ताप....त्याचा आणि माझा....
रिक्षा...ओ रिक्षा...रिक्षा....असा टिपेचा आवाज माझ्या कानावर पडला...आवाज ओळखीचा वाटत होता...पण ओळखता येत नव्हता...मी त्यावेळी दुकानात होते...बाहेर येऊन पाहिलं तर मीना रिक्षाच्या नावानं ओरडत होती...मी पुन्हा एकदा खात्री करुन घेतली...ती मीनाच होती...काहीजण सर्व विसरतील पण आपली गाडी विसरणार नाहीत ना...त्या वर्गातली मीना...अगदी घरासमोरच्या दुकानात जायचं असेल तरी या बाई गाडीनंच जातील...इतकं हिचं गाडीवरचं प्रेम...रिक्षानं कधी प्रवासच केला नाही...असं ठामपणे सांगणारी मीना माझ्यासमोर रिक्षा थांबवण्यासाठी प्रयत्न करत होती, यावर माझा विश्वासच बसला नाही...दुकानदाराला सांगून मी मीनाजवळ आले....तिच्या खांद्यावर हात ठेऊन हाक मारली...मीना काय ग...गाडी कुठे गेली...रिक्षा कशाला करतेस...म्हणून मी सुरु झाले...पण मीनाचा चेहरा बघून प्रश्नांना आवर घातली...चेह-यावरचा मास्क निट करत मीना म्हणाली, तीन दिवसापूर्वी व्हायरल ताप झाला होता ग....त्यात कमालीचा थकवा आलाय...चालायची ताकद नाही...तर गाडीचं काय...अरे बापरे...मग बाहेर कशाला पडलीस...यावर मीना हसल्यासारखं करत म्हणाली...माझा ताप बरा होतोच न होतो नवरा आजारी पडला....आणि नवरा आजारी पडला म्हणजे माहित आहे ना...माझा थकवा बाजुला ठेऊन उठलेय...डॉक्टरांकडून औषधं घेतलीत...आता घरी चाललेय...मी तिला थांबवलं...माझी खरेदी पूर्ण केली. आणि दोघींनी मिळून एकच रिक्षा मिळवली....तिचं घर माझ्यापुढे...तरीही तिला आधी सोडून मग मी घरी आले...तापानं हैराण झालेली मीना रिक्षामधून उतरत असतांना दहावेळा थॅक्स म्हणत होती...काही हवं असेल तर सांग म्हणत मी माझ्या घराकडे परत येतांना गेल्या आठवड्यातल्या माझ्या घराच्या वातावरणाबद्दल विचार सुरु झाले.
गेला संपूर्ण आठवडा व्हायरल तापाच्या नावानं गेला...सुरुवातीला मला कणकण वाटली...कानातून आग बाहेर पडतेय असं वाटायला लागलं...थोडी अंगदुखी...नव-याला सांगितलं...तर म्हणाला सकाळी जरा व्यायाम कमी कर...त्यामुळे अंगदुखी असेल...मलाही तेच कारण वाटलं...पण दुस-या दिवशी उठतांना डोकं प्रचंड दुखायला लागलं...काहीतरी वेगळं आहे, याची जाणीव...ताप तर नसेल...असला तर कोणता ताप असेल हा विचार त्याच क्षणी मनात आला...आणि त्या विचाराबरोबर सर्व अंगाला घाम सुटला...पुन्हा नव-याला बोलायला कारण मिळालं...मी म्हटलं नाही, उगाचच घाबरतेस म्हणून तो ऑफीसची तयारी करु लागला...इकडे अंगदुखी जास्त वाटली म्हणून मी थोडी कमी योगासनं केली...अगदी कडक पाण्यात मिठ टाकून आंघोळ केली...अगदी काही नको म्हणून दोन त्रिभुनवकिर्तीच्या गोळ्या तोंडात टाकल्या...आणि जेष्टीमधाचं चाटणही घेतलं...पण संध्याकाळी कणकण थोडी वाढली...आणि गपचुप डॉक्टरांना गाठलं...दवाखाना सर्व तापाच्या पेशंटनी भरलेला....त्यात माझीही भर...डॉक्टरांनी व्हायरल असणार म्हणून सांगितलं...औषधं घेऊन घरी येईपर्यंत थंडी वाजायला लागली...पुन्हा हे मनाचे खेळ म्हणून जेवणाला लागले...मात्र तोपर्यंत सर्व हातापायातील सांधे किती आहेत याची जाणीव व्हायला लागली...अगदी त्यात कोणीतरी खिळे मारतंय इतक्या वेदना व्हायला लागल्या...सर्व अंगाला कुठे वेदनाशमक क्रिम लावा...म्हणून पुन्हा कडक पाण्यात मिठ टाकून अंघोळ केली...जरा बरं वाटलं..पण काही क्षण नंतर कमालीचा थकवा आला...आणि डोळे आपोआप बंद झाले...रात्री नवरा घरी आल्यावर जाग आली...त्याला कल्पना दिली...आधीच काळजी घेऊया...तुला इन्फेक्शन नको, म्हणून मी एक कोपरा पकडला...पण तो निर्धास्त...उगाचच काय...व्हायरल आहे, दोन दिवसात
जाईल...काही वेगळं नको रहायला...म्हणून हसण्यावर नेलं...दुस-या दिवशी ताप गेला...पण अंगदुखी प्रचंड आली...अगदी सर्व अंगभर कोणीतरी खिळे ठोकतंय इतक्या वेदना...माझा त्रास बघून नवराही घरी राहीला...सकाळचा नाष्टा म्हणून खाऊचे डबे खरडून झाले...दुपारी डाळखिचडी आणि पापड...जे ताटात येईल ते निमूटपणे खाऊन झालं.... रात्री नव-यानं पोळी भाजी केंद्रातून जेवण आणलं...
आता तिस-या दिवशी थोडा फरक जाणवेल म्हणून मी डोळे मिटले...पण तिसरा दिवस अजून एक पेशंट घेऊन आला...सकाळी उठल्यावर पहिली तक्रार नव-याची होती...माझं डोकं दुखतंय...सर्दी बाहेर पडलेय...माझ्या अंगावर काटा आला...देवा, यालाही इन्फेक्शन झालं की काय...पण तरीही नवरा बिंधास्त...तू काळजी करु नकोस...नेमकं त्याची सर्दीची औषधं संपलेली...मग काय, मी माझी अंगदुखी बाजुला ठेवली...बाहेर पडले, औषधं खरेदी झाली. नवरा आजारी पडला तर...ही शंका मनात आली आणि भाज्या खरेदी केल्या...सूप लागणार...मध्ये मध्ये काहीतरी तोंडात टाकायला लागणार...पनीर...राजगि-याच्या लाह्या...असे एक ना दोन जास्तीच्या वस्तू घेत घर गाठले, तर नवरा निघायच्या तयारीत...डॉक्टरची फेरी...अंग तापलं होतं...आता माझी डोकदुखी, अंगदुखी कुठे पळून गेली...नवरा डॉक्टरांकडून येईपर्यंत घरात पेज, बटाट्याच्या कस-या, बिटाची कोशिंबीर तयार करुन झाली...झालं, जे नेहमी होतं तेच...आजारी झाल्यावर आमची गाडी एकदम गडबडून गेली...हे नको...काही खायला नको...चाटण नको...मग माझी त्याच्यामागे भुणभूण...अरे थोडं खा...तोंडाला चव येईल...पोटात अन्न गेल्यावर बरं वाटेल...गोळ्यांमुळे त्रास होणार नाही...लगेच बरं वाटेल...यातून पुढे गेल्यावर डोक्यावर लेप लावून झाला...अंग पुसून झालं...तोंडाला चव नाही म्हणून सूप...पोहे करुन झाले...रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं कर म्हणून पुन्हा डाळखिचडी...मसाला पापड करुन झालं...रात्री झोपतांना दुस-या दिवशी डाळखिचडी नको म्हणून त्याच्या सूचना...मग इडली, निर डोशांची तयारी करुन मी पाठ
टेकली...एव्हाना मलाही अंगदुखी आहे याची जाणीव झाली...हैराण झाले...उठता येत नव्हतं...पण सांगते कोणाला...औषधांचा डोस घेऊन डोळे मिटले...
नव-याच्या तापाचा दुसरा दिवस थोडा बरा म्हणायचा....कारण ताप उतरला..पण
खोकला सुरु झालेला...मग पुन्हा वाफारा...जेष्टीमधाचं चाटण...पारीजातकाची पानं
टाकलेला दालचिनी आणि लवंगांचा काढा...त्याची कुरुकुर....निर डोसे...इडली...चव नाही
म्हणून पनीर फ्राय...वगैरे वगैरे...या सर्वांत फळं राहीली बरं का...ती सुद्धा
कापून सोलून दिलेली...ही धावपळ...त्यात माझ्या तापाचा एक डोस राहिला...तो
घेतला...अंगदुखी थोडी होतीच...पण गरम पाण्यात मिठ टाकून अंघोळ करुन त्यावर मी उपाय
शोधला...दोन दिवसांनी नव-याला आराम पडला...त्यानंतर घरातूनच दोन दिवस ऑफीसचं
काम....त्यादरम्यान तापात वापर झालेले सर्व कपडे धुवून झाले...पुन्हा ते इन्फेक्शन
नको...हाच विचार...या सर्वात प्रचंड थकवा मात्र होता...पण नवरा आजारी पडल्यावर तो
कुठल्या कुठे पळून गेला...कुठून ते बळ येतं हे माहित नाही...
मीनाला तिच्या घरापर्यंत सोडून येतांना हेच सर्व आठवत होते...तिचीही आता माझ्यासारखी अवस्था झालेली. तिचं
आजारपण आपसूक बाजुला झालेलं...नव-याच्या तापानं तिचा थकवा...सर्दी...कुठल्याकुठे
पळून गेलेली...ती आजारी पडली तेव्हा नव-यानं थेट पोळीभाजी केंद्रातून डबाच लावला...पण
नवरा आजारी झाल्यावर या बाईंनी हा डबा बंद करुन किचनमध्ये पदर खोचून उभी राहिली...चार वेगळे पदार्थ करुन नव-याला खाऊ घातले...बाईपण म्हणतात ते
हेच...आम्ही कितीही आजारी असलो...वेदना असल्या...त्रास असला तरी कुटुंबात कोणला
काही झालं हे समजलं की आमचं सर्व दुखणं बाजुला होतं...आणि त्या आजारी व्यक्तिच्या
भोवती आम्ही फिरायला लागतो...त्यात ती व्यक्ती नवरा असला तर बोलायची बातच नाही....एरवी
एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाली तर कचाकचा भांडणं होतील...पण आजारपण आलं की आमच्या
मनाचा कोपरा लोण्यासारखा मऊ होऊन जातो....त्यात लोण्याच्या मऊपणात आमचं दुःख...वेदना आपसूक
लपून जातात...यालाच संसार ऐसे नाव....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
याला जीवन ऐसे नाव असे म्हणतात ना? 😄😜
ReplyDeleteKhupach chaan.....
ReplyDeleteमन की बात..
ReplyDeleteछान लिहिलेस
घरातली गृहिणी आजारी असताना इतर कुणालाही घरात आजार पण आलं की गृहिणीचे दुखते पळालेच ! त्यातून मुले आजारी झाली की कंबर कसून उभी राहत यथार्थ लेख
ReplyDeleteमस्त,छान लिहिले आहे, घरची माऊली सर्व बाजूने लढत असते
Delete