एक सफर चिंधीमार्केटची.....
तब्बल चार तासांहून अधिक वेळ झाला होता. माझी शॉपिंग चालू होती...पण बॅग मात्र खाली. मला माहित असलेल्या सर्व कपड्यांच्या दुकानात दौरा झाला, पण मनपसंद असं काहीच मिळालं नाही. दुपारी बारा वाजता मी घराबाहेर पडले, चार वाजेपर्यंतही कुठल्याही दुकानात कपड्यांची खरेदी झाली नाही. कुठे रंगाचा अटकाव तर कुठे डिझाईनचा प्रश्न...कुठे त्यावर केलेले वर्क एवढं होतं की ड्रेस साध्या कार्यक्रमासाठी की लग्नासाठी असा प्रश्न...आणि हे सर्व मनासारखं मिळून आलं की नेमकं माझ्या साईजचा ड्रेसच गायब झालेला असायचा...आणि हेही जरी जमून आलं तर मुख्य रहायचं ते म्हणजे व्हिटामीन एम...अर्थातच त्या कपड्यांची किंमत माझ्या बजेटच्या पार आरपार जात होती...त्यामुळे दुपारी हौशेनं सुरु केलेला शॉपिंगचा दौरा चार वाजता आटोपता घेतला, आणि रिकाम्या पिशव्यांनी घर गाठलं. घरी आल्यावर नव-यानं हसून स्वागत केलं...त्या हास्यात बरचं काही लपलं होतं...म्हणजेच, तुला कधी काही पटकन पसंत पडणार नाही...असा अर्थ त्या हास्यात डोकावत होता...शेवटी माझा नाराज झालेला चेहरा बघून तो म्हणाला, त्या तुझ्या लाडक्या चिंधी बाजारात जा ना...तिथे बघ काय आवडीचं मिळतं का...बस्स हेच ऐकायचं होतं. माझा पडलेला चेहरा खुलला...गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक ठिकाणी होणारे हक्काचे दौरे आवरते घेतले होते...त्यातलाच हा एक चिंधी बाजारचा दौरा...
गेल्या दोन वर्षात कोरोना नावाच्या चक्रव्यूहात अडकल्यामुळे सर्वांवर अटकाव लागला होता. त्यातील मुख्य गोष्ट म्हणजे कपड्यांची खरेदी. कुठल्या कार्यक्रमांची जंत्रीही नव्हती...त्यामुळे ऑनलाईन खरेदीवर सर्व भार होता. आता कोरोनाची दहशत कमी झाल्यावर पुन्हा सर्व सुरुळीत होऊ लागलं आहे. कौटुंबिक गाठीभेटी आणि इतरही कार्यक्रम सुरु झालेत. अशातच दोन वर्षात केलेल्या योगसाधनेमुळे नेहमी लागणारे कपड्यांचे मापही एक नंबरनं घटलंय...ही आनंदाची वाटणारी गोष्ट किती अडचणीची होऊ शकते, याची जाणीव मी बाहेर तयार कपड्यांच्या खरेदीसाठी गेल्यावर आली. बहुतेक ठिकाणी एकाच रंगाचे, डिझाईनचे कपडे...मग या रंगावर ही डिझाईन नाही का...याचा गळा मोठा आहे...हा रंग जरा डार्क आहे...हा काय रंग आहे...हे मटेरिअल चांगलं नाही...हे काय...याची किंमत अवाजवी आहे...असे अनेक नकारवर नकार देत मी माझ्या खरेदीच्या ऊत्साहाला आवर घातला. घरी परत आल्यावर नव-यानं चिंधी बाजाराची आठवण करुन दिली...आणि दुस-या दिवशी या चिंधी बाजाराची वाट धरली.
तयार कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी गेल्यावर ज्यांना स्वतः मोठं ड्रेसडिझाईनर
असल्याचा अविष्कार होतो....आणि मग प्रत्येक ड्रेसमध्ये काहीतरी कमतरता दिसायला
लागते...रंग, डिझाईन, त्यावरील वर्क यामध्ये काहीतरी चुकल्यासारखं जाणवतं...त्यांच्यासाठी
स्वतः कापडं घेऊन, आपल्या डोक्यातल्या कल्पनांप्रमाणे कपडे शिवून घेणे हाच एक
पर्याय रहातो. आणि मी ही याच गटातली
असल्यामुळे मीसुद्या हाच पर्याय स्विकरते.
अशावेळी हा चिंधीबाजार मदतीसाठी येतो.
डोंबिवलीत रहायला आल्यानंतर काही मैत्रिणींनी या चिंधी बाजाराची वाट दाखवली
होती. पहिल्यांदा चिंधी बाजार हे नाव
ऐकल्यावरच खूप हसायला आलं होतं. चिंधीसारखे
कपडे मिळत असतील...त्यांची कॉलीटी चांगली नसेल...आदी शंका काढून झाल्या...मग
मैत्रिणीनं तू चल ग फक्त...नाही आवडलं तर घेऊ नकोस, नुसतं फिरणं तर होईल, म्हणून गळ घातली. आणि तेव्हापासून या चिधी बाजाराची मोहिनी पडली
ती आजतागायत...
डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनच्या समोर एका गल्लीमध्ये हा
चिंधीबाजार, अर्थात कपड्यांच्या ताग्यांचा आणि कटपीसचा बाजार आहे. मी येथे अनेकवेळा गेले आहे, पण प्रत्येकवेळा या चिंधी बाजारची गल्ली विसरते...आता तर दोन वर्षांनी जात होते...मनात थोडी धाकधूक होती...काही नवीन मिळेल की जुनाच माल असेल काय माहित, अशी शंका घेऊन, आणि मध्येच एकाला चिंधी बाजारची गल्ली कुठली म्हणून विचारत त्या गल्लीत गेले. आणि पुढच्या दोन तासात हातातल्या दोन पिशव्या टम्म भरुन बाहेर पडले.
चिंधी बाजार म्हणजे, कपड्यांचा बाजार. अगदी दहा-बारा दुकानात कपड्यांचे तागे ठेवलेले असतात. काही ठिकाणी कटपीसवर असतात. बहुधा सर्वंत्रच कपडे सूरत, किंवा राजस्थानच्या काही भागातून येतात. आणि कुठले कपडे असतात, हे विचारु नका. कपड्यांमधले सर्व प्रकार एकाच छताखाली असा प्रकार इथे आहे. फक्त येतांना भरपूर वेळ आणि आपल्याला हवे असलेले कपड्यांचे डिझाईन आणि पोत शोधण्याचे पेशन्स ठेवलं की काम होतं. ब-याचवेळा आपण ज्या कपड्यांच्या शोधात येतो, ते बाजुला होऊन दुसरेच कपडे खरेदी केले जातात. असं माझ्या बाबतीत अनेकवेळा झालं आहे. त्यामुळे आता स्वअनुभवानंतर काही ठराविक खरेदी करायची हा नियम न ठेवता येते...मग आवडलेल्या कपड्यांची खरेदी होते. कपड्याची कुठलीही नवीन फॅशन बाजारात आली की त्या कपड्यांचे तागे या चिंधी बाजारातील गल्लीत दाखल होतात. अगदी क्रेप, टू कलर झिकझॅक, वेलवेट मटेरील, शिफॉन, मलई कॉटन पासून अनेक नवीन प्रकार येथे पहायला मिळतात. जेवढ्या व्हरायटी, तेवढेच रंग आणि त्यावरची डिझाईन शिवाय जरदोजी कामांमध्येही विविधता...बनारसी ओढण्या...लेपर्ड प्रिंटच्या कपड्यांची नवी फॅशन...असं खूप काही बघायला मिळातं. आत्ताही तसंच होतं. दुपारची वेळ असली तरी माझ्यासारख्या खूप हौशी बायका या बाजारात होत्या....इथे किलोवर कटपीस मिळतात. त्यामुळे अशा कटपीसच्या मोठ्या पिशव्यांमधून आपल्याला हवे असणारे आणि आवडलेले कटपीस महिला शोधत होत्या....काही मैत्रिणींचे गट
आले होते. अशी एकत्र खरेदी केल्यास आणखी स्वस्त दरात कापड मिळतं.
मी सावकाश सर्व बाजार फिरुन घेतला. नवीन म्हणून माझा ठरलेला एक दुकानदार आहे. त्याचे या चिंधी बाजारात लागून असे दोन गाळे आहेत. सर्व फिरुन शेवटी त्याच्या दुकानात गेले. आधी माझ्या मनातल्या शंकेप्रमाणे कपडे बघायला लागले. तेव्हा नवीनच म्हणाले, ओ दिदी....लॉकडाऊनका कोई माल नही है...सब खतम हुआ...पुरा दुकान खाली हो गया था....लेडीज लोक फोन करते आते थे, सुबह सात बजे...और बहोत सारा कपडा लेके जाते थे...अब ये सब नया है...हमेशा की तरही...आप चिंता मत करो...त्याच्या या आश्वासनानं मी निवांत झाले...काय घ्यावं या चिंतेत पडले...कारण ती अलीबाबाची गुहा होती...शेवटी तो नवीन मदतीला आला...क्या बनाना है, म्हणत त्यानं विचारलं...मी माझ्या मनातल्या ड्रेसची कल्पना सांगितल्यावर त्यांनी तागेच्या तागे माझ्यापुढे खाली काढायला सुरुवात केली....मग मी अजूनच गोंधळले...शेवटी माझ्या लाडक्या रंगावर येऊन थांबले...गुलाबी रंगाची बारीक नक्षीकाम असलेले एक तलम कापड मिळाले...नवीनने त्यावर मॅचिंग होईल असे अस्तर काढले. मग अजून एका ड्रेससाठी कापड घेऊन झाले...मग उगाचच मध्ये इरकली काठाचा तागा आला...तोही घेऊन झाला...आता बस्स बस्स म्हणून उठत असतांना शिफॉनच्या कपड्यांवरुन नजर हटत नव्हती. काही वर्षापूर्वी अशाच शिफॉनच्या कपड्यांपासून मी सुंदर साड्या केल्या होत्या...त्यावर पेंटींग करुन वर टिकल्यांची सजावट केली...मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला अशी साडी भेट
दिल्यावर ती जाम खूष झाली होती...आत्ताही तसेच शिफॉनचे कपडे खुणावत होते...नवीन हुश्शार...त्यांनी माझी स्टील झालेली नजर हेरली आणि त्या शिफॉनच्या ताग्यांना माझ्यापुढे टाकायला सुरुवात केली....दिदि ये लेलो....आप कुछ भी कर सकते हो....म्हणत त्यांनी मला हरभ-याच्या झाडावर चढवले, मग मलाही स्वतःला मी मनिष मल्होत्रा पेक्षा कमी नाही, हा साक्षात्कार झाला. यातूनच नाही नाही करत साडीसाठी म्हणून त्यातले दोन रंग घेऊन झाले... आणि असंच राहू दे...मग काहीतरी करु म्हणून अजून एका रंगाचे शिफॉन कापड घेऊन झाले. अजूनही मन भिरभिरत होतं...बॅगा भरल्या...आत्ता खरचं बस्स म्हणत त्या नवीनचं बील दिलं आणि पुन्हा एक फेरी मारुन चिंधी बाजारातून काढता पाय घेतला.
घरी येण्याआधी सरळ टेलरच्या दुकानात गेले. त्याच्याताब्यात घेतलेले कपडे दिले आणि मला हवे
तसे डिझाईन सांगितले...जवळपास तासभर टेलरकडे घालवल्यावर घर गाठलं...आता त्या
शिफॉनच्या साड्यांवर काय करता येईल याची तयारी सुरु केली...एकूण काय चिंधी बाजार
म्हणजे माझ्यासारख्या हौशी फॅशन डिझायनरसाठी मोठी संधी आहे...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप छान
ReplyDeleteवाचताना खरेदी केल्याचा आनंद मिळाला. त्या चिंधी बाजारात मी एकदाच गेलेय... वाचल्यावर पुन्हा जायचा मोह होतोय.
ReplyDeleteVastav aahe. Mazya dnyanat mazya Sau sathi aankhi eka kapdyanchya thikanachi bhar(addition). Thanks 😊
ReplyDeleteमाझा आवडता विषय शिवण .
ReplyDeleteशिवण कामातून उरलेल्या चिंध्या हा जणू काळजा तला ठेवा . ह्यातून काय काय करता येईल हा विचार अखंड डोक्यात . चिंध्यातून शिवलेला एक प्रकार गंमत म्हणून पोस्ट करते . ह्या डोंबिवली च्या चिंधी बाजाराला मी पण तीन चार वेळा भेट देऊन बॅगज साठी कापड खरेदी केली आहे . त्यामुळे हा लेख अगदी मनातलाच ! धन्यवाद सई !
खरंच सुंदर आहे चिंधी बाजार ..पडद्याची कापडं आणि पडदे खूप सुंदर मिळाले होते आम्हाला आणि स्वस्तही.. टॉवेल बेडशीट ही खूप सुंदर मिळतात
ReplyDelete