दूध...साय...लोणी....आणि तूपाची धार...
व्वा...किती दिवसांनी केलंस ग...सर्व घर बघ दरवळतंय...माझं कौतुक करतांना नव-यानं दीर्घ श्वास घेतला...मला हातांनीच छान अशी खूण करत पुन्हा घरभर पसरलेला तुप कढवण्याचा सुवास भरुन घेतला. आणि त्याच्या मिटींगमध्ये व्यस्त झाला. एरवी आठवड्यातून दोन वेळा लोणी कढवण्याची प्रक्रिया आमच्याकडे व्हायची...दुधाचे प्रमाणही तसेच होते...पण लेक बाहेर गेल्यापासून घरात दूध अगदी मोजकेच येऊ लागले...त्यात एटू...मीटू...फॅट फ्री...असे नाना प्रयोग, दुधाच्या बाबतीत सुरु झाले...परिणामी घट्ट....दाट...आणि तेवढीच मऊसूत साय मात्र विरळ झाली. त्यापोठोपाठ सायीचं दही आणि त्यातून होणारं लोणी....ताक...सर्वच कमी झालं. एरवी माझ्याकडे एकावेळी अर्धाकिलोपेक्षाही जास्त तूप व्हायचं...आत्ता झालेलं तेवढं नव्हतं...पण त्याचा दरवळ तसाच होता...आणि त्याच दरवळीनं सर्व घर भरुन गेलं होतं...नव-यानं पुन्हा आवाज दिला...ताकाची कढी...भात आणि ताज्या तुपाची धार असा बेत कर म्हणून सुचवलं...माझ्याही चेह-यावर हास्याची लकेर उमटली...आणि मी कढवलेल्या ताज्या तुपाला नेहमीच्या डब्यात भरायला घेतलं.
तूप हा आमच्या जेवणातला एक
अविभाज्य घटक...त्यातही घरातले कढवलेले तूप...एक मोठा स्टिलचा डबा कायम भरलेला
असणार...तो डबा भरला की तसाच मोठा दुसरा डबा सुरु करायचा आणि त्या भरलेल्या
डब्यातल्या तुपाचे लाडू, शंकरपाळ्या...असे पदार्थ सुरु...दूध ते तूप या सर्व
प्रक्रीयेचं नव-याला पहिल्यापासूनच कौतुक...कारण या प्रत्येक टप्प्यावर एक पदार्थ
ठरलेला आहे. दूध...दही...लोणी...तूप...ताक...या
सर्वांना जोडणारी ही खाद्यपदार्थाची चेन अस्सल मराठमोळ्या चवीची....त्यामुळे या सर्वांचंच
नव-याला कोण कौतुक....
ही दूधा-तूपाची परंपरा आली
ती आईपासून...रेवदंड्याला आमच्या घरात दूधा-तूपाची कमतरता नव्हती. आई या सर्वांत पारंगत...आई दूधावरची साय
काढतांना मी मुद्दाम आसपास असायचे. साधारण
दोन लिटरच्या दूधावरुन आई जाडसर साय चिनीमातीच्या बरणीत काढायची...ही साय, ती नेहमी
अखंड काढायची...हे तिचं कसब मला एवढ्या वर्षानंतरही जमलं नाही. शिवाय दूधाच्या भांड्याच्या आसपास लागलेली सर्व
साय अगदी अलगद चमच्यानं खरडून काढली जायची...पुन्हा दूध गरम केलं की पुन्हा त्यावर
पहिल्यासारखी घट्ट नाही पण थोडी हलकी साय यायची...त्याचीही तशीच
प्रक्रीया...सायीची बरणी भरली की त्यात घरचं थोडं ताक रात्री टाकून विरजण घातलं
जायचं...आणि सकाळी मोठ्या भांड्यात हे सायीचं लोणी घेऊन लाकडाच्या मोठ्या रवीनं
घुसळलं जायचं...लोणी आलं की मग हलक्या हातांनी काढून त्याचे दोन भाग व्हायचे....एक
ताटात लगेच वाढला जायचा...दुसरा भाग कढवायला...लहानपणापासून या तुपाच्या सुवासानं
भारावलेले होते....संसाराला सुरुवात झाली तेव्हा पहिलं काम हे दूध-तूपाचं केलं..
रेवदंड्याला आमच्या घरच्या गायी-म्हशी होत्या...त्यामुळे विकत दूध
आणण्याचा प्रश्नच नव्हता...मात्र इथे पिशव्यांच्या दुधाशिवाय पर्याय नव्हता. त्यातही स्पेशल, डोन्ट, असे काही प्रकार आहेत याची माहितीही नव्हती...शेवटी विकणा-याला, लोणी निकालना है...असं म-हाठी...हिंदीत सांगितलं...त्याला ते बरोबर कळलं...त्यांनी स्पेशल दूधाची पिशवी हातात ठेवली...वर अच्छा है...म्हणून पावती दिली. गॅसवर मंद आचेवर दूध तापवल्यावर थंड करुन फ्रीजमध्ये गेलं. दुस-या दिवशी त्याच्यावर घट्ट साय आली होती. आईला आठवून ती साय डब्यात काढली....नंतर रोज हे साय साठवणं सुरु झालं. शनिवारी रात्री विकतच्या दह्यातून या सायीला विरजण लावलं...आणि दुस-या दिवशी मिक्सरच्या आधारानं लोणी काढलं....लोण्याचा छानसा गोळा आल्यावर कितीतरी खूष झाले होते...नव-याला कोण कौतुक...मग लगेच हे लोणी कढवायला ठेवलं...पण इथं काहीतरी फसलं...लोणी वितळल्यावर भरकर सर्व ओतू जाऊ लागलं. गॅस बंद-चालू असं करुन बघितलं...पण दोन-तीन वेळा तरी तुपाची अंघोळ गॅसला झालीच...यातून वाचलेलं तूप कढवलं थंड झाल्यावर एका बरणीत काढलं...संध्याकाळी साधारण थंड झाल्यावर या पहिल्यावहिल्या तुपाला बघितल्यावर डालड्यासारखं वाटलं...अगदीच मिळमिळीत...आईकडे रवाळ तुप असतं...ते काही नव्हतं...काय चुकलंय हे कळत नव्हतं....शेवटी आईला विचारलं...तिनं अगदी शेवटी पकडलं...लगेच गॅसवर ठेवलास का लोण्याचा गोळा...चपात्या झाल्यावर तवा गरम रहातो ना....त्या तव्यावर ठेव लोण्याचं भांडं आधी....आणि मुख्य म्हणजे लोण्यात चांगली दहा-बारा तुळशीची पानं घालं...हे दोन सल्ले मोलाचे होते...मग पुढचा कुठलाच प्रयत्न कधीही फेल गेला नाही....तुपाची कधीही गॅसला अंघोळ झाली नाही...छान रवेदार तूप...तयार होऊ लागले..
एकतर लोणी झाल्यावर लोणी आणि थालीपीठ हा बेत आमच्याकडे कितीतरी वर्षात ठरलेला. दर सोमवारी सायंकाळी सायीच्या दह्यापासून लोणी काढणार...मग लोणी आणि थालीपीठं हा रात्रीचा बेत आणि दुस-या दिवशी सकाळी ताकाची कढी...लेक मोठा होऊ लागल्यावर दुधाचं प्रमाण वाढलं...त्याला दोनवेळा ग्लासभर दूध....वर त्याला आवडतात म्हणून सळढ हातानं दूध वापरुन मिठाई होऊ लागली. जरा गरमी वाढली की त-हेत-हेचे मिल्कशेक...अनेकवेळा ज्या दुकानातून दूध विकत घ्यायचो ते विचारायचे, कोणी पाहुणे आलेत का...तुम्हा तिघांना एवढं दूध कशाला लागतं...या असल्या प्रश्नावर आम्ही खूप हसायचो...या सर्वांचा चांगला परिणाम म्हणजे माझे भरलेले तुपाचे डबे. तुपाचा एक मोठा डबा सदैव भरलेला असायचा. लेकाला अगदी लहानपणापासून घरी बनवलेले लाडू खायची सवय लागली. मी डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याबरोबर काम करायचे तेव्हा त्या नेहमी सांगायच्या, भात, मुगाची डाळ, लिंबाची फोड आणि एक चमचा तुप...हे एवढं जरी लेकानं खाल्लं तरी पुष्पळ बघ....तेव्हापासूनचा त्यांचा सल्ला प्रमाण मानलेला. डाळ-भातावर तुपाची धार हवीच. डोसा केला तर तो तुपातून पोहून आलाय की काय असाच...मोदकही खातांना तुपात न्हालेलाच हवा....लोणी काढलं की ते
वाटीभर लेकाच्या नावाचं...गरम गरम थालीपीठाचा घास लोण्याबरोबर तो घेणार आणि व्वा...म्हणणार...या सर्व पावत्या किती महत्त्वाच्या....तोच प्रकार शि-याचा...एरवी शिरा हा प्रकार लेकाला आवडत नाही...पण तो आरोग्याला चांगला...म्हणून सढळ हातानं तुप वापरुन आठवड्यातून एकदा तरी होणारच...त्या तुपाच्या मस्त सुवासात रंगलेला हा शिरा म्हणजे आमच्या घरातल्या ट्रेडमार्क पदार्थांपैकी एक आहे.
असे दुधा-तुपात रंगलेले आमचे घर लेक बाहेर शिकायला गेल्यापासून अगदी ओकेबोके झाले. लेक गेल्यावर दूध अगदी नावालाच यायला लागले. पहिली तीव्र प्रतिक्रीया आमच्याकडे दूध देणा-यांची होती. काय झालं....दूध का बंद झालं...असं कसं...म्हणून त्यांचे प्रश्न येऊ लागले. मग नव-यानं टोन्ड दूध...ए-2 दूध असे प्रयोग सुरु केले...या सर्वात एक झालं की माझे तुपाचे डबे खाली होत होते...घरात लोणी, तुप हा प्रकार बंदच झाल्यासारखं झालं...गेल्या पंधरा दिवसात हे डबे खाली झाल्याचं अधिक लक्षात यायला लागलं कारण लेक सोबत लाडू घेऊन गेला होता, ते संपल्याचा आलेला मेसेज...लाडू करुन ठेव, मी येतोय....हा त्याचा मेसेज आला आणि मी अलर्ट झाले. पहिलं ते दुधाचे लाड बाजुला केले....आणि ज्याच्यावर मस्त घट्ट साय येते ते दूध घरी आणलं. पुढचे काही आठवडे दूध लागणार म्हणून
दुकानदाराला मेसेज पाठवला. तो खूष...मी पुन्हा दूध...साय....दही...लोणी...ताक...या चक्रात स्वतःला गुंतवून घेतले. आत्ताही तसंच चालू आहे. एकीकडे थोडं का होईना, पण तुपाचा डबा पुन्हा भरायला लागला. दुपारच्या जेवणाची तयारी सुरु केली. अगदी साधा बेत बटाट्याच्या कस-या, भात, ज्वारीची भाकरी, आईनं दिलेलं हळदीचं लोणचं आणि ताज्या ताकाची कढी...या सर्वांवर ताज्या तुपाची धार...जेवतांना एक समाधान होतं...तो तुपाचा खास डबा आता भरतोय...आणि ज्यासाठी तो भरतोय...तोही येतोय....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खर्च रवाळ तुपाचा सुगंध दरवळायला लागला आजूबाजूला। किती सुंदर लिहीला आहे लेख
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप छान !
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteअगदी साधा विषय खूलवून लिहिण्याचं तुझं कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.
ReplyDeleteधन्यवाद मॅडम...
Deleteछान लिहिलंय स ई
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteआधी आमच्याकडे सुद्धा लोणी, तूप असायचे. पण आता फॅट कंटेंट नको म्हणून फक्त गाईचे दूध ,तेही थोडे येते .त्यातून लोणी तूप कुठून येणार?
ReplyDeleteजयश्री कर्वे
फॅट नावाचा शब्द आला....तेव्हापासून बहुधा सर्वच घरात हे असं होऊ लागलंय...आमचंही घर याला अपवाद नाही...
Deleteखूप छान लेख.मस्त लिहिलंय छान आईच्या टिप्स पण मिळाल्या.
ReplyDeleteछान आहे
ReplyDelete