आईपणाची परीक्षा...

 

  आईपणाची परीक्षा...


काय ग...काय सुकली आहेस...चेहरा बघ...लेकाची आठवण येते ना...दुपारचे उन चुकवावे म्हणून मी सकाळी आठच्या ठोक्याला बाहेर पडले होते.  घाईघाईनं सर्व कामं करुन नऊ वाजता घरात परतायचंच हे ठरवलं होतं...तसं झालंही...घराच्या अगदी जवळ आल्यावर काही ओळखीच्या महिलांचा ग्रुप गप्पा मारतांना दिसला.  त्यातल्या सर्व ओळखीच्या...नुसतं हसून पुढे जात होते....तितक्यात त्या सर्व जणी जवळ आल्या...आणि लगेच सरु झाल्या...लेकाला कॉलेजला जाऊन महिना झाला...तो माझ्या सोबत नाही...ही भावना काही जात नाही...सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत...एक क्षणही त्याची आठवण नाही अशी वेळ नाही...पण त्यातूनही मी सावरतेय...हे होणार होतं याची जाणीव होती...अगदी पाच ते सहा वर्षापासून...गेल्या दोन वर्षापासून हा दुरावा होणार याची प्रकर्षानं जाणीव होत होती....मी या दुराव्यासाठी स्वतःला तयार करत होते...पण पाण्यात पडल्यावर पोहणे आणि पाण्याच्या समोर उभं राहून पोहल्यासारखं करणे यात जेवढा फरक, तेवढाच माझ्या सर्व प्रयत्नांमध्ये होता.  आता लेक दूर गावी शिकायला गेल्यापासून खरी परीक्ष सुरु झाली.  गेले महिनाभर रोज स्वतःबरोबर झगडतेय...त्याच्या आठवणीत झुरतेय आणि स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करतेय...आणि या सर्वात असे संवाद मला रोज ऐकायला लागत आहेत.  या सर्व मैत्रिणींबरोबर संवाद साधला...लेकाची खुशाली सांगितली...आणि घर गाठलं...आवराआवर करायला सुरुवात केली.  अर्थात पहिली नजर लेकाच्या टेबलावर गेली...आणि मनात पुन्हा आठवणींची लहर आली...

गेल्या महिन्यापासून मी ज्या अवस्थेला सामोरी जातेय,  त्यातून माझ्या अनेक मैत्रिणी आणि परिचित गेलेले आहेत.  त्यामुळेच लेक जेव्हा जेईईच्या तयारीला लागला, तेव्हाच मलाही तू तयार रहा...असा सल्ला मिळत होता.  माझ्याप्रमाणेच प्रत्येक आईला असा सल्ला मिळतो, आणि तिला तिच्या


मनाची तयारी करावी लागते.  आपली पिल्लं कायम आपल्याजवळच रहावी अशी जगातल्या सर्व आयांची इच्छा असते.  पण ते कधीही शक्य नाही याची जाणीवही आईला असते.  आपल्या मुलांनी मोठं व्हावं,  नाव कमवावं यासाठी प्रत्येक आई प्रयत्नशील असते.  मी त्यात एकटी नाही याची जाणीव मला आहे.  मात्र प्रत्येकावर एक वेळ येते, त्या वेळेतून तिला स्वतःला जावं लागतं.  आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर नवा अनुभव...आणि नवीन मनाची घर्षणं...तशीच अवस्था माझी झाली आहे. 

आत्तापर्यंत मी या अवस्थेतून ज्या माझ्या मैत्रिणी गेल्या आहेत, त्यांना धीर दिला आहे.  छान होईल सर्व,  आपली मुलं खूप मोठी होणार, एकटं समजू नकोस,  आठवण आली...एकटं वाटलं तर कधीही मला फोन कर, माझ्या घरी ये...अशा शब्दांनी मैत्रिणींना आधार दिला आहे.  तेव्हा त्या हो ग नक्कीच असं म्हणत असत....आता तिच वेळ माझ्यावर आली आहे.  माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यामागे भक्कम उभ्या आहेत, तरीही कुठेतरी एकाकीपणाची भावना जाणवते.  काही दिवसांपूर्वी आमच्या मार्गदर्शक आणि लेकाच्या मॅडम भेटल्या...दर्शना सामंत...पहिल्या नजरेतच त्यांनी विचारलं...कशा आहात...काहीतरी बिनसलंय का...असूदे...थोडा वेळ लागेल...महिन्या दोन महिन्यात सावराल...किती विश्वासाचे आणि आधाराचे बोल होते...आमच्या मधुरा भाभीही तशाच...अनुभवी...चार वर्ष झालीत, लेक अमेरिकेला आहे...त्यांचेही अनुभवाचे बोल...थोडा वेळ जाऊदे...हळूहळू सवय होईल...या अस्वस्थेचीही मजा घे...पुढे हाच तुझा अनुभव आणखी कोणाला तरी कामाला येईल...माझ्या जाऊबाई...निशावहिनी तशाच...लेक-सून अमेरिकेला...त्यांनीही अशाच धिराच्या बोलांनी आधार दिलेला...

या आणि अशा अनेक आधाराच्या बोलावर महिना गेला.  या महिन्याभरात घरात गोडधोड नावाला झालं नाही.  ना एखादा खास पदार्थ झाला.  त्याला आवडतं ते...हे वाक्य पुढे येतं होतं.  पण आता त्यातून सावरायला सुरुवात केली.  चार दिवसांपूर्वी घरातले डबे बघितले, सर्व खाली झालेले.  नव-याला लागणारी गव्हाची आणि मुगाची बिस्किटं संपलेली...चिवड्याचा डबा खाली झालेला.  चटण्या...वाटणं संपलेली...लाडवांचा डबा साफ झालेला....तेव्हा पुन्हा मोर्चा स्वयंपाकघरात वळवला...दोन दिवस हे सर्व डबे भरण्यात गेले.  साफसफाई झाली.  चिमण्यांच्या घराला नवा आकार देऊन झाला.  पुन्हा एकएक कामांची उजळणी होऊ लागली.  एकीकडे माझी पुन्हा चालू झालेली धावपळ पाहून नवरा सुखावला...

गेल्या दोन वर्षापासून या सर्वांतून मला जावे लागेल याची माहिती होती.  नवराही सांगायचा...त्याला त्याच्या हातांनी जेऊदे...आता तो बाहेर रहाणार...तेव्हा काय करशील...त्रास होईल तेव्हा...त्यावेळी, तेव्हाचं तेव्हा बघून घेईन...असं सांगून नव-याचा सल्ला धुडकावून लावला होता...मात्र आता प्रत्येक घासाला लेकाची आठवण होते...लेकाला सोडून आल्यावर पहिल्या आठवड्यात जाणवणारा दुरावा आता थोडा कमी झाला आहे.  त्याचाही येणारा नेमका फोन...जेवणाच्या तक्रारी आता कमी झाल्यामुळे आलेला दिलासा...एकूण काय सध्या माझ्या आईपणाची परीक्षा चालू आहे.  रोज नवे सल्ले...रोज नवी परीक्षा...पण प्रत्येकाला या पायरीमधून जावे लागते, याची जाणीव आहे. 


माझी आईही गेली होती...तशीच मी सुद्धा जातेय...स्वतःला तयार करतेय, नव्या भूमिकेसाठी...

गेल्या दोन वर्षात हातात घेतलेली अनेक कामं तशीच गुंडाळून ठेवावी लागली आहेत.  त्या सर्व कामांची यादी खूप मोठी आहे.  पेंन्टींगची माझी अनेक कामं अशी अर्धवट आहेत.  दोन साड्या तयार करायला घेतल्या...पण त्या तशाच गुंडाळून ठेवल्या...साडी हातात घेतली तर किमान दोन तासांची बैठक हवी...तसा वेळच मिळत नव्हता.  आता ते शक्य होणार आहे.  भरतकाम आणि आरीवर्कही तसंच मागे पडलेलं...त्या दिवशी बाहेर पडले होते ती त्यासाठीच...नव्या घेतलेल्या एका साडीवर वर्कचं काम करायला घ्यायचा विचार केला आणि सकाळी आठ वाजताच ते दुकान गाठलं...दुकान अगदी उघडतानाच मी दारात हजर...ओळखीच्या त्या दुकानदारांनी मला हव्या असलेल्या वस्तूंचे बॉक्स समोर ठेवले आणि तो साफसफाई करायला लागला.  मी हव्या त्या वस्तू, टिकल्या, रंगीत दोरे घेतले त्याचे पैसे देऊन घराकडे आले तर वाटेत मैत्रिणींनी गाठलं...पुन्हा लेकाची आठवण...पण आता सावरतेय....त्यांनाही तेच सांगितलं...होणार ग थोडा त्रास होणार...पण तो चांगल्यासाठी गेला आहे दूर...मी बरी आहे, म्हणत त्या सर्वांचा निरोप घेतला...

सध्या लेकाच्या टेबलाचा ताबा मी घेतलाय....भरतकामासाठी लागणारे सामान असणारे वेगवेगळे डबे त्यावर आहेत...आता नवीन आणलेले रंगीत दोरे त्यात ठेवले...टिकल्यांच्या काही पिशव्या तशाच पडल्या होत्या त्या आवरल्या...कारण त्याला पसारा आवडत नाही...हा विचार मनात आला आणि नकळत हसू आलं...हीच तर खरी परीक्षा असते...आईची आणि तिच्या आईपणाची...आपल्या बाळांच्या आठवणी सदैव आपल्याजवळ ठेवत त्यांना उंच आकाशी उडायला पाठवायचे....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. अगदी प्रत्येक आईच्या मनातल लिहीलयस!!

    ReplyDelete
  2. सई, अप्रतिम विषय निवडलास.very touchy लेखनातील सहजता भावली.

    ReplyDelete
  3. सई,खूप छान लेख.अर्थातच सर्व बदल त्रासदायक असतात. But Change is the only costant in life.

    ReplyDelete

Post a Comment