अनंताच्या फुलाची मोहीनी...

 

  अनंताच्या फुलाची मोहीनी...


आत्ता बस्स झालं...तो बंगल्यातला माणूस आला तर ओरडेल...तसं झालं तर मी पुढे निघून जाईन...तुझं तू बघून घे...म्हणत नव-यानं हातात पकडलेली अनंताच्या झाडाची फांदी सोडून दिली...आणि हातातली फुलं...कळ्या...माझ्या हातात कोंबलींच...आणि तरातरा चालत तो पुढे चालू लागला...मी माझ्या हातातल्या पिशवीत त्या अनंताच्या कळ्या आणि फुलं निट ठेवली आणि नव-याला गाठण्याचा प्रयत्न करु लागले.  दर रविवारी चालण्याचा कार्यक्रम या अशा चो-यांसाठी ठेवला आहेस का ते सांग आधी...नवरा राग आल्याचं नाटक करीत विचारत होता...कारण दर रविवारी योगाला विराम देऊन लांब फेरी मारायची असा हट्ट मी धरला...सोबत येतांना त्या वाटेवर असलेल्या एकदम चविष्ट असा वडापाव खाऊन येऊ शकतो, असे लालूच दाखवले.  रविवार आहे, एक दिवस डायट बाजूला ठेऊन वडापाव खायचा...पण त्यासाठी तासभर चालावे लागेल...पहिल्यांदा रविवारी सकाळी उठून चालायला जाण्यासाठी कुरकुर करणारा नवरा त्या वडापावमुळे बहुधा तयार झाला...आणि आता दर रविवारी टेकडीपर्यंत प्रभात फेरीचा कार्यक्रम नक्की झाला...पहिल्या-दुस-या रविवारी येतांना आणि जातांना आसपासच्या झाडांचा अंदाज घेतला...तेव्हाच एका बंगल्याच्या बाहेर डोकवणा-या अनंताच्या झाडानं मोहवलं होतं.  वाटेत काही बकुळीची झाडंही लागली. पहिल्या फेरीनंतर पुढच्या रविवारी या सर्वांसाठी एक पिशवी घ्यायचं ठरवलं होतं...त्यातूनच टेकडीवरुन परत येतांना नवरा उल्लेख करीत असलेली चोरी करण्याचा मोह मला आवरला नाही...एका बंगल्यातील अनंत मनमुराद मोहरला होता...त्याचा काही भाग बंगल्याच्या कुंपणाच्या भिंतीच्या बाहेर डोकवत होता...तिच फांदी नव-याला विनंती करुन


आणखी बाहेर ओढायला लावली होती...आणि त्यावरची ती पांढरी शुभ्र सुवासिक फुलं तोडली होती...सोबत काही कळ्याही दिसल्या...त्यावरही हात चालवला...त्यामुळेच वैतागलेल्या नव-यानं ती फांदी सोडून दिली...आणि आपली वाट धरली होती...

अनंताच्या फुलाची ज्याला माहिती असेल त्याला या फुलाची मोहीनी म्हणजे काय याची कल्पना असणारच...पांढ-या रंगाचे...भरगच्च पाकळ्या असणारे...मध्येच पिवळ्या रंगाच्या परागकणांनी सजलेले आणि हळुवार हिरव्या रंगाच्या आवरणांनी सजलेल्या या फुलाचे खरे सौदर्य त्याच्या सुगंधामध्ये दडलेले असते.  दूरुन अगदी साधे दिसले तरी या फुलाच्या जवळ गेल्यावर त्याचा तो हळूवार सुगंध आपल्याला त्या फुलाकडे खेचून घेतो...ते कायमचा...लहानपणी आमच्या रेवदंडा गावात या फुलाची आणि माझी मैत्री जुळली.  रेवदंडा-चौल भागात जवळपास सर्वच घराच्या अंगणात आणि अंगणाबाहेरही अनंताची झाडं आहेत.  देवाला फुलं विकत घेण्याची वेळ येथे कधी आलीच नाही.  घरच्या अनंताची आणि तगरीच्या पांढ-या फुलांनी घरातले देव सजून जायचे.  लाल, पिवळ्या, गुलाबी रंगाच्या जास्वंदीची फुले त्या पांढ-या फुलांवर खुलून दिसायची...रेवदंड्यात असतांना हे अनंताचे फुल संध्याकाळी दोन वेण्यांवर लावून घ्यायची फार हौस...त्याचे कारण म्हणजे, संध्याकाळी ही अनंताची कळी फुलायला लागते...तेव्हा तिचे सौदर्य आणि सुगंध हे दोन्हीही कोणालाही प्रेमात पाडेल असेच असते...त्यावेळी या फुलांची दोन-तीन झाडे आमच्या बागेत होती.  त्यामुळे त्याची किंमत वाटायची नाही. 


रेवंदडा सुटल्यावर अनंताच्या फुलाचाही दुरावा झाला.

काही वर्षांनी डोंबिवलीत आल्यावर अनंताच्या झाडं दिसू लागली.  माझी आईही या अनंताच्या फुलांची पक्की फॅन...कुठे कोणाच्या घराच्या आवारात अनंताचं झाड दिसलं तर आई एखादी कळी नक्की घेणार...ब-याचवेळा तिच्या या सवईने आम्ही ओरडतोही...अग ते ओरडतील...कसं वाटेल आई...आई, त्यावर फक्त असू दे...म्हणते...मग अनंताचे फूल मिळाल्यास ते देवा-यातील शंकराच्या पिंडीवर आणि कळी असेल तर पाण्यात ठेऊन देणार...दुस-या दिवशी तुला नको असेल तर देवाला घाल...हे तिचे नेहमीचे वाक्य...ठाण्याच्या बाजारात जायला लागल्यावर अनंताच्या फुलांचा वाटाही मिळायला लागला.  दुधाची तहान ताकावर या नियमानं विकत का होईना, मी अद्यापही हौशेनं असा वाटा घेते.  मध्यंतरी अंनताचे कलमही मिळाले...ते घेतले...पण ते काही रुजले नाही....त्यामुळे कधीतरी बाजारात विकायला मिळणारे अनंताचे फूल घ्यायचे आणि त्याच्यावर हौस भागवायची...हे चालू होते...

या सर्वात गेल्या काही दिवसांपूर्वी केलेला निर्णय एकदम सुखावह ठरला.  दररोज एक तासाचा योगा...रविवारी या एक तासाला आराम द्यायचा का...यावर घरी आम्हा दोघात चर्चा झाली.  शिवाय रविवारी डायट-बियट नको हा नव-याचा आग्रह...माझाही त्याला होकार...लेक बाहेर गेल्यामुळे मनात झालेली पोकळी कमी करण्यासाठीही सध्या उपाय चालू आहेत...कारण एरवी नाही पण रविवारी त्याची कमी खूप जाणवते...या सर्वांवर उपाय म्हणून रविवारी सकाळी लवकर उठून चालायला जायचं...हा निर्णय घेतला...टेकडी परिसरात लेक आणि मी ब-याचवेळा चालायला जायचो...त्याला पक्षी निरिक्षणाची आवड आहे.  त्यामुळे कधी वेळ असेल तेव्हा सकाळी लवकर उठून आम्ही तिथे पक्षी निरिक्षणासाठी जायचो...आणि येतांना वाटेतल्या वडापावच्या दुकानात थांबून चांगली पोटपूजा करत घर गाठायचो...नव-याला हा अऩुभव सांगितला...आपण पण तसंच करुया...पक्षी निरिक्षण होईल...चाल होईल...वेळ जाईल...आणि वडापाववर तावही मारता येईल...ही सर्व समीकरणं चांगली जुळली...नव-याला पक्षी निरिक्षणाबरोबरच वडापावची मोहिनी जास्त पडली...त्यामुळे दर रविवार चालण्याचा वार ठरलाय...दोन रविवार झाल्यावर


आम्हा दोघांनाही या रस्तावरील अन्य गोष्टींचाही शोध लागायला लागला.  त्यातच या अनंताच्या झाडांचा शोध लागला.  एका बंगल्याच्या भींतीला लागून असलेल्या अनंताच्या झाडाने माझं लक्ष वेधून घेतलं होतं...वाटेत काही ठिकाणी दोन्ही बाजुला बकुळीची झाडंही होती...या बकुळीच्या झाडांखाली पडलेला फुलांचा पेर वेचण्यासाठी नव-याची मदत झाली...पहिली फेरी झाल्यावर दुस-या फेरीपासून हातात फुलांसाठीची वेगळी पिशवी घ्यायला सुरुवात केली.  नजर मात्र त्या अनंताच्या फुलांवर होती...शेवटी गेल्या रविवारी थोडी हिंम्मत करुन त्या बंगल्याबाहेर डोकवणा-या अनंताच्या फुलांवार डल्ला मारलाच...पहिल्यांदा नव-यानं साथ दिली...एक फुल घेतल्यावर मी शांत बसेन असा त्याचा कयास खोटा ठरला.  जी फांदी आम्ही हातात धरली होती, त्याला चांगली चार फुलं होती...आणि कळ्याही होत्या...मी त्या कळ्याही घेतल्या...तोडतांना मनात भीती होतीच..कोणी बघितलं तर...पण अनंताच्या फुलांची मोहीनी काही सुटली

नाही...आणि चार फुलं...दोन कळ्या हातात आल्या...नव-यानं एकदा सांगून बघितलं...आणि तो ती फांदी सोडून चालू पडला...मी हातात आलेल्या कळ्या...फुलं निट पिशवीत ठेऊन त्याला गाठलं...या सर्वांसाठी तुझा चालायचा प्लॅन  होता का...त्यानं वडापावच्या गाडीवर उभं राहिल्यावर विचारलं...तू पण तुझ्या आईसारखीच आहेस...ही सर्वोत्तम कॉम्पिमेंट आहे, म्हणत त्याला धन्यवाद दिले...आरामात घर गाठलं...रविवारचा सुट्टीचा वार...मी जेवणात मग्न...तर नवरा देवाची पुजा करण्यात...जी फुलं तोडतांना तो कुरुकुर करत होता...ही आता हौसेनं देवाला घालत होता...सोबत बकुळीची फुलंही होती...छान...मंद...सुवास सर्वत्र दरवळला होता...मी सोबत आणलेल्या कळ्या छोट्या वाटीत ठेवल्या...दुस-या दिवशीसाठी...मनात त्या बंगल्यावाल्यांचे आभार मानले...त्यांच्यामुळे का होईना हा लहानपणाचा हक्काचा सुगंध पुन्हा अनुभवता आलाय...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. माझ्या दारात पण अनंत डवरलाय! तू छान वर्णन केलं आहेस...

    ReplyDelete

Post a Comment