एक समाधानी दिवस....
गेला शनिवार भन्नाट गेला...अपेक्षेपेक्षाही काही चांगलं झाल्यावर जो आनंद मिळतो, त्या मनमोकळ्या आनंदाचा गेला. शांत परिसर...सोबतीला योगाची प्रात्यक्षिकं...सोबतीला धरणाचा सुंदर परिसर...आणि या सर्वांत सुखवणारं म्हणजे, आंब्याची झाडं...अगदी पानं कमी आणि आंबे जास्त अशा आंब्याच्या बनात जाण्याचा योग आला. अगदी साधी वा-याची झुळूक आली तरी टपाटप आंबे पडायचे...आणि योगाची प्रात्यक्षिके सोडून ते आंबे गोळा करण्यासाठी माझी पळापळ व्हायची...या सर्व धावपळीचे फळ म्हणजे चांगले पिशवीभर आंबे मिळाले. रायवळ आंबा...अगदी गोड...हा आंबा गोळा करतांना अगदी लहान झाल्यासारखे झाले. नुकताच वाढदिवस झालेला. वय वर्षानं वाढलंय...पण हे फक्त नावालाच, अशी नव-यानं दिलेली प्रतिक्रीया सार्थ ठरली...आंब्यांनं भरलेली पिशवी...वाटेत हाणलेली भरपूर जांभळं...आणि निसर्गाच्या अगदी जवळ गेल्यावर मिळतो तसा सात्विक आनंद...या सर्वांनी गेला शनिवार सजून गेला.
काही दिवसांपूर्वी एका मित्रानं योगा करतेस का म्हणून विचारलं...त्याला हो म्हणण्यापेक्षा, मी योगा करतांना नव-यानं काढलेले फोटो दाखवले...तर त्यांनं लगेच माझ्याबरोबर काही फोटो काढायला येशील का म्हणून विचारलं...एरवीही फोटो काढूया म्हटलं की मी पुढे असते...आणि फोटो काढण्यासाठी बाहेर जायला मिळणार...आणि मी नाही म्हणणार...नो...नेव्हर...मी लगेच हो म्हटलं...आणि चटपट प्रोग्राम ठरला. खालापूरला एका ओळखीच्या फार्महाऊसमध्ये शनिवारी जाण्याचं नक्की झालं. मी आणि नवरा...साडेसहाला कल्याणला पोहोचलो...तिथे त्या मित्राला गाडीत घेतलं आणि खालापूरकडे रवाना झालो. तोपर्यंत अगदी साधं वाटत होतं. आत्तापर्यंत हा परिसर बघितलेला नव्हता...फक्त आपण नव्या ठिकाणी जाणार आहोत, याची उत्सुकता होती. जातांना दुसरा रस्ता पकडला...बदलापूर, माथेरान, कर्जत असं करत खालापूर गाठलं. कर्जतच्या आसपास आल्यावर जाणवलं की रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी फार्म हाऊस, धाबे यांची संख्या ब-यापैकी झालेली. शनिवार असल्यामुळे त्या सर्वांच्यापुढे गाड्या उभ्या होत्या. लोकांची ब-यापैकी गर्दी होती. वाटेत खूप ठिकाणी आंबे-फणस विक्रेते बसलेले होते. पण पहिल्यांदा आपलं कामाचं ठिकाण गाठूया, मग येतांना ही खरेदी करु...अशी समजूत नव-यानं काढून दिली. आणि मी शांत बसले...साधारण दोन तासात आम्ही ठरलेल्या फार्महाऊसवर पोहचलो...आणि सर्वात सुंदर दिवसाची सुरुवात झाली.
अगदी सकाळी आठच्या ठोक्याला फार्महाऊस गाठलं होतं. सकाळी फोटो छान
येतात, म्हणून घाई चालू होती. आधी सर्व फार्महाऊस बघून घेऊया, म्हणून आमचा विचार होता. त्यामुळे फेरफटका मारायला सुरुवात केली, पण अगदी दहा-बारा पावलं चालून झाली आणि आमचे सर्व प्लॅन तिथल्या तिथे गळून पडले. अत्यंत सुंदर असणा-या फार्म हाऊसमध्ये सर्वत्र जास्वंदी आणि मोग-याची फुललेली झाडं होती. त्यांच्यावरुन नजर गेली तेव्हा समोर एक छोटं धरण होतं...मात्र त्याहीपेक्षा आम्हाला आवडलेली गोष्ट म्हणजे, सर्वत्र आंब्यांनी भरलेली झाडं आम्हाला खुणवत होती. आम्ही घरातून निघालो, तेव्हा एक शेड्यूल ठरवलं होतं. मात्र आंब्यांच्या या झाडांनी सर्व शेड्यूल खोडून काढलं. अगदी हाताला लागतील एवढे आंबे प्रत्येक झाडावर होते. अशीच अनेक झाडं या परिसरात होती. जवळ धरण...त्यामुळे वातावरण अल्हाददायक...वारा छान सुटलेला. अगदी साधी झुळूक आली तरी पटपट आंबे पडायचे. आपल्यासमोर असे आंबे पडायला लागले तर गप्प रहाणार का...ती योगाची प्रात्यक्षिकं...फोटो....सर्व मागे पडले आणि आंबे गोळा करण्यामागे आम्ही सर्व लागलो...जरा चौकशी केल्यावर समजलं की या आंब्याच्या झाडावरील आंबे कधी काढले जात नाहीत. मुंबईहून अनेक कुटुंब या ठिकाणी एक-दोन दिवस मुक्कामासाठी येतात. त्यापैकी अनेकांना गांव ही संकल्पना माहितच नसते. त्यामुळे इथला परिसर शक्यतो जेवढा साधा, गावातील वातावरणासारखा राहील याची काळजी घेतली आहे. गावाला गेल्यावर आंबे काढण्याची, विशेषकरुन झाडावरील आंबे तोडण्याची मजा औरच असते. इथे आलेल्या कुटुंबांना, त्यातील मुलांना हा आनंद घेता यावा म्हणून हे आंबे कधी उतरवले जात नाहीत. आलेली मंडळी आंबे गोळा करतात. ज्यांना झाडावर चढता येतं, ते चढतात आणि हवे तेवढे आंबे तोडतात...कोणाचंही...कसलंही बंधन नाही. ही सर्व माहिती मिळताच आम्हीही झाडावर चढण्याचं कौशल्य तपासून बघितलं. पण हाताला येतील असे आंबेच बरेच होते...त्यावर हात चालवला आणि नंतर या अगदी ताज्या अंब्यांचा मनमुराद आस्वाद घेतला. यासर्वात आमचे सर्व वेळापत्रक बिघडले. खरंतर अवघ्या तासाभराचे काम होते. आम्ही सर्व अकरा वाजेपर्यंत होईल असा अंदाज केला होता. मात्र आंबे मध्ये आले आणि सर्व मागे पडले. पण कोणाचीही तक्रार नव्हती. उलट वेगळा आनंद आमच्या चेह-यावर आला होता. किती दिवसांनी...नव्हे वर्षांनी असा आनंद लुटता आला होता. झाडावर चढून आंबे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्या काही तासांत आम्ही आम्हालाच विसरलो होतो. फोन तर दूरच राहिला होता. आंबे खाल्यावर जवळच असलेल्या धरणाच्या काठावर गेलो...तिथेच हातपाय धुतले...आंब्याचे हात धुतांना छोटे-छोटे मासेही जवळ येते होते...तिथेच फोटो शुट झालं...आणि आमची आवराआवर सुरु झाली. दुपरच्या जेवणामध्ये पुन्हा आंबे आले. कारण त्या आंब्याच्या झाडाखालीच जेवणाची व्यवस्था होती. जेवतांनाही अर्ध लक्ष वारा आल्यावर पडणा-या
आंब्यांकडे होतं. दुपारी दोन वाजता हे फार्महाऊस सोडलं तेव्हा सोबत आंबे, लाल जास्वंदीच्या भरपूर कळ्या, मोग-याची फुलं, कोरफडीची मोठी पानं...असं बरचं काही सोबत घेतलं होतं...आणि भरपूर समाधान...
परतीचा रस्ता जुना मुंबई-पुणे हायवेवरुन पकडला. तिथून अर्धा तास वाचेल असं आमच्या एका सहका-यानं सांगितलं. या हायवेला लागल्यावर आणखी एक लॉटरी लागली. रस्त्याच्या एका बाजुला जांभूळ विक्रेत्यांची रांग होती. जांभूळ, करवंद आणि छोटे रायवळ आंबे काही जणांकडे फणसही होते. मी न सांगताही नव-यांनं गाडी थांबवली...आसपासच्या आदीवासी पाड्यांमधील महिला आणि मुलं जांभळं आणि करवंदांची विक्री करत होते. जांभळं छोटी होती...पण एकदम गोड...एक-दोन चवीची बघितल्यावर त्या मुलाला भरपूर जांभळं बांधायला सांगितली. त्यांनी पानांचा मोठासा कोन तयार केला...त्यात राहतील एवढी जांभळं बांधून दिली. सहज म्हणून झालेली ही छोटी सहल सफल झाली
होती. हा जांभळाचा कोन हातात घेऊन आम्ही परत गाडीत बसलो...वातावरण सुखद होतं...या सर्व परिसरात अनेक फार्म हाऊस दिसले. काही खासगी होते तर काही ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसत होती. सर्व परिसर हिरवागार...त्यात टुमदार बंगले उठून दिसत होते. शहरातल्या गजबटापासून दूर जाण्यासाठी केलेली ही एक सोय...आम्ही घराकडे परतत असतांना काही गाड्या फार्महाऊसच्या वाटेवर दिसत होत्या...दिवसभरात मोबाईल नावाच्या प्रकाराला हातही लावला नव्हता. रेंजही नव्हती. शहराची जाणीव व्हायला लागली, तशी ही रेंजही आली...आणि मोबाईल सारख्या व्हायब्रेट व्हायला लागला....मेसेजवर मेसेज...पण मन अजूनही त्या आंब्याच्या झाडाभोवतीच होतं...मी आणि नव-यानंही मोबाईल बघण्याचा प्रयत्न केला...पण काय झालं माहित नाही...तो तसाच बाजुला ठेवला...आणि शांतपणानं काही तासांपूर्वी घालवलेल्या आनंदी क्षणांच्या आठवणीत रमून गेलो...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूपच छान शब्दांत व्यक्त केलं आहे. वाचताना मनानं मीही तिकडे फेरफटका मारून आले. 👌
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteवाचताना आमचा पण आमराईत मस्त फेरफटका झाला.
ReplyDeleteसई फार मस्त वाटतय् वाचून !सुरेख शब्दांकन
ReplyDelete