ओवसा....नवविचारांचा.....
बघू कुठे आहे तुझा ओवसा...देवासमोर मांडलास का...म्हणत मी शालिनीच्या गणपतीबाप्पासमोर शोधू लागले...त्यावर त्या मायलेकी हसू लागल्या...शालिनी आणि तिची लेक निशी...मी प्रश्नार्थक नजरेने दोघींकडे बघितल्यावर शालिनी म्हणाली, तुझ्या विचारांची छाप पडलीय तिच्यावर...काळाप्रमाणे चालावं म्हणाली...परंपरा कराव्यात पण त्या आजच्या परिस्थितीनुसार डिमोल्ड करायला हव्यात, असं म्हणतेय, ही तुझी लाडकी भाची...त्यामुळे ओवसा भरला...पूजला पण कोणाला दिला ते विचार तिला...अनोखी कल्पना मांडली तिनं आमच्यासमोर...आम्हाला थोडं खटकलं...पण तिला आणि तिच्या सासरच्यानांही आवडला तिचा विचार...त्यामुळे आम्ही हुश्श केलं...तू बोल तिच्याबरोबर, मी फराळ, कॉफी आणते, तुझ्यासाठी...असं म्हणत शालिनी आत गेली आणि निशीनं मला हात धरून तिच्याजवळ बसवलं...
शालिनी आणि निशी या मायलेकींची ओळख स्कॉलरशिपच्या परीक्षांमुळे झालेली. निशी माझ्या लेकापेक्षा जवळपास आठ-नऊ वर्षांनी मोठी. एकुलती एक लेक. त्यामुळे शालिनी आणि ती नेहमी एकत्र असायच्या. निशी प्रचंड
हुशार. सगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेली. माझा लेक अगदी लहान असतांना एका पुस्तकांच्या दुकानात या मायलेकींची ओळख झाली. तेव्हा बहुधा निशीनं दहावी पार केली होती. तिचं पुढचं ध्येय नक्की होतं. जेईई या परीक्षेचं नाव मी तिच्या तोंडी पहिल्यांदा ऐकलं असणार...तेव्हा मी या जगात नवखी होते. एक अनुभवी म्हणून शालिनीचा नंबर घेतला. नंतर काही अडचण वाटली तर तिला फोन करत राहिले. तिनेही पुढे निशीची पुस्तकं आणि पेपर मला दिले. काहीवेळा निशीनं लेकाला कठिण वाटलेले प्रश्न सोडवायला मदत केली. एकूण काय माझं आणि शालिनींचं मेतकुट छान जमलं. निशी जेईईच्या मार्फत कर्नाटकमध्ये एक इन्स्टीट्यूटमध्ये गेली. बीटेक केलं आणि तिथूनच एमटेक...या दरम्यान शालिनी ब-याचवेळा माझ्याकडे हक्कानं यायची. आमची लायब्ररीही एक...त्यामुळे भाजी...लायब्ररी...असा अनेकवेळा दौरा व्हायचा...निशी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाईल असा आमचा अंदाज होता. पण तिच्यासोबत शिकत असलेल्या एका बंगलोरच्या मुलासोबत तिनं लग्न करण्याचा निर्णय
घेतला. दोघंही एकाच वर्गात...निशी आणि तिचा मित्र कृष्णा...दोघंही एमटेक झाले आणि एकाच आयटी कंपनीत जॉईन झाले. दोघांनीही आपल्या कुटुंबाची ओळख करुन दिली आणि लग्नाचा निर्णय सांगितला. दोघंही एकुलते एक...कृष्णाच्या आईवडीलांनीही होकार दिला. इथे शालिनीही तयार झाली. फक्त लग्न बंगलोरला करण्याची अट ठेवण्यात आली, तेवढयावरुन शालिनी नाराज होती. पण नंतर नवजोडपं चांगलं पंधरा दिवस शालिनीकडे रहायला आलं आणि शालिनी पुरती कृष्णाची आई झाली. एक जोरदार रिसेप्शन पार्टी दिली...कृष्णाच्या स्वभावानं आम्हा सर्वांनाच भुरळ घातली. आता ही निशी आणि कृष्णा बंगलोरलाच रहातात...काही वर्ष काम करुन स्वतःचं स्टार्टअप करण्याचा दोघांचाही बेत आहे. शालिनी आणि तिचा नवरा आता बराच वेळ तिकडे बंगलोरलाच असतात. अगदी कोरोनामध्येही दोनवर्ष शालिनी लेकीकडेच राहिली...सगळे सण तिनं तिकडेच साजरे केले. अगदी घरचा गणपतीबाप्पाही जावयाकडे आणला होता....आता कोरोनाचं सावट निवळल्यावर लेकीनं आणि जावयानं या दोघांना इथे येण्याची परवानगी दिली. चार महिन्यापूर्वी ती आपल्या घरी रहायला आली. काहीदिवस साफसफाईमध्ये गेले. रुम बंद असल्यामुळे त्याचं काम करुन घेतलं. हे सगळं झाल्यावर तिनं आम्हा सर्व मैत्रिणींना ती परत आल्याचं कळवलं आणि गणपतीला नक्की या असा निरोप दिला. शिवाय निशीही येणार होती. यंदा गौरी पूर्वा नक्षत्रात येणार असल्यानं ओवसा होता. निशीचा ओवसा राहिला होता, तो ओवसा करण्यासाठी निशी, कृष्णा आणि त्याचे आई वडीलही येणार होते.
हे झालं निशीबद्दलचं...आता भेटलेली...माझ्या समोर असलेली निशी ही पार बदललेली होती. मी तिला ओळखायचे तेव्हाही ती स्वतंत्र विचारांची होतीच. पण आता निशी खूप परिपक्व आणि विचार व्यक्त करणारी वाटली. मी गणपतीबाप्पाच्या दर्शनाला गेले तेव्हा कृष्णा आपल्या आईवडीलांना घेऊन काही गणपती दाखवायला बाहेर गेला होता. सोबत निशीचे वडीलही होते. निशी त्यांची खुशाली सांगत म्हणाली, आई सारखं ओवसा ओवसा म्हणत होती, तेव्हा मी गुगल सर्च करुन सर्व माहिती घेतली. आईलाही विचारलं...तेव्हाच ठरवलं होतं की थोडं जुनं आणि थोडं नवं असा हा ओवसा करायचा...आम्ही सूपं घेतली...पण त्या सूपात नेहमी ठेवतात त्या वस्तू घेतल्या नाहीत...थोडा वेगळा ओवसा केला. पाच किलो तांदूळ, दोन किलो डाळ, तेल, साखर, डायफ्रुटची पाकीटं, फळं, साडी आणि पाकीटात पाचशे रुपये असं प्रत्येक सुपात ठेवलं....ही पाच सुपं गौरीपुढे ठेऊन त्यांची पुजा केली. आपण ओवसा केल्यावर ती सूपं आपल्या नातेवाईंकांकडे देतो ना...मी तसं न करता ती सूपं ज्यांना त्यांची गरज आहे, अशा बायकांना दिली. आई इथे आली तेव्हा घराची पार अवस्था झाली होती. आमच्याकडे काम करणा-या मावशींनी आईला खूप मदत केली. कामाचे पैसे किती हे न ठरवता त्या दिवसरात्र घराची साफसफाई
करत होत्या...त्यांना फक्त आई परत आल्याचा आनंद होता. त्या मावशींना एक सूप दिलं. दुसरं सूप आमच्या सोसायटीतल्या वॉचमनच्या बायकोच्या हाती दिलं. तिसरं सूप त्या आमच्या कोप-यावरच्या भाजीवाल्या मावशीला दिलं. मला एवढ्या वर्षांनी बघून तिला किती आनंद झाला माहिती आहे का....चौथं सूप सोसायटीमध्ये कचरा काढायला बाई येते तिच्या हातात दिलं...तिला त्यातलं सामान बघून खूप आनंद झाला...आणि पाचवं सूप कोणाला दिलं माहित आहे का...ज्या मावशीकडून ही सूपं खरेदी केली होती ना, तिलाच सांगितलं होतं, गौरीपूजेच्या दिवशी इथेच थांब म्हणून मी तुला एक गम्मत घेऊन येते...अग आजीच होती ती...मी तिच्या हातात भरलेलं सूप दिल्यावर किती खूष झाली ती...माझ्या चेह-यावरुन नजर काढल्यासारखे हात फिरवून बोटं मोडली....निशी बोलत होती....तिनं माझ्या चेह-यावरुन तसेच हात फिरवून दाखवले आणि तिच्या कानाजवळ जाऊन बोटं मोडली...आणि मोठयानं हसायला लागली...माझ्या डोळ्यात मात्र पाणी साठलं होतं....
कधी एवढी मोठी झाली ही....ती मात्र बोलत होती. अग मावशी, मला चांगला पगार आहे, कृष्णालाही...माझ्या
सासरचेही खूप चांगले आहे. आम्ही फक्त पैसे
साठवतोय, आमच्या व्यवसायासाठी....अशावेळी हे सण आम्ही आपल्या पद्धतीनं साजरे
करण्याचा निश्चय केलाय. तिकडे बंगलोरलाही
दिवळा-दस-याच्या वेळी शाळांमध्ये गरजेच्या वस्तू देतो. आता आईनं ओवसा सांगितल्यावर तो आपल्या आपल्यातच
देण्यापेक्षा आणि त्यांच्याकडून गिफ्ट मिळवण्यापेक्षा मला जे योग्य वाटलं ते मी
केलं. कृष्णाला विचारलं तेव्हा त्याचाही
होकार होता...त्यानं सांगितल्यावरच ही तुझी शालिनी नावाची मैत्रिण तयार झाली...लेकीपेक्षा
जावयावर तिचा विश्वास...असं म्हणत पुन्हा निशी हसायला लागली. आणि माझ्या डोळ्यात साठलेलं पाणी आपसूक ओघळायला
लागलं. कधी ग एवढी मोठी झालीस म्हणून त्या
वेड्या मुलीला मी जवळ घेतलं...शालिनी समोर होती...तिच्या डोळ्यातही असेच आनंदाचे
अश्रू साठले होते....लेक मोठी झाल्यापेक्षा लेक वैचारिक दृष्ट्या परिपक्व असण्याचा
तो आनंद होता. आमच्या गप्पा चालू असतांना
कृष्णा आणि त्याचे आई-वडीलही आले...कृष्णाच्या आईच्या हातची कॉफी झकास असते असा
शेरा निशीनं दिल्यावर त्यांनीही तेवढ्याच आनंदानं कॉफी केली...आणखी गप्पा आणि कौतुक झाल्यावर मी
निघतांना निशीसाठी घेतलेली भेटवस्तू तिच्या हातात दिली. तेव्हा हे काय, मी तर ओवसा दिलाच नाही ना
तुला...मग भेट कसली देतेस म्हणत निशी नाही म्हणू लागली. मग म्हटलं...अग वेडे तु मला आज विचारांचा ओवसा
दिलास....किती प्रगल्भ विचारांचा आहे हा तुझा ओवसा...त्याबद्दल तुझे आभार नको का मानायला....वय हा एक फॅक्टर आहे, तू लहान असलीस तरी वैचारिकदृष्ट्या आज मला खूप
शिकवून गेलीस....त्यासाठी ही छोटीशी भेट...म्हणत मी पुन्हा तिच्या हातात ती
भेटवस्तू दिली...निशीनं भेट हातात घेतली आणि मला मिठी मारली...दोघांनी नमस्कार
केला...निशीला...कृष्णाला घरी येण्याचं आमंत्रण देत मी त्यांचा
निरोप घेतला...माझ्या डोळ्यातल्या आनंदाला भरतं आलं होतं...काहीतरी नवं सापडल्याचा
आनंद त्यात होता....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
...
पूर्वा नक्षत्रांमध्ये गौरी
Comments
Post a Comment