प्रवीण काटवी…दिलदार माणूस...
काटवी काकूंचा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेसेज आला...काटवी
काका गेले...काटवी काका म्हणजे, प्रवीण काटवी.
ज्येष्ठ आर्किटेक्ट, समाजसेवी, अनेक संस्थांचे संस्थापक...हळूवार मनाचा
माणूस...आकाश व्यापतांना जमिनीला सावली देणारा माणूस...काटवी काकांना अशा अनेक पदव्यांनी...शब्दांनी भुषवता येईल...काटवी काका हे
असेच अद्वितीय व्यक्तिमत्व होते...कोणताही गाजावजा न करता या माणसांनी किती
सामाजिक उपक्रम राबवले याची मोजदातही नाही.
काटवी काकू, म्हणजेच श्रद्धा काटवी यांचा 6 मार्चला काका केल्याचा मेसेज आल्यावर
मोठा आघात झाला. काटवी काकांसोबत आमचे
बालपण गेले. त्यांच्याबरोबर जो काही काळ
घालवला त्यात त्यांचे मोठेपण कधी मोजता आले नाही.
ते वयही तसे नव्हते. पण काका
कोणीतरी मोठे आहेत, आणि तरीही ते आपल्याबरोबर खूप छान बोलतात. सर्वांची आस्थेनं चौकशी करतात...कोणालाही
कमीपणा वाटू देत नाहीत...सतत काहीतरी उपक्रम राबवत असतात हे समजत होते...काकूंचा
मेसेज आल्यावर मन सहजपणे त्या बालपणीच्या आठवणींमध्ये गेलं...जिथे काटवी काकांचं
स्थान अभेद्य आहे.
आमच्या रेवदंडा येथील घराच्या अंगणात शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या काळात निळ्या रंगाची मारुती 800 यायची...स्वतः प्रवीण काटवी काका गाडी चालवत असायचे. सोबत श्रद्धा काकू आणि त्यांच्या प्रज्ञा आणि ज्ञानदा या मुली. काहीवेळा काटवी काकांच्या आईही सोबत असायच्या. हे सर्व काटवी कुटुंब म्हणजे अत्यंत प्रेमळ...मायाळू...अतिशय प्रतिष्ठीत असलेल्या या कुटुंबाचे पाय जमिनीवर राहीले. या कुटुंबानं अलगद आमच्यावर असेच प्रेमाचे संस्कार केले. त्यांची गाडी, रेवदंड्याला, आमच्या घराच्या अंगणात उभी राहीली की मला कोण आनंद व्हायचा...काका घरी याचये...आमच्या वडीलांचे, अशोक शेलार यांचे ते मित्र....घरी आल्यावर सर्वांची आस्थेनं चौकशी करायचे...गप्पा झाल्या की, मग मी त्यांच्या मुलींसोबत गाडीमध्ये बसून काका-काकी कुठे जातील तिथे, त्यांच्या सोबत मी जायचे...तेव्हा गाडीतून फिरायला मिळायचे ही गोष्टच एवढी मोठी वाटायची की, आपण ज्या व्यक्तीच्या गाडीत आहोत, ती प्रवीण काटवी नावाची व्यक्ती किती मोठी आहे, याची माहिती घ्यावीशीही वाटली नाही. काकांनी तसे कधी वाटूही दिले नाही. ते कायम मोठ्या माणसांमध्ये असायचे...त्यात राजकारणी, साहित्यिक असायचे, पण मुलांसोबत असतांना ते फक्त काका असायचे. प्रेमळ, आस्थेवाईकपणे चौकशी करणारे. मुलांमध्ये, मुलांसारखे बोलणारे...
त्यांनी रेवंदडा-चौल गावांत अनेक उपक्रम राबवले...अनेक नवीन गोष्टींची माहिती मला त्यांच्यांमुळे मिळाली. आपल्याला जी नवीन माहिती मिळते, ती आपल्या परिवारातील सर्वांना मिळाली पाहिजे यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. त्यांनी रेवदंडा-चौल भागात काटवी अँग्रो रिसर्च सेंटरची स्थापना केली. काका यातून शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांची माहिती देत असत. प्रयोग करत असत. अशाच एका कार्यक्रमात काकांनी सूर्यचूल या प्रकाराची पहिल्यांदा माहिती करुन दिली होती. सूर्याच्या प्रकाशाचा वापर करत अन्न शिजवणारी ही चूल, म्हणजेच काचेची मोठी पेटी काका खास मुंबईहून घेऊन आले होते. काकांनी या सूर्यचुलीची माहिती देतांना त्याचा डेमोही दिला आणि उपयुक्तताही स्पष्ट केली होती. यामागे त्यांची अनोखी धडपड होती. आपल्याला एखादी नवी गोष्ट समजली की, ती आपल्या गावापर्यंत पोहचली पाहिजे, ही त्यांची भावना खूप मोठी होती.
प्रवीण काका आर्कीटेक्ट आहेत हे तेव्हा माहित होतं, अर्थात ते म्हणजे काय याची त्या वयात माहिती
नव्हती. पण काका खूप मोठे आहेत, त्यांच्या
खूप मोठ्या ओळखी आहेत, ते खूप श्रीमंत आहेत, आणि एवढं सर्व असूनही काका खूप प्रेमळ
आहेत, मनमिळावू स्वभावाचे आहेत. अत्यंत प्रेमानं आणि आत्मियतेनं बोलणारे आहेत
याची जाणीव काकांकडे बघून व्हायची. काका...श्रद्धा काकू आणि त्यांच्या दोन मुली, प्रज्ञा आणि ज्ञानदा रेवदंड्यात आले की माझ्यासाठी ती पर्वणी
असायची. त्यांच्या दोन्ही मुलींपैकी मोठी प्रज्ञा आणि मी समवयीन...त्यामुळे आमची छान गट्टी
जमायची...अर्थात काका गावी यायचे ते काही ना काही कामाच्या निमित्तानं...ते बहुधा
सामिजीक कामासाठी यायचे. गावी, रेवदंड्यात
काकांनी अनेक उपक्रम राबविले. त्यानिमित्त
काका अनेक मान्यवरांना गावी बोलवायचे.
त्यापैकी काही आमच्या घरीही रहायला असायचे. नामवंत साहित्यिक, उद्योजक, राजकीय व्यक्ती
असायच्या....प्रमोद नवलकर, व. पु. काळे...यांच्यासह अनेक आयपीएस अधिकारी तेव्हा
काकांच्या शब्दाखातर आमच्या गावाला यायचे.
काका या सगळ्यांचे अगत्य करण्यात व्यस्त असायचे. सगळे जण प्रवीण काटवी नावाच्या प्रेमळ
माणसाच्या आग्रहाखातर आलेले असायचे.
अर्थात या सगळ्यांचे मित्र असणारे काटवी काका, कधीही गर्वात राहिले
नाहीत. आंब्यानं भरलेलं झाड कसं वाकलेलं
असतं...तसंच हा सर्वगुण संपन्न माणूस या सर्वांमध्ये विनम्रतेने वावरत असे.
त्या
वेळी मुंबईहून रेवदंड्याला यायला चार साडेचार किंवा त्याहून अधिक वेळ लागायचा. प्रवासातून आल्यावरही काका-काकू प्रसन्नचित्त असायचे. काका एक नंबर खवय्ये...गावात आल्यावर अनेकवेळा थेट समुद्रकिना-यावर मासे खरेदीसाठी जात असत. कोलंबी त्यांच्या विशेष आवडीची होती...काका मासे घेऊन आले की काकू तेवढ्याच उत्साहानं मासे करायच्या...अगदी साध्या मसाल्यांचा वापर करत काकू मासे बनवायच्या...कुठेही प्रवासाची चिडचिड नाही....आरडाओरडा नाही...सगळं वातावरण आनंदाचं असायचं....श्रद्धा काकूंनी केलेल्या चपात्या आणि माशांचा मी काटवीकाकांसोबत अनेकवेळा आस्वाद घेतला आहे. काटवी कुटुंबासोबत टेबलावर बसून जेवण...मी गावात वाढलेली...टेबल मॅनर्स हा शब्द तेव्हा माझ्या डिक्शनरीतही नव्हता...जेवतांना अनेकवेळा संकोचल्यासारखं वाटायचं...पण हे काटवी कुटुंब वेगळंच...त्यांनी कधी टिंगल केली नाही...समजून घेतलं...काका-काकू, त्यांच्या दोन मुलींची जशी काळजी घ्यायचे तशीच माझीही घ्यायचे...आग्रहानं जेवायला वाढायचे...त्याकाळी या मोठ्या माणसांनी दाखवेले हे प्रेम आजही मनात तसेच जपले आहे.
काका जेवढे हौशी तेवढ्याच काकूही...कोणताही प्रकार पाहिला की तो
आपल्या परिचितांना ते आधी सांगायचे.
त्यापैकीच पावभाजी हा प्रकार...काकांना पावभाजी आवडायची...पण आमच्या
गावापर्यंत ती पोहचली नव्हती. पण काका दी
ग्रेटच...एकदा रेवदंड्याला येतांना पावभाजी बनवण्याचे सर्व सामानच काय पण
तो भला मोठा तवाही घेऊन काका आले. परिचितांना
आमच्याघरी पावभाजी पार्टीसाठी बोलवले.
तीस-पस्तीस जणांसाठी काकूंनी स्वतः पावभाजी बनवली, आमच्या आईलाही
शिकवली. या सर्व पावभाजी पार्टीचं
नियोजन...काका स्वतः करीत होते...सर्वांना आग्रहाने पावभाजी वाढत होते.
या सर्व घटना छोट्या आहेत, पण आता या सर्वांकडे मागे वळून बघतांना
समजतं...काका किती मोठे होते...पण या मोठेपणाच्या आवरणाखाली ते कधी राहिले नाहीत की इतरांना त्या मोठेपणाची झळ बसली नाही...उलट त्यांनी या मोठेपणाच्या सावलीत अनेकांना सामावून घेतले होते. त्यांचा विनयशील स्वभाव बरंच काही शिकवून गेला. आकाशाला गवसणी घाला...पण जमिनीबरोबरचं नातं कधीही विसरु नका याची पहिली शिकवण काकांकडून मिळाली.
प्रवीण काटवी हे व्यक्तिमत्वच तसंच होतं...गिरगांवमध्ये रहाणारे काटवी
काका आपल्या मुळ गावांबरोबर, रेवदंडा-चौल बरोबर कायम जोडलेले होते. ते अकॅडमी ऑफ आर्केटेक्चर कॉलेजचे पदवीधर,
सोबत अर्थशास्त्रातही पदवी घेतली आणि एल.एल. बी. ची पदवीही संपादन केली. हा माणूस वेगळा होता, याचे पहिलेच उदाहरण
म्हणजे काका कुठल्याही नोकरीत रमले नाहीत.
तर त्यांनी इतरांसाठी नोकरी निर्माण करुन दिली. त्यांनी स्वतःची प्रवीण कटवी अँड असोसिएट्स ही फर्म
स्थापन केली. गेल्या अनेक वर्षापासून ही
फर्म मुंबईतच नाही तर देशातील अग्रगण्य आर्कीटेक्ट फर्म म्हणून ओळखली जाते. यामागे आहे, प्रवीण काटवी यांचा प्रामाणिक
स्वभाव आणि कामातील सचोटी. मुंबईतील चर्नी
रोड येथील प्रवीण काटवी अँड असोसिएट्स ही आता प्रख्यात वास्तुशिल्प कंपन्यांपैकी
एक आहे. आर्किटेक्चर आणि डिझाइनच्या क्षेत्रातील सखोल ज्ञान आणि कौशल्य ही त्यांची
वैशिष्ट आहेत. यासर्वांच्या उभारणीसाठी
प्रवीण काटवी काकांनी घेतलेले परिश्रमही खूप मोठे आहेत.
प्रवीण काका हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मृदूभाषी असलेल्या काकांनी अनेक आयकॉन ठरतील असे
प्रकल्प साकारले आहेत. त्यातील मानाचा
तुरा म्हणजे, मुंबई, फ्लोरा फाऊंटन येथील
हुतात्मा स्मारकाचे सुंदर उद्यान शिल्प काकांच्या कल्पकतेतूनच साकारले आहे. 33 वर्ष झालेले हे स्मारक अद्यापही नव्यासारखे
वाटते. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या
पुणे येथील वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचे आव्हान काकांनी
स्विकारले होते..अवघ्या 23 दिवसांत हे काम काकांनी केले...स्वतः शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांनी या कामाचे कौतुक केले.
या कामाबद्दल काटवी काकांचा माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते
सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्रातील
पहिली महापौर मॅराथॉन स्पर्धा काकांनीच आयोजीत केली. काकांनी महाराष्ट्रील अनेक मंदिरं आणि
मंदिराच्या परिसराला सुभोभित केले आहे. या
सर्वात त्यांची अनेक मान्यवरांबरोबर ओळख झाली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,
टाटा समुहाचे जे. आर. डी. टाटा,
गोदरेज समुहाचे एस.पी. गोदरेज,
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, जेष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले या
मान्यवरांच्या सहवासात काटवी काकांनी काम केले आहे. या सर्वांच्या विचारांचे संस्कार झालेल्या
काटवी काकांनी आपला वारसा अनेकापर्यंत पोहचवला.
काकांचा पिंड समाजसेवेचा होता. आपण समाजाचं देणं लागतो, ही भावना त्यांच्या मनात सदैव असे. त्यातूनच काटवी अग्रो रिसर्च सेंटर, जेष्ठ नागरिक संघ, काटवी एंटरप्राईझेस चॅरिटेबल ट्रस्टची त्यांनी स्थापना केली. यामार्फत श्रीमती सुनिता रविंद्रनाथ काटवी रुग्ण वाहिनी सेवा सुरु केली. कै. सूर्यकांत मोहनदास यांच्या नावाने गिरगावात गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुरु केली. रेवदंडा येथे वडीलांच्या नावाने, कै. रविंद्रनाथ दिनानाथ काटवी पॅथॉलॉजी सेंटरची स्थापना केली. सासूबाई श्रीमती मालती सुर्यकांत मोहनदास यांच्या नावाने एक्सरे सेंटर सुरु केले. काटवी कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करायचे. त्यात सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा स्पर्धांचा समावेश असायचा. गावात मान्यवरांची व्याख्याने व्हायची. वैद्यकीय शिबिरं असायची. असे अनेक उपक्रम काटवी काकांनी राबविले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यमग्न असणा-या काटवीकाकांचे निसर्गाबरोबर अतूट नाते होते. नावाप्रमाणे ते प्रवीण होते आणि निसर्गाच्या ओढीनं त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी झाला होता. सदैव इतरांना प्रेरणा देणारे प्रवीण काटवी काका आज नाहीत. पण त्यांनी दिलेले विनम्रतेचे संस्कार मात्र कायम सोबत रहाणार आहेत.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
A father always holds a very special place in the hearts of his daughters Thankyou for honouring his contributions to the society.
ReplyDeletePradnya Vasudeo
धन्यवाद प्रज्ञा....काटवी काकांचे स्थान आमच्या सर्व शेलार कुटुंबियांच्या मनात कायम आदराचे होते...आणि तसेच रहाणार आहे....
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteनेहमी प्रकाश दादाच्या तोंडून नाव ऐकायला यायचं पण ते एवढे मोठे होते हे आज कळल, धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद दादा....काटवी काकांनी आपल्या गावासाठी खूप केलं आहे. शेती आणि पूरक शेतीबाबत त्यांना खूप माहिती होती...आणि ती माहिती ते आपल्या परिचितांना नेहमी देत असत...
DeleteKhoop chhan lekh ..sagale prasang lekhatun tuzya ubhe rahile.....pan kharach aadhichi pidhi ekdam great hoti..Sagal sambhalun hote ....🙏
ReplyDelete