लोकलचा प्रवास आणि अनुभवाची भर....
मंबई लोकल....अर्थात आमची लाडकी ट्रेन म्हणजे फक्त येण्या-जाण्यासाठी सोयीची वाहतूक व्यवस्था नाही. तर लोकल म्हणजे जीवन...आणि अनुभवाचा एक समृद्ध खजिना आहे. कधीही जा...खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये अनेक भाषांची, स्वभावाची माणसं एकत्र प्रवास करतात...अनेक अनोळखी माणसं एकत्र येतात-जातात....सोबत अनेक आठवणी...अनुभव देऊन जातात...असाच एक अनुभव माझ्या पदरात पडला....रविवारी ठाण्यापर्यंत प्रवास केला...सुट्टीचा दिवस...तरीही ट्रेनला नेहमीसारखी गर्दी...अगदी रात्री अकरा वाजताही. नव-यानं खूप आग्रह केला, एकत्र प्रवास करुया...पण त्याच्या आग्रहाला टाळून मी महिलांचा डबा गाठला...चढायला ब-यापैकी गर्दी असली तरी जागा मिळाली. समोरच्या जागेवर एक आगळी जोडी बसली...डोंबिवली गाठेपर्यंत या दोघींनी माझे सर्व लक्ष वेधून घेतले. आई आणि मुलगी...आई साधारण साठी ओलांडलेली आणि मुलगी चाळीशीपार असावी...दोघीही छान तयार झालेल्या...बहुधा लग्नाला गेल्या असाव्यात...आई शांतपणे बसलेली होती...आणि मुलगी मात्र प्रचंड वैतागलेली होती...आई, तुला काही कळतं की नाही...काय पटकन बोललीस...त्याचे केस कसे का असेना...तुला काय करायचं होतं...एवढ्या लोकात बोलायचं का असं....मुलगी पटापट आईला बोलत होती...पण आई शांत होती...अग मला काय माहित त्यांनी पांढरा रंग लावलाय ते केसाला...मला वाटलं तरणा पोरगा, म्हातारा कसा झाला...एका क्षणापूर्वी चिडलेली ती मुलगी आईच्या त्या उत्तरानं शांत झाली...एकदम हसायला लागली...काय ग आई, कधी सुधारणार तू...म्हणत त्या मायलेकी हसत एकमेकींच्या गळ्यात पडल्या आणि गप्पांमध्ये गुंतून गेल्या....
आम्ही रविवारी, अनेक दिवसांनी ठाणं गाठलं होतं. त्यामुळे कामांची मोठी लिस्ट होती. सर्व हाईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले, ट्रेनला कमी गर्दी असेल, जेण्डसमधून जाऊया...म्हणून नवरा आग्रही होता...पण ट्रेनचा रागरंग पाहून ठरवूया म्हणून मी महिला डब्यात जाण्याच्या आग्रहावर ठाम राहीले. ट्रेन आल्यावर गर्दी बघितल्यावर नव-यानं त्याचा डबा पकडला आणि मी महिला डबा. बराचशा महिला ठाण्यात उतरल्यानं डबा खाली होता. जागा मिळाली. माझ्यासोबत चढलेल्या काही बायका समोरच्या आडव्या बाकड्यावर बसल्या. त्यातच ही आई-लेकीची जोडी होती. त्यांच्या बोलण्यावरुन समजलं की दोघीही कोणा नातेवाईकाच्या लग्नाला गेल्या होत्या. त्या लग्नात त्यांच्या कोणा नातेवाईकाच्या तरुण मुलांनी केसांना चंदेरी लुक दिला होता. नवीन फॅशन. या आईंना काही ते समजलं नाही. तो तुरुण मुलागा त्यांच्यासमोर आल्यावर त्यांना वाटले की, त्याचे केसच पिकले आहेत. त्यांनी त्या मुलाला तसे विचारलेही...सगळ्या कुटुंबासमोर असला प्रश्न आल्यामुळे तो मुलगा आणि त्याचे आईवडील बावचळले होते. आणि इकडे या आईंची मुलगी आणि अन्य नातेवाईकही गोंधळले...शेवटी कोणीतरी मध्ये पडून ती आत्ताची फॅशन आहे, म्हणून वेळ मारुन नेली...पण त्यावेळी मोठा हशा झाला होता...त्या मुलाचा, आणि त्याच्या आई वडीलांचा चेहरा पडला होता. त्यांना नक्की वाईट वाटलं असणार...म्हणून या आईंची लेक काळजीत पडली होती. त्या समारंभात आईला बोलता आलं नव्हतं...आता ट्रेनमध्ये चढल्या चढल्या ही लेक सुरु झाली. पण त्या माऊलीला तिने काय चूक केली आहे तेच समजेना...एवढ्या तरुण वयात त्या पोराचे केस कसे पिकले हाच प्रश्न तिला सतावत होता...म्हणून तिनं विचारलं...आणि असं पटकन...सर्वासमोर विचारायचं नसतं म्हणून ती लेक आईला दटावत होती...आता त्यांना काय वाटेल...हे लेकीनं म्हटल्यावर...असली कसली फॅशन...आता ती त्याची आईच त्याला ओरडेल...परत ते पोरगं केस काळे करेल बघ...अस निरागस उत्तर त्या आईनं दिलं...एव्हाना लेकीच्या रागाचा टेम्पोही उतरला होता...दोघीही पुन्हा माय-लेकीच्या नात्याकडे वळल्या होत्या...आईचा डायलॉग ऐकून लेक चांगली खळखळून हसू लागली. दोघींनी हातावर टाळ्या दिल्या...आणि दोन्हीही त्या
समारंभातल्या गप्पांमध्ये रंगून गेल्या. कोण कोण भेटलं...कोण काय बोललं...यावर त्या दोघींच्या गप्पा चालू झाल्या...ट्रेननंही एकएक स्टेशन सोडलं...दिवा सोडल्यावर जवळपास सर्व ट्रेन खाली झाली...मला आणि माझ्या समोर बसलेल्या या दोघींना विंडो सिट मिळाली...तितक्यात दोन फेरीवाल्या आल्या...एकीकडे कानातले...आणि दुसरीकडे गृहउपयोगी वस्तू होत्या...हॅंगरला लावलेल्या वस्तू गोल गोल फिरत होत्या...त्या मायलेकींनी कानातले असलेल्या ट्रेचा ताबा घेतला...आईंनं दोन-तीन कानातले लेकीसाठी निवडले...तीने लेकीच्या हातात दिले....हे घे, तुला छान दिसतील...पण लेकीला काही ते आवडले नाहीत...मला एवढे मोठे नको, मला चांगले नाही दिसणार, म्हणत तिनं ते पुन्हा ट्रे मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला...आई म्हणाली, घे, चांगले दिसतील तुला...तेवढ्यात लेकींनं त्या हॅंगरला लटकवलेल्या वस्तूंचा ताबा घेतला. आईला काही विचारलं...हे आहे का तुझ्याकडे...हे घेते थांब...तिनं आईसाठी काही घेतलं...अर्थात त्यांची खरेदी झाल्यावर मी सुद्धा कानातल्या ट्रेचा ताबा घेतला...कारण कितीही वाजता ट्रेनमधून प्रवास केला तरी काहीतरी खरेदी करावी हा पहिला नियम...त्यानुसार अगदी दोन कानातल्यांचे जोड घेतले...आणि पुन्हा त्या मायलेकींमध्ये गुंतून गेले. डोंबिवली येण्याची वेळ झाली. तेवढ्यात लेकीला काहीतरी आठवलं...अग विसरलोच आपण...तिनं पर्समधून दोन मिल्कशेकचे कॅन काढले. लेकीनं स्ट्रॉ काढून आईच्या हातात मिल्कशेक दिले आणि स्वतः पण प्यायला लागली. स्टेशनही आले, दोघीही बॅगा सांभाळत उठल्या...मुलीच्या ओठांवर मिल्कशेक लागले होते...आईनं आपल्या हातातल्या रुमालानं ते पुसले, दोघींनी एकमेकींचा हात घट्ट धरला आणि त्या उतरण्यासाठी सज्ज झाल्या...मी त्या दोघींच्या पाठोपाठ होते. एकच रिक्षा करुया...मी तुला बिल्डींगच्या खाली सोडते आणि मगच जाते...मुलींनं सांगितल्यावर आई हो म्हणाली...त्या दोघीही सावकाश उतरल्या...दोघीही तशाच हातात हात घालून चालत होत्या...मजेत गप्पा मारत होत्या...रात्रीचे बारा वाजायला आले होते...पण या दोघींना काहीही फरक पडत नव्हत्या...त्या एकमेकींसाठी बस्स होत्या...त्यांच्याकडे पहात मला माझ्या आईची आठवण येत होती....मागून नवरा आला...त्यानं पक्का ट्रेनवाला प्रश्न विचारला...जागा मिळाली होती का...मी हसून हो म्हटलं...विंडो सिट...दोन कानातल्यांचे जोड आणि एक छान अनुभव....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Comments
Post a Comment