म.....मठरीचा आणि मैत्रीचाही....
दिवाळी झाल्यावरचा दिवस म्हणजे सर्व आवरा आवरीचा...आदल्या दिवशी झालेली भाऊबीज....त्यासाठी झालेला लांबचा प्रवास...दिवळीसाठी काढलेले खास दिवे...सामान...त्यांना पुन्हा साफ करुन त्यांच्या जागी ठेवण्याची गडबड...याच गडबडीत एक फोन आला...दुपारची वेळ...त्यात अनोळखी नंबर...कुठल्यातरी स्किमसाठी फोन असेल म्हणून पहिल्यांदा दुर्लक्ष केलं...पण पुन्हा रिंग वाजल्यावर उचलला...पलिकडून प्रचंड प्रेमळ आवाज...नमस्कार और दिपावलीकी ढेरों शुभकामनाऐ...अशी हिंदीमधली साद...मी सुद्धा नमस्कार केला…पलीकडची महिला शब्दांची जुळवाजुळव करत असल्याचे भासले....तिनं पहिल्यांदा लेकांचं नाव घेतलं...मग मी स्तब्ध झाले...हो म्हटलं...आणि तिचे पुढचे बोल ऐकण्यासाठी आतुर झाले...पुढे त्यांनी लेकाच्या मित्राचे नाव घेतले. लेकाच्या मित्राची आई...पहिल्यांदा नातं स्पष्ट झालं...आणि मैत्रिची तार जुळली...पुढे ती काही वेळ बोलत राहिली...काही दिवसांपूर्वी लेकाला डबे पाठवले होते...त्यात मठरी नावाचा पदार्थ होता...त्या मठरीचा डबा लेकानं गेल्यागेल्या सर्व मित्रांना वाटला...त्यातली एक मठरी या महिलेल्या मुलालाही मिळाली....त्याला त्या मठरीची चव भारी आवडली. त्यांच्या घरी मठरी जवळपास रोज होते. पावसाळा किंवा थंडीमध्ये तर रोज संध्याकाळचा चहा
आणि मठरी हा खास कार्यक्रम असतो. अशी रोज मठरी खाणा-या मुलाला माझी मठरी वेगळी वाटली...चव आवडली. त्यानं थेट त्याच्या आईला सांगितलं...मी खाल्लेली मठरी वेगळ्या चवीची होती...तू त्यांना फोन करुन चौकशी कर...मग लेकानं माझा नंबर त्याच्या मित्राला दिला...मित्रानं तो त्याच्या आईला दिला आणि आईनं मला फोन केला...एका मठरीच्या चवीचा असा प्रवास एक नवीन ओळख देऊन गेला आणि सोबत आणखी एका मठरीची रेसिपी देऊन गेला....
सुमारे तासभर हा फोन चालला...गीताबाली नावाची नवी मैत्रिण झाली. तिचा लेकही माझ्या मुलाबरोबर शिकतोय. त्यांची तिकडे पक्की मैत्री झालीय आणि मठरीच्या चवीनं आम्ही आयांचीही मैत्री झाली. मी बनवलेल्या मेथीच्या खा-या मठ-या या नव्या मैत्रिणीच्या लेकाला भारी आवडल्या. रात्री अभ्यास करतांना या मठ-यांचा एक डबा मुलांनी साफ केला. सकाळी
उठल्यावर या बेट्यानं पहिला आपल्या आईला फोन केला. अशाच मठ-या कर म्हणून आग्रह धरला. मग माझा नंबर घेऊन तिला दिला, आणि रेसिपी विचार म्हणून आग्रह धरला. पहिल्यांदा ही नवी मैत्रीण, गीताबाली....त्याला नाही म्हणत होती. ऐसा कैसे फोन करेंगे....क्या कहेंगे...म्हणून ती मुलाला नकार देत होती. पण मुलाच्या आग्रहासमोर तिनं हार मानली...आणि मला फोन केला. बरं फोन केल्यावर सुरुवातीला अडखणा-या गीतानं तिला वाटणारी अडचण पहिल्याच फटक्यात सांगितली. त्यांच्याकडे म्हणे आठवड्यातले चार दिवस तरी मठरी नावाचा प्रकार रोज संध्याकाळी होतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर अशा कितीतरी मठ-या संध्याकाळी तयार होतात आणि चहाबरोबर फस्त होतात. अशा मुरलेल्या मठ-यांच्या जगात आमची मराठमोळी मठरी वेगळ्या चवीची भासली आणि भाव खाऊन गेली. म्हणून जरा संकोचतच गीताबालींन विचारलं...हमारे यहा रोज होती है मठरी...गरम गरम ही खाते है....डब्बे में रखते ही नही....और मेरे बेटे को आपकी अच्छी लगी...बताओ मुझे कैसा लगा...आपने ऐसा क्या किया जो मेरा बेटा आपकी मठरीपे खुश हुआ...म्हणत आईच्या मनाची प्रेमळ वेदना
माझ्याकडे व्यक्त केली. हे असं होतंच...आपण आपल्या मुलांसाठी जीव ओतून काही करायचं...आणि त्यांनी दुस-या घरातील पदार्थांची तारीफ करायची...अशावेळी त्या आईच्या मनाची काय अवस्था होत असेल तशीच अवस्था गीताबालीची झाली होती...
हा फोन आल्यावर पहिल्यांदा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या....तुमच्याकडे
वातावरण कसं आहे....प्रसिद्ध स्थळं याचीही चर्चा झाली. मग दोघींही हळूहळू मुख्य मुद्द्यावर
आलो...मठरी...हा असा प्रकार आहे की, जी करु ती चव आणि जो करु तो आकार...अगदी
व्यापक...चवीचे कुठलेही बंधन नाही तसेच आकाराचेही....नियम फक्त एकच की, मठरी
तोंडात टाकल्यावर एकदम कुरुकरु असा आवाज व्हायला हवा...आणि चव अशी की मठरी तोंडात
गेल्यावर त्या कुरुकुरीत आवाजाचा मागोवा घेत अगदी वेळखात मठरी साफ करायची...या
मठरी प्रकाराच्या अनेक चवी आमच्याकडे होतात...पण या प्रकारात महारत मिळाली ती
लॉकडाऊनच्या काळात...मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये अनेक प्रकारचे साचे घरी मागवले...अगदी
चोवीस वेगवेगळे आकार...बिस्कीट किंवा कटलेट करण्यासाठी, पण त्या आकाराच्या मठरही
करुन झाल्या....जेवढे आकार तेवढ्याच चवींच्याही मठ-या झाल्या.
अगदी फार कमी वेळात मठ-या हव्या असतील तर मैद्याचा वापर करायचा.
अन्यथा गव्हाच्या पिठाच्या मठ-या नंबर वन होतात. तशाच मठ-या मी नेहमी तयार करते. अगदी मेथी, पालक, पुदीना, लोणच्याचा खार, कोथिंबीर, टोमॅटो, वटाणा, गाजर, बिट, आलं, लसूण, मिरची...अशा सर्व प्रकारच्या मठ-या करुन झाल्या आहेत. कधी-कधी या सर्व चवींची भेळही करुन झालीय. कशाही असोत...त्या चवीला भारीच झाल्यात. अगदी दोन कप पिठामध्ये चार चमचे तेल टाकून पिठ चांगले मळायचे...कोरडेच...मग त्यात ओवा, जिरं, थोडी बारीक केलेली बडीशेप, धणेपुड, चाटमसाला, मिरचीची पावडर किंवा रवाळ कुटलेली मिरची...हे सर्व टाकून पुन्हा कोरडे मळायचे...आता त्यात आणखी चव हवी असले तर कसुरी मेथी घालायची...ताजी मेथी घालायची असेल तर मात्र थोडी काळजी घ्यावी लागते...मी एकदा कच्चीच मेथीची पानं टाकून मठ-या केल्या होत्या...पण त्या लवकर नरम पडल्या. पण ताजी मेथी टाकायची असेल तर ती तेलावर छान परतून घ्यायची...काहीवेळा त्या तेलात लसूण परतूनसुद्धा घेता येते...मग अशी परतलेली मेथी मठरीच्या पिठात घालून पिठ मळायचे....या सर्वात मिठ थोडं जास्त जास्त घालायचं आणि सर्वात शेवटी पाण्याचा वापर करायचा....अगदी बेतानं...सर्व छान घट्ट मळून झालं की वर तेलाचा हात लावून अगदी पंधरा मिनिटांसाठी हा गोळा तसाच ठेवायचा...आता यात पाण्याच्या ऐवजी टोमॅटोचा रस किंवा पालकचा रसही घालता येतो...काहीवेळा मी फक्त लसूण आणि आल्याच्या चवीच्याही मठ-या केल्यात...अशावेळी लसूण आणि सुंठीचा वापर केलाय...त्याच्या जोडीला फक्त जिरं आणि काळीमिरी पावडर टाकलीय...ही सर्व चव अगदी भन्नाट लागलीय...पंधरा मिनीटांनी या गोळ्याचे चार भाग करुन घ्यायचे आणि छान
पोळ्या लाटून घ्यायच्या. त्याच्यामध्ये तूप आणि कॉनफ्लॉवरचे मिश्रण लावायचे...एकमेकांवर ठेवलेल्या या चपात्यांचा रोल करायचा....थोडा हातांनी हळूवार दाबून मग त्याचे छोटे छोटे भाग कारायचे....मग शेवटचा टप्पा आणखी मजेशीर...तुम्हाला कुठला आकार हवा...आणि किती कुरकुरीत मठ-या हव्या तसा आकार करायचा...या गोळ्यांची छोटी पुरी लाटून...त्यावर पुन्हा तुपाचे मिश्रण आणि मग एक घडी...त्यावर पुन्हा तुपाचे मिश्रण आणि एक दुसरी घडी...मग या त्रिकोणी आकाराच्या झालेल्या पुरीला हलक्या हातानं अगदी थोडं लाटायचं आणि काट्यानं टोचायचं...जेणेकरुन पुरी फुलणार नाही...मग या पु-या गरम तेलात तळायच्या...गव्हाच्या पु-या करतांना फक्त तळतांना काळजी घ्यावी लागते...अगदी निवांत तळायचे...मंद आचेवर...ब-याचवेळा या पु-या आणखीही शॉर्टकट प्रकारे करता येतात. अगदी छोट्या छोट्या पु-याही लाटता येतात...ब-याचवेळा अंगठ्याच्या हातानंही त्या होतात...अशावेळी त्याच्यावर काट्यांनी टोचायचीही गरज नसते...फक्त तळतांना लागणारा वेळ तेवढाच होतो...अशा मठ-या छान तळून झाल्यावर झालंच की...
गिताबालीबरोबर बोलतांना या सर्व मठ-यांच्या प्रकाराची उजळणी झाली. तिच्या लेकांनं जी मी केलेली मठरी टेस्ट केली होती, त्यात मी लोणच्याचा
बाकी राहीलेला सार घातला होता...त्यासोबत कसुरी मेथी आणि जिरं, ओवा, बडीशेप या त्रयींचींही जोड दिली होती...गिताबालीनं माझ्या मठ-यांच्या चवीच्या विविधतेबद्दल माझं भरभरुन कौतुक केलं...आणि त्यांच्याकडे आता मैद्याऐवजी गव्हाच्या मठ-या करण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला असलेला आमच्यातला संकोच आता दूर झाला होता...एकमेकींकडे येण्याचे...अगदी रहायलाच येण्याचे आमंत्रणही देऊन झाले. आता आमच्यात फोनतर नेहमी होणार होता...मठरीसोबत आणखीही काही पाककृतींची देवाण घेवाण होणार होती...तासभराच्या गप्पानंतर एवढा वेळ बोलण्यासाठी पुरेसा नाही, याची जाणीव झाली....म पासून म्हणजेच मठरीपासून सुरुवात झाली होती...आणि आपल्याकडे जेवणातील वैविध्यता किती...अगदी आपल्या बाराखडीसारखी...त्यामुळे आमच्या नव्या मैत्रीत आता जेवणातील बाराखडी सुरु झालीय....ती जशी बहरत जाईल, तसाच तुमच्या आमच्यामध्येही तिचा सुवास दरवळत राहील....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
प्रवाही, सुगम लेखन
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteझकास च
ReplyDeleteतोंडाला पाणी सुटलं
धन्यवाद....
Deleteउत्तम लेखणी आणि सुगरण या दोन्हींचा उत्तम मिलाफ तुझ्या हातात आहे म्हणूनच तुझे लेख नेहमीच अप्रतिम असतात
ReplyDeleteधन्यवाद....
Deleteसई खूप छान रेसिपी आणि लेख सुद्धा!
ReplyDelete