कोविडनंतरचे माथेरान.....
ताई, त्या दोन वर्षांचं विचारु नका...एका रोगानं सगळं जग पार बदललंय...त्यात आमच्या माथेरानचं काय बोलायचं...आता इथली माती कमी होतेय...सगळीकडे पेवरब्लॉक रस्ते होतायेत...खूप कामं झाली या दोन वर्षात माथेरानमध्ये...सगळं बदललंय...रस्ते झालेत...आता काही पर्यटक बोलतात...माथेरानमध्ये माती नाही तर मजा नाही...पण बाबांनो याच कामांनी इथल्या लोकांना दोनवर्ष जगवलं...कोरोनामुळे सगळं बंद होतं...कोणाच्याही हाताला काम नाही...पोटाचं काय...मग ही सगळी कामं निघाली...अहो, चांगल्या घरातील लोकं पण कामाला आली...आता सगळं सुरळीत होतंय...तो रोग कमी झालाय...पण मोठी शिकवण देऊन गेलाय...माझ्यासमोर हात जोडून रामा गोरे बोलत होते...रामा गोरे म्हणजे माथेरानचे ग्रामदैवत, श्री पिसरनाथ मंदिराचे पुजारी...आमच्या माथेरान दौ-यामधील या अनुभवानं बदलत असलेल्या माथेरानचं मनच जणू आमच्यासमोर व्यक्त झालं. माथेरान आमचं आवडतं ठिकाण...जवळपास अडीच वर्षाच्या काळानंतर माथेरानमध्ये गेले, तेव्हा माथेराननं जणू रुपडं बदलल्याचं जाणवलं...एवढ्या वर्षांनी आवडत्या गावात गेल्यावर जसं सर्व ओळखीच्यांना भेटण्याची आतुरता असते, तशीच होती. याच अतुरतेनं सर्वांच्या भेटी झाल्या...या सर्व गप्पांमध्ये कोरोनाचा काळ होता...आणि त्यात आलेला प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता...पण सर्वांच्या बोलण्यातला मर्म एकच
होता...माथेरान बदललंय...पण हा बदल सर्वांनी स्विकारलाय...कारण कधी काय, कशी वेळ येईल हे सांगता येणार नाही...आलेल्या वेळेचा आनंद घ्या...आणि सन्मान करा...
माथेरान हे आमचं तिघांचही आवडतं ठिकाण...लॉकडाऊन
लागण्याच्या दिवशीच आम्ही माथेरानला जाणार होतो.
पण लॉकडाऊन आणि कोरोनामुळे सर्व प्लॅन घरातच ठेवावे लागले...त्यानंतर
लेकाचा अभ्यास...परीक्षा...आणि आता तो कॉलेजला गेल्यावरच्या काळात माथेरान कुठे
हरवले. लेक नाही तर कुठेही नाही...असा
माझा हेका...मात्र गेल्या आठवड्यात अचानक हा माथेरानचा बेत ठरला...दोन दिवस बदल
होईल, चल जाऊया...म्हणत नव-यानं माझी समजूत काढली...आणि माथेरानच्या लाल मातीत
जाण्याचा पुन्हा योग आला. कोरोना
येण्यापूर्वी वर्षातून दोन किंवा तीनवेळा तरी माथेरानला आम्ही जात असू...त्यामागची
कारणं वेगवेगळी...एकतर जाण्यासाठी लागणारा फार कमी वेळ, आमचं लाडकं रग्बी हॉटेल आणि तिथलं टेस्टी फूड,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माथेरानच्या लाल मातीचं आकर्षण...भरपूर
फिरायचं...मनमोकळं...तिथली झाडं, डोंगर...फारकाय दगडही आमच्या आवडीचे...पुन्हा-पुन्हा
त्यांना बघण्याची हौसच लागलेली. यावेळीही
तोच उत्साह...लेक सोबत नाही...पण अडीच वर्षानंतर माथेरानला जातांना तसाच आनंद आणि
उत्साह होता...
शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास माथेरान गाठलं...आणि गेल्या दोन वर्षाच्या काळात माथेरान बरच बदल्याची चुणूक पहायला मिळाली. अगदी सुरुवातीलाच, एमटीडीसी हॉटेलपासून अमन लॉज पर्यंतच्या पॅसेजवर छान कमान केलेली...मिनी ट्रेनला भरपूर गर्दी...त्यामुळे आम्ही नेहमीप्रमाणे पैदल
यात्रा सुरु केली. अमन लॉज ते माथेरान हा पायी प्रवास साधारण पंचवीस-तीस मिनीटांचा...मात्र आम्हाला नेहमीप्रमाणे जास्त वेळ लागला...मिनी ट्रेनच्या ट्रॅकवरुन चालत, करवंद-जांब विकणा-या मुलांबरोबर गप्पा मारत...तो रानमेवा खात आणि भरपूर फोटो काढत माथेरान गाठायला तासभर लागला. इथूनच माथेरानमध्ये चालू असलेल्या विकास कामांचा अंदाज यायला लागला. माथेरानमध्ये आल्यावर पहिला थांबा असतो शेलार हॉटेलचा. गेल्या चाळीस वर्षापासून हे हॉटेल माथेरानमध्ये आहे. आम्ही जेव्हापासून माथेरानमध्ये यायला लागलो, तेव्हापासून पहिला नाष्टा शेलार्समध्ये होतो...तो माझा हट्ट...कारण एकतर माझं माहेरचं नाव आणि इथली जिभेवर कायम राहिल अशी चव...पहिल्यांदा हॉटेलचं रुपडं अगदी साधं होतं. आता हॉटेल अधिक प्रशस्त झालेलं...पण काऊंटरवर शेलारकाका तशाच आग्रहाच्या भाषेत बोलत होते...पहिल्यांदा त्यांची ख्याली खुशाली विचारली. कोरोनामध्ये सगळं थांबलं होतं...अचानक आलेलं हे वादळ थोड्या दिवसात शांत होईल असं वाटत होतं, पण बघता बघता काळ वाढला...लॉकडाऊन वाढला...आणि नेहमी पर्यटकांनी फुलणारं माथेरान ओकंबोकं झालं. मुळात येथे शेती नाही...अन्य व्यवसाय नाही. सर्व उद्योग पयर्टन आणि त्याभोवती गुंफलेले. सर्वंच बंद झाल्यामुळे आता करायचं काय हा प्रश्न होता. या काळात या भागात रखडलेल्या योजना राबवल्या गेल्या. रस्ते आणि पॉईंटपर्यंत जाण्याच्या सुविधा वाढवण्यात आल्या. पावसामुळे होणारी डोंगराची धुप थांबवण्यासाठी उपाय करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी रेलिंग टाकण्यात आले. अशी अनेक विकासकामे सुरु झाली. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणारं माथेरान या कामांमुळे चालू राहीलं. घोडेवाले, हातांनी रिक्षा ओढणारे, हॉटेलमध्ये काम करणारे यांच्यासोबत दुकानदार, अन्य व्यावसायिकही या कामात सामिल झाले. हाताला काम मिळालं...आणि पैशाची सोय झाली. त्यामुळे अनेकांना आधार मिळाला. शेलारकाका हे सर्व भरल्या डोळ्यांनी सांगत होते...तुमच्या सर्वांवरच आमचं घर आहे हो...तुम्ही आलात तर येथे काम येणार...आता सर्व सुरुळीत होतंय...देवाची कृपा म्हणत शेलारकाकांनी आमच्यासमोर त्यांची फेमस मिसळ आणि कांदा भजीची प्लेट ठेवली. हॉटेल फुल्ल होतं...आणि काका समाधानी...निघतांना पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर बोलून, नमस्कार करत त्यांचा निरोप घेतला. आमचं रग्बी गाठलं...माथेरान असलं तरी ऊनाचा तडाखा बसला होता...त्यामुळे बॅगा ठेऊन हॉटेलचा फेरफटका मारला, जेवण करुन थोडा वेळ आराम आणि सर्वात आवडता पॉईंट बघायला सज्ज झालो....सनसेट पॉईंट...पेमास्टरपार्कपासून सरळ चालत जायचं...आता या पार्कमध्येही ब-यापैकी काम चालू आहे. पुढचा रस्ता काहीसा रुंद झालेला काही ठिकाणी रेलिंग बसवलेले...काही ठिकाणी पेवरब्लॉकच्या रस्त्याचे काम चालू होते...आम्ही पाच वाजता हा पॉईंट गाठला तेव्हा कोणीच तेथे नव्हते...अर्थातच त्यादिवशी सायंकाळी सात वाजता सूर्यास्त होता...त्याआधी आम्हाला धरुन पाच पर्यटक होते. सनसेटपॉईंटचे टोक गाठले. तिथे तिन
विद्यार्थी होते. हैद्राबादमधून आलेले. अफलातून फोटोग्राफी चालू होती. थोड्या गप्पा झाल्या...थोडं सांभाळून रहा म्हणत आम्ही मागे आलो. इथला वडापाव आमच्या लेकाचा आवडीचा...गेलात की नक्की खा, असा लेकाचा निरोप होता...वडापावच्या एकमेव दुकानात त्यावेळी काका नव्हते. काकू होत्या. काकांची चौकशी केली....म्हणाल्या देवाघरी गेले...आमच्या हातातला वडापाव तसाच राहिला...त्यावर म्हणाल्या, शेवटपर्यंत दिसलेच नाहीत. कोरोना झाला म्हणून मुंबईत हॉस्पिटलमध्ये ठेवलं...महिनाभर होते...व्हिडीओ कॉलमधूनच दिसायचे...महिनाभर कोरोनाबरोबर झूंजून ते देवाघरी गेले. शेवटचं दर्शनही नाही...त्यामुळे आम्ही ते आमच्यातून गेलेत हे मानतच नाही. ते इथेच आहेत. वर्षभरापूर्वी बसलेल्या या आघातानंतर काकू आता सावरल्या आहेत. मोठी मुलगी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला, धाकटी त्यांना मदत करत शाळेत शिकते...या सर्वात गावाची खुप मदत झाली...जे आहे, ते आहे म्हणत...त्यांनी आमची चौकशी केली...आम्हाला पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले...आम्ही दोघंही सुन्न झालो...पण त्या काकू या सर्वांपुढे गेलेल्या...आमच्यासारखेच काही पर्यटक त्यांची आस्थेनं चौकशी करत होते...त्या सर्वांना अशीच खंबीरपणे उत्तरं देत त्या त्यांचं काम करत होत्या...त्यांना सलाम करीत आम्ही अस्ताला जाणा-या सूर्याकडे पहात बसलो.
दुसरा दिवस चांगलाच पायपीटीचा...श्री पिसरनाथ मंदिराचं पहिलं दर्शन...तिथेच रामा गोरे भेटले...मंदिराची साफसफाई करत होते...त्यांची ही सहावी पिढी देवाच्या सेवेत आहे. गेल्या दोन वर्षाचा हिशोब ठेवायचा नाही या मतापर्यंत ते आलेले...कोरोनामध्ये खूप चांगली माणसं दूर गेली...पर्यटन बंद झालं. पण पर्यटकांनी गावाला विसरलं नाही, हे ते आठवणीनं सांगतात...लांबलांबहून गावात मदत आली...त्यामुळे खूप हातभार लागल्याचं गोरे सांगत होते...भरपूर गप्पा मारुन त्यांचा निरोप घेत लॉर्ड पाईंट गाठला...हा पॉईंट आमच्या लेकाच्या आवडीचा...त्यामार्गावर दगडाचे वेगवेगळे आकार आणि झाडांची मुळं त्याला आवडायची...पण आता सर्व मार्ग पेवरब्लॉकचा झालाय...झाडांची मुळंही दगडांच्या पाय-यांमागे दडली गेलेली...या पॉईंटवरुन सगळा माथेरानचा आवाका पहाता येतो...ऋषीकेष चाळके नावाचा मुलगा येथे आपल्या भावंडांसोबत विविध खेळ मांडून छोटासा व्यवसाय करतो...लॉकडाऊनमध्ये या मुलांनीही मिळेल ते काम केले...सोबत सर्व डोंगर-द-या पालथ्या घातल्या...आता पर्यटक यायला लागल्यावर पुन्हा आपला व्यवसाय सुरु केलाय. माथेरानच्या बदललेल्या रुपाची चर्चा करत आम्ही
आमचा मोर्चा इको पॉईंटकडे वळवला...दमछाक करणा-या या रस्त्याचेही रुप बदललेले...कुठे पेवरब्लॉक तर कुठे चि-यांचे रस्ते झालेले...रस्ताही मोठा झालेला...काही ठिकाणी रेलिंगही लागलेले...एरवी मागून घोडे आले तरी कळायचे नाहीत. पण आता लांबूनच टापांचे आवाज कानी पडत होते. आम्ही भर दुपारी, म्हणजेच एक वाजता इको पॉईंटला होतो...फारशी गर्दी नव्हती...सुनील नावाच्या युवकांनं नवीन उद्योग शोधला होता...लव्हशेपचा मोठा आकार फुलांनी सजवून त्यात पर्यटकांना फोटो काढून देत होता....अवघे दहा रुपये...हवे तेवढे फोटो काढा...त्याच्या कल्पकतेचे कौतुक करत इको पॉईंटचा कोपरा गाठला...इथे सिम्बॉसिस कॉलेजच्या तीन विद्यार्थिनी भेटल्या...त्यातल्या दोघी झारखंडच्या तर एक आसामची...माथेरानच्या प्रेमात पडलेल्या...एकत्र फोटो काढण्यासाठी कोणाला तरी शोधत होत्या...आम्ही स्वतःहून पुढे गेलो...त्या मुलींचे भरपूर फोटो काढून दिले...आता दर सुट्टीत माथेरानला येणार म्हणत त्यांनी आमचा निरोप घेतला...आम्ही मात्र भर ऊन्हात तिथेच तासभर घुटमळत राहिलो...लेकाची आठवण...आणि पूर्वीचं माथेरान....आत्ताचं माथेरान अशीच चर्चा...परत हॉटेलकडे निघतांना एक आर्श्चयाचा धक्का बसला...ओ..ओ..मॅडम...सर...म्हणत एक घोडेवाला मागे आला...एवढ्या वर्षात आम्ही क्वचित माथेरानला घोडेस्वारी केली आहे...पण काही जणांबरोबर ओळख नक्की होती...आता दीड-दोन वर्षानंतर आम्हाला कोणी ओळखत असेल अशी अपेक्षाही नव्हती...तो मुजफ्फर होता...त्याचे घोडे मोठे उमदे...उंच....लेकाला नेहमी आवडायचे...त्यामुळे तो नेहमी त्याच्याबरोबर गप्पा मारुन त्यांची माहिती घेत असे...त्यातून ओळख झालेली...इको पॉईंटवरुन बाहेर येतांना पाहून मुजफ्फर पुढे झाला...आत्ताही त्याच्याकडे अमेझॉन नावाचा उंचपुरा घोडा होता....आमच्याकडे लेकाची चौकशी केल्यावर, उसको फोटो भेजो...आप घोडेपें बैठो, म्हणत आम्हाला घोड्यावर बसवून फोटो काढून दिले...नव-यानं त्याला पैसे दिले...तर पैसे के लिये नही...आप हमेशा बात करते है इसिलिए...म्हणत नकार देत होता...शेवटी अमेझॉनला आमच्याकडून काहीतरी दे...म्हणत नव-यानं त्याच्या खिशात पैसे कोंबलेचं...माथेरान हे असंच आहे...इथल्या साध्या माणसांनी सजलेलं...
रविवारची सर्व संध्याकाळ माथेरानच्या बाजारात घालवली...बाजारात पिशव्या आणि चपलांची दुकांनं अधिक झालेली...काही हॉटेलही बदललेली...आम्ही नरीमन चिक्कीचे दुकान गाठले...विनीता गुप्ता इथल्या मुख्य...त्यांना नमस्कार करीत चौकशी केली. विषय अर्थातच कोरोनाचा....त्यावेळी ऐन पर्यटकांचा हंगाम असल्यामुळे त्यांच्या दुकानात सर्व माल भरलेला होता...कोरोनाकाळात माथेरानमध्ये अनेकांनी मदत वाटली...त्यात चिक्कीच्या पाकीटांचेही वाटप केले. माथेरानच्या खाली असलेल्या आदिवासी पाड्यांमध्येही असेच वाटप केले. तब्बल दिड महिना मोफत चिक्की वाटली...दुकानात कच्चा मालही खूप होता...चणे, शेंगदाणे भरपूर होते...हे सर्व चणे, शेंगदाणे माकडांसाठी टाकून दिले....वो दो साल की बातही मत करो...बहोत कुछ सिखाया...म्हणत त्यांनी या दोन वर्षातले अनुभव आमच्यासमोर मोकळेपणानं सांगितले...निघतांना वापस आना हां...म्हणत प्रेमानं निरोप दिला...पुढचा कोपरा विजय या मुलाचा...बॉक्स क्रिकेटचा त्याचा व्यवसाय आहे. विजयबरोबरही गप्पा झाल्या...त्यालाही कोरोनाचा फटका बसलेला...या काळात गावात झालेल्या कामांनी मदत झाली...चांगल्या घरातील
माणसंही कामं करत होती...आपण तर साधी माणसं, म्हणत त्यांनी त्यावेळी झालेली वेदना पुढे मांडली...या माथेरान बाजाराच्या शेवटी नरेंद्र फुटवेअरचं दुकान आहे...शिवाजी साळुंखे नावाचे गृहस्थ गेली चाळीस वर्ष हे दुकान चालवतात...त्यांचीही तिच अवस्था...लॉकडाऊन वाढत गेला तसा दुकानातला सर्व माल कमी किंमतीमध्ये काही मोठ्या दुकानदारांना विकला आणि ते रस्त्याच्या कामाला लागले. काळ वाईट होता...पण खूप लोकांनी मदत केली...आता सर्व ठिक होईल...या काळानं खूप शिकवलंय...म्हणत त्यांनी आमची चौकशी केली...रात्री उशीरा पर्यंत आम्ही या बाजारात फिरत होतो....पर्यटकांच्या गर्दीनं दुकानं फुलली होती...एकूण माथेरानला पुन्हा एकदा उभारी मिळत होती...सोमवारी सकाळी या आवडत्या गावाचा निरोप घेतांना अनेक प्रश्न मनात होते...काहीं जणांनी आता पेवरब्लॉकचे रस्ते झाल्यावर माथेरानमध्ये मोटारी येणार असल्याचे सांगितले होते...तर काहींनी ई सायकली येणार...आता पुढच्यावेळी याल तेव्हा कदाचित घोडेही नसतील म्हणून शंका व्यक्त केली होती...तर काहींनी थोडी तरी सुविधा होतेय...एक व्यवसाय गेला तर दुसरा नक्की येईल...कोरोनामध्ये नाही का एक बंद झालं तर दुसरं दार उघडलं होतं...असा आशावादही व्यक्त केला...माथेरान सोडतांना हे सर्व विचार मनात होते...दोन दिवस सुखात गेलेले...नेटवर्क नव्हतं...टिव्ही नाही...त्यामुळे जगापासून दूर असल्याचा अनुभव मिळालेला...खाली नेरळला आलो आणि फोन व्हायब्रेट व्हायला लागला....मेसेजवर मेसेज...वर बघितलं तर ते सुखाचं गाव दिसलं...असंच राहूदे...कितीही सुविधा झाल्या तरी इथल्या माणसांची मन लाल मातीसारखी आहेत...आणि ती तशीच रहाणार...साधी...भोळी...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
🌹👍🌻🌸🌷💯👍
ReplyDeleteसई मॅडम माथेरानचे खूपच सुंदर व वास्तव वर्णन या लेखातून आपण केले आहात.माथेरानच्या तुमच्या आठवणी, तेथील माणसांशी तुमच्या कुटुंबाचे असलेले आपुलकीचे नाते,माथेरानचे मनमोहक वर्णन वाचून माथेरानला जाण्याचा मोह आवरत नाही.
ReplyDeleteसई मॅडम अप्रतिम लेख.
नक्की जा....माथेरानला आता पावसाळ्यातही छान वाटणार आहे. पेवरब्लॉकच्या रस्त्यांमुळे भर पावसातही फिरता येणार आहे....हा अनुभव नक्की घेण्यासारखा आहे...
Deleteक्या बात है,इतकं सुंदर टिपले आहे,जाऊन आलो की
ReplyDeleteधन्यवाद दिपाली मॅडम....
DeleteNehmi plane khup sundar..
ReplyDeleteफारच सुंदर लेख. काही दिवसांनी माथेरानबद्दल असे म्हणावे लागेल, " गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी."
ReplyDeleteबदल हा सृष्टीचा नियम आहे. माथेरान हे पर्यटन स्थळ असल्याने तेथे विकास हा होणारच. विकासाला वेग असतो. त्या वेगात कोण भरडले, चिरडले जात आहे याचा कोणीही विचार करीत नाही. या गोष्टीचे भान स्थानीक लोकांनी ठेवणे आवश्यक आहे.
सुहास सरफरे
काका धन्यवाद...तु्म्ही खूप छान प्रतिक्रीया दिली आहे. प्रत्येक स्थळाची प्रगती होत असते. मग त्यातून पर्यटन स्थळ असेल तरी अपवाद नसतो. वास्तविक गेले कित्येक वर्ष पर्यटनस्थळ या नावाखाली मुळ माथेरानचे रहिवासी अनेक बंधन सोसत आहेत. कोणी अचानक आजारी झालं तर त्यांची खूप धावपळ होते. मुलांच्या शिक्षणाचेही प्रश्न आहेत. आता थोड्या सोयी झाल्या तर या समस्यांही काही प्रमाणात दूर होतील.आपली रोजीरोटी या पर्यटनावरच अवलंबून असल्याची जाणही येथील नागरिकांना आहे. त्यामुळे निसर्गाची जोपासना ते नक्की करतील अशी आशा आहे.
DeleteKhup chhan lekh.
ReplyDeleteधन्यवाद..
Deleteमस्तच लिहिलं आहे.., असं वाटलं की मी आता माथेरान मध्येच आहे.
ReplyDeleteKhup chhan 👌👌
ReplyDelete