रस्ता कोणाचा...अर्थातच खड्ड्यांचा....

 

  रस्ता कोणाचा...अर्थातच खड्ड्यांचा....


पावसाळा सर्वांना हवाहावास वाटतो...पावसाळ्यात काय नाही मिळत...सगळाच उत्साह...चहा...कॉफीला भजीची सोबत मिळते...जेवणात पावसाळी भाज्यांची बहार असते...तर संध्याकाळी भाजलेल्या कणसाची दरवळ सगळीकडे पसरते...पावसाळी वातावरण काही औरच असते...त्यात जर पावसाळी पिकनीक साधली तर मग बघायलाच नको...या सर्व गोड पावसाळी वातावरणात आणखी एक मेंबर पावसाची बहुधा आतुरतेनं वाट बघत असतो...हा मेंबर म्हणजे खड्डा...पावसाळ्यात सगळीकडे रस्त्यावर पडणारे खड्डे...या खड्यांनीच मलाही नको केलंय...काही दिवसांपूर्वी टू व्हिलर घेऊन नेहमीच्या अंदाजाने बाहेर पडले..पण नेहमीचा रस्ताच वैरी झाला...त्यावर पावसाचे पाणी साठलेले...अंदाज आला नाही...नुकताच हा रस्ता खडी टाकून निट केलेला...आता पावसाच्या आशीर्वादानं या खडीनं  एकी केलेली...त्यामुळे रस्त्याभर कुठे रेतीचे छोटे डोंगर...तर कुठे चिखलानं भरलेला खड्डा...पावसाचं पाणी भरल्यानं या खड्ड्याची खोली किती याचा अंदाजही आला नाही...आणि गाडी घसरली...नशीबानं वेग जास्त नव्हता...त्यामुळे न पडता गाडी थांबवता आली...त्यानंतर टू व्हिलरला आराम देत आता सगळी भीस्त रिक्षावर ठेवली आहे.  बुधवारी असाच रिक्षा दौरा केला.   दोन ठिकाणी जायचे होते...रिक्षाचालकास आधीच सगळं सांगून पैसे ठरवून घेतले...त्यांनी ओके केल्यावर रिक्षामध्ये बसले...पण रिक्षावाल्यानं एकाच फेरीत अवघ्या शहराला पालथं घातलं...अगदी दूरदूरच्या रस्त्यांवरुन फिरवलं...मी त्यांना म्हटलं, अहो काका...केवढ्या लांबच्या रस्त्यावरुन घेत आहात...तर तो उलट म्हणाला, तुम्ही पैसे ठरवलेत ना...पण रस्ता कुठला ते ठरवलं का नाही...मग मी सांगणार तोच रस्ता असेल...यावर मी काय बोलणार...नंतर कळलं की हे महाशय रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी लांबलांबच्या रस्तांनी मला फिरवत होते.


साधारण वर्षभरापूर्वी एकदा हाताला दुखापत झाली होती.  हातावर उपचार झाले...पण कायम हलकीशी कळ येत राहीली.   विशेषतः गाडी चालवतांना हा दुखरा हात दुखण्याची अधिक जाणीव करुन देतो...त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवण्यावर भर देतेय...त्यासाठी गाडीचा वेग कमी...ब्रेकचा वापर फारच कमी करावा लागेल असा ठेवते.   पण हे सगळं गणित पावसाळ्यात चुकतं.   कारण पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती.  गेली पंधरा वर्ष तरी टू व्हिलर चालवतेय...त्यामुळे येणारा नको तेवढा आत्मविश्वास या खड्ड्यांमध्ये अनेकवेळा बळी गेला आहे.   पण आताशा भीती वाटायला लागेल...एवढी खड्ड्यांची संख्या वाढलीय.   पावसाची चाहूल लागल्यावरच रस्ते कामाला वेग येतो, तसंच आमच्या भागात झालं होतं...बारीक रेती टाकून खड्डे भरण्यात आले.  पाऊस आल्यावर जे नेहमी होतं  तेच झालं...खडी एकीकडे आणि  खड्डे एकीकडे असा प्रकार झालेला...त्यात पाऊस...त्यामुळे रस्त्यात छोटी-छोटी तळी झालेली...या तळ्यातून मार्ग काढतांना एकदा गाडी घसरली...थोडक्यात वाचले...पण मनात झालेलं धस्स काही जाईना...शेवटी रिक्षाचा पर्याय स्विकारला...महिन्याची ठराविक कामं होती...बॅंकांची फेरी...आणखीही काही कामं...शेवटी एक रिक्षा केली.  रिक्षाचालकाला जिथे जायचं आहे, ती ठिकाणं सांगितली...पैसे ठरले. 

पण या काकांना अख्ख्या शहराची फेरी घडवली.  कारण होते खड्ड्यांचे...अहो सहन होत नाही ताई, म्हणून त्यांनी त्यांची व्यथा सांगितली...त्यांच्या पाठिचं दुखणं....त्यावर उपचार परवडत नाहीत म्हणून रोज रात्री झोपतांना एक पेनकिलरची गोळी....हे ऐकून मी गप्प झाले...त्यांचं सुरु होतं, एवढे खड्डे आहेत, रस्त्यात की विचारु नका...तुम्ही काळजी करु नका, मी ठरलेलेच पैसे घेईन, म्हणून मला अश्वस्थ केलं...पण त्यांच्या या रोजच्या दुख-या जगण्याच्या जाणीवेनं मी अस्वस्थ मात्र झाले.   

अर्थात या काकांनी जेवढी काळजी घेतली होती, त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही.  कारण सर्वच रस्त्यांची अवस्था सारखी होती.  अहो काल गेलो होतो हो इथून, एवढा खड्डा नव्हता,असं मध्ये मध्ये म्हणत ते काका माझी समजूत काढत होते. या सगळ्या प्रवासात दोनवेळा त्यांनी जोरात ब्रेक दाबला आणि मी पुढे फेकले गेले...एकदा डोक्याला रिक्षाचे छप्पर आपटले...बाकी धक्के बसले ते मोजण्यासारखे नव्हतेच...मला अपेक्षित ठिकाणी सोडून रिक्षावाले काका निघून गेले.  जिथे गेले होते, तो रस्ता म्हणजे खड्ड्यांचे आगार असल्यासारखा होता.  त्यामुळे एक तासाभरात काम झाल्यावर पुन्हा रिक्षा नको, चालत जाऊया म्हणून मी चालायला सुरुवात केली.   सोबतीला मुसळधार पाऊस होता.

हातात छत्री, बॅग असं सांभाळत चालायला सुरुवात केली...पण लवकरच समजलं की काही खरं नाही...कारण या रस्त्यात खड्डेच खड्डे होते...त्यात येणा-या जाणा-या गाड्या चुकवाव्या लागत होत्या.  चालकांची तारांबळ होत होती....खड्ड्यांचा अंदाज घेत ते सांभाळून गाडी चालवत होते.  पण कोणीच


दिशा वगैरे पाळत नव्हते...जिथून ब-यापैकी खड्डे असतील...म्हणजे त्यांची खोली कमी असेल असा अंदाज घेत ते गाडी चालवत होते.   त्यामुळे माझ्यासारख्या रस्त्यातून चालणा-यांची तर अधिकच कुचंबणा होत होती.  शेवटी काहीवेळा पाऊस सोडून मी छत्री पायावरही धरली होती.   जेणेकरुन गाड्यांमुळे उडणारे चिखलाचे पाणी अंगावर येत नव्हते.   किमान वीस मिनीटांचा हा रस्ता होता....पण पाऊसाचा जोर आणि खड्ड्यांचा अंदाज घेत मला या रस्त्याला पार करायला पंधरा मिनिटं अधिक लागली.  शेवटी घराजवळच्या रस्त्यावर आले तेव्हा थोडा धीर आला...एव्हाना मुसळधार पडणारा पाऊस थोडा कमी झाला होता.  पावसात भिजायला झालं होतं.  पण समाधान एकच होतं, की कुठेच चिखल उडला नव्हता...याचंच समाधान वाटत होतं...घराजवळ आले, तर गाड्या थांबलेल्या...आता इथे कसलं ट्रॅफीक म्हणत पुढे जाण्याचा प्रयत्न केला...तर मोठा आवाज करत क्रशर रस्त्यावर फिरतांना दिसले...पुढे एका डंपरमध्ये खडी भरली होती...काही कामगार पावसात ती खडी रस्त्यावर टाकत होते...आणि ते भलं मोठं क्रशर त्यावर फिरत होतं...अरे देवा...पुन्हा खडी म्हणत मी डोक्याला हात लावला...आता हे सर्व रस्ते खड्ड्यांचेच नाही तर चिखलाचेही होणार होते....म्हणजेे माझी गाडी माझ्यापासून आणखी काही दिवस तरी दूर असल्याची जाणीवही झाली....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

Post a Comment