रेडीमेडच्या मागचे तिचे समृद्ध हात.....

 

 रेडीमेडच्या मागचे तिचे समृद्ध हात.....


हे काय....आता असं पण येतं का....कमाल आहे बुवा या आजकालच्या मुलींची....किती ते रेडीमेड...सर्वच बाबतीच सुख आहे....थोडं अंगाची हालचाल नाही....कसला त्रास नाही....कमाल आहे..असं पुन्हा पुन्हा म्हणत, माझ्या बाजुच्या बाईनं हातातल्या पाकिटावर नजर टाकली...त्या बाईच्या कपाळावर पडलेल्या आठ्या अधिक दाट झाल्या...एकदा पुन्हा ते हातातलं पाकिट उलट पुलट करुन झालं...शेवटी नाराजीनं ते पाकिट दुकानदारासमोर ठेवलं...त्यांनी बाजुला ठेवलेले पैसे घेतले,  आणि काहीतरी पुटपुटत दुकानातून त्या निघून गेल्या.  मी त्या बाईच्या मागे होते...माझीही खरेदी झाली होती...दुकानदाराला आता पैसे देण्यासाठी मी काऊंटरसमोर आले, तेव्हा मी सुद्धा उत्सुकतेनं ते पाकिट हातात घेतलं.  खूप निटनिटकं...माझ्या मनात पहिल्यांदा विचार आला.  चिवड्यामध्ये सुक्या खोब-याच्या कापा घालतात ना...तशाच सुक्या खोब-याच्या कापांचं पाकिट होतं ते...अगदी पातळ, छान कापा केलेल्या होत्या...सर्व बहुधा एका मापाच्या...मोजून केल्या असाव्यात अशाच...तो दुकानदार माझ्याकडे हसून बघत होता...मी सुद्धा त्या बाईंसारखंच उलट पुलट करुन पाकिट बघत होते...किती छान कल्पना...मग त्या बाईचे शब्द आठवले...किती ते रेडीमेड...पण हे रेडीमेड एक सोडून दोघींना सुखाचे होते की...एक जी वेळातवेळ काढून घरी चिवडा बनवणार होती...आणि घरचा


चिवडा म्हणून आनंदानं सांगणार होती, आणि दुसरी म्हणजे ती, सुक्या खोब-याच्या कापा करुन विकायला ठेवणारी...शेवटी तिलाही छोटा का होईना पण व्यवसाय करायची संधी मिळालेली...

आठवड्यात सुरु होणारा श्रावण महिना...येणारे पाहुणे...आणि काही घरगुती कार्यक्रम यासाठी नेहमीप्रमाणे यादी करुन खरेदीसाठी गेलेले.  घरात काही खाऊ बनवावा लागणार होता आणि काही विकत घ्यायचा होता.  एका ठरलेल्या वाण्याकडे गेले.  यादीप्रमाणे सामान घेतलं आणि त्यांच्याकडच्या चकल्या घेतल्या.  गेल्या अनेक वर्षापासून या दुकानातल्या मुगाच्या डाळीच्या चकल्या विकत घेतोय...एक महिला या चकल्या बनवते...अगदी अप्रतिम...तोंडात टाकल्यावर विरघळणा-या...चवदार...दुकानदारानं दिलेल्या माहितीनुसार या चकल्यांच्या जोरावर या महिलेनं तिच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लावलाय.  ते घेतांना पुन्हा त्या सुक्या खोब-यांच्या कापांकडे माझी गाडी वळली.  माझ्या हातात अजून ते पाकिट होतं.  दुकानदारानं विश्वासानं सांगितलं....घेताय का, चांगलं आहे,  एकदा वापरुन बघा...मी नाही म्हणत पाकिट बाजुला ठेवलं.  आत्ता नकोय...जेव्हा चिवडा करायचा असेल तेव्हा नक्की घेईन...पण ही कल्पना ज्यांची आहे, त्यांचं कौतुक आहे.  हे ऐकल्यावर त्या दुकानदारानं आणखीही काही पाकिट समोर ठेवली.  उपवासाच्या थालिपीठांची भाजणी, जवसाची चटणी, कांदा लसूण मसाला...म्हणाला ताई, ही बघा याच बाईंकडून आम्ही ही सुद्धा उत्पादनं घेतो...त्यांनीही कुटुंबाला मदत होण्यासाठी हा छोटा उद्योग सुरु केलाय...आपल्याकडे चकल्या आणतात त्यांनीच दुकानाचा पत्ता दिला...आणि पहिल्यांदा मला सर्व उत्पादनं टेस्ट करायला दिली.  आम्हाला चव आवडली...आता हे पदार्थ दुकानात विक्रीसाठी ठेवले आहेत.  त्या कुटुंबाना थोडाफार आर्थिक हातभार लागतोय...मला कौतुक वाटलं...अगदी सुरुवात होती व्यवसायाची...त्याच्यावर किंमतीही हातानं टाकल्या होत्या...घरी जवसाची


चटणी, भाजणी मी करते...पण काही बदल म्हणून मी ही दोन पाकिटं घेतली आणि घराकडे निघाले. 

पुढे दोन दुकानं सोडल्यावर त्या मगाशी दुकानात नाक मुरडणा-या  बाई दिसल्या...भाजी घेणं चालू होतं.  मला त्यांच्याकडे बघून त्यांनी मारलेला डायलॉग आठवला...आजकालच्या मुलींना रेडीमेड किती मिळतं...मनात हसायला आलं...मला लग्न झालं ते दिवस आठवले...सकाळी ही धावपळ...घर आवरण, डबा, नाष्टा,  बाळाची तयारी...एक ना दोन...नुसती धावपळ...ठरलेली गाडी गाठायची...परत येतांनाही तशीच धावपळ...मग घरी आल्यावर जेवणाची गडबड...अशावेळी शनिवार-रविवारी केलेली मेहनत कामी यायची....आल्या-लसणीची पेस्ट,  सुक्या खोब-याचं वाटण, खोवलेलं ओलं खोबरं,  साफ करुन कापून ठेवलेल्या भाज्या,  कांदा-लसूण मसाला...अशा एक ना दोन तरतुदी या रविवारी करुन ठेवलेल्या असायच्या....अगदी मोडाची मूग-मटकीही डब्यात ठेवलेली असायची...या सर्वांमुळे संध्याकाळी थोडा वेळ वाचायचा...हे सर्व ठिक वाटायचं...पण गडबड व्हायची ती पालेभाजी करतांना...कारण तिच नेमकी साफ केलेली नसायची...आणि करायला घेतली तर सगळं शेड्यूल बिघडायचं...मग पालेभाजी घेणंच बंद केलं होतं...एकदिवस त्या भाजीवाल्याबाईनं पालेभाजी का घेत नाहीस ग हल्ली, म्हणून दटावलं...तेव्हा वेळ मिळत नाही साफ करायला हे खरं कारण पुढे केलं...तेव्हा हसून ती मावशी म्हणाली होती,  एवढचं ना...तुमच्या ऑफीसवाल्यांसाठी आम्ही साफ केलेल्या भाज्याही विकतो, फक्त पाच-दहा रुपये जास्तीचे घेतो,  तूला हवी तर सांग साफ करुन ठेवते...मग पुन्हा वेळापत्रक रुळावर आलं.   मेथी,


पालक, माठ, कोथिंबीरच काय पण देठ काढून मोडून ठेवलेली आळूची पानंही मिळू लागली...हे ही एकप्रकारचं रेडीमेडच होत की...पण यामुळे आम्हा दोघींचाही फायदा होत होता.  मला माझी आवडती पालेभाजी साफकरुन मिळत होती, आणि तिला तिच्या मेहनतीचे पैसे मिळत होते...

ज्याला बसती घाव, त्यालाच दुःख ठाव...अशी गत येथे आहे.  गरज ही एक संधी असते.  मला यासर्वांत त्या महिलेचंच कौतुक वाटत होतं.  साधी गोष्ट आहे, सुक्या खोब-याच्या कापा...त्या  विकायचा विचार तरी कोण करेल का...किती सोप्पं काम आहे, म्हणून काही नक्की नाकं मुरडणार...पण ज्यांचा वेळ घड्याळ्याच्या काट्याबरोबर जोडला गेलेला आहे, त्यांना अशा छोट्या गोष्टींमुळे किती मदत होते, हे तीच जाणो.  अलिकडे भाजीच्या दुकानात सोललेला लसूण,  कापलेल्या भाज्या...असं सर्व काही मिळतं....ही कल्पना ज्यांना सुचली आणि त्यांनी हा छोटा व्यवसाय करायचं धाडस केलं त्या महिलांना खरच सलाम...गरजेतून सुरु झालेला हा व्यवसायही कोणाच्या तरी कुटुंबाचा आधार झाला आहे.  ही गोष्ट मान्य केली पाहिजे....पण या सर्वाकडे बघण्याची आपली नजरही तशीच हवी आहे,  एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू...दोघीही स्त्रीया...एकीकडे पैसे आहेत...हौस आहे...पण वेळ नाही...आणि दुसरी गरजवंत आहे...आणि तिच्याकडे जिद्द आहे...कला आहे...मग यातून निर्माण झालेले हे छोटे व्यवसाय खरे तर स्वावलंबनाची पहिली पायरी आहेत,  आणि त्याचे प्रत्येकानं कौतुक करावं असं आहे.  आपल्याला रेडीमेड देतांना या मागचे हात किती मेहनत घेत असतील याचीही जाणीव हवी.  आम्ही ज्या मुगाच्या चकल्या घेतो, त्यांचंच उदाहरण सांगायचं तर ती चकली


करणारी महिला रोज पहाटे उठून या कामाला लागते.   एरवी चार-पाच किलोच्या चकल्या होतात...आणि दिवाळी मध्ये हा आकडा पन्नास किलोच्या आसपास जातो...यासाठी ती माऊली पहाटे तीनवाजता उठते आणि तेव्हापासून चकल्यांच्या तयारीला लागते...तिच्या या मेहनतीमुळेच आम्हाला आयती चकली चाखता येते...अशावेळी काय ते रेडीमेड म्हटलं तर तिथे त्या माऊलीच्या कष्टावर पाणी टाकल्यासारखे होईल...

या सर्वात एक जमात असते...ती खास असते...आम्ही नाही बाई काही बाहेरचं आणत...कितीही त्रास झाला तरी घरचच हवं...आमच्याकडे हे चालत नाही...असं चालत नाही...बाहेरच चांगलं नसतं...या वर्गाला कोणीही....कधीही सुधारु शकणार नाही, या मताची मी आहे....आज अनेक महिला छोट्या-मोठ्या गृहउद्योगानं स्वयंपूर्ण झाल्या आहेत.  त्यांचा आदर करावा...महिलांनीच महिलांना दिलेली ही साथ म्हणजे साथी हात बढाना...याच गटातली...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

 

 

Comments

  1. आता नवीन पिढीचा मात्र रेडिमेडवरच भर आहे...छान लेख लिहिला

    ReplyDelete
  2. सई लेख खूप छान आहे

    ReplyDelete
  3. छान लेख.. काळाची गरज आहे हे रेडीमेड पदार्थ

    ReplyDelete

Post a Comment