कोकम आख्यान....

 

  कोकम आख्यान....


बरोब्बर रात्री दीड वाजता बेल वाजली....गावाला गेलेला नवरा आला...गाडी तब्बल तीन तास लेट झाली.  त्यामुळे अकराला येणार असलेली आमची स्वारी दीड वाजता हजर झाली...हा सगळा प्रवास तापदायक ठरला असणार आणि त्यामुळे नवरा चिडचिड करत घरात येणार असा माझा अंदाज होता.  मात्र दार उघडल्यावर सुखद धक्का बसला...एक दिवसांच्या प्रवासासाठी लागते तेवढीच बॅग घेऊन नवरा गेला होता.  मिळाले तर आंबे आणतो असं सांगून आणखी एक कापडी पिशवी त्या बॅगेत कोंबली होती.  तिच कापडी बॅग त्याच्या हातात होती.  दरवाजा उघडताच ती बॅग पुढे करत म्हणाला, हे घे, हे मिळालं...आंबे नाहीत पण हे छोटेही काही कमी नाहीत...मला आर्श्चय वाटलं...कदाचित हापूस ऐवजी आंब्याच्या बिटक्या मिळाल्या असतील म्हणून मी ती बॅग हातात घेऊन उघडली....तर त्यात होती कोकमं...अर्थात रांतांबे...  चांगली पिकलेली...अगदी लाल नाही, पण थोडा लाल आणि त्यात जांभळा रंग मिसळल्यावर होईल असा रंग...वर हिरव्या-पिवळ्या रंगाचं झाकण लावलंय, असा देठ...रत्नागिरी ते पनवेल असा एसी रेल्वेने प्रवास आणि पुढे डोंबिवली पर्यंत पुन्हा एसी टॅक्सी...त्यामुळे थोडी गार पडलेली कोकमं बघितल्यावर माझीही कळी फुलली...तिकडे पाऊस तुफान झाला म्हणे....त्यामुळे आंबे काही मिळाले नाहीत...पण प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पहात असतांना स्थानिक महिला ही कोकमं विकत होत्या...नव-यानं आंब्याची पिशवी त्यांच्यासाठी


वापरली...ट्रेनमध्ये अगदी जपून आणलेला हा ठेवा माझ्या हातात देत म्हणाला...आता कर ती सोलकढी...आणि सरबत...दोन दिवसांच्या धावपळीचा सगळा थकवा निघून जाईल...

शनिवारी आम्ही भाजीसाठी बाजारात गेलो होतो,  तिथे कोकमं दिसली होती.  नवरा म्हणजे पक्का कोकणी...कोकमं दिसल्यावर लगेच खरेदीसाठी गेला.  त्याची त्यावेळेची धावपळ बघून मला हसायला आलं होतं...अरेरे...काय ही वेळ...आता कोकमंही विकत घ्यायची का...म्हणत मी हसले होते...तेव्हा त्याचा हिरमोड झाला...कोकमांची खरेदी न करता घरी आलो, तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते...उन्हाचा चांगलाच तडाखा लागला...अंगावर लाल चट्टेही आले...ते बघून मी वैतागले होते...दुस-या दिवशी घरचं लग्न...उगाच गेलो म्हणून माझी चिडचिड सुरु झाली...तेव्हा नव-यानं संधी साधली...ती कोकमं घेतली असती ना तर नुसत्या कोकम-जिरा पाण्यानं सगळं बरं झालं असतं...मी तेव्हा डोक्यावर हात मारुन घेतला...दोन दिवसांनी जाऊन आणते कोकमं, म्हणत नव-याची समजूत काढली.  पण तो दुस-याच दिवशी गावी जाणार होता...तिथे मिळाली की घेऊन येतो, म्हणत आमच्या घरी सुरु झालेलं कोकम आख्यान तेव्हा तिथेच थांबले होते...

ते कोकम आख्यान आता पुन्हा सुरु झाले.  अर्थात आता प्रॅक्टीकल होते. 


चांगली वीस-बावीस कोकमं होती.  आणि सर्व चांगली होती...चांगली धूवून-पुसून कोकमांच्या प्रॅक्टीकलची सुरुवात झाली.  हाताला तेल लावून ती कोकमं कापली...मधला तो मस्त बियांचा गोळा एका भांडयात काढला...कापलेली कोकमं एका परातीत राहतील तेवढी ठेवली...त्यावर लाल मिठ पेरुन झालं...दुस-या मोठ्या ताटात अशीच कोकमं लावून ठेवली...त्यात साखर पेरुन झाली...खिडकीतून येणा-या उन्हाच्या आधारानं ही ताटं ठेवून झाली.  माझ्या एका मैत्रिणीनं झटपट होणारं...आणि ते काही दिवस फ्रिजमध्ये छान रहाणारं कोकम सरबत शिकवलं आहे.  त्यानुसार बाकीच्या कोकमाचे सरबत सुरु झाले.  कापलेली कोकमं थोडं पाणी आणि भरपूर गुळ घालून उकळायला ठेवली...साधारण गुळ वितळला...कोकमंही शिजल्यासारखी झाली.  हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून काढलं...मग सर्व गाळून त्यामध्ये भाजलेल्या जि-याची पावडर आणि काळं मिठ टाकून झालं...हे घट्ट गोड आगळ...एका काचेच्या बाटलीत भरुन झालं...या सर्वात चांगलीच घामाघूम झाले होते...दुपारच्या जेवणाला तासभराचा अवधी होता...त्यामुळे ताज्या सरबताचा ग्लास भरला...नवीन बल्बच्या आकाराची

ग्लासं बाहेर काढली....त्यात चमचे हे गोडं आगळ आणि अर्धा ग्लास पाणी टाकून झाले...कुंडीतल्या पुदिन्याची चार पानं तोडली..ती त्या सरबतात टाकली...आणखी छान सुगंध आला...एक भरलेला ग्लास नव-यासमोर ठेवला आणि दुसरा मी हातात घेऊन पंख्याखाली बसले.  पंख्यातून गार वारा येत नसला तरी सरबताचा पहिला घोट घेतल्यावर मन शांत झाले...आणि नंतर गारेगार...नव-यानंही व्वा म्हणून दाद दिली...हे सरबत फार टिकत नाही...पण आत्तापर्यंत ते कधीच वाया गेले नाही...कारण त्याची चव खरचं अप्रतिम लागते...कधीकधी जि-याऐवजी मी वेलचीची पुडही टाकते...पण ती वेलची जेवढी कच्चा आंब्याच्या पन्ह्यामध्ये पक्की बसते तशी या सरबतात बसत नाही...इथे जि-याचीच चव जास्ती चालले...त्यामुळे पुन्हा प्रमाण योग्य झाल्याची शाबासकी स्वतःला देत राहिलेल्या चार कोकमांकडे वळले...

रात्री उशीरा आलेला नवरा सकाळी भरपूर पोह्यांवर ताव मारुन कामाला बसला होता.  जेवणाची इच्छा नव्हती.  गरमीमुळे भूक फारशी लागत नाही, अशी अवस्था...मग साधा भात लावला...सोबत ओल्या नारळाची, ओली कोकमं घातलेली सोलकढी केली.  त्यावर फक्त तुप, जिरे आणि हिंगाची फोडणी....या गुलाबी सोलकढीवर हिरव्या रंगाची कोथिंबीर...बरं सोलकडी हा प्रकार आमच्याकडे वाटीभर कधीच पुरत नाही.  परत ग्लासं भरली...भाताबरोबर फक्त सोलकढी आणि पोह्यांचे पापड...ओल्या कोकमांची सर्व चव त्या सोलकढीत उतरली होती.  दोन ग्लास सोलकढी प्यायल्यावर नव-यानं ढेकर दिला...भात फारसा संपला नाही.  पण सोलकढी अर्धी संपली...बाकीची कढी फ्रिजमध्ये गेली.  दुस-या दिवशीसाठी...तरीही नव-यानं सांगून बघितलंच...उद्याला त्याची चव उतरेल....त्यापेक्षा रात्री पुन्हा कढी-भात चालेल...मी तेव्हा बघू म्हणत कढी फ्रिजमध्ये ठेवली...आता मोर्चा त्या वाळत टाकलेल्या कोकमांकडे वळवला...खिडकीतून येणारे ऊन असले तरी हवेतला उष्मा त्यांना भारी पडला होता...सकाळी ठेवलेली कोकमं चांगलीच आवळली होती...साखर आणि मिठाचं पाणी सुटलं होतं...अजून चार दिवस असेच ऊन


मिळाले की हे काम होणार होतं...

एरवी हा कोकमांचा घाट मी फार कधी घालत नाही.  कोण ना कोण मैत्रिणी सुकी, मिठ टाकलेली आमसूलं आणून देतात...माश्यात वापरायचं आगळही तसंच येणारं...उन्हाळ्याशिवाय कोकमांचं सरबत फार होत नाही.  पण ही सोलकडी मात्र नेहमीची...एरवी आमसुलं त्यात जातात...ओल्या कोकमानं येणारा गुलाबी रंग त्यानं येत नाही....चवही थोडीफार बदलते...पण सोलकढी म्हटलं म्हणजे सर्व माफ...शक्यतो मासे किंवा चिकनवर ताव मारल्यावर ही सोलकढी पचनास चांगली म्हणून ग्लासभर रिचवली जाते...


तसं बघितलं तर कोकम हे फळ बहुउपयोगी...पण त्याचं महत्त्व फार कधी कळलंच नाही...लहानपणी सुट्ट्यांमध्ये दुपारच्या वेळी ही कोकमांची झाड खेळायचे साधन असायचे...चि-याच्या बांधावरुन चालत जायचे...मध्येच कोकमांनी भरलेलं झाड दिसलं की काठी घेऊन त्याला झोडपून काढायचे...मग त्यातली चांगली कोकमं निवडून त्यातल्या बिया खायच्या...गोड लागल्या तर ठिक नाहीतर दुसरे कोकम शोधायचे...मग यातलीच चांगली कोकमं निवडून तशीच फ्रॉकमध्ये भरुन घर गाठायचं...या उद्योगामुळेच एप्रिल-मे महिन्यात आई अगदी साधे कपडे घालायला द्यायची...मे महिन्याच्या सुट्टीनंतर हे कपडेही बाद व्हायचे...पण आता हे सर्व बदलेलं...नव-याला विकत आणलेल्या कोकमांची किंमत विचारली...पन्नास रुपये म्हणाला...काय सांगतोस...वाबीस कोकमांचे पन्नास...खूप झाले रे...तो हसला...ठिक आहे, गावची आहेत ना...आणि त्या दोन ग्लास सोलकढीपुढे पैशांचा हिशोब नको...एरवी पक्का हिशोबी असणारा नवरा त्या लालसर कोकमांपुढे झुकला होता...मलाही ते पटलं...चवीचा महिमा, दुसरं काय....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

 

Comments

  1. दुसऱ्यांची अडचण होईल इतकं खुलासेवार लिहू नये आणि लिहायचे असेल तर दोन तीन बाटल्या वाचकांपर्यंत पोहोचवू द्याव्यात

    ReplyDelete
  2. कोकमाचे कौतुक आपल्या कोकणात खरच खूप आहे .रतांबे आहेत पण गुणकारी . पण तू कोकमतेलाचा उल्लेख केला नाहीयेस. 😀

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच...कोकम तेल उपयोगी आहे. त्याच्यावर एक वेगळा कॉलम होईल...धन्यवाद मॅडम....

      Delete
  3. कोकमाचे कौतुक आपल्या कोकणात खरच खूप आहे .रतांबे आहेत पण गुणकारी . पण तू कोकमतेलाचा उल्लेख केला नाहीयेस. 😀

    - जयश्री कर्वे

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लेख.

    ReplyDelete
  5. छोट्या छोट्या गोष्टी खूलवून लिहिण्याचं तुझं कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. आणि सर्व डोळ्यासमोर घडताना दिसतं. हा एक लेखांचा कौतुकाचा भाग आहे. मस्त चविष्ट लेख!!

    ReplyDelete

Post a Comment