एका सुखाच्या गोळ्यासाठी....
दोन्ही हातांनी त्या अत्यंत नाजूक आणि जगातील सर्वात चवदार....रसदार फळांची साल सोलली....आणि अख्ख्या फळाचा एक घास घेतला...आहाहा....याच स्वर्गीय स्वादासाठी केलेला अट्टहास पूर्णत्वास गेल्याचे समाधान वाटले...तिच अवस्था पतीची...मोठा घास घेतलेल्या पतीनं समाधानानं मान हलवली आणि हातांनी एक नंबर अशी खूण केली...मी हसून पुन्हा पुढच्या फळाकडे वळले...हे स्वर्गीय फळ म्हणजे, ताडगोळे...रसाळ...चवदार...पाणीदार...ताडगोळ्यांना अशी अनेक नाव मी दिली आहेत. लहानपणी जेव्हा पहिल्यांदा या फळाचा रसाळ गोळा तोंडात घेतला होता...तेव्हापासूनच ताळगोळ्यांच्या मी प्रेमात पडले. अगदी लहान असतांना ताडगोळे सोलतांना तारांबळ व्हायची...ब-याचवेळा त्यातलं अगदी चमचाभर...पण अविट चविचं पाणी पडून जायचं...पण नंतर वाढत्या वयाबरोबर पाण्यासकट ताडगोळा सोलण्याची कला आत्मसात झाली...आणि मग तो हळूवार गोळा तोंडात टाकल्यावर येणा- अदभूत समाधानाचा स्वाद घ्यायला शिकले...काही फळांची चव ही त्या-त्या प्रदेशातल्या पाण्याच्या चवीप्रमाणे बदलते...कधी एकाच फळाच्या अनेक जाती-उपजाती असतात...पण ताडगोळा हा एकमेव असा प्रकार आहे, जो कुठेही खा...त्याची चव मात्र तिच...गोडी तिच...तोच रसाळपणा...आणि हा अवघा गोळा तोंडात गेल्यावर मिळणारं समाधानही तेही तसेच...
उन्हाच्या झळा तापायला लागल्या....तशा एकएक वस्तू घरात यायला लागल्या. खास उन्हाळी असा शिक्का त्यांच्यावर बसलेला असतो. मार्च महिना गडबडीत गेला तरी उन्हाळी शिक्का बसलेली फळं घरी यायला सुरुवात झाली. अगदी लेक येणार म्हणून आंबाही घरी आला. अर्थात नेहमीप्रमाणे पहिला आंबा काही खास निघाला नाही. पण लेकाला हापूस खाता आला येवढंच समाधान त्यावर झालं. पण त्यासोबत अन्य उन्हाळी फळांचीही आमच्याकडे चलती असते. कलिंगड तर अगदी नेहमीचंच...दोन दिवसाआड ते हक्कांनी घरी येणार...ओल्या काजूंनीही डबे भरुन झाले. पण या सर्वात एकाची कमी वाटत होती, ती म्हणजे ताडगोळ्यांची. बरं आमच्याकडे ताडगोळे मिळत नाहीत असं नाही. पण गाडीवर बहुधा भय्ये ताडगोळ्यांच्या नावाने जे फळ विकतात ते कधी आमच्या पचनी पडलंच नाही. लग्न करुन डोंबिवलीत आल्यावर पहिल्यांदाच ताडगोळे असे गाडीवरही मिळतात हे बघायला मिळालं. आणि हट्टांनी ते नव-याला घ्यायला लावले होते. तेव्हा त्यांनी आधीच तुला आवडणार नाहीत....खूप कडक असतात...सोलतांना त्रास होतो, अशी नकारात्मक बाराखडी सुरु केली. मी रेवदंड्याची...आमच्या चौल..रेवदंड्यात ताडगोळा म्हणजे स्वर्गसुखासारखा...आत्तापर्यंत तरी तसाच अनुभव मला होता. त्यामुळे पहिल्यांदाच नव-यानं मला ताडगोळ्यांबाबत सांगितल्यावर मी त्याचीच खिल्ली उडवली होती. तुम्हाला काही खाता येत नाही...खायची माहिती नाही...ताडगोळे कधी खाल्लेत का...म्हणत मी त्याला त्या विक्रेत्यासमोरच ओरडले होते...त्या भय्याकडून चांगले दोन डझन ताडगोळे विकत घेतले...नव-यानं गपचूप पैसे दिले...घरी आल्यावर मी आधी त्या ताडगोळ्यांवर ताव मारायला बसले...नव-यालाही बाजुला बसवून
घेतलं...ताडगोळे अख्खे सोलायची कला असते...बघा मी तुम्हाला दाखवते...म्हणत सुरु केली...पण हा काहीतरी वेगळाच प्रकार होता. आत्तापर्यंत मी जे ताडगोळे खाल्ले होते, त्यांची साल हळूवारपणे निघायची....पण या ताडगोळ्यांची साल निघत नव्हतीच...पण ताडगोळाही अगदी कडक...शेवटी सुरीच्या सहाय्यानं ताडगोळे सोलले...आणि खाण्याचा प्रयत्न केल्यावर अपराध केल्याच्या नजरेने नव-याकडे बघितले...विजयी नजरेनं नवरा माझ्याकडेच बघत होता....बघ मी तुला आधीच सांगितलं होतं...मी हताशपणे त्या ताडगोळ्यांकडे बघत होते...दोन डझन ताडगोळ्यांपैकी एक ना एक अगदी सर्वच दगडासारखे होते...माझा आत्तापर्यंतचा हा पहिलाच अनुभव...आमच्या गावाकडे असे दगड नसतात म्हणून मी हिरमुसले होते तेव्हा...
तेव्हा ठाण्याला नोकरीनिमित्त जायचे. नागरिक स्टोअर, कौपिनेश्वर मंदिर करत तलावपाली परिसर गाठायचा...रोज सकाळी नऊच्या सुमारास या गल्लीला बहार आलेला असतो. अशाच एका दिवशी मला कौपिनेश्वर मंदिराजवळ ताडगोळे विकणा-या काही महिला दिसल्या. टोपलीमध्ये ताडगोळे त्यांनी मांडून ठेवले होते. वर केळीची पानं लावून त्यांना उनापासून वाचवण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या...एरवी या गल्लीतून जातांना भाजी..फुलांची खरेदी मी करत असे...अनपेक्षित ताडगोळे दिसल्यावर ते घेण्यासाठी पुढे झाले. पण तशीच माघारीही फिरले. कारण अगदी एक महिन्यापूर्वीच दगडी ताडगोळ्यांचा अनुभव आला होता. तेव्हा नवरा काही बोलला नसला तरी...अधून मधून चिडवाचिडवी चालू होती...म्हणून मी माझ्या मोहाला आवर घातला. पण नंतर रोज त्या महिला ताडगोळे विकतांना दिसू लागल्या. त्यांच्या ठराविक जागा होत्या...आणि घेणारेही चांगली गर्दी करत होतो. आठवडाभर असे ताडगोळे दर्शन झाल्यावर मी एकदिवस नव-याला त्यांच्याबाबत सांगितले....तेव्हा त्यांनी आधी आलेल्या अनुभवाची उजळणी केली. आणि कधीतरी चौल-रेवदंड्याला ताडगोळे खायला जाऊया म्हणून माझी समजूत काढली. एव्हाना ठाण्याचा माक्रेट गल्लीमध्ये काही भाजी विक्रेत्या ओळखीच्या झाल्या होत्या...एकदिवस त्यांच्याकडून भाजी घेतांना मी त्यांनाच हे ताडगोळे चांगले असतील का म्हणून विचारलं. तर त्यांनी अगदी हमी दिली...ताई एकदा घेऊनच बघा, अहो आमच्या गावतल्याच बायका आहेत या....घरचे ताडगोळे आहेत...ते गाड्यांवर मिळतात तसले कडक नसतात...रात्री ताडाच्या झाडांवरुन काढतात...आणि पहाटे सोलतात...तुम्ही एकदा घेऊन बघाच...म्हणून त्या भाजीवाल्या मागे लागल्या...मी मोजून सहा ताडगोळे घेतले...त्यांनी तेव्हा केळीच्या पानात बांधले आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत दिले...खाऊन बघा आणि उद्या येतांना डबा आणा म्हणजे चांगले रहातील दिवसभर असा सल्लाही दिला...मी हो म्हणत, ऑफीस गाठलं...ती पिशवी तशीच सांभाळून बाजूला ठेऊन दिली. दुपारी जेवणाच्या सुट्टीत त्या ताडगोळ्यांची आठवण झाली. सहज म्हणून एक ताडगोळा काढला आणि सोलून तोंडात टाकला...आणि आमची रेवदंड्याची चव चाखल्याचा आनंद झाला. एकूण सहा ताडगोळे घेतले होते...एक कसाबसा नव-यासाठी राखून ठेवला. संध्याकाळी ट्रेनला होणारी गर्दी लक्षात घेऊन जेवणाच्या डब्यात हळूवारपणे तो सांभाळून घरी नेला आणि घरी आल्यावर पहिल्यांदा नव-याला
तो सोललेला, मउसर ताडगोळा पुढे केला...तोही खूष...दुस-या दिवशी मी मोठा डबा घेऊन त्या ताडगोळे विक्रेत्या महिलेच्या समोर हजर झाले होते....काहीही न बोलता हसत डबा पुढे केला...तेव्हा ती म्हणाली, बघा ताई, अहो आमचे घरचे ताडगोळे आहेत... डबा भरुन ते ताडगोळे घेतले. तिने सांगितलेले पैसे दिले...तेव्हापासून सुरु झालेला हा उन्हाळी ताडगोळ्यांच्या आनंदचा सिलसिला आत्तापर्यंत चालू आहे...जवळपास वीस वर्ष होऊन गेली असतील...ठाण्यातील नोकरी सुटली...रोजची ठाण्याची फेरी होईनाशी झाली. पण ताडगोळ्यांच्या आणि ओल्या काजूंच्या ओढीनं मार्च महिना सुरु झाला की अजूनही न चुकता आठवड्यातून एकदा तरी ठाण्याला जाते...अर्थात कोरोनामुळे गेलेली दोन वर्ष वजा केली तर ही ताडगोळ्यांची फेरी कधीही चुकवली नाही.
आत्ताही धावपळत ठाण्याला गेले. कौपिनेश्वर मंदिराच्या आसपास या सर्व महिला बसलेल्या होत्या. गेल्या कित्येक वर्षापासून आमची ओळख...एकमेकींची नावं माहित नाहीत...पण चेहरे ओळखीचे...अगदी चेह-यावर मास्क असूनही एक-दोघींनी ओळखले...ताई कशा आहात...बघा खूप छान आहेत...म्हणत एकीनं माझा डब्या ताब्यात घेतला...आता तिच्यासोबत तिची सूनपण कधीतरी येते....तेही सांगून ठेवलं. मी नसले तर इथेच सून असेल, तिच्याकडून घ्या...म्हणून निरोप दिला...मी तो ताडगोळ्यांचा भरलेला डबा...ओले काजू आणि हिरव्या करवंदाचा वाटा घेऊन परत घर गाठलं...संध्याकाळी चारच्या सुमारास तो डबा घेतला...यात वाटणी नाहीच...जो जेवढे सोलेल...तेवढे त्याचे...हा साधा सरळ नियम...लेकाची आठवण करत आम्ही दोघांनीही ही खेळीमेळीची आणि चवीची स्पर्धा सुरु केली...यात कोणी किती खाल्ले पेक्षा खातांना किती आस्वाद घेतला हा आनंदच जास्त होता...
मला आठवलं काही वर्षापूर्वी माझं ताडगोळ्यांचं वेड माहित असलेल्या एका
हौशी मैत्रिणीनं मला ताडगोळ्यांचं आईसक्रीम खायला बोलवलं होतं...ताडगोळ्यांचं
आईसक्रीम...मी तेव्हाच तिच्यावर ओरडले होते...एवढे अत्याचार मी माझ्या आवडत्या
फळावर करणार नाही....आणि असे अत्याचार केलेला पदार्थ मी खाणार नाही, म्हणून मी
चक्क नकार दिला होता...ताडगोळा हा असा प्रकार आहे की त्याच्यावर कुठलेही संस्कार न
करता तो थेट तोंडात आणि तिथून पोटात गेला पाहिजे....त्याच्यावर मिठ, मिरची, चाट
मसाला घालून खाणारी मंडळीही मी पाहिली आहेत.
पण अशा अघोरी प्रकारांवर मी कधीही विश्वास ठेवला नाही....कारण हे अमृतफळ
आहे...जो हा रसाळ गोळा खातो तोच या अमृताची चव चाखतो....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
अप्रतिम......ताडगोळे
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteताडगोळे माझ्या नवऱ्याचा पण वीक पॉइंट आहे. तू अचूक वर्णन केलं आहेस.. कधी कधी फसवतात हे फेरीवाले!! पण लुसलुशीत ताडगोळा म्हणजे सुख असतं!! खरंच अमृतफळ 🌺
ReplyDeleteधन्यवाद मॅडम...
Deleteमला ही ताडगोळे
ReplyDeleteखूप आवडतात। पण लेखातले ताडगोळे वाचल्यावर खायलाच पाहिजे या हंगामात ही जाणीव झाली आज।
नक्कीच....धन्यवाद...
Delete