रचंड वेळ घेणारी प्रवेश प्रक्रीया....निकाल लागून चार महिने झालेले...आता प्रवेश याद्या लागायला सुरुवात झाली... साना खूप मागे फेकली गेल्याचे जाणवले...ओपन...हा शिक्का असेल तर अगदी चार पाच अंक कमी असेल तरी पार डोंगराच्या कड्यावरुन खाली फेकावे असा अनुभव येतो...तोच तिला आलेला...एका मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये नंबर लागला...पण तिथून काही लाखांची मागणी करण्यात आली...एवढे लागतातच...असा संदेशही आला...चार वर्ष झटून केलेला अभ्यास...मिळालेले चांगले गुण...हेच मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुरेसे होते अशा भ्रमात ही मंडळी होती....एवढे पैसे आणायचे कुठून यावर विचार मंथन सुरु झाले.  तेव्हाही आजीनं जमीन विकण्याचा सल्ला दिला...पण त्याला सानाच्या बाबांनी नकार दिली.  शेवटी दंतवैद्यकीय


महाविद्यालयात नंबर लागला...पण सानाला ते मान्य झाले नाही...मी एक वर्ष थांबते, पुढच्या वर्षी अजून चांगले गुण मिळवेन आणि मला हवा तिथे प्रवेश मिळेल, असा तिचा निर्णय झाला...

मात्र या सर्वात तिची एक मैत्रिण युक्रेनला वैद्यकीय शिक्षणासाठी चालल्याचं तिला समजलं... साना आणि तिची आई त्यांच्या घरी गेल्या. सर्व माहिती घेऊन पुन्हा त्यांनी सांगितलेल्या संस्थेत गेल्या.  तिथून युक्रेन आणि रशिया येथील मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश निश्चिती होत होती.  सानाचे गुण बघितल्यावर ती मंडळी तर खूप खूष झाली.  तिला स्कॉलरशिप देऊ केली.  तिथे रहाणा-या आणि शिकणा-या काही मुलींबरोबर थेट बोलण्याची संधी दिली.  सर्व ठिक होतं....आणि आर्थिक बजेटही बरच कमी होतं...फक्त लेक परदेशात रहाणार...वर्ष-वर्ष येऊ शकणार नाही एवढं सांभाळायचं होतं.  त्या संस्थेकडून मैत्रिणीला कळलं, की खूप मुलं रशिया आणि युक्रेनमध्ये शिकायला जातात...शिक्षणाचा खर्च कमी येतोच...शिवाय आपल्याकडे जी किचकट आणि वेळकाढू प्रवेश प्रक्रीया आहे, त्या सर्वाला इथे टाळण्यात येतं.  त्यामुळे मुलं आणि पालक...दोघेही खूष असतात...शिक्षणाचा खर्च तर अर्ध्याहून कमी...आणि त्यासाठी कर्ज मिळण्याची व्यवस्था... सानाला घेऊन गेलेले आई-बाबा आले तेच तिचा प्रवेश निश्चित करुन.  एका दिवसात सर्व प्रक्रिया झाली.  घरी येतांना बाबा पेढ्यांचा बॉक्स घेऊन गेले... साना, आजीच्या पाया पडली...तेव्हाही दोघी खूप रडल्या...त्या आनंदानं आणि साना दूर जाणार...या वेदनेनं...पण त्यातही ती डॉक्टर होणार याचा आनंदच जास्त होता.  आम्हा सर्वांनाही ही आनंदाची बातमी मिळाली.  युक्रेनचं नाव तेव्हा आमच्या सर्वांच्या तोंडी झालं....मैत्रिणीवर चौकशीचा मारा झाला...तिथलं वातावरण, खाणं, लोक कशी आहेत, रहाण्याचं काय...असे अनेक प्रश्न तिला विचारत होते...तेव्हा तिनं त्या संस्थेनं दिलेला व्हिडीओ आम्हा सर्वांना दाखवला....अगदी महिन्याभरातच साना युक्रेनला रवाना झाली.  काही दिवसांनी तिचा तिथला फोटो आम्हा


सर्वांच्या मोबाईलवर फिरत होता...

गेल्यावर्षी आमचं हे लाडकं फुलपाखरु सुट्टीमध्ये आलं तेव्हा अधिक गोरं झालं होतं...तेवढीच परिपक्वही...लांब रहाण्याचा फायदा दिसत होता.  सर्व काही ठिक चालू होतं...आता मे महिन्याच्या अखेरीस ती पुन्हा येणार होती...तेवढ्यात हे युद्धाचे ढग भरुन आले...आणि माझ्या मैत्रिणीच्या हसत्या खेळत्या घरावर अंधार करुन गेले.  साना परत येईपर्यंत मैत्रिणीचं कुटुंब, आम्ही सर्व मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारचे सर्वच चिंतेत होतो...मैत्रिणीला फोन करण्याची हिम्मत नव्हती...पण दोन दिवसांतून एकदा घरी जात होतो...शेवटी गेल्या आठवड्यात ती परत आली आणि सर्वांनी मोकळा श्वास घेतला....आता सर्व ठिक असं वाटलं होतं...पण नाही...आता तर खरी चिंता जाणवायला लागलीय... साना आल्यापासून शांत झालेली. आल्यापासून दोन दिवस तर अंथरुणावरुन उठलीच नाही...आता फक्त टिव्ही लावून बसते आणि त्या युद्धाच्या बातम्या बघते...आई, आजी, बाबा, धाकटी मिता...तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतात पण हो...नाही...हुं...च्या पलीकडे काही नाही....मैत्रिणींचा फोन येत होता...अग काही सुचत नाही...पोरीकडे बघवत नाही...काय करायचं...जरा तिला बोलती करा ग...म्हणून तिनं भेटून आर्जव केलेलं...त्यामुळे आम्ही नेहमीच्या चार मैत्रिणी सानाच्या घरी जमलो होतो...

आम्हाला बघून आजीच पुढे आली होती...आज काही झालं तरी चालेल, माझ्या पोरीला बोलती करा...जळल्लं ते युद्ध...माझ्या नातीला त्यांनी अबोल केलंय...आम्हाला सर्वांना बघून साना उठून बसली होती...पण बेडवरुन काही खाली आली नाही.  थोडीफार बोलली...काय कसं...मग पुन्हा शांत आणि बातम्या चालू...शेवटी आजीनं ती पोकळी फोडली... साना भरपूर रडली...तासाभरानं शांत झाली...टिव्ही लावायचाच नाही....बातम्या तर नकोच...म्हणत आम्ही बाहेर आलो... सानाचं तोंड आजीनं धुतलं...अगदी लहान होती असंच...माझी बाय ती...असं खचून नाय जायचं...मी आहे ना...अशी आजीची धीराची भाषा चालू होती...त्या आजी नात्यातला ओलावा बघून आमचे सर्वांचेच डोळे भरुन येत होते...आजीनं आमच्या मैत्रिणीला पोहे करायला सांगितले...खोबरं टाक ग... सानाला आवडतं...म्हणत नातीला धरुन बसली...आता साना बोलू लागली... साना सगळं निट होईल काही काळजी करु नकोस, म्हटल्यावर, पण मावशी माझं फक्त एकच वर्ष होतं ग...बाबांनी कर्ज घेतलं आहे,  त्याचे हफ्तेही सुरु होतील....त्याचं काय करायचं...कसं होईल सगळं...मीतालाही डॉक्टर व्हायचंय...मी डॉक्टर झाल्यावर मिताचा खर्च करणार होते...आता काय करु....कसं होणार सगळं...म्हणत परत हमसून रडायला लागली...


इथे मला साना दिसतच नव्हती.  मध्यंवर्गीय कटुंबातील मुलांची प्रतिनिधी दिसत होती....आमची मुलं हुशार असतात...त्यांना मोठी स्वप्न असतात...जिद्द असते...पण ते व्हिटामिन एम कुठून आणायचं हे कोडं सुटत नाही.  एज्युकेशन लोन हा शब्द चांगला वाटतो...पण त्याची प्रोसेस काय हे जो त्या वाटेनं जातो त्यालाच माहित...अभ्यास एके अभ्यास करुन ही मुलं फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि गलेलठ्ठ पगारासाठी परदेशात जातात, असाही समज अनेकांचा असतो.  पण त्यामागे त्या मुलांनी सहन केलेली लांबलचक प्रवेश प्रक्रीया आणि त्यातही हातात चांगले गुण असूनही अपेक्षित शैक्षणिक जागा न मिळाल्यानं आलेला मानसिक ताण कोणालाही दिसत नाही.  या सर्वात ज्या कोणालाही साध्या प्रवेश परीक्षांची नावे माहित नसतात, त्यांचे सल्ले तर डोक्याला ताप देणारे ठरतात.  या सर्वातून साना आणि तिचे कुटुंब गेलेले... सानाला आता या सर्वांचीच चिंता सतावत होती.  काय झालं, शेवटी आपल्या देशात परत यावच लागलं ना...मग इथेच का शिकली नाही..असं कोणी बोललं तर काय करु...म्हणून ती आजीला विचारत होती...आणि आजी आपल्या नातीचे सारखे पाझरणारे डोळे पुसत होती...काय नाही...मी आहे ना...माझ्याकडे बोट दाखव...मग मी दाखवते त्यांना काय ते...आज आजी गब्बरच्या भूमिकेत होती... सानाला तशाच गब्बरची गरज होती....मैत्रिणीनं पोह्यांच्या डीश आणल्या... सानाच्या हातात पहिली दिली...आजीनं नातीला घास भरवला....तू पहिल्यासारखी हो...बघ ते युद्ध थांबेल...आणि सर्व निट होईल...आजीच्या सल्ल्यावर सानाही हसली...आणि अवघं घरही...आमच्या गप्पा रंगल्या...मैत्रिणीला आम्ही थोडे दिवस बाहेर जाण्याचा सल्ला दिला.   मिताची परीक्षा पुढच्या आठवड्यात संपणार होती...तेव्हा कुठेतरी जाण्याचा बेत ठरवा असं सुचवलं...बाबांनी लगेच सर्व जबाबदारी सानावर सोपवली.... सानानं हसत होकार दिला...आम्ही घराचा फुललेला मुड बघितला आणि समाधानानं आजीला नमस्कार करुन निरोप घेतला....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप छान माही ती .सुंदर लेखन आहे
    लेख वाचला खूप सुंदर अणि सोप्या भाषेत लिहला आहे .खूप आवडला मला.असेच लेख लिहत रहा

    Superb Sai Tai,,

    ReplyDelete
  2. सद्यपरिस्थितीवर साधं तरीही विचार करायला लावणारं लिहीलयस. खरोखर विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड काळजी करावी अशीच आहे.

    ReplyDelete

Post a Comment