वाढीव पान.....

 

वाढीव पान...

हम नही आयेंगे...किसी के घर का खाना हम नही खाते...अपना खाना बनाकर लाते है...वोही खाते है...बाकी आपको देना है तो बिस्किट या फ्रूट दे दो...वो चलेगा....ही चार हिंदी वाक्य माझ्यावर फेकत तो निघून गेला.  चार दिवसांपर्वी घरात पितृपक्षातले श्राद्ध होते...त्याला चार ते पाच प्रकारच्या भाज्या...तळलेले पदार्थ...गोडाचे दोन-चार प्रकार...हे सर्व करतांना भारी वाटलं...अगदी बेतानेच केलेला हा स्वयंपाक नंतर बराच झालाय याची जाणीव झाली.  एवढं संपवायचं कसं...हा प्रश्न पडला...मग वॉचमनची आठवण झाली.  त्याला बोलवूया जेवायला...म्हणून त्याला वर बोलवून घेतलं...आज हमारे घर खाना खाना...असं म्हटलं...त्यानं आत डोकावून विचारलं...पूजा किया क्या...तेव्हा हो म्हणाले,  मग या माणसानं सरळ सुरुच केलं.  हम किसी के घर खाना नही खाते...आपको चाहिऐ तो फ्रुट दे दो...आप बिस्किट देते है ना वैसे दे दो...पर पका हुआ खाना नही चाहिए...असं म्हणून तो सरळ चालता झाला.  काही वेळ मलाच समजलं नाही तो काय म्हणाला...पहिल्यांदा खूप उद्धट वाटलं...माझा मी पणा आला...आपल्याला नाही म्हणतो म्हणजे काय.  आपण काय त्याला खराब अन्न देत होतो का....वरुन फ्रूट पाहिजे म्हणतो...शहाणाच आहे...वगैरे वगैरे विचार मनात आले.  यशावकाश नैवेद्य दाखवून झाला.  आमचे जेवण झाले.  जे काही राहीले, ते सरळ फ्रिजमध्ये गेले.  दोन दिवस हेच खाऊ पण आता कोणाला विचारणार नाही, असं म्हणत...पुन्हा मी आणि नवरा त्या वॉचमनच्या वाक्यांना घेऊन बसलो.  एरवी खूप चांगली असलेली व्यक्ती मध्येच बिनसल्यावर कशी वागते, तसंच त्याचं वागणं होतं...शेवटी कंटाळून सोडून देऊया...यापुढे त्याला विचारायचं नाही, असं म्हणून हातात पुस्तक पकडून वाचनात मन रमवायला लागलो.

संध्याकाळी थोडी पावसानं उसंत मिळाल्यामुळे चहा-कॉफी घेतल्यावर दोघंही चालायला म्हणून बाहेर पडलो.  खाली तो  वॉचमन बसला होता.  त्याला समोर बघितल्यावर आता हसायचं की नाही अशी पंचायत झाली.  त्यानं मारलेले डायलॉग आठवले आणि माझा मी पणा माझ्यावर स्वार झाला.  मान वळवून चालायला लागले.  तेव्हा मॅडमजी आप नाराज हो गये क्या, म्हणत तोच मागे आला.  माझ्या ऐवजी नव-यानं उत्तर दिलं...नही नही.  हम ठिक है, म्हणत आम्ही त्याला टाळू लागलो.  त्यावर अरे आपको ऐसे नही बोलना था...पता नही कैसे निकल गया...मैं भी सोचता रहा...आपको कैसा लगा


होगा....माफ किजिऐ, म्हणत त्यानं हात जोडले....वो लोग घर पर बुलाकर कभी कभी कुछ भी खाने को देते है इललिये बोला...पर मेरे बोलनेका तरीका गलत था....माफ किजीए, आप अच्छे लोग है...म्हणत त्यानं आमच्यासमोर हात जोडले....काही क्षणापूर्वी आलेला माझा मी पण कुठल्या कुठे पळून गेला.  त्यानं हात जोडल्यावर तर अधिकच संकोचल्यासारखं झालं.  कोणी बघितलं तर काय म्हणतील म्हणून नजर इकडे तिकडे फिरायला लागली.  ठिक है म्हणत आम्ही चालायला लागल्यावर तो पुन्हा मागे आला...अक्षरशः गेटवर त्यानं आडवलं...एकदा म्हणे कोणीतरी जेवायला बोलावलं होतं...आणि घरातल्या मृत व्यक्तीच्या नावानं त्याला जेवायला वाढलं...त्या व्यक्तीला जे जे आवडतं ते ते त्याला खायला लावलं...ही गोष्ट या माणसाच्या मनाला खूप लागली.  आपल्याला कोणा एका मृत व्यक्तीच्या नावानं खायला दिलं हे मनात बसलं...एरवी ते कुटुंब या वॉचमनला फारशी किंमत देत नव्हतं...जेवल्यावर त्याला हात जोडून त्याच्याहातावर काही पैसे दिले आणि पुन्हा नमस्कार केला.  या घटनेनं हा वॉचमन मनातून खूप दुखावला...वॉचमन असला तरी तोही माणूसच की...आपण कोणा मृत व्यक्तीच्या नावानं जेवलो....हेच त्यानं मनात ठेवलं...आमच्याकडे जेवायला बोलावल्यावर त्याच्या मनात या मागच्या गोष्टीची उजळणी झाली आणि त्याचा उद्वेग बाहेर पडला इतकच...

आम्ही दोघांनीही त्याची बाजू ऐकून घेतली.  आणि आता माफी मागायची वेळ आमची होती.  एरवी घरात काही कार्यक्रम असेल तर आठवणीनं आधी त्याची डीश तयार केली जाते, आणि त्याच्यापर्यंत पोहचवली जाते.  अगदी महिन्याचे सामान भरतांनाही त्याचा खाऊ असतो.  बिस्कीट आणि टोस्टचे पुडे....ते हातात दिल्यावर तो नेहमीप्रमाणे ते डोक्याला लावून नमस्कार करणार...हा नमस्कार आम्हाला नसायचा तर त्या अन्नाला असायचा....आता चालतांना त्याचाच विचार...अनेकदा एखादा प्रसंग आपल्याला नवीन संदेश देऊन जातो, तसाच हा प्रसंग आमच्यासाठी ठरला.  एरवी घरात किती कार्यक्रम होतात.  पण एक वाढीव ताट लावावं आणि त्याला वर बोलवून जेवायला द्यावं असं कधी सुचलं नाही.  दिवाळी-दस-याला त्याच्यापर्यंत डीश पोहचवली जाते.  पण बाबा आज घरात येऊन जेव, हे वाक्य कधी आलं नव्हतं...आमची ही चूकच


होती.  त्यालाही सण-समारंभ आहेत.   कुटुंब आहे.  पण ते सर्व दूर...दूरदेशी...हा इथे एकटा...आपल्यासाठी सकाळी काहीतरी बनवतो...आणि दुपारी त्यावरच आपलं पोट भरतो...अशात त्याला कधीतरी घरी जेवायला बोलवायचं सुचलं कसं नाही हा प्रश्न आता आम्हाला सतावू लागला होता.  त्याला कोणाच्यातरी नावानं जेवायला बोलावण्यापेक्षा त्याच्याच नावानं बोलावून जेवायला देणे महत्त्वाचे होते.  साधा वॉचमन असला तरी तो माणूस होता...त्याचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, हे मान्य करायला हवं होतं...आम्ही दोघंही याच विचारातून जात होतं....कुठंतरी चुकलं होतं...आता  वेळ होती चूक दुरुस्त करण्याची.   त्यासाठी काय करायचं हे ठरवायला लागलं.  येत्या नवरात्रात आणि दिवाळीतही त्याला हक्कानं जेवायला बोलवायचं, असं ठरलं.  नेमकं तेव्हाच समोर फळवाल्याची गाडी आली.  पुन्हा वॉचमनचे सकाळचे बोल आठवले.  नव-यानं गुपचूप त्या फळवाल्याला थांबवलं...दोन-तिन दिवस रहातील अशी फळं घेतली.  चालून झाल्यावर सोसायटीच्या आवारात गेल्यावर पहिल्यांदा ती पिशवी त्याच्या हातात दिली.   आता तो गहीवरला...अरे आप तो गुस्सा हो गये...मैंने माफी मांगी...गलतीसे हुआ...आप लोग कभी कुछ बोलते नही...भाभी हमेशा कुछ ना कुछ देती है...सुबह गलतीसे बोला...किसीका गुस्सा किसपे उतारा....म्हणत हात जोडू लागला...नव-यानं त्याचे ते हात पकडले....म्हणाला...ये सुबह के कारण नही....ये आपने हमे कुछ सिखाया इसलीए है....और खाने का तो आपको आनाही होगा...नवरात्रीमें एक दिन हमारे साथ आपको खाना खाना है...ये याद रखिऐ...एवढं बोलून नवरा वळला...त्या वॉचमननं ती फळाची पिशवी तशीच डोक्याला लावली होती...पण त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं....कधीकधी लहान-लहान वाटणारी माणसं आपल्या आधुनिक विचारांना खोडून तिथे त्यांचे विचार पेस्ट करतात...तसंच आज झालं होतं....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. माझी विनंती, लेख तुझे उत्कृष्ट च असतात, जरा शब्दांची मर्यादा कमीतकमी राखलीस तर अजून जास्त जणांना तूझ्या लेखाचा लाभ घेता येईल. 😊🌹🤝

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भाई...आता तुमच्यासाठी वेगळा लेख लिहिते....कारण अनेकांनी लेखाच्या शब्दांची संख्या वाढवावी असा आग्रह धरला आहे...

      Delete

Post a Comment