आमची तगमग...आणि
भेटवस्तूंचे मायाजाल....
झालं का नक्की....अजून काही लागणार आहे का....एवढंच....नक्की ना....आम्ही जाऊ....अजून काही सह्या लागणार नाहीत ना...असेच अजून चार प्रश्न समोर बसलेल्या महिला अधिका-यांना विचारले...ती प्रत्येकवेळेला हसून नाही म्हणत होती...आता काही नाही. उद्यापर्यंत तुमच्या लेकाची फी जमा होईल, काही काळजी करु नका...झालं सर्व...एवढं आश्वासन दिल्यावरही मी काही बोलणार होते....तेवढ्यात नव-यानं कमान सांभाळली...आता त्यांच्यावर तरी विश्वास ठेव...मॅडम स्वॉरी, आधी आम्हाला खूप खराब अनुभव आलाय...खूप धावपळ आणि मनस्ताप झालाय....त्यामानानं तुम्ही खूप सहकार्य केलत. आमचं काम झालं. धन्यवाद...आम्ही तिघांनीही त्यांना हात जोडल्यावर संकोचून त्या बाई म्हणाल्या, अहो हे आमचं कामचं आहे. त्यात धन्यवाद कसले...एवढं बोलून त्यांनी लेकाला शुभेच्छा दिल्या...भरपूर अभ्यास कर...मोठा हो....म्हणून आशीर्वाद दिला...त्यांचे ते आश्वासन आणि आश्वासक बोल सोबत घेऊन आम्ही संबंधिक बॅंकेच्या बाहेर आलो. अगदी अर्धा तासापूर्वीच ऑफीसमध्ये आलो होतो, आल्याआल्या आवश्यक ते पेपर आम्हाला तयार ठेवायला सांगितले. त्यांनी ते तपासले. लेकाच्या आणि नव-याच्या सह्या झाल्या...सह्या झाल्यावर पुन्हा एकदा खात्री करुन घेतली आणि आम्हाला ओकेची खूण केली. मोजून पंधरा ते वीस मिनिटीत लेकाच्या एज्युकेशन लोनची प्रक्रीया पूर्ण झाली होती. भर दुपारी उन्हाच्या झळा सहन करत आम्ही त्या कार्यालयाच्या बाहेर पडलो, तरीही हे मोठं काम पूर्ण झाल्याचा आनंद एवढा वाटत होता की, त्या झळाही फार त्रासदायक ठरल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेली ही एज्युकेशन लोनची प्रक्रीया आम्हाला मोठा धडा देणारी ठरली होती.
गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लेकाचे कॉलेज नक्की झाल्यावर एज्युकेशन लोन कुठून घ्यायचं याबाबत विचार सुरु झाला. नव-याचा पक्का विश्वास मोठ्या सरकारी बॅंकेवर...थोडा वेळ जाईल...कागदपत्र अधिक लागतील...पण विश्वासपात्र आहे. आपण सर्व पद्धतशीरपणे करुया...तू काही काळजी करु नकोस मी सर्व व्यवस्थित करतो...म्हणून त्यांनी मला आश्वासीत केले. तरीही काळजी करण्याचा माझा स्वभाव काही स्वस्थ बसू देत नव्हता. नेहमी ए प्लॅन असावा आणि त्याच्या मागे प्लॅन बी सुद्धा असावा...अशा मताची मी...त्यामुळे नवरा लोनच्या पेपरची तयारी करत असतांना मी दुस-या एका सरकारीच, पण त्यामानानं लहान असलेल्या बॅंकेत जाऊन चौकशी करुन आले...कोणते पेपर द्यायचे आहेत याची माहिती घेतली...मात्र याआधी नव-यानं फाईल तयार करायला घेतली आणि मी जमा केलेली माहिती माझ्याकडे ठेवली. पुढचा सगळा आठवडा संबंधित बॅंकेने सांगितलेले पेपर झेरॉक्स करण्यात आणि ते बॅंकेकडे जमा करण्यात गेले. साधारण पंधरा दिवस हे रांगा लावण्यात, झेरॉक्स काढण्यात, आणि आवश्याक ते पेपर जमा करण्यात गेले. फाईल जवळपास शंभरपेक्षा अधिक पानांची झाली असेल. मग मुलाचा नंबर लागला. त्यालाही पेपरवर सह्या करण्यासाठी फे-या माराव्या लागल्या. एव्हाना त्याचे लेक्चर सुरु झाले होते. पण व्हीटामीन एम कधीही महत्त्वाचे...म्हणून त्या ऑनलाईन लेक्चरला खाडा करुन तोही बॅंकेमध्ये फे-या मारु लागला. डिसेंबर महिन्यात एकदाची फाईल ओके असल्याची खात्री संबंधित अधिका-यांनी दिली आणि आम्ही मोकळा श्वास घेतला. एवढंच नाही तर आमचे फाईल वर्क खूप छान असल्याचेही त्यांनी सांगितले. मग काय, आपलं कामचं झालं या आनंदात आम्ही राहिलो...
इकडे एकएक महिना जात होता...पण अजून काही प्रोसेस झाल्याचा संदेश
आला नाही म्हणून मी नव-याला विचारायला सुरुवात केली. तेव्हा जरा विश्वास ठेव...आपलं सर्व काम होणार आहे, म्हणून तो खात्री देऊ लागला. दरम्यान बॅंकेकडून आमच्या घराची पहाणी करण्यात आली...लोनची एक प्रक्रीया पुढे गेली....म्हणून आम्हाला दिलासा मिळाला...हे होता होता फेब्रुवारी महिना आला...लेकाचं ऑफलाईन कॉलेज सुरु होणार म्हणून मेल आल्यावर मात्र माझा संयम संपला...आत्ता तू काहीतरी नक्की कर...बॅंकेत खात्री कर....तीन महिने होत आले...अजून लोन झालं नाही...नक्की काय ते विचारुया म्हणून माझी घालमेल सुरु झाली. नवराही थोडा काळजीत पडला...मग पुन्हा फोनाफोनी सुरु झाली...तेव्हा आमच्या ओके असलेल्या फाईलमध्ये कायकाय त्रुटी आहेत. याची माहिती द्यायला सुरुवात झाली. कधी चेक चुकलाय...कधी पेपर नाही...तर कधी अजून काही नाही....आम्ही दोघांनीही डोक्याला हात लावला...एवढे दिवस का नाही सांगितले...या प्रश्नावर मात्र उत्तर नव्हते...आता काय करायचे....लेक पंधरा दिवसांनी कॉलेजला जाणार होता, तेव्हापर्यंत कसे होणार म्हणून दोघेही काळजीत पडलो...शेवटी ज्या दुस-या बॅंकेत मी आधी चौकशी केली होती, तेथे आम्ही दोघंही गेलो. तिथल्या व्यवस्थापकांनं लेकाचं कॉलेज बघितलं, आणि म्हणाला, अरे हा स्कॉलरलोनवाला मुलगा आहे...तुम्हाला काही माहिती नाही का...आम्ही दोघांनीही माना हलवल्या...मग त्यांनी सर्व प्रक्रीया समजून सांगितली...आयआयटी आणि तस्सम कॉलेजसाठी स्कॉलर्स लोनची प्रक्रीया असते...इंडरेस्ट अगदी कमी...आणि अन्य काही सुविधाही मुलांसाठी असतात. त्यात माझ्या लेकाचं कॉलेजही होतं....त्या व्यवस्थापकानं स्वतः बाजुला बसत सर्व फॉर्म भरुन दिला आणि या मुलांनी आमच्याकडे लोन घेतलं तर आम्हाला आनंदच होईल म्हणून आम्हा दोघांना विश्वास दिला. हा अनुभव आम्हाला नवीन होता...आत्तापर्यंत आम्ही ज्या बॅंकेत तीन महिने लोनसाठी वाया घालवले होते, त्यांनी आम्हाला काडीचीही माहिती याबाबत दिली नव्हती. उलट आम्ही त्याबाबत विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी पहिली सर्व प्रक्रीया थांबवून आम्हाला आपल्याकडून लोन नको आहे, असा अर्ज त्या बॅंकेत दिला. आपण समोरच्या विद्यार्थ्यांचे...त्याच्या पालकांचे तीन महिने वाया घालवलेत, त्यासोबत त्याचे झेरॉक्सचे किमान तीन हजारही वाया घालवले आहेत आणि त्याला मानसिक त्रास दिला आहे, याची कोणतीही तमा न बाळगता, त्या अधिका-यांनी आमची फाईल आमच्यासमोर रद्द केली. अत्यंत शांतपणे आमच्या एकूण एक पेपरवर रिजेक्टटेड असा शिक्का मारण्यात अर्धा तास घालवला...त्या दरम्यान आम्ही दोघंही शांतपणे बघत होतो...ही रिजेक्टेड फाईल आमच्या हातात देऊन ते त्यांच्या कामाला लागले...आणि आम्ही हताशपणे सरकारी अनुभव घेत बाहेर पडलो.
घरी आल्यावर पुन्हा दुसरी फाईल करायला सुरुवात केली. कारण हातात अवघे पंधरा दिवस होते. एकीकडे लेकाची जायची तयारी...तर दुसरीकडे बॅंकेचे लोन...एका दिवसात ही दुस-या बॅंकेसाठी लागणारी फाईल तयार केली आणि सकाळी पहिला नंबर बॅंकेत लावला. पुन्हा त्या व्यवस्थापकानं आम्हाला त्याच्या साध्या स्वभावानं आपलंस केलं...लेकाला जवळ बसवून घेतलं...काही पेपर कमी होते, झेरॉक्ससची कमी होती...मात्र त्यानं, अरे भाई जरा इसका काम करो, स्कॉलर्सलोनका बच्चा है, म्हणत आमचं काम केलं....तब्बल दोन तास त्यांनी घेतले....पण काम जवळपास पूर्ण झालं. अगदी एक-दोन पेपर आमच्याकडून राहिले होते. ते कुठले, त्यांच्या किती झेरॉक्स, त्यावर कुठे सह्या याची सर्व माहिती त्यांनी आम्हाला एका स्वतंत्र पेपरवर लिहून दिली. आणि दुस-या दिवशी या म्हणून सांगितले...आम्ही पुन्हा काळजीत, काम होईल की नाही...पण दुस-या दिवशी गेल्यावर सुखद धक्का होता. त्या
व्यवस्थापकानं आमची सर्व फाईल पुढे पाठवली होती. बाकीचे पेपर मेलद्वारे पाठवून दिले...घरी आल्यावर दोन तासात त्याचा फोन आला...फाईल ओके आहे. पुढे पाठवली आहे...साधारण दहा ते पंधरा दिवसात तुमचं काम होईल...पण आमचा प्रश्न होताच...लेक जाणार होता...त्याच्या सह्यांचा प्रश्न होताच...तेव्हा, पुन्हा त्यांनी मार्ग सांगितला...सर्व ओके होऊदे...मुलगा गेला तरी चालेल, तो जेव्हा येईल तेव्हा त्याची पेपरवर सही घेऊ, तुम्ही तोपर्यंत त्याची जी फी भरली असेल ती आम्ही तेव्हा तुमच्या खात्यात जमा करु...काळजी करुन नका...म्हणून विश्वास दिला...त्याच्यावर विश्वास ठेवत आम्ही सर्व प्रक्रीया केली.
आत्ता बरोबर सव्वा महिन्यांनी लेक परत आला...आठवड्याभराची सुट्टी
होती...त्यात हे बॅंकेचं काम महत्त्वाचं होतं.
आला त्यादिवशीच त्याला घेऊन ठाण्यात बॅंकेत गेलो...त्याआधी चारवेळा तेथील
अधिकारी महिलेनं कोणते पेपर, फोटो, घेऊन यायचे आहेत याची माहिती दिली होती. दरम्यान तेथील अन्य अधिका-यांनीही आमचे काम
कितपत झाले आहे, याची फोनवरुन माहिती घेतली होती...आम्ही दिलेल्या वेळेत बॅंकेत
दाखल झालो आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनीटात सर्व प्रक्रीया पूर्ण झाली. अत्यंत सौजन्यशील वागणूक...आपुलकी...मुलाची
चौकशी...त्यामुळेच तिथून बाहेर पडलो तेव्हा ऊन तापले होते तरीही आम्हाला ते सुखद
वाटत होते. दुस-यादिवशी दुपारपर्यंत
लेकाच्या कॉलेजमध्ये फी जमा झाल्याची रिसिट मिळाली...आम्ही पुन्हा धन्यवाद म्हणून
संबंधित अधिका-यांना फोन केला...तेव्हाही त्यांचे आश्वासित बोल अहो, कशाला
धन्यवाद...आमचं कामचं आहे ते...काळजी करु नका...लेकाला भरपूर शुभेच्छा...
आम्ही एकदाचा मोकळा श्वास घेतला...त्याचवेळी टिव्हीवर बातम्या चालू
होत्या...पन्नास लाखांच्या घड्याळाची गोष्ट चालू होती...मनात आलं, आम्ही या सर्व
प्रक्रीयेमध्ये एवढे भरडलो होतो की नको ते लोन असं झालं होतं...तर गावपातळीवर काय
अवस्था असेल...अशा लाखांच्या घड्याळांच्या भेटी ऐवजी या मुलांच्या शिक्षणावर खर्च
केला तर...अर्थात या तर चे उत्तर कधीच नसणार...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
आदरणीय सई जी मुलांचे शिक्षण आणि त्यांची प्रगती हेच आपल्या आयुष्यातील मुख्य ध्येय ठेवून जे वाटचाल करतात तेच आपल आयुष्य सार्थकी लावतात...
ReplyDeleteअपन कितीही कमावले आणि आपले मूल चांगले नाही निघाले तर कमवून उपयोग नाही आणि कमी कमाई केली तरी हरकत नाही कारण
मूल चांगले निघाले तर तेच कमाई करून घेते
अपन छान लिहले त्या बद्दल आपले हार्दिक कौतुक
सध्याची वस्तुस्थिति आहे ही। काहीच तसे अलिकडे सरळ भासत नाही। शिकणार्य मुलांचा तरी नीट झाले पाहिजे । गोष्ठी सुलभ करायला पाहिजे की नाही
ReplyDelete