असाही लग्न सोहळा.....

 

 असाही लग्न सोहळा.....


हे तुझ्यासाठी आग्रहाचं आमंत्रण....लग्नाला यायचं...अगदी आठवडाभर तू आम्हाला आमच्यासोबत हवीस...म्हणत अनघानं हातावर अक्षता दिल्या, सोबत एक साडी आणि त्यावर ठेवलेला मिठाईचा डबा माझ्या हातात दिला.  तिच्या सोबत होणारी नवरी, अनयाही होती...अनयानं लगेच मला नमस्कार केला, आणि ताई तू आमच्या सोबतच येणार ना...म्हणत गळ्यात पडली...मी हातात अक्षता आणि भेटवस्तू घेऊन तशीच उभी होते.  अनयाच्या पाठीवर थोपटायचे होते, पण त्याऐवजी डोळ्यातून पाणी येऊ लागले.  हातातल्या त्या वस्तू बाजुला ठेऊन डोळ्यातले आनंदाश्रू पुसले...माझ्यासह आमच्याघरी आमंत्रणासाठी आलेल्या सर्वांच्याच डोळ्यात पाणी होतं.  एक अनोखं लग्न पुढच्या महिन्यात होणार होतं.  अनोखं कशासाठी, तर अगदी अर्ध्या तासात हे लग्न जमलं...मुलगा लंडनला आणि मुलगी आमच्या शेजारी....दोघांच्याही घरातून फोन आले, आमच्या मुलीचं लग्न आणि आमच्या मुलाच्या लग्नासाठी कोणी असेल तर सांग...एकापाठोपाठ अगदी पंधरा मिनिटांच्या अंतरानं आलेल्या या फोननंतर मी फक्त दोघांनाही एकमेकांचे फोन नंबर दिले.  त्यानंतर अगदी पंधरा मिनिटानंतर पहिला टप्पा पार केल्याचा फोन आला, पत्रिका जुळल्या आणि पुढच्या पायरीवर लग्नाची बोलणी गेली.  त्याच लग्नाचे


आमंत्रण माझ्या हाती होते.  नव-या मुलीचा...अनयाचा खुललेला चेहरा सगळं सांगत होता...तितक्यात एक व्हिडीओ कॉल सुरु झाला.  हा नवरदेव...थेट लंडनवरुन...या फोनने सर्वांचे आनंदाच्या अश्रुंनी पाणावलेले डोळे, आणखी खुलले...पुन्हा आग्रह आणि लग्नाच्या तयारीच्या गप्पांचा फड रंगला....

आलेल्या पाहुण्यांची सरबराई झाली.  अनघा माझी मैत्रिण.  तिची धाकटी बहिण अनया.  अनघाच्या वडीलांचे एका आजारपणात निधन झाले, त्यानंतर आईही गेली.  तोपर्यंत अनघाचे लग्न झाले होते.  अनघावर धाकट्या बहिणीची जबाबदारी आली.  अनया बहिणीकडे रहायची...याचवर्षी तिनं एमबीए पूर्ण केलं.  तिचा निकाल हाती आल्यावर अनघानं फोन केला होता.  आता अनयाच्या लग्नाचं बघायचंय.  आईबाबांनंतर मी तिला माझ्या मुलीसारखं जपलंय...आता लग्नाची आणि कन्यादानाची जबाबदारीही माझीच.  तेव्हा कोणी ओळखीत चांगला मुलगा असला तर सांग म्हणून तिनं अनयाची पत्रिका पाठवली होती.  तिच्याबरोबर बोलल्यावर काही क्षणातच प्रज्ञा


या मैत्रिणीचा फोन आला.  फोनचं कारणही तेच...लग्नाचं.  तिचा भाऊ प्रज्ञेश लंडनला रहातो.  वयाची तिशी पार केलेली.  प्रज्ञेश जवळपास लंडनला स्थाईक झाल्यासारखा.  प्रज्ञा इथे रहाते आणि सासर सांभाळून माहेरचीही काळजी घेते.  आई-वडील प्रज्ञेशकडे जाण्याचं टाळत होते.   प्रज्ञेशनं लग्न करण्यासाठी त्यांचा आग्रह होता.  पण प्रज्ञेश करीअरच्या मागे लागलेला.  मात्र कोरोना काळात प्रज्ञेशचं मन बदललं.  घरात एकटा राहिल्यानं बहुधा कुटुंबाची किती गरज आहे, याची जाणीव झाली.  त्यानं लग्न करायला होकार दिला पण आई-वडीलांनाही तिकडे, लंडनला येण्याचा आग्रह केलाय.  प्रज्ञाच्या आई-वडीलांनी लगेच होकार दिला.  मुलाचं लग्न होणं महत्त्वाचं होतं.  त्यासाठी प्रज्ञाचा फोन आला.  तिनं प्रज्ञेशबाबत सांगितलं आणि आईबाबा कायम प्रज्ञेशसोबत रहाणार आहेत, त्यांना सांभाळून घेणारी मुलगी हवी आहे, असं सांगितलं.  काही मिनिटांपूर्वीच मला अनघाचा फोन आलेला.  माझ्यासमोर तिची बहिण अनया आली.  मी लगेच तिला अनयाची पत्रिका पाठवली.  तिनं आई-वडीलांना अनयाबद्दल सांगितलं.  आणि अवघ्या पंधरा मिनिटांनी तिचा पुन्हा फोन आला, अनया पसंद आहे, आम्ही भेटतो एकमेकांना म्हणून फोन नंबरची मागणी केली.  मी दोन्ही कुटुंबाला एकमेकांचे फोन नंबर दिले, आणि मोकळी झाले. 

दुस-या दिवशी प्रज्ञा आणि अनघा या दोघीही न सांगता माझ्याकडे सकाळी हजर झाल्या.  त्यांच्या चेह-याकडे बघून लगेच समजलं की लग्न ठरलं.  दोघीही आनंदी होत्या.  आदल्या दिवशी रात्रीच प्रज्ञेश आणि अनया यांचे फोनवरुन बोलणे झाले.  व्हिडीओ कॉल.  दोघांची पसंती झाली.  त्याच रात्री दोन्ही कुटुंबं एकत्र जेवायलाही गेली आणि तिथेच सर्व बोलणी झाली.  प्रज्ञेश आणि अनया या दोघांचीही लग्न


समारंभाबाबत काही खास मतं होती.  या सर्वांबाबतच या डिनर डिप्लोमॅसीमध्ये चर्चा झाली...एकूण काय दोन्हीही कुटुंब अवघ्या काही तासात एक झाली.  अनया एमबीए झाल्यावर नोकरी करणार होती.  पण प्रज्ञेशच्या सुचनेनुसार तिनं आणखी एका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.  अगदी दोन महिन्यांचा हा अभ्यासक्रम तिला लंडनमध्ये फायदेशीर होणार होता.  आता अनयाबाई बराच वेळ आपल्या होणा-या सासरी राहतात.  प्रज्ञेशच्या आईवडीलांना तिची सोबत मिळाली, शिवाय अनयाला जाणवणारी आईवडीलांची कमी भरुन निघालीय. 

प्रज्ञेश आणि अनयाची लग्नाबाबतची मुख्य अट होती म्हणजे लग्न शहरात करायचं नाही.  बाहेर करायचं.  त्यासाठी आलिबाग-पेण मार्गावरील एक फार्महाऊस पाच दिवसांसाठी बुक केलंय.  इथेच साखरपुड्यासह लग्नाच्या सर्व विधी होणार आहेत.  लग्नाला बोलवण्यात येणा-या सर्व नातेवाईक आणि पाहुण्यांचे वर्गीकरण करण्यात आलेय.  प्रत्येक सोहळ्याला अगदी मोजक्या पाहुण्यांना दोन्ही कुटुंबाकडून बोलवण्यात आलं आहे.  दोन्ही कुटुंबाकडे लग्नासाठी धावपळ करण्यासाठी आवश्यक असे मनुष्यबळ नाही.  त्यामुळे आपला आवाका ओळखून त्यांनी लग्नाच्या समारंभाची सर्व जबाबदारी संबंधित फार्म हाऊसवर सोपवली आहे.  ज्यांना लग्नाला बोलवले नाही, त्यांना भेटवस्तू आणि एक प्रेमळ पत्र पाठवण्याचे ठरले आहे.  दोन्ही घरातील या भेटवस्तू आणि पत्र एकाच दिवशी एका कुरिअर कंपनीकडे देण्यात येतील.  बरं दोन्ही कुटुंबानी लग्नाची मुख्य खरेदी, साड्या आणि कपडेही एकाच ठिकाणी घेतले.  नाशिकच्या येवल्यामधून ही सर्व खरेदी झाली.  लग्नात मराठमोळाच साज असणार म्हणून अनयानं शरारा...घागरा...या प्रकारात न जाता साड्या घेतल्या...नाशिकला जातांना मोठी यादी.  पाहुण्यांची नावं...त्यांची आवड...इथपर्यंत ती यादी परफेक्ट केली होती.


  दिवसभर हे साड्यांचं आणि प्रज्ञेशच्या कपड्यांचे शॉपिंग झाले. 

मुख्य मुद्दा होता तो जेवणाचा.  इथेही प्रज्ञेशचा आग्रह भारी ठरला.  तो गेली काही वर्ष आपल्या देशापासून दूर आहे.  त्यामुळे त्यानं आपल्या जेवणाचं महत्त्व खरं जाणलं आहे.  म्हणूनच लग्नाचा सर्व बेत अगदी मराठमोळा असला पाहिजे असा त्याचा आग्रह होता.  मुख्यम्हणजे ज्या भाज्या त्या फार्म हाऊसच्या भागात मिळतात, त्याच यावेळी असाव्यात असा त्याचा आग्रह होता.  फार्महाऊस मालकांनं मग त्या भागातील एका महिलागटासोबत ओळख करुन दिली.  या महिला लग्नसमारंभात जेवण करण्याच्या ऑर्डर स्विकारतात.  पण त्यांना शहरी भागातील पदार्थ बनवण्याचा अनुभव नव्हता.  प्रज्ञेशनं तेव्हाच व्हीडीओ कॉलवरुन त्यांना तुम्ही जे बनवाल तेच हवं म्हणून त्यांना होकार दिला.  आता या चार दिवसाच्या लग्न समारंभात सकाळी नाष्टाला अगदी उकडपासून पोहे, थालिपीठ, घावण्यापर्यंत सर्व असणार आहे.  जेवणात स्थानिक भाज्याच मुख्य असतील.  त्यात तोंडली, दुधी, भोपळा, शिराळी, कच्चे टोमॅटो यांचा समावेश आहे.  मुख्य म्हणजे जो तांदूळ वापरणार आहेत, तोही लाल तांदूळ असेल आणि तांदळाच्या, नाचणीच्या भाक-या असणार आहेत.  गोडात खरवस, मोदक, पुरणपोळी असा बेत असणार आहे.  माझ्याकडे आमंत्रण द्यायला आल्यावर ही मंडळी या जेवणाच्या मेनूबद्दलच बोलत होती.   फार्महाऊसमध्ये होणारा सोहळा आणि चार दिवसांचा मुक्काम म्हणजे लग्नाचे बजेट चांगलेच फुगणार होते.  मी तेव्हा ही शंका बोलून दाखवली...तेव्हा सर्व हसले होते.  अनयाचे होणारे सासरेच म्हणाले, आम्हालाही वाटलं, लग्न चांगलंच महागात पडणार म्हणून...पण तू जेवणाचा मेनू बघ ना...जेवणात कुठेही चार भाज्या....चार प्रकारचे भात...चार-पाच प्रकारचे गोडाचे पदार्थ असा बेत नाही.  सगळं मोजकंच आहे पण चवदार आहे.  आम्ही फार्म हाऊसमध्ये गेलो होतो तेव्हाच चव बघितली.  तोंडली घातलेला मसाले भात, भोपळ्याची रस्सा भाजी, बटाट्याची भाजी, उकडीची तांदळाची भाकरी, मोदक आणि काकडी-टोमॅटोची कोशिंबीर, साथीला पोह्यांची मिरगुंड एवढाच बेत होता...पण आम्ही सर्व पोटभरुन जेवलो आणि न संकोचता रात्रीच्या जेवणासाठी डबे भरुन जेवण घेऊनही आलो.  या सर्व जेवणाचे बजेट आपल्या शहरातल्या हॉलमध्ये लग्नात जे जेवणाचे ताट मिळते त्यापेक्षा खूप कमी आहे.  पण एकदा जेवल्यावर तू चव विसरणार नाहीस याची खात्री आहे. 


मला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नव्हती...माझ्यासोबत असलेल्या सर्वांच आनंदच सांगत होता.  चांगल्या चार-पाच तासानंतर ही दोन्हीही कुटुंब मला पुन्हा पुन्हा आग्रहाचे आमंत्रण करुन पुढच्या आमंत्रणासाठी गेली.  मी राहून राहून कौतुक करत होते.  एकतर लग्न अवघ्या काही तासात जुळले.  बरं जुळल्यावर सर्वांच्या आवडीनिवडी एकमेकांमध्ये अगदी फिट्ट बसल्या.  दोघाही कुटुंबांनी कुठलाही गोंधळ-गडबड न उडू देता, आणि आमच्यात हेच लागतं....असाच मानपान हवा वगैरे आवरणं बाजुला ठेवत एक कॉमन वही केली.  त्यात सामानाची आणि जी कामं करायची आहेत, त्याची यादी केली.  तुम्ही की आम्ही हा भाग न करता, ज्याला जसा वेळ मिळेल तशी ती कामं करीत आहेत.   आणि सर्वात मुख्य म्हणजे प्रज्ञेश-अनया आपल्या मतांबद्दल ठाम आहेत.  आपलं लग्न कसं असावं हे त्यांनी ठरवलं आहे, पण यात आपल्या आईवडीलांवर भार येऊ नये याचीही ते काळजी घेत आहेत.  म्हणूनच मी म्हटलं, की एक वेगळं लग्न....आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारं...जुन्या विचारांचा हात धरुन नव्याला सोबत घेणारं...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. समकालीन विवाहप्रथेचं मनोज्ञ शब्दचित्र

    ReplyDelete
  2. Very nice article Sai.It is an energizer to start a new style of Marriage event Management.I am very happy to read this.Thanks.

    ReplyDelete
  3. खूपच छान लेख. ओघवत्या भाषेत केलेलं हे वर्णन डोळ्यांसमोर त्या घटनांची चित्र उभी करतं.

    ReplyDelete
  4. खूप आवडले हे लग्न

    ReplyDelete
  5. म्हणतात ना रेशीमगाठी वरतून जुळून आलेल्या असतात त्याचं हे एक चांगलं उदाहरण आहे निमित्त मात्र सई आहे

    ReplyDelete
  6. Very nice Shilpa

    ReplyDelete

Post a Comment