इश्क में हम तुम्हें क्या बताये

 

 इश्क में हम तुम्हें क्या बताये


इश्क में हम तुम्हें क्या बताये
किस कदर चोट खाये हुये हैं...
मौत ने हमको, हाँ मौत ने हमको
मौत ने हमको मारा है और हम
जिन्दगी के सताये हुये हैं.....

लांबलेल्या व्यायामाला आवरतं घेत घरातील कामांकडे मी मोर्चा वळवला...मुख्य काम म्हणजे कुंड्यांची साफसफाई...झाडांना पाणी घालत असतांना सोनू निगमच्या आवाजातील हे गाणं कानी पडलं.  अगदी सक्काळ सक्काळ कोणाचा हार्टब्रेक झाला असेल, असा चटकन विचार मनात आला...पण नंतर या गाण्याबरोबर हातोड्याचे आवाज कानी पडले...ड्रिलींगमशीनचाही आवाज या गाण्यात मिसळला...कोणाकडे तरी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी चालू होती.  घरातील छोटीमोठी कामं चालू होती.  त्यासाठी आलेल्या कामगारांनी  सोनू निगमची गाणी लावली होती.   चित्रपटाचं नाव काय हे आठवण्याचा प्रयत्न करु लागले, तेवढ्यात सोनू पुढच्या कडव्यापर्यंत पोहचला....

ऐसे आये हैं, हो ऐसे हाये हैं
ऐसे आये हैं मैय्यत पे मेरी
जैसे शादी में आये हुए हैं
ऐसे आये हैं मैय्यत पे मेरी
जैसे शादी में आये हुये हैं
इश्क में हम तुम्हें क्या बताये..

त्याच क्षणी आठवलं...बेवफा सनम...1995 मध्ये आलेला चित्रपट...आपली मराठमोळी शिल्पा शिरोडकर आणि क्रिशन कुमार यांचा चित्रपट...हा चित्रपट गाजला का...हिट झाला का...हे आता लक्षात येत नाही...पण यातली सर्वच गाणी खास राहिली...1995 आणि त्याच्या आसपासची वर्षं म्हणजे, सोनू निगमच्या मोहिनी घालणा-या आवाजाचा काळ होता.  बेवफा सनमची गाणी बहुधा सर्वाधिक आवडली ती प्रेमात पडून जोरदार धडक लागलेल्या प्रेमविरांना...अगदी नाक्यानाक्यावर बेवफा सनमचं एक तरी गाणं कानावर पडायचं...फारकाय रिक्षासुद्धा  इश्क में हम तुम्हें क्या बताये.....म्हणत चालायच्या...तेव्हा अगदी तोंडपाठ असलेली गाणी अलिकडे थोडी हरवल्यासारखी झालेली....आता आवडत्या लिस्टमध्ये थोडाफार फरक झालेला...सकाळी आपलं मराठमोळं शास्त्रीय संगीत...नंतर मात्र दिवसभर सनम पुरी आणि जोडीला साऊथ इंडीयन गाण्याची धूम...रात्री मात्र रफी आणि ओपीदा....या सर्वांत ही 90 च्या शतकातल्या गाण्यांची गोडी कुठे हरवली असल्याची जाणीव झाली...इकडे सोनू गात होता...पुन्हा तेच गाण आलं... इश्क में हम तुम्हें क्या बताये...गाण्याच्या जोडीला ड्रिलिंग मशीनचा आवाजही होता...पण तांदूळातून खडे कसे बाजुला केले जातात, तसा कानांनी तो ड्रिलींगचा आवाज बाजुला सारला आणि सोनूच्या आवाजतल्या गाण्यात मन गुंतलं....

मौत ने हमको मारा है और हम
जिन्दगी के सताये हुये है...


सतत गाणी ऐकणं हा माझा आवडता छंद...घरात कुठल्याही कोप-यात असो टिव्हीवर गाण्याचं चॅनेल किंवा मोबाईलमध्ये युट्युबम्युझिकच्या सहाय्यानं गाणी सतत चालू असतात....ही गाणी म्हणजे संजिवनी ठरतात...ब-याचवेळा ज्या गोष्टी आपल्या आसपास असतात, त्यांचं महत्त्व कळत नाही, तशीच ही गाणी ऐकण्याची सवय.  पण कोरोनाकाळात या सवयीचा फायदा किती हे ध्यानात आलं.  मनात सतत भीती असायची...आता काय होणार...आता काय होणार....या भीतीवर ही गाणी कधी रामबाण उपाय ठरली हे कळलं नाही.  मनात विचार आले आणि सुरु असलेल्या गाण्यांच्या साथीनं ते कुठल्या कुठे पार निघून गेले. 

चांगल्या गाण्याचा शोध घ्यायचा आणि ती गाणी मोबाईलवर वाजवायची...मग त्या नादात घरातली कामं भराभर करायची...पण या सर्वांत ओ पी नय्यर...आशाताई...लता मंगेशकर, महम्मद रफी आणि माझा आवडता अभिनेता शम्मी कपूर यांच्या गाण्याची साथ कधीही सोडावीशी वाटली नाही....आत्ताही नाही...अगदी दिवसभर स्वयंपाकघरात जाणार म्हटल्यावर ओपीदा सोबत असणारच...त्यांच्या सोबतीनं कितीही अवघड आणि किचकट पदार्थ असला तर तो निवांतपणे आणि छान होणार याची खात्री असते. 


दिवाळीचा फराळही तसाच...शक्यतो रात्री दहा वाजता फराळ करायला सुरुवात करायची...खाज्याच्या करंज्या आणि शंकरपाळ्या...शेव...अगदी पहाटे तीन तरी हमखास वाजणार...पण मजाल आहे की डोळ्यावर झोप येईल....कारण सोबतीला ओपीदा आणि शम्मी...या दोघांच्या गाण्यांच्या साथीनं मी आत्तापर्यंत प्रत्येक दिवाळीचा फराळ केलाय...फराळाबद्दल कौतुक झाल्यावर मी प्रथम या दोघांचेच आभार मानते...अर्थात हे मनातल्या मनात...सुरुवातीला लेक माझ्या गाण्यांच्या आवडीवर खूप हसायचा...इंग्रजी शाळेत शिकलेली ही पोरं...मराठी आणि हिंदी गाणी यांच्या पचनी नाही...त्याला अलिकडे कोरीयन गाण्यांचं वेड लागलेलं....त्यांनं मलाही ही कोरीयन गाणी ऐकवली...त्यातलं संगीत कसं आहे,  त्याचे प्रकार हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला....त्याच्या समाधानासाठी मी हो हो...केलं...पण तेवढी आपली समजच नाही...आणि हे गाणं आपल्या मनात नाही....तर कृतीत कुठे येणार...गाणं मनात असलं की ते आपल्या व्यवहारात उतरतं...आता ओपींचं

लेके पहला पहला प्यार चालू असेल आणि दुसरीकडे पुरणपोळ्यांचा घाट घातला असेल...तर...हा घाट कधी पार होतो...हे कळतंही नाही...पण हे सर्व या पिढीला सांगण्यात आता तरी काही पॉईंट नाही, हे मी अनुभवनाने शिकले आहे.  गाण्यांबाबत जेव्हा जेव्हा आमच्याच चर्चा आणि नंतर वाद सुरु झाले, तेव्हा त्यांचा समारोप करतांना मी त्याला आवर्जुन सांगते...तू वयाची पस्तीशी पार केलीस की सर्व जग सोडून आपल्या या रफी, लता, आशा, शम्मा, ओपीदा यांनाच शरण येशील....जग गोल आहे बाळा....गाण्यातही....फिरुनी येशील तू....

नशा म्हणतात ती ही...गेल्या काही वर्षात गाण्यांच्या लिस्टमध्ये साऊथच्या गाण्यांचा शिरकाव झालाय.  नानी, अल्लू अर्जून, साई पल्लवी, सूर्या हे कलाकार आवडायला लागले आणि त्यातून डीएसपी या अप्रतिम अशा संगितकाराचा सूर आवडला.  ही साऊथची हिट ठरलेली गाणी माझ्या प्लेलिस्टमध्ये कधी आली आणि मानाची जागा पटकावून बसली हे कळलं नाही.  त्यातल्या एकाही गाण्याचा मराठी किंवा हिंदी अर्थ शोधायचा मी कधीही प्रयत्न केला नाही...महत्त्वाचं आहे, संगीत...ताल धरायला लावणा-या या संगितानं मोहिनी घातलीय हे नक्की...अगदी घरात एकटी असतांना म्युझिक सिस्टिमवर मोठ्या आवाजात ही गाणी लावायची...एकाकीपणा कुठल्याकुठे पळून जाणार...बरं त्या साऊथच्या गाण्यांचा तालच असा असतो की कामांचा उरकंही वाढतो...अगदी ते  साऊथचे हिरो धडाधड फाईट सीन करतात तसंच घरचं काम फटाफट होतं...मग चांगला वेळ राहिल्याची जाणीव होते...त्यानंतर हातात येतो तो कॉफीचा मग आणि सनम पुरीच्या गाण्यांची


साथ....

गाण्यांचा हा सगळा सरगम मनात चालू असतांना खाली सोनू निगम अगदी टिपेला गेला होता...प्रेमाची परिसीमा वगैरे म्हणतात...ती चालू झाली होती...

अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का
यार ने ही लुट लिया घर यार का...

एखादं गाण अचानक कानी आलं की दिवसभर तेच तोंडात रहातं तसं या गाण्यांबाबत चालू झालं...अचानक खालून गाण्यांचे स्वर कानी पडत गेले...आणि मग तेच गाणं मनाबरोबर खेळत राहीलं...दिवसभर बेवफा सनम...दुपार उलटून गेली...माझीही गणपती बाप्पांसाठी खरेदी बाकी राहीली होती...संध्याकाळच्या गर्दीपेक्षा दुपारची खरेदी बरी म्हणून मी निघायच्या तयारीला लागले...आणि अखेर गाण्यातील बहुधा सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या कडव्याच्या ओळी कानावर पडल्या...

आज ही हमने बदले हैं कपड़े
आज ही हम नहाये हुये हैं..

अरे देवा...आता हेच मनात रहाणार...म्हणून मी आपसूक या गाण्याकडे पुन्हा ओढले गेले...घरातून बाहेर पडतांना मनात तेच चालू होतं...आज ही हमने...आता पुढचा दिवस यातच जाणार बहुधा म्हणत मी रिक्षाला हात केला....पण दिवस खास होता...रिक्षा थांबली आणि आपल्या आशाताईंचा आवाज कानावर आला...


मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है....

मी फक्त स्टेशन एवढाच शब्द बोलले...एरवी कुठेही जायचं आणि रिक्षात बसायचं असेल तर किती पैसे हे ठरवून घेते...पण आता नाही....आशाताई पुढे गातच होत्या....

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है....

ओ ओ ओ सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हे...

और मेरे एक खत में लिपटी रात पडी है...

वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो....

आम्ही दोघंही लयीत होतो...रिक्षावाला आणि मी सुद्धा...मन शांत...प्रसन्न...सोनू निगमनं सुरु केलेला प्रेमातील धोक्याचा प्रवास आता पुढच्या टप्प्यावर गेला होता...गाणी आपल्याला आपल्या सोबत नेतात...तशीच मी सुद्धा पुढे गेलेली...नेमकी पावसाची सर रिक्षा सोडतांना आली...रिक्षा थांबली तिथेच पावसाचं पाणी साठलं होतं...पण कसलीही चिकचिक नाही....मनात आता आशाताई होत्या...सगळं निवांत...सुरेल आणि सहज...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

Comments