भाजीत भाजी फोडशीची...
पाऊस पडतोय...पहिला पाऊस पडला की घराघरात भजी करतात...कांदा...बटाटा...कुठली तरी एक भजी तरी करायचीस...निदान एखादा पापड तरी तळायचा...पण आमच्याकडे काय तर पावसाळी भाज्या...जेवतांना बसतांना मला जेवढं बोलता येईल...तेवढं बोलून नवरा ताटावर बसला. बाहेर पावसाची एक हलकीशी सर पडत होती. अशावेळी जेवतांना काहीतरी चटकदार, भजीसारखं तोंडात टाकावं अशी भावना होणारच...पण मी केलेला बेतही काही कमी नव्हता. ताटात फक्त तीन पदार्थ होते...फोडशीची सोडे घातलेली भाजी...तांदळाच्या पांढ-या भाक-या आणि कांदा...फोडशी ही अशी भाजी आहे, की ती कितीही प्रकारानं केली तरी हवीहवीशी वाटावी...बाजारात पावसाळी भाज्यांमध्ये मुबलक प्रकारात कुठली भाजी मिळते, तर ती फोडशीचीच भाजी असेल...मी तब्बल चार जुड्या आणलेल्या...त्या बघूनच नव-यानं सुरुवात केली होती...एवढ्या कशाला आणायच्या...एकदा केलीस तरी
बस्स...वगैरे...चालू झालं होतं....पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत फोडशीच्या मला माहित असलेल्या आणि नसलेल्याही नवीन प्रकारांना करायचा बेत केला होता...त्यातलाच पहिला प्रकार म्हणजे फोडशीची सोडे घातलेली भाजी...ताटावर नाराजी व्यक्त करत बसलेला नवरा, पहिला घास घेतल्यापासून गपचूप जेवत होता...नंतर थोडी भाजी आणि अधिकची अर्धी भाकरी घेतल्यावर भाजी छान झालीय, हे सांगायचीही गरज नव्हती...
फोडशीची भाजी आहेच तशी...आपण जशी करु त्या पद्धतीत ही भाजी चवदार लागते. पावसाची हवी तशी सुरुवात अद्याप झालेली नाही. पण हा हलकासा पाऊस पावसाळी भाज्यांसाठी पुरेसा ठरतो. बाजारात फेरफटका मारल्यावर शेवाळाची भाजी पहिल्यांदा दिसली. ही भाजी चवीला सर्वात भारी. अगदी दुधाची तहान ताकावर अशी...म्हणजेच चिकनकरी...मटणकरी...याच्या तोडीस तोड चव या शेवाळाच्या भाजीची लागते. पण ही भाजी तेवढीच गरम...पाऊस
पुरेसा झाल्यावर येणा-या थंडाव्यात ही भाजी खाल्ली तर त्याचा त्रास होत नाही, हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव. त्यामुळे बाकीच्या पावसाळी भाज्यांवर जोर दिलेला. टाकळा, भारंग, कुर्डू आणि फोडशी या भाज्या जेवढ्या खाता येतील तेवढ्या खाण्याचा प्रयत्न चालू केला आहे. पहिला अटॅक भारंगावर. भारंगाच्या भाजीचं पाणी अगदी सुपासारखं प्यायचं...फक्त लसणीची फोडणी देऊन...त्यानं पोटातले रोग...जंतू मरुन जातात असं आई सांगायची...लहान असतांना नाक दाबत प्यायलेलं हे भारंगाचं पाणी आता स्वतः करुन पितांना कायम त्या लहानपणीच्या क्षणी घेऊन जातं...या भारंगाच्या भाजीबरोबर अन्य भाज्याही होत्या...पण त्यातही फोडशीच्या भाजीचा हिरवा गर्द रंग अधिक भावला...भारंगाची एक जुडी आणि फोडशीच्या दोन जुड्या आधी घेतल्या...मग पैसे सुट्टे नाहीत या कारणानं अधिकच्या दोन पिशवीत बसल्या...अशा पाच जुड्या झाल्यावर पहिल्यांदा या साफसफाईत दिवस जाईल याची काळजी पडली होती...अर्थातच नंतर नव-याच्या बोलाची...झालंही तसंच..
घरी आल्याआल्या त्याची नजर त्या भाजीनं टम्म फुललेल्या पिशवीवर पडली...आणि सर्व पालेभाज्या बघितल्यावर दुसरं काही मिळालं नाही का...मी रोज पालेभाजी खाणार नाही, म्हणत त्यांनी त्याची नापसंती सांगितली....भारंगाचं पाणी कसंतरी अर्धाकप पिऊन झालं...पण खरी कसोटी फोडशीच्या भाजीवर लागणार होती...कारण चार जुड्या संपवायच्या होत्या...एकच चव झाली तर सर्व बिनसणार होतं...त्यामुळे पहिल्या जुडीची भाजी सोड्याबरोबर केली. नेहमी करतो तसेच सोडे...फक्त त्यात कांदा आणि लसूण जास्त...वरुन फोडशीची भाजी घालून चांगलं परतून घेतलं...सकाळच्या
जेवणात ही फोडशीची सोडे घातलेली भाजी एक नंबर झाली होती...नव-यानं न बोलता खाल्ली म्हणजे पावतीच होती. आता बाकीच्या तिन जुड्यांचा प्रश्न होता...त्यातला एका जुडीच्या वड्यांचा बेत केला. सर्व डाळी भिजवून वाटून घेतल्या...आत आवडीप्रमाणे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, सोबत ओवा आणि अगदी नावाला जिरं, मिठ त्यात फोडशीची भाजी कापून टाकली. या सर्व मिश्रणाच्या मी इडल्या करते. मस्त वाफवल्यावर त्यांचे छोटे तुकडे करायचे आणि कोथिंबीरीच्या वड्यांना जशी फोडणी देतो तशी फोडणी द्यायची...या सर्व मिश्रणात फोडशीची भाजी आहे, याचा पत्ताही लागत नाही. संध्याकाळच्या नाष्ट्यासाठी खूप छान पर्याय होतो. तसाच आमच्याकडेही झाली. नशीबानं त्याचवेळी पावसाची मोठी सर आली होती. अशावेळी या फोडशीच्या वड्या छान परतून, फोडणी घालून तयार झाल्या. यात फोडशीची भाजी आहे हे ओळखलं तर पुन्हा बोलणी नको, म्हणून या वड्या देतांना त्यावर थोडी भुगा शेव पसरली आणि चाट मसाला भुरभुरला...या सर्व आवरणाखाली फोडशीची भाजी गपचूप लपून पोटात गेली. इथे दोन जुड्या संपल्या. बाकीच्या दोन जुड्या तशाच पेपरमध्ये गुंडाळून दुस-या दिवशीसाठी ठेवल्या होत्या.
दुस-या दिवशी अगदी पारंपारिक पद्धतीनं फोडशीची भाजी केली. भरपूर लसूण आणि चणाच्या डाळीवर फोडणी, मिरची आणि भरपूर कांदा तयार झालेल्या भाजीवर चमचाभर ओलं खोबरं...आत्ता ताटात भाकरी बदलली...तांदळाच्या भाकरी ऐवजी नेहमीची ज्वारीची भाकरी, ही पारंपारिक पद्धतीनं केलेली फोडशीची भाजी आणि सोबत तळलेल्या मिरच्या...आजही नव-यानं पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली...आजतरी संपली का भाजी...म्हणत जेवणाची सुरुवात झाली. पण पारंपारिक पणा हा साजेसाच असतो...तो जपलाच पाहिजे...निदान अशा भाज्यां बनवतातंना तरी...कारण पहिला घास घेतल्यावर मलाही भाजी
सरसच झाल्याची जाणीव झाली. नव-याचाही प्रश्नच नव्हता...तळलेल्या मिरच्यांच्या बरोबर आणि ज्वारीच्या भाक-यांसंगे ही तिसरी फोडशीची जुडीही संपली. आता खरा प्रश्न होता, कारण एव्हाना शेवटची जुडी थोडी मलूल झाली होती. काही पानं खराब झाली...अशावेळी काय करु म्हणून वाचार चालू केला. पण नव-यानंच हा प्रश्न सोडवला...रात्री जेवायला मसालेभात आणि भजी करशील का म्हणून त्यांनी विचारलं...मी लगेच हो म्हणत फ्राईडराईस करते म्हणून सांगितलं...काही भाज्या अगदी थोड्या थोड्या राहील्या आहेत, त्या संपतील म्हणून कारण पुढे केलं...त्याची ना नव्हती...मग रात्रीच्या फ्राईड राईसची तयारी सुरु केली....बाकी सर्व भाज्यांबरोबर पातीचा कांदा म्हणून चक्क फोडशीची भाजी टाकली. पहिल्यांदा मलाही धाकधूक होती. चव बदलेल...पाणी सुटेल...पण मोठा गॅस करुन पसतल्यावर पाणी फार सुटलं नाही...आणि काळीमिरीच्या फोडणीमध्ये फोडशीच्या भाजीचा विशिष्ट वासही विरुन गेला. रात्रीच्या जेवणात हा
फोडशीची भाजी घातलेला फ्राईड राईस आणि भजी हा बेत झाला...भात छान झाल्याचा नव-याचा अभिप्राय आला..आणि मी हुश्श केलं...अर्थातच मी कोणतीही गोष्ट लपून करत नाही...भात संपल्यावर तो का छान झाला याचं कारण सांगितलं...नव-यानं त्यावर फक्त छान म्हणून प्रतिक्रीया दिली...आणि आता पुढची भाजी कुठली...शेवाळाची की अळूची...हा त्याचा अनपेक्षित प्रश्न आला...आणि बाजारात पुढची फेरी कधी मारायची याचं माझं प्लॅनिंग सुरु झालं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
जबरदस्त.😋 🌹👌👌👌
ReplyDeleteमस्तच! वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटलं.
ReplyDeleteWah
ReplyDeleteखूप सुंदर लेख मी पण सर्व भाज्या करते
ReplyDeleteसर्व घरातले खातात
कधीतरी कुरकुर असते