नाना-नानी आलेत घरी.....
शॉपिंग हा सर्वांचाच विकपॉईट...माझा तर यात पहिला नंबर लागेल. त्यात साड्या म्हटलं की अधिक उत्सुकता. माझ्या ओळखीचा एक सोलापूरचा ग्रुप आहे. ही मंडळी हातमागावर तयार केलेल्या साड्या आणि चादरी विकतात. वर्षातून एकदा त्यांचे प्रदर्शन शहरात लागते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर ओळख असल्यामुळे त्यांचा वॉटसअपवर मेसेज आला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी येण्याचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत पहिल्या दिवशी प्रदर्शनात पोहचले...साड्यांचे नवे प्रकार होते. डिझाईन छान...पण साड्यांची खरेदी करतांना सोबत चार मैत्रिणी हव्यातच...त्यामुळे मी काही साड्या पसंद करुन ठेवल्या आणि त्यांना दुस-या दिवशी दुपारी येण्याचे आश्वासन दिले....या प्रदर्शनातून बाहेर पडताच पहिला फोन श्वेताला केला. माझ्या या मैत्रिणीला साड्या खूप आवडतात...अगदी महिन्या दोन महिन्यांनी ती साड्या खरेदी करते. साड्या खरेदीत ती आम्हा सर्व मैत्रिणींची गुरु आहे. त्यामुळे मी श्वेताला पहिला फोन केला...साड्या खरेदी करुया...आठवडाभर प्रदर्शन आहे. दसरा आणि दिवाळीसाठी खास साड्या आहेत. तू उद्या मोकळी असलीस तर
आपण जाऊया...मी बाकीच्यांनाही सांगते. सर्वजणी दुपारी जाऊया...तू माझ्याकडे येणार की मी तुझ्याकडे येऊ ते बोल...असे घाईघाईत मी श्वेताबरोबर बोलत होते. साड्या म्हटल्यावर श्वेताच पहिली येणार हे मला माहित होतं...पण यावेळी श्वेताचा काहीच प्रतिसाद नव्हता...मी पुन्हा विचारलं...श्वेता...अग ऐकतेस ना...जाऊया ना खरेदीसाठी...तेव्हा पलिकडून श्वेताचा हळूवार आवाज ऐकू आला...नाही जमणार ग...काय सांगतेस...साड्या नकोत...का ग..म्हणून मी तिला पुन्हा तेवढ्याच घाईत विचारले...तेव्हा ती तशाच हळूवार आवाजात म्हणाली...अग नाना-नानी आलेत घरी....
श्वेताचे हे शब्द ऐकून माझा उत्साह एकदम कमी झाला.
मी फक्त ओके म्हटलं...आणि फोन ठेवला....डोळ्यासमोर नाना-नानी आले. श्वेताचे सासू-सासरे. साता-याची मंडळी. गावाकडे मोठी शेती. गावाला राहून शेती आणि गावावर प्रेम करणारे जसे
असतात तसेच हे नाना-नानी. शरद, श्वेताचा
नवरा बारावीपर्यंत गावीच होता. नानांचे
गावचे घर म्हणजे मोठा बंगलाच आहे. सर्वच
ऐसपैस...शरद बारावीनंतर इंजिनिअरींगसाठी शहरात राहिला. नंतर त्याला नोकरी लागली. दरम्यान नोकरी करतांना आणखीही पूरक अभ्यासक्रम
पूर्ण केले. प्रमोशन मिळाले. नंतर ती नोकरी सोडून आणखी चार नोक-या
बदलल्या. आता ज्या कंपनीत शरद
स्थिरावल्यासारखा झालाय ती परदेशी कंपनी आहे.
त्यामुळे दोन-तीन महिन्यातून एकदा
तरी परदेशी वारी ठरलेली.
शरद आणि श्वेताचे लग्न शरदच्या बहिणीच्या पुढाकाराने झालं. साधारण दहा वर्ष झाली असतील त्यांच्या लग्नाला. श्वेताचा मोठा मुलगा आठ वर्षाचा
आणि धाकटी मुलगी पाच वर्षाची. मुलाच्या शाळेच्या अँडमिशनच्यावेळी श्वेता माझ्या घरी आली होती. तिला माझ्याच एका मैत्रिणीनं माझ्याकडे पाठवलं होतं. मुलाचं अँडमिशन झालं आणि तेव्हापासून श्वेता आमच्या मैत्रिणीच्या कंपूमध्ये सामिल झाली. श्वेता आता पूर्णवेळ घरात व्यस्त आहे. दोन्ही मुलांच्या मागे तिची धावपण चालू आहे. शरद ब-याचवेळा दौ-यावर. कोरोनामुळे काही महिने त्यांनी वर्क फ्रॉम होम केले. पण हवाई वाहतुकीवरील निर्बंध कमी झाल्यावर त्याचे दौरे चालू झाले. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी श्वेता एकटी सांभाळते. श्वेता ब-याचवेळा नाना-नानींना येण्याचा आग्रह करते. पण काहीना काही कारण सांगून ते टाळतात. शेतीची कामं तर वर्षभरासाठी असतात. पण न चुकता दर महिन्याला ते गावावरुन भाजी, फळं, कडधान्य पाठवतात. मात्र नाना काही शरदच्या घरी यायला तयार होत नाहीत. तेच नाना-नानी आता आलेत हे जेव्हा श्वेतांनी सांगितलं. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर श्वेतानं सांगितलेला प्रसंग उभा राहिला.
श्वेताचं घर मोठ आहे. तीन बेडरुम, हॉल, देवघर, स्वयंपाकघर आणि तीन टॉयलेट बाथरुम...शिवाय छोटीशी गॅलेरीही. शरदनं या घराचं इंटेरिअर अगदी आधुनिक पद्धतीनं केलं आहे. तो नेहमी देश-विदेशात दौ-यावर जातो. तिथे बघितलेल्या काही आधुनिक वस्तु मुद्दाम घरासाठी त्यांनी आणल्या आहेत. श्वेतानं या घराच्या घरभरणीला आम्हा सर्वांना आठवणीनं बोलावलं होतं. त्यावेळी आमची नुकतीच ओळख झालेली. आम्ही सर्व घर बघून भारावून गेलो होतो. किचन, मुलांची खोली, बेडरुम, देवघर...सर्व घर बघत कौतुक करत होतं. तेव्हा श्वतानं हात पकडून बाथरुममध्ये नेलं. तिथलं इटेरिअर बघून तर तोंडात बोटं घातली. वेगळ्या प्रकारचे नळ, त्याचे लॉक, लाईटची वेगळी पद्धत...शॉवरही दोन प्रकारचे...आमच्या सर्वांसाठी हे सर्व अगदी नवीन
होतं. आम्ही श्वेता आणि शरदच्या पसंदीचे कौतुक केले. शरदला अशा आधुनिक साधनांची आवड असल्याचे श्वेतांनी सांगितले. तेव्हाच गावावरुन आलेल्या श्वेताच्या सासू सास-यांना आम्ही पहिल्यांदा भेटलो. पांढरा शुभ्र झब्बा, लेंगा आणि टोपी घातलेले नाना आणि काठाची नऊवारी साडी घातलेल्या नानी...दोघंही सकाळीच मुलाच्या नवीन घराच्या पुजेसाठी गावावरुन आले होते. दोघांनाही नमस्कार करुन आम्ही निघालो. त्यानंतर चार-पाच दिवस श्वेता भेटली नाही. आठवड्यानंतर ती भेटली तेव्हा चेहरा उतरलेला होता. थकलीस का म्हणून विचारल्यावर घरी झालेला गोंधळ तिनं सांगितला. घरभरणीच्या दिवशी खूप गडबड झाली, म्हणून दुस-या दिवशी आराम करायचे श्वेतानं ठरवलं...अगदी आरामात उठण्याचे ठरवून श्वेता-शरद त्यांच्या बेडरुममध्ये गेले. नाना-नानीं त्यांच्या रुममध्ये. सकाळी नानांना लवकर उठण्याची आणि उठल्यावर चहा प्यायची सवय होती. श्वेता लवकर उठली नाही म्हणून नानी चहा करायला गेल्या. पण त्या गॅस शेगडीचे आणि त्यांचे काही जमेना. त्यांनी गॅसची सर्व नॉक चालू केले. पण त्यांना लायटर मिळेना. नानी अगदी बावरुन गेल्या. या नादात गॅस घरभर पसरला. वास यायला लागल्यावर नानी आणखी घाबरल्या...त्यांनी नानांना सांगितलं. मग त्यांनी गॅसचा ताबा घेतला. नानीं घाबरुन श्वेताला उठवायला गेल्या...श्वेता आणि शरद येईपर्यंत घरभर गॅसचा वास पसरला होता. त्यांनी पहिल्यांदा घराच्या खिडक्या उघडल्या...नाना-नानी दोघंही घाबरले होते. श्वेताही घाबरली. चुकून काही वाईट घटना झाली असती तर काय...शरद नानींवर वैतागला. त्यामुळे घरातलं वातावरण बदललं. त्यात अंघोळीला गेलेल्या नानांना गिझरच्या नळाचा अंदाज येत नव्हता. तो चालू राहिला...तिथेपण गोंधळ...पाणी चालू राहिलं...पाण्याच्या टाक्यां ओव्हरफ्लो झाल्या...घरभर पाणी पसरलं...नव्या घरात हे सर्व झाल्यामुळे शरद अस्वस्थ झाला. तो नाना-नानींवर भडकला. तुम्हाला येवढंपण येत नाही का..म्हणून त्याची चिडचिड सुरु झाली. नानींचीही तिच गत झाली. बाथरुममध्ये गेल्यावर बावचळल्या....कुठला नळ चालू करायचा तेच त्यांना समजेना. शेवटी श्वेतांनी
दोघांना गरम पाणी काठून दिले. आणि दोन थंड पाण्याचा बादल्या त्यांच्या बाथरुममध्ये भरुन ठेवल्या.
पण सकाळच्या घटनेनंतर घरातले वातावरण बदलले. मुलाच्या आधुनिक घरात नाना-नानींना
संकोचल्यासारखे वाटत होते. मंदिरात जातो असं
सांगून दोघंही सकाळचा नाष्टा करुन घराबाहेर पडले.
दुपारी परत येतांना नानी आधी आल्या.
नाना कुठे राहिले म्हणून शरद खाली नानांना बघायला गेला. तेव्हा त्याला नाना झाडाच्या अडोशाला जाऊन
लघुशंका करतांना दिसले. शरद पुन्हा
वैतागला. त्याला संकोचल्यासारखं
झालं. कोण काय म्हणेल वगैर शंका घेऊनच तो
घरात आला. त्याच्यापाठोपाठ नाना आले. घरात पुन्हा गोंधळ झाला. शरद, नानांना खूप बोलला. मुलाच्या स्टेटसचा काही विचार कराल की
नाही...हा मुद्दा महत्त्वाचा होता...घरात तीन बाथरुम आहेत. ते कमी पडलेत का...असे तो रागानं ओरडत
होता...नाना सर्व वेळ मान खाली घालून गप्प बसले होते...मग हळूच म्हणाले होते...अरे
पण मला त्यात जायला भीती वाटते. कुठला नळ
चालू करावा हेच समजत नाही. शरद यावर थोडा
शांत झाला. या गोंधळानंतर नाना-नानी
दुस-याच दिवशी गावाला गेले. हे सर्व
सांगतांना श्वेताच्याही डोळ्यात पाणी आलं होतं आणि माझ्याही....
त्यानंतर कोरोना आला...आणि नाना दोन वर्ष गावीच राहिले. आता जवळपास तीन वर्षाच्या अंतरानं नाना आले असावेत...आता श्वेताच्या तोंडातून नाना-नानी आलेत हे ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला. कारण या दोन वर्षात वर्क फ्रॉम होम करतांना शरदनं घरात आणखी काही बदल करुन घेतले होते. बाथरुम-टॉयलेटमध्ये हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरसाठी वेगळे नॉक केले होते. गरम पाण्याचा शॉवरचा नवीन प्रकार आला होता...शिवाय लायटींगही बदलली होती...श्वेता काही दिवसांपूर्वी हे सर्व कौतुकांनं सांगत होती. शिवाय किचनमध्ये आता गॅसलाईनद्वारे गॅस येणार होता. त्यासाठीही आवश्यक बदल करुन घेतले होते...आता नाना-नानी आल्यावर ते या आधुनिक घरात
कसे सामावले जातात याची काळजी लागून राहिली...नाही म्हणायला शरदला त्यांच्या कडून झालेल्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी नंतर नानांची माफीही मागितली. दोन पिढीमधील अंतर किंवा दोन संस्कृतीमधील अंतर असं काहीही म्हणा...दोन नाणी आपल्या आपल्या पटलावर ठाम आहेत. त्यात मध्ये आमची श्वेता...साड्या खरेदीपेक्षा श्वेताला आणि पर्यांयानं नाना-नानींना भेटण्याची जास्त गरज होती. मग पुन्हा फोनाफोनी....सर्व मैत्रिणींचा मोर्चा श्वेताकडे जाणार होता...नाना-नानींना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न करणार...एक प्रयत्न करायला काय हरकत आहे...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
प्रवाही आणि वास्तवदर्शी लेखन
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteदोन पिढ्यां मधल्या जगण्याचे,विचारांतले अंतर साध्या सरळ भाषेत सांगितलस! छान लेख!!
ReplyDeleteधन्यवाद..
Deleteअगदी वास्तव सोप्या भाषेत मांडलं खूप छान , असंच लिहीत रहा, आम्ही नक्की वाचू
ReplyDeleteधन्यवाद..
DeleteKya baat Tai
ReplyDeleteधन्यवाद..
Delete