रंगाची बहार आणि गुलबक्षीची कमाल....
प्रवासातला थकवा दूर करण्यासाठी कशाची मदत होते...दिवसभर केलेला प्रवास....धावपळ....त्यातून आलेला थकवा फक्त मंदशा सुगंधानं आणि उमलत्या फुलाला बघण्यानं दूर होतो, असं सांगितलं तर कदाचित पटणार नाही...पण गेल्या शनिवारची संध्याकाळ ही अशीच गेली. एका सुखद अशा सुगंधात न्हावून निघाल्याची जाणीव...आणि खूपशा बालपणीच्या आठवणी एका फुलांच्या जुडीत सामावल्याची जाणीव झाली आणि थकव्याची गाडी कुठे भूर्र....उडून गेली.
गेल्या शनिवारी लाडक्या गावाला धावती भेट दिली. चौल-रेवदंडा ही आमची गावं म्हणजे निसर्गाची भरपूर उधळण. त्यात पावसानं तर आणखी बहार आणलेली. काही ठिकाणी भेट द्यायची होती, त्यामुळे शनिवारी सकाळी सात वाजता हा चौल-रेवदंड्याकडे प्रवास सुरु केला. त्यासाठी पहाटे पाचला उठून तयारी करावी लागली...एरवी कुठे जायचं असेल तर, गाडीत बसल्यावर एखादी तरी डुलकी लागते. पण गावाला जायचं म्हटल्यावर ही झोप कुठल्याकुठे पळालेली...पनवेल सोडल्यावर सर्व निसर्ग बोलायला लागला. सगळ्या रस्त्याभर तेरड्याच्या वनांची रांगोळी पसरलेली. आलिबाग जवळ आल्यावर या फुलांच्या ताटव्यात रंगाची होळी सुरु झाली की काय असा भास होऊ लागलेला. प्रत्येकाच्या अंगणात तेरड्याचा छोटा मळा...आणि त्यातील बहारदार रंग...मध्येच येणारी पावसाची एखादी सर...अशा वातावरणात चौलच्या घरी दाखल झालो...रामेश्वराचे दर्शन हा आमच्या या दौ-याचा आणखी एक हेतू होता. श्रावण महिना...त्यामुळे रामेश्वराचे सजलेलं मंदिर दिसलं आणि मन प्रसन्न झालं....त्यात भरलेली पोखरण आणि तिच्यात मस्तपणे डुंबणारी मुलं पाहिली आणि बालपणीच्या लिला आठवल्या. मंदिरात देवाला अर्पण करण्यासाठी चौलनाक्यावरुन चाफ्याची फुलं घेतली होती...या फुलांचा सुगंधही बालपणीच्या आठवणींना
जागा करणारा...या आठवणींना आवर घालत ज्या कामासाठी आलो आहोत, ती कामं पटापट करुया म्हणून नवरा एकीकडे खुणावत होता. त्याचंही बरोबर....येतांना सुखावह वाटत असलं तरी घराकडे परत जातांना डोंबिवलीच्या वेशीवर होणारी ट्रॅफीक बंदी ही भयावह होती, त्यामुळेच लवकर कर...वेळेत आटप असा त्याचा घोषा चालू होता....या सर्व घाईत ज्या मंडळींना आम्ही खास भेटायला गेलो होतो, त्यांच्या भेटी सुरु झाल्या. रेवदंड्याच्या शेलार आळीतील आमचं मुळ घर...लेकाला कधी या घरी घेऊन गेले नव्हते. तो चार दिवसासाठी आल्यावर पहिल्यांदा या घरी जाण्याचा बेत ठरवला. आता घरात आमचा भाऊ आणि वहिनी असतात...दोघांचीही भेट झाली...गप्पा झाल्या...देवाला नमस्कार झाला...निघतांना वहिनीनं नारळ भरलेली पिशवी आणि खूपसारी जायफळं दिली...आमची रेवदंड्याची ही खास भेट...पुढचं घर आमच्या वार्डेगुरुजींचं. वार्डेगुरुजींचं घर हे कायम आम्हा कुटुंबियांसाठी मंदिरच...गुरुजी आता नसले तरी आमच्या आसपास ते कायम आहेत, याची जाणीव आम्हाला आहे, यातूनच त्यांच्या घरी जाऊन त्यांना एकदा तरी नमस्कार करण्याचा नियम. या घरातही तसंच स्वागत....अगदी घरातल्या सदस्यांसारखं...पुन्हा छान गप्पा...जेवणाचा आग्रह आणि आमची निघण्याची घाई...मनात कितीही थांबायचं असलं तरी आणि खूप जणांना भेटण्याची इच्छा असली तरी थांबता येत नव्हतं....संध्याकाळी ठराविक वेळेत
परत येण्याचं बंधन होतं....त्यामुळे सर्वांच्या प्रेमळ आग्रहाला नकार देत, निघण्याची तयारी सुरु झाली. निघतांना पुन्हा एकदा पोखरण मनसोक्त बघावी म्हणून लेकाला घेऊन त्या पोखरणीला फेरी मारायला गेले....तेव्हाच एका कोप-यात धम्मक पिवळ्या रंगाच्या कळ्या दिसल्या....गुलबक्षीच्या...गुलबक्षीचे छोटेसे झुडूप त्या कोप-यात फुलले होते. संध्याकाळी फुलण्यासाठी त्यातल्या काही कळ्या अगदी तयारी करत होत्या. त्यांचा रंगच इतका मोहक होता की मी त्या गुलबक्षीच्या झुडपाकडे ओढले गेले. त्यावर लागलेल्या कळ्या हलक्या हातानं तोडून घेतल्या...त्या छोट्याश्या झुडूपावर काही बियाही तयार झाल्या होत्या. एखाद्या हि-याच्या अंगठीसारख्या आकारात या बिया सजतात. या गुलबक्षीच्या काळ्या बियाही हळूवारपणे काढल्यावर आता काय हे झाडच सोबत घेतेस की काय...म्हणत नवराही मागे आला...झाड नको...या बिया पुरेशा आहेत, म्हणण मी त्या छोट्या झुडूपातील जवळपास सर्व बिया काढून रुमालात बांधल्या...आणि त्या कळ्या एका पानात गुंडाळून घेतल्या...आमच्या गावाची ही रंगीत आणि सुगंधी भेट पुढच्या प्रवासात मन मोहणारी ठरली....
दुपारनंतर परतीचा प्रवास सुरु झाला...सोबत घेतलेल्या कळ्या सांभाळून
ठेवल्या. आमच्या रेवदंडा आणि चौल या गावात गुलबक्षीच्या अगदी अनंत अशा रंगाच्या जाती आठळतील. प्रत्येकाच्या अंगणात ही गुलबक्षी असणारच. संध्याकाळनंतर फुलणारी ही गुलबक्षीची फुलं श्रावणात बहार आणतात. आमच्या घरी अगदी लाल रंगाची गुलबक्षी होती. श्रावणात संध्याकाळी ही गुलबक्षी देवांवर सजायची. गणपतीच्या दिवसात शेजारच्या परब आजी या गुलबक्षीच्या फुलांची सुंदर अशी कंठी गुंफायच्या...लाल गुलबक्षी आणि त्याच्या सोबत हिरव्या गर्द रंगाची झिपरीची पानं...गणपती बाप्पा दिड दिवसांचे...पहिल्या दिवशी संध्याकाळच्या पुजेनंतर ही गुलबक्षीच्या फुलांची कंठी बाप्पाच्या गळ्यात शोभायची...दुस-या दिवशी बाप्पा निघणार म्हणून कोण घाई असायची. अशावेळी या गुलबक्षीच्या कळ्याही लवकर खुडाव्या लागायच्या. मग या कळ्यांचीच कंठी परबआजी गुंफायच्या आणि ती अर्धी उमललेल्या फुलांची कंठी घालून बाप्पा गावाल निघायचे...या सर्वात त्यांच्या गळ्यातील गुलबक्षीच्या फुलांचा मंद सुवास सोबत असायचा...
हे गुलबक्षीचं फुल जेवढं देखणं...तेवढचं त्याचं आयुष्य अगदी मोजकं. संध्याकाळी चार नंतर अलगद फुलणार...आणि पहाटे दवबिंदू साठवत मावळणार...पण तरीही ही गुलबक्षी, फुलांची आवड असणा-यांची लाडकी...कारण या फुलांमध्ये जेवढी रंगाची बहार असते, तेवढीच कुठेही मिळत नाही. गावी श्रावणात तर या गुलबक्षीच्या फुलांचाच सर्वात मोठा आधार असतो. जिवतीची शुक्रवारची पूजा आणि हळदीकुंकू असूदे की हरतालिकेची पुजा...सर्वात प्रमुख असायची ती ही गुलबक्षीची फुलं. आणि इथूनच कुणाकडे कुठल्या रंगाची गुलबक्षी आहे, हे समजायचं. गुलाबी, पांढरी, लाल, गुलाबी, पिवळी, नारंगी...अशा विविध रंगाव्यतिरिक्त काही ठिकाणी गुलबक्षी दुहेरी किंवा तिहेरी रंगात दिसायची. या रंगाची जास्त मागणी असायची. मग हळदीकुंकू समारंभात या फुलांच्या रंगाची तारीफ व्हायची...आणि आमच्यासाठी बिया ठेवा...हा हक्काचा निरोप ठेवायचा...जशी गुलबक्षी मुबलक तशाच त्याच्या बियाही. गुलबक्षीचं झुडूप जेवढं फुलांनी डवरायचं....तेवढंच नंतर काळ्या बियांनी लक्ष वेधून घ्यायचं. या बिया कुणी
काढल्या नाही तर त्या आपसूक खाली गळून गुलबक्षीची नवीन रोपटी तयार व्हायची...पुन्हा नव्याचा बहर...आणि मंद सुवासातली संध्याकाळ....
या सर्व आठवणी काढत आमचा प्रवास चालू होता...अर्थात कितीही घाई केली तरी व्हायचं तेच झालं होतं. अगदी डोंबिवलीच्या वेशीपर्यंत आल्यावर ट्रॅफीकनं आमची चांगली तासभर वाट अडवली. एवढा खटाटोप कशाला केला म्हणून चिडचिड व्हायला लागली...आणि त्यातच त्या गुलबक्षीच्या कळ्यांकडे लक्ष गेलं. एका मोठ्या पानात त्यांना बांधलं होतं...त्या कळ्या मोकळ्या केल्यावर कळलं की छान पिवळ्या रंगाची फुलं फुलली होती...हलकेच त्या फुलांचा मंद सुवास गाडीत पसरला...या फुलांची जादूच अशी होती की सर्व त्रागा कुठल्याकुठे
पळून गेला. तासभर उशीरांनं घर गाठलं....पहिलं काम म्हणजे या फुलांना एका डीशमध्ये छान सजवून ठेवलं...लहानपणीच्या अनेक आठवणी त्यांच्यात गुंतल्याची जाणीव झाली. नकळत हातातला रुमाल जड वाटू लागला. त्यात त्या पिवळ्या जर्द गुलबक्षीच्या बिया आणल्या होत्या. त्या बिया एका रिकाम्या कुंडीत रुजत घातल्या...एरवी कुंड्यांमध्ये काही लावलं की ओरडणारा नवरा हसत होता...हिच तर या गुलबक्षीच्या फुलांची जादू आहे...कुणालाही प्रेमात पाडणारी...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
गुलबक्षी सारखाच सुंदर रंगांचा लेख!!
ReplyDeleteबिया मात्र हव्यात, कृष्ण तुळशीची वाट बघतेय 🙏
धन्यवाद...दोन्ही नक्की मिळणार....बिया घेऊन येते...
Deleteखूप सुंदर लेख, लहानपणीच्या आठवणी जागवणारा. गुलबक्षीच्या रंगात आणि आठवणीत मन गुंगवून टाकणारं वर्णन. 👌👌
ReplyDeleteचौल माझ्या मैत्रिणीचं घर आहे तिथे. मीठवाले जोशी माहित असतील. खूप निसर्गसुंदर गाव.
धन्यवाद....चौल...रेवदंडा...नागांव...ही सर्व गांव निसर्गानं वरदान दिलेली...असंख्य फुलझाडं या भागात आहेत. आणि सर्वांच्याच घराबाहेर या फुलझाडांचे ताटवे असतात....खूप छान वाटलं....धन्यवाद पुन्हा एकदा...
Deleteसुरेख लेख
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteआमचे ही बालपण
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteकोकणाचे, फुलांचे, रंगाचे वर्णन अत्यंत सुंदर पद्धतीने मांडले आहे मात्र दर वेळेस तुमची जोडी जाऊन मजा करते
ReplyDeleteधन्यवाद...कोकणाला निसर्गानं सढळ हातानं सौदर्य दिलं आहे....आम्ही फक्त त्यातला थोडा थोडा भाग बघतोय...
Deleteमनमोहक फुलांन सारखाच मनमोहक लेख. 👍👌
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteसहज सुंदर असा लेख लिहिला.. .
ReplyDeleteधन्यवाद....
Delete