पावसाळ्यातील झाडाझडती....

 

 पावसाळ्यातील झाडाझडती....


गुरुवारचा सगळा दिवस सार्थकी लागला....संध्याकाळी खिडकीत बसून कॉफी पितांना हिच भावना मनात होती...खिडकी म्हणजे एसीचा  डक   ठेवल्यावर जी जागा बाकी रहाते, त्यात पाच-सहा कुंड्या..त्यावर काही छोटे डबे ठेऊन केलेला हिरवा कोपरा थोडा साफ झाला होता...त्यात नवीन सदस्यांची भर पडली होती...काही छान छाटून तयार होऊन बसले होते...बाहेर पाऊस पडत असतांना आपल्या छोट्या का होईना पण बागेला बघणं हा अती आनंदाचा क्षण होता.  मी झाडांची साफसफाई करतांना नवरा जरा कुरबूर करत होता...थोडं आवर...आता पुन्हा नको...काढून टाक...अशा शब्दांनी तो मला या हिरवाईपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होता...मात्र मी माझ्या कामात गुंग होऊन गेले होते...दुपारी जेवल्यावर सुरु केलेली ही पावसाळी झाडाझडती संध्याकाळी कॉफीच्या वेळेपर्यंत पूर्ण झाली.  सर्व कुंड्यांना त्यांच्या जागी ठेऊन आता त्यांचे नवे रुपडे बघत बसलो होतो...

गुरुवारी पाऊस चांगलाच पडला...बाहेर रिक्षाचा आवाज आला म्हणून खिडकीत जाऊन काय सूचना आहे, हे ऐकण्याचा प्रयत्न करु लागले.  या खिडकीतून त्या खिडकीत...असं घरातल्या घरात फिरुन झालं...पुढच्या अठ्ठेचाळीस तासात असाच पाऊस पडणार आहे, काळजी घ्या...असा संदेश त्यातून सांगत होते...हा संदेश ऐकतच खिडकीतील कुंड्यावर नजर टाकली...त्यात झालेली गर्दी खुणावत होती...थोड्या साफसफाईची गरज होती.  त्यातच नवीन काही कुंड्याही तयार करायच्या होत्या...त्यासाठी आणलेल्या बिया पडल्या होत्या...खरं तर हे पावसाळी काम...पाऊस सुरु होण्याआधी करावं असं...पण गेले काही दिवस असलेल्या गडबडीमुळे आणि थोड्या आळसानं दूर लोटलं


होतं...आज मात्र करायचंच असा निश्चय करुन गुरुवारी दुपारी या खिडकीतल्या बागेच्या साफसफाईला सुरुवात केली.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या हिरव्या कोप-याला जरा जास्तच महत्त्व दिलंय.  अगदी कोथिंबीर, पुदीना, मिरच्या घरच्या घरी तयार होऊ लागल्यात.  पानमेथीही घरी तयार होऊ लागलीय.  एरवी अनेक वर्ष माझ्याकडे गुलाब किंवा मोग-याचे रोप बहरायचे नाही.  पण रोजच्या जेवणातील कांदा आणि लसूणाच्या सालांच्या पाण्यांनी त्यांनाही बळकटी मिळालीय...आता एक कोपरा हिरवा करता करता...घरातल्या प्रत्येक खिडकीत दोन-चार कुंड्या झाल्यात.  घरातही मनीप्लॅटच्या सजवलेल्या कुंड्या ठेवल्यात....पण या सर्वांची साफसफाई अर्थात छाटणी करण्याची वेळ आली की मात्र मनात थोडं खट्टू होतं...पण यातूनच नवं बहरणार हा विचार करुन ड्राय बाल्कनीत हा सर्व मेळा जमा केला...सर्व कुंड्या काढून झाल्या...पण वालपावट्याच्या वेलीला काढता येणार नव्हते...अगदी छोट्याश्या डब्यात रुजलेलं हा वालपावट्याचा एकच वेल..पण त्याचा बहर काय...एका वेलाला तब्बल पंचवीस शेंगा निघाल्या...त्या शेंगा काढून बाकीचा वेल साफ केला...त्यात थोडं खतं घातलं...आणि पुढच्या झाडांवर मोर्चा वळवला...त्याच डब्यात छोटंसं मिरचीचं झाडही रुजलंय...सुरुवातीला अगदी नाजूक आहे, असं वाटणा-या झाडांनं बहुधा कांद्याच्या पाण्यानं चांगला जोम पकडला.  त्यावरही हिरव्या मिरच्या लागल्या होत्या...या मिरच्या काढून झाल्या...आणखी एक कुंडी महत्त्वाची आहे.  ती म्हणजे आल्याची...गेल्या दोन वर्षापासून यात आलं लावण्याची सवय लावून घेतली आहे.  एकदा मोड आलेले आले सहज म्हणून त्यात


रोवलं होतं...त्याला काही दिवसांनी फुटवा आला...तेव्हापासून एक कुंडी आल्याची झाली...तीच साफ केली...अगदी कोवळं आलं एक वाटी तरी निघालं...हा सर्व ऐवज किचनमध्ये सांभाळून ठेवला आणि मुख्य साफसफाईच्या कामाला लागले.

बोन्साय झाडांची छाटणी करतांना खूप काळजी घ्यावी लागते.  चार वर्षापूर्वी मोसंब्याच्या बिया एका कुडींत सहज म्हणून घातल्या.  त्याचे झाड आले...आता त्याला चार वर्ष झालीत...दर सहा महिन्यांनी त्याला छाटते....अजूनही त्याला काही फळं लागत नाहीत म्हणून दरवेळी नवरा ते झाड काढण्याची सूचना देतो...पण तो बोन्सायचा प्रयोग आहे...राहू दे म्हणत मी त्या कुंडीला साफ करते...आत्ताही तसंच झालं...आता या बोन्सायमध्ये आणखी भर पडली आहे, ती आंबा, जांभूळ आणि अवाकडोची....फळ खाल्लं की शक्यतो त्याच्या बिया कुठल्यातरी कुंडीत खोचायच्या ही सवय मला आहे.  त्यातून असे काहीतरी प्रयोग सफल होतात.  गेल्यावर्षी लावलेल्या आंब्याच्या कोईतून चांगलाच फुटवा आलेला आहे.  त्याच्यावरही बोन्सायचा प्रयोग चालू केलाय.  त्याच्यासोबतीनं जांभळाच्या बियाही रोबल्या होत्या.  त्यातील चांगल्या दहा-बारा बिया रुजल्या....आता त्यांच्यावरही बोन्सायचा प्रयोग सुरु आहे....या सर्वात जपलेलं झाड म्हणजे अवाकॅडोचं...या विदेशी फळाची बी रुजायला फार कठीण...माझ्याकडे मात्र दोन बिया रुजल्या होत्या...त्यातल्या एक एका मैत्रिणीच्या वाडीत लावायला दिलं...तर दुसरं तसच राहिलं...त्याला मध्यंतरी छाटलं तर पुन्हा त्याच्यावर छानशी नाजूक पानं आली...तेव्हापासून हा अवाकॅडोचाही बोन्साय प्रयोग चालू झालाय...गुलाब आणि डबल मोग-याची


झाडं नाजूक...कांदा आणि लसूणाच्या सालीच्या पानांनी त्यांनाही चांगला बहर येतोय...त्यांची सफाई झाली...कुंड्या धूवून आपापल्या जागी गेल्या...तुळशीच्या कुंडीची खास काळजी घ्यावी लागते...कारण नव-याची त्याच्यावर नजर असते....त्यात एक आणखी एक रोप लावून झालं. 

आता खरी बाजू होती ती नव्या पाहुण्याची...दरवर्षी काही पावसाळी नियम असतात, ते पाळावेच लागतात...त्यातला एक नियम म्हणजे पालेबिरडं...आमच्या चौल-रेवदंड्याकडे पालेबिरडं खाल्लं नाही तर पाऊसाळ्याचा काही उपयोगच नाही अशी परिस्थिती...तिथे पावसाचा शिडकावा झाला रे की झाला...बाजारात पालेबिरडं विकायला येणारच...मग बहुधा प्रत्येक घरात पालेबिरड्याची भाजी आणि तांदळाच्या भाक-यांचा बेत...पण ते इथे कसं मिळणार...या प्रश्नावर मी माझंच उत्तर शोधलं आहे.  दरवर्षी वालपावट्याचे दाणे रुजत घालते...साधारण आठवड्यानं त्यांना फुटवा येतो...अगदी बोटभर मोठी झालेली ही रोपटी मग भाजी म्हणून खाल्ली जाते...आत्ताही सर्व आवरल्यावर मोकळ्या ठेवलेल्या एका छोट्या टबमध्ये वालपावट्याचे दाणे पेरुन


झाले...त्यावर पाण्याचा हलका शिडकावा करुन, हा टब एका खिडकीमध्ये ठेवला...आता पुढचा सगळा आठवडा या टबभोवती जाणार होता...नंतर आईनं आणलेल्या निळ्या-पांढ-या गोकर्णाच्या बिया रुजायला घातल्या...गोकर्णाचा वेल कुठे चढेल याचा अंदाज करुन त्याची जागा नक्की केली.  काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन एक खत मागवलं होतं.  त्यासोबत काही फुलांच्या झाडांच्या बिया आल्या होत्या...त्या बियाही एका डब्यात लावून झाल्या...आता शेवटची माणसं हक्काची...तशीच शेवटच्या हक्काच्या कुंड्या तयार करायला घेतल्या...कोथिंबीर कापून झाली...थोडे धणे नव्या कोथिंबीरीसाठी घातले...पुदिन्याचा प्रश्नच

नाही...प्रत्येक कुंडीत थोडा थोडा पसरलाय...त्यातल्याच काही काड्या एका नव्या डब्यात लावल्या...स्वंयपाकघरात ठेवायला ही पुदिन्याची नवी कुंडी तयार झाली...त्याला जागा करुन दिली...हे सर्व करता करता संध्याकाळ झालेली...पावसाची बॅटींग आणि सनम पुरीची गाणी यात वेळेचा मात्र अंदाजच आला नाही...केलेल्या कामावर एक नजर टाकली....ड्राय बाल्कनित पडलेली माती साफ केली...आता निवांत वेळ...नव-याचाही ब्रेक पॉईट झालेला...मग ताज्या काढलेल्या आल्यावर नजर गेली...पावसाची साथ होतीच...याच आल्याची चांगली वाफाळती कॉफी तयार केली...दोन मग भरले...आणि तो हक्काचा हिरवा कोपरा गाठला...बोलायची काहीच गरज नव्हती...कॉफीचा स्वाद आणि हिरव्या कोप-याची साथ....और क्या....बस्स...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. हे सगळं बघायला यायला हवं!! फोटोत तो हिरवा आनंद दिसतोय. तुझं खूप कौतुक 🌺

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन आहे हिरव्या कोपर्‍याचे. तिथे आली की नक्की बघायला येईन. लिखाणाबरोबर ही बागेची आवड माहीत नव्हती. खूप मस्त, अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment