मिळाली मिळाली...
गाभोळी मिळाली...
राईच्या दाण्यासारखी...पण रंगानी वेगळी...पांढरी आणि अगदी थोडा हिरावा रंग लावल्यासारखी राईच्या दाण्यांसारखी भाजी...लहान...लहान या छोट्या मण्यांच्या घडाची वेल...अशा दोन किंवा तिन वेलींचे केलेले वेटोळे...अगदी खेळाच्या रिंगएवढे...सर्व दाणेदार...क्वचित कधी मध्ये एखादं दुसरे हिरव्या रंगाचे पान असते...बाकी सगळा दाण्यांचा मामला...ही दाणेदार भाजी म्हणजे गाभोळीची भाजी...श्रावण महिना संपत आला की ही भाजी बाजारात डोकवू लागते. गणपती आणि नवरात्रीपर्यंत अगदी बहार आल्यासारखी गाभोळीची भाजी बाजारात दिसू लागते. पण ही काही नेहमीच्या भाज्यांसारखी भाजी नाही...त्यामुळे ती कोणाकडेही मिळत नाही. शक्यतो गावावरुन ज्या महिला भाज्या घेऊन येतात त्यांच्याकडे ही दाणेदार दौलत मिळते. बहुतांशी सर्वांकडे एकच भाव असतो. काहीवेळा हे दाणे वेगळे करुन मोठ्या पानांवर त्यांचा वाटाही लावला असतो. पण कसेही असले तरी ही भाजी घ्यावी...वेटोळे किंवा अशी सुट्टी केलेली....अगदी वर्षातल्या काही मोजक्या महिन्यात येणारी ही गाभोळीची भाजी म्हणजे, रानभाज्यांमधली दाणेदार दौलत म्हटली पाहिजे...चवीला एवढी भन्नाट की एकदा खाल्ली की पुढच्यावेळी भाजी कधी आणायची याचा बेत सुरु होतो. यावेळी भर गणपतीमध्ये ही भाजी काही मला मिळाली नाही. एकदा एका भाजीवालीच्या टोपलीत ही दाणेदार दौलत दिसली...तेव्हा मी मोठ्या आशेनं तिच्याकडे गेले होते, पण बाजुला उभ्या
असलेल्या महिलेनं पाचशे रुपये मोजून ती सर्वच गाभोळीची भाजी विकत घेतली होती....भाजीवालीनं त्या महिलेकडे बोट दाखवून हिनं सर्व घेतलीय...आता तुला हवी तर उद्याला आणते, असं म्हटल्यावर मी हिरमुले होते...आणि ती माझ्या बाजुची बाई, मणभर सोनं विकत घेतल्याच्या रुबाबात उभी होती....पण भाजी विकणा-या महिलेच्या वचनावर विश्वास ठेवून मी दुस-या दिवशी पुन्हा तिच्याकडे गेले. अगदी ताज्या ताज्या गुंडाळ्या होत्या गाभोळीच्या...पांढरे, पोपटी आणि थोडे हिरवेसर असे हे मण्यांचे घड बघताच माझी कळी खुलली...पन्नास रुपयाला तीन गुंडाळ्या...मी शंभर रुपयांची भाजी घेतली...कारण ती फक्त माझ्या घरापुरती मर्यादीत रहाणार नव्हती...नव-याचा डबा...मैत्रिणींचे डबेही हक्कानं जाणार होते...
गाभोळीच्या भाजीची आणि माझी ओळख पहिल्यांदा झाली ती ठाण्याच्या मार्केटमध्ये. ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिराच्या आसपास गावावरुन भाजी घेऊन आलेल्या भाजीवाल्या बसतात. याच भाजीवाल्यांकडे ही भाजी मिळायची. पहिल्यांदा गाभोळीच्या भाजीची ओळखच नव्हती. अगदी नावही माहित नव्हतं...एकदा उत्सुकता म्हणून विकणा-या बायकांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी फक्त भाजीचं नावच नाही तर नवीन म्हणून भाजी करण्याची पद्धतही सांगितली. पहिल्यांदा या भाजीचा एकच वेटोळं घरी घेऊन आले. सांगितल्याप्रमाणे भाजी साफ केली. अगदी त्या भाजीवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे भाजी साफ केल्यावर मोठ्या गाळणीत गरम पाणी घालून
भाजी साफ करुन ठेवली...आणि सढळ हातांनं तेल, कांदा, खोबरं घालून भाजी बनवली...अगदी घास घासभर पानात आली. तेव्हापासून श्रावण आणि नवरात्रीमध्ये गाभोळीची भाजी घरात यायला लागलीय.
ही भाजी साफ करायला जेवढी खटपट करायला लागते तेवढीच ती करण्यासाठीही खटपट करावी लागते....पण या सर्वातून हायसं कधी वाटतं जेव्हा पहिला घास तोंडात जातो तेव्हा...गाभोळीची भाजी करतांना हात थोडा ढिला सोडावा लागतो....अगदी तेलापासून सुरुवात होते. एरवी पालेभाजीला थोडं बेताचं तेल चालतं...पण ही गाभोळीची भाजी मात्र करतांना सढळ हाताचा वापरच चवदार ठरतो. थोडं जास्तीच तेल..ते गरम झाल्यावर चांगला...म्हणजे अगदी भरपूर लसूण ढेचून घ्यायचा...अगदी बारीक लसूण आणि मिरची तेलावर परतल्यावर बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा...या दरम्यान गाभोळीची भाजी साफ करण्याचा टास्क पार पाडावा लागतो. गाभोळीची भाजी वेटोळ्यात असते. हे वेटोळे झाडाच्या बारीक धाग्यानं बांधलेले असतात...ते सोडल्यावर गाभोळीची वेल मोकळी होते. एका वेटोळ्यात दोन किंवा तीन गाभोळीच्या वेली असतात. त्याला दाणेदार असे छोटे छोटे घड...गाभोळीची वेल एका हातात धरुन दुस-या हातानं हे घड अलगद पकडायचे मग हे दाणे मोकळे होतात...या सर्वांत एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करत ठेवायचं...गाभोळीचे दाणे साफ झाल्यावर मोठ्या गाळणीत भाजी घेऊन पाण्याखाली धरावी...मी एका मोठ्या भांड्यात एक गाळणी ठेऊन त्यात ही साफ केलेली गाभोळी ठेवते आणि त्यावरुन गरम पाणी टाकते. थोडावेळ गाभोळीचे दाणे गरम पाण्यात राहिल्यावर शिजतातही आणि त्यातली बारीक मातीही साफ होते. असे साफ झालेले आणि
अर्धेअधिक शिजलेले गाभोळीचे दाणे मग परतलेल्या कांद्यावर घालायचे. भाजी चांगली परतून अगदी थोड्यावेळासाठी झाकण ठेवावे. गॅस बंद करतांना परत सढळ हातानं वरुन ओलं खोबरं पेरायचं...की भाजी तयार...ही गाभोळीची भाजी कुठल्याही भाकरीबरोबर सरस लागते. तांदळाची, ज्वारीची किंवा नाचणीची अश्या कुठल्याही भाकरीबरोबर गाभोळीची भाजी चटकदार लागते. मी तर काहीवेळा हौस म्हणून या तिनही प्रकारच्या छोट्या छोट्या भाक-या करते. शेवटी ही भाजी काही रोज मिळत नाही...वर्षाकाठी घरात चार ते पाचवेळा येणारी ही भाजी करतांना थोडी धावपळ झाली तरी तिचा स्वाद घेतांना एवढे लाड करायला काहीच हरकत नसते.
गाभोळीची भाजी माशाच्या गाभोळीसारखीच दिसते. माशाची गाभोळी शिजल्यावर या भाजीसारखीच दिसते. अर्थात चवीत फरक आहे. तरीही श्रावणात आणि नवरात्रीमध्ये मिळणारी ही भाजी खवय्यांसाठी वरदान ठरते. कारण या महिन्यात मासे घरात आणता येत नाहीत...मग दुधाची तहान ताकावर...त्या न्यायानं गाभोळीची भाजी माशांची कसर भरुन काढते.
या गाभोळीला काही जण चुणभाजीही म्हणतात...पण मला नक्की माहित नाही. मी ज्यांना ओळखते, आणि ज्यांच्याकडून भाजी विकत घेते, ते सर्वजण गाभोळी हाच शब्द या भाजीसाठी वापरतात. त्याच्या बारीक दाण्यांमुळे हा शब्द प्रचलित झाला असावा. अर्थात या भाजीची चव एवढी अफलातून आहे, की त्याचं दुसरं नाव काय...त्याचे फायदे-तोटे काय हे जाणण्याचा मी प्रयत्न केला नाही. हां पण तुमच्यापैकी कोणला माहित असेल तर नक्की शेअर करा...म्हणजे ही माहिती अन्य खवय्यांपर्यंत पोहचायलाही मदत होईल. एकूण काय हा आठवडा या भाजीत गेलाय...मी घेतलेली गाभोळीची भाजी रात्री उशीरा साफ करुन ठेवली होती. नव-याचा डबा सकाळी सातला तयार लागतो...त्या घाईत होणारं हे कामचं नाही. त्यामुळे त्याचा ऑफीसचा डबा
भरुन दिला. एक-दोन मैत्रिणींचे डबे भरुन त्यांच्यापर्यंत पोहचवले. दुपारच्या जेवणात मग मी आणि ही गाभोळीची भाजी. सोबतीला नाचणीची भाकरी...बाकी पापड, लोणचं...चटणी हा प्रकार काही नाही...एक एक घास घेतांना भाजीची चव जाणवत होती. गाभोळीच्या भाजीचा प्रत्येक दाणा अन दाणा खुललेला...या चवदार दाण्यांमुळे हा साधासा बेत संपवतांना चांगला तास तरी लागला...आणि हो...या गाभोळीच्या भाजीपुढे जेवतांना एकदाही हात मोबाईल किंवा टिव्हीच्या रिमोटकडे गेला नाही...हेच या भाजीचं यश...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
दाने दाने पे लिखा हैं खाने वाले का नाम. पण हाय रामा, या कुठल्याच दाण्यावर आमचे नाव नव्हते हे खरे सत्य.नवीन माहिती मिळाली. 👍👌
ReplyDeleteधन्यवाद....
DeleteKhup chhan
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteएकदाआम्हांलापण करून पाठव
ReplyDelete