फ्रिजमध्ये अर्धे डबे आणि फुल्ल आठवणी
संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं...जवळपास चारवेळा तरी मी हा प्रश्न नव-याला विचारला...आणि त्याचं तेच उत्तर...कर काहीतरी लाईट...लाईट म्हणजे नक्की काय...हे मात्र तो सांगत नव्हता....शेवटी माझ्या मताप्रमाणे काहीतरी करु आणि हेच लाईट आहे, असं सांगून फ्रीज चाचपडायला घेतला...पण तो चांगलाच भरलेला...एक-एक डबा उघडून बघितला आणि हात तिथेच थांबला. आदल्याच दिवशी लेक त्याच्या सध्याच्या मुक्काम असलेल्या शहरात निघून गेला होता. इनमीन आठ दिवसाच्या सुट्टीवर तो आलेला. आणि तो येणार म्हणून त्याच्या आवडीचे कितीतरी पदार्थांची तयारी करुन फ्रिजमध्ये रेडी पोझिशनमध्ये ठेवलेले. हे सर्व डबे आता माझ्यासमोर पडले होते. त्यांच्याकडे एक टक बघत असतांना मी सुद्धा गोंधळून गेले. फ्रीजच्या दरवाजातून आवाज यायला लागला तेव्हा कुठे तंद्री भंग पावली. यातले बहुतेक डबे अर्धे संपले होते. पण तरीही आठवणींनी भरले होते...हौशेनं केलेले हे पदार्थ त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला...पण आठवड्याभरात काय देऊ आणि किती देऊ अशी परिस्थिती झालेली. शेवटी सर्व डबे बाहेर काढले...यातूनच काहीतरी करावं म्हणून विचार सुरु झाला...आणि हक्काचा लाईट पर्याय सापडला.
दोघांसाठीच काय करायचं....हा प्रश्न लेक शिकायला बाहेर गेला तेव्हा काही काळ आमच्या घरात सतत विचारला गेला. तो नाही...तर काही नाही.
अगदी साधी खिचडी चालेल...किंवा पिठलं भात...जवळपास दोन-तीन आठवडे हाच बेत आमच्याकडे असायचा. पण या सर्वांतून माझ्या काही जाणकार मैत्रिणींनी बाहेर काढलं. आपल्या शरीराच्या, आरोग्याच्या काही गरजा आहेत. आणि असं खंगून...विचार करुन त्या पूर्ण करता येत नाहीत...उलट त्यात अधिक भर पडते...याची जाणीव करुन दिली. त्यानंतर मात्र मी या शोकाकूल वातावरणातून बाहेर पडले होते. एरवी लेक असतांना तो कधी काय मागेल याचा भरवसा नसायचा...त्यामुळे फ्रीजमध्ये सदैव चार पदार्थ अधिकचे केलेले असायचे. शिजलेले बटाटे, मोड आलेले मूग, मटकी, भरलेल्या मिरच्या, अळूवडी, कोथिंबीरवडी, शेवपुरीसाठी लागणा-या चटण्या, सोललेलं डाळींब...असे सर्व तयार असायचं. बस्स त्याची फर्माईश झाली की त्यातून एखादा पदार्थ लगेच तयार होत असे. जेवणावर भरलेली मिरची आणि अळूवडी किंव कोथिंबीर वडीही रोजच...पण तो गेल्यावर या सर्वांवर मर्यादा आली होती. तो काय खात असेल हा प्रश्न नेहमी पडायचा...या प्रश्नावर उत्तर मैत्रिंणींनी दिलं आणि वेळेनं फुंकर घातली. हळूहळू पुन्हा फ्रीजमध्ये डबे भरायला लागले.
खजुराची चटणी ही त्यातली प्रमुख.
शेवपुरी किंवा भेळ करायची असेल तेव्हा कधीही हक्कानं लागेल असाच हा डबा पुन्हा तसाच भरायला...आणि
वापरालयला सुरुवात केली. पुदीन्याचा डबाही
तसाच...रोज जेवणात किमान दहाबारा पानं तरी हवीत म्हणून हा डबा कायम पुन्हा भरायला
सुरुवात केली. लेकाच्या खाण्याच्या आवडी
आणि आमच्या आवडी थोड्याफार वेगळ्या.
त्याला सूप हा प्रकार कधीच आवडला नाही.
त्यामुळे तो असतांना अगदी आठवड्यातून एखाद-दोन वेळा सूप करण्याची संधी मिळत असे. आता मात्र हे सर्व शेड्यूल बदलंल. रोज त-हेत-हेचे सूपचे प्रकार होतात. आणि त्यानुसार फ्रीजमध्ये भाज्या भरायला
सुरुवात केली. मिरच्या आणि वड्यांना
सुट्टी दिली. त्याऐवजी सुरणाच्या कापा आता
मिळतात. मूग, मटकीलाही सोबत
मिळालीय...हिरवे मोड आलेले चणे, काबूली चणे आणि मोडआलेली मेथी आता या डब्यात
ठेवायला सुरुवात केलीय. याशिवाय मक्याची
कणसं...अगदी कधी कधी रात्री जेवणात मक्याची कणसं आणि शेवपुरी...भेळपुरीचाही बेत
व्हायला लागला.
गेल्या आठवड्यात मात्र पुन्हा फ्रिजला पूर्वीसारखं भरायला लागलं. चिजचे
दोन-तीन प्रकार आले. लेकाच्या आवडीच्या मिरच्या आणि वड्या आल्या. सूपाच्या भाज्यांना सुट्टी मिळाली आणि रंगीत सिमला मिर्च्या फ्रिजमध्ये दाखल झाल्या. मोठ्या कणसांऐवजी...बोटभर उंचीचे स्वीटकॉर्न आले आणि मशरुमही काळ्या डब्यातून आले. अवघ्या आठवड्याभरात तो काय काय खाणार...त्यामुळे आता तो गेल्यावर हे सर्व डबे अर्धे खाली होऊन बसले होते. सर्वांवर चांगला उपाय माझ्यासमोर पडला होता. मूग, मटकी, काबूली चण्यांचा डबा खाली केला. ते शिजत असतांनाच टोमॅटो कापून घेतला...पुदिन्याच्या पानांची चटणी केली...मग लाईट लाईट म्हणत चटकदार बेत तयार झाला...तो म्हणजे भेळ...उकडलेली कडधान्य...त्यात छोट्या मक्याच्या कापा...चटण्या आणि भरपूर डाळिंबाचे दाणे. नावापुरते कुरमुरे आणि भरपूर फरसाण...चाट मसाला टाकलेली ही भेळ चवीला काय दिसायलाही सुंदर झाली होती. अजून काही राहीलंय का बघ..म्हणत नव-यानंही पसंती दिली. तशी अजून एका छोट्या डब्याची आठवण झाली. चिजचा छोटा डबा खाली झाला होता...फक्त एक चिज क्यूब बाकी होता. त्याचेही तुकडे या भेळीवर आले आणि अजून एक डबा खाली झाला. बेसीनमध्ये या रिकाम्या डब्यांचा ढिग पडला होता. आता उद्या पुन्हा रोजच्या शेड्युलनुसार यांना भरुया म्हणून भेळीचा समाचार घ्यायला सुरुवात केली.
आपण आपली किंमत किती करुन घेतो, याचा प्रत्यय लेक बाहेर गेल्यावर आला. आता काय दोघांचं जेवण करायला कितीसा वेळ...हा प्रश्न ब-याचवेळा ऐकायला मिळाला होता. या प्रश्नानंही मला ताळ्यावर आणलं होतं, म्हणजे आमचं काही अस्तित्वच नाही का...हा पहिला उलट प्रश्न माझ्या मनात प्रत्येकवेळा आला होता. आम्ही दोघं असलो तरी दोघांनाही चवीचं आवडतं...आणि ते पदार्थ करायला वेळ लागतो...हे सांगण्याचा प्रयत्न केला...पण शेवटी हा प्रत्येकाच्या स्वभावाचा पैलू असल्याची जाणीव झाली. आता नेहमीच्या मेनू लिस्टमध्ये बदल करण्याची संधी मिळाली, हा विचार मी पकडला आणि आमच्या फ्रीजमधल्या डब्यांना नव्या पदार्थाची चव चाखायला मिळाली. हे शेड्यूल स्विकारल्यापासून दोन वेळा लेक येऊन गेला. तो येण्याआधी पुन्हा पहिले पाढे पच्चावन्न या नियमानं...त्याच्या पसंतीच्या पदार्थाची उजळणी व्हायची तशीच यावेळीही झालेली. त्याच्या पसंतीच्या सर्व
पदार्थांची एक गल्ला भेळ आमच्या दोघांसमोर होती...अर्थात प्रत्येक घासासोबत येणारी त्याची आठवणही होती. पण हे काहीवेळ...भेळीची चव आणि आजच्या दिवसातल्या दोघांच्या गम्मती जम्मती यावर चर्चा सुरु झाली...आणि भेळीची डीश खाली व्हायला लागली....
नवा दिवस सुरु झाला...पुन्हा नव्यानं डबे भरायला सुरुवात केली. तरी आधीचा एक अर्धा भरलेला डबा
होताच....लेकाच्या आवडीचा बटरस्कॉच केक...तो तसाच ठेवला, दुपारी एक असंच सारवरत असलेलं जहाज येणार
होतं...सरीता नावाचं...तिच्यासोबत आणखीही दोन मैत्रिणी कॉफीसाठी येणार
होत्या....त्यांचीही तिच गाथा...अशावेळी हा अर्धा केक भरलेला डबा आणि त्याचील
फुल्ल आठवणीं उपयोगी पडणार होत्या... समजुतीच्या...एकमेकींना असलेल्या आधाराच्या
ब-याचश्या गप्पा होणार होत्या....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप छान लेख
ReplyDeleteमस्तच
Delete